Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

तिच्या गालावरची खळी..

Read Later
तिच्या गालावरची खळी..

सौ.प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 

विषय: आणि.. ती हसली 

उपविषय: तिच्या गालावरची खळी..

टीम सोलापूर..


"मॅडम मला माफ करा." गुन्हेगार गयावया करत होता.

"लाज नाही वाटली तुला तिची छेड काढताना? भर रस्त्यात तिला प्रपोज करताना? तुम्ही गुन्हे करता आणि बदनाम ती होते. आईवडिलांची इज्जत धुळीला मिळेल म्हणून ती आत्महत्या करते. तुमच्यासारखे नराधम जामीन मिळाला की सुटतात पण तिच काय ? तिचा जीव जातो. कुटुंब विस्कळीत होतं." केतकी गुन्हेगाराला फटके देत आक्रोश करत होती.जेव्हा ती इतकी हायपर व्हायची तेव्हा त्या पोलीस स्टेशनच्या परिसरात निरव शांतता पसरायची. 


"किती त्रास करून घेतात मॅडम स्वतःला? स्त्रियांच्या बाबतीत अन्याय झाला तर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायला त्या स्वतःच पुढे होतात.असा कोणत्या जन्माचा तो त्यांचा दुष्मन असतो देव जाणे ?" सहकाऱ्यांचे हे नेहमीचे ठरलेले वाक्य असायचे.


पण ती अतिशय कणखर होती. तिने भल्याभल्यांना नमून सोडले होते. तिची ख्याती आता सर्वदूर पसरली होती. तिचं नाव घेताच, गुन्हा करताना गुन्हेगार दहावेळा विचार करायचा. त्यामुळे गावातील छोटेमोठे गुन्हे करणार्‍यांची संख्यादेखील कमी झाली. सगळीकडे तिच्या नावाचा जयजयकार होऊ लागला. मुलींना आणि महिलांना समाजात वावरताना तिचा मोठा आधार वाटू लागला.


केतकी असे तिचे नाव. नुकतेच प्रमोशन मिळाल्याने केतकी आईबाबा आणि छोट्या कुहूसोबत शहरात आली.आज पोलीस स्टेशनमध्ये पीआय असलेले श्री. दीपक जोग येणार म्हणून जोरात तयारी सुरू झाली होती. केतकी आपले काम चोख बजावत होती. तिची आपल्या कामावर असलेली निष्ठा अनेक प्रसंगात दिसून येत होती. दीपकनेही केतकीबद्दल ऐकले होते. अतिशय सुंदर, स्वाभिमानी आणि जरा जास्तच तोरा मिरवणारी केतकी दीपकच्या मनात मात्र घर करुन गेली.पहिल्या भेटीतच दीपक केतकीच्या प्रेमातच पडला. त्याला तिचा निर्भीडपणा खूप आवडला. त्याला जिथे तिथे केतकीच दिसू लागली. त्याचे केतकीच्या पोलीस स्टेशनमध्ये येणे जाणे जरा जास्तच वाढले. पण केतकी मात्र त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होती. आपले वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे केतकी उलट बोलू शकत नव्हती. दीपक केतकीच्या घरापर्यंत पोहोचला. केतकीच्या आई वडिलांना त्याने सांगितले, "तो केतकीवर खुप प्रेम करतो." पण आई वडिलांनी सर्व काही केतकीवर सोपवलं."


बाबा अगदी शांतपणे म्हणाले, " मी तुमच्या भावना समजू शकतो पण केतकी हो म्हणाली तरच पुढचे निर्णय होतील." केतकीच्या वाढदिवसादिवशी केतकीला इम्प्रेस करण्यासाठी मिटींगचं खोट कारण देत दीपकने वाढदिवसाचे छान नियोजन केले होते.सर्वांना दीपकचे  केतकीवर प्रेम आहे हे जाणवत होते.दीपक आणि केतकीची जोडीही अगदी शोभून दिसत होती.


मीटिंगसाठी म्हणून घाईघाईने हॉटेलमध्ये पोहोचलेल्या केतकीने जेव्हा बर्थडे पार्टी पाहिली तेव्हा ती खूप नाराज झाली. ऑफिसमधले सगळेजण छान तयार होऊन केतकीची वाट पहात बसले होते. 


पण केतकी जे वागली ते सर्वांनाच खूप खटकले होते आल्या आल्या ती दीपकला म्हणाली, "सर कोणाचा वाढदिवस आहे का आज ?"


"हो माझ्यासाठी स्पेशल असलेल्या व्यक्तीचा म्हणजे तुमचाच आहे ना आणि त्यासाठी मी हे पार्टीचे नियोजन केले आहे. " खूप प्रेमाने दीपक बोलत होता. 


"काय? तुम्हाला कोणी सांगितले आज माझा वाढदिवस असतो ते ?" रागाने केतकी म्हणाली.


"मीच शोधलं." दीपक आनंदाने म्हणाला.


"का केलेत तुम्ही असं ?" म्हणून केतकी डोळ्यातील अश्रु पुसत चक्क निघून गेली.


त्यानंतर दोन दिवस ती रजेवर होती. लांब निघून गेल्यावर तरी दीपक तिला विसरून जाईल म्हणून केतकीने बदलीचा अर्ज दिला. तिला वाटले, दीपक तिला विसरून जाईल.पण घडले मात्र उलट होते.


त्याचदिवशी सायंकाळी दीपक घरी आला. त्याने कारण विचारल्यावरही केतकी काहीच बोलत नाही हे पाहून तो परत जायला निघाला. तेवढ्यात त्याचा हात "अंकल." म्हणून कोणीतरी पकडला.


त्याने त्या चिमुकल्या हातावर आपला हात ठेवून "तू कोण?" असे विचारले.


"मी माझ्या आईची मुलगी. माझ्यामुळेच माझी आई तुमच्याशी लग्न नाही करतेय.तिने लग्न केल्यावर मला तसेच आजीआजोबांना कोण सांभाळणार ? म्हणून." कुहू निरागसपणे म्हणाली.


"कुहू ,इकडे ये. असे काही नाहीये." म्हणून कुहूला जवळ घेत केतकी धायमोकलून रडू लागली.


दीपकला काहीच समजत नव्हते.


केतकीचे बाबा म्हणाले,"हो माझी विधवा लेक एका मुलीची आई आहे. ती तुमच्याशीच काय कोणाशीच लग्न करू शकत नाही. तिचा नवरा गेल्यानंतर तिने लोकांच्या वाईट नजरा आणि त्यांची बोलणी याला कंटाळून पोलीस खाते जॉईन केले. चांगुलपणावरचा विश्वास उडालाय तिचा. हे सत्य आम्ही सहसा सांगणे टाळतोच पण आज तुम्हाला सांगितले." 


दीपक निघून गेला. सगळ्यांना खात्री होती त्याला सत्य कळल्यावर तो पुन्हा केतकीच्या आयुष्यात डोकावणार नाही. केतकी आनंदाने ऑफीसला गेली. ऑफीसमधला तिचा टेबल निरनिराळ्या बुकेनी सजला होता. तिला आनंद वाटत होता पण "इतके बुके इथे कसे आले?" असे तिने कॉन्स्टेबलला विचारले तेव्हा त्याने जिकडे बोट दाखवले तिकडे केतकीने नजर टाकली.कोणीतरी बुकेच्या मागे आपला चेहरा लपवत केतकीजवळ चालत येत होते. केतकी साशंक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. 


"वील यू मॅरी मी?" म्हणून दीपकने त्याचा चेहरा दाखवला.


"का करताय सर तुम्ही असं? तुम्ही इतके चांगले आहात की तुम्हाला खूप छान जोडीदार मिळेल. तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून जबाबदाऱ्याच पार पाडाव्या लागणार आहेत हे लक्षात घ्या. मला , आईबाबांना आणि कुहूला सगळ्यांना तुम्हाला सांभाळावं लागेल. नीट विचार करा."


"आणि माझ्या आईवडिलांना सुद्धा." दीपक आपल्या कोपऱ्यात उभारलेल्या आईवडिलांकडे बोट दाखवून म्हणाला.


हसत दीपकचे आईवडील केतकीजवळ आले.


"आम्हांला दीपकने तुझ्याबद्दल सगळे सांगितले आहे. आम्हांला तू सून म्हणून खरंच खूप आवडली आहेस.आतातरी होशील आमच्या घरची सून ?" म्हणून सासूबाईंनी केतकीला जवळ घेतले.

होकारार्थी मान हलवत केतकी गोड हसली. कधी न दिसणारी तिच्या गालावरची ती खळी दीपकला मोहिनी घालत होती..

सौ.प्राजक्ता पाटील 
  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//