तिची तपश्चर्या - भाग ४५
लग्नानंतर पहिल्या प्रथमच उमा आणि मानस आज एकमेकांसोबत नाहीत पाहूया पुढे..
मानस आणि आई-बाबा उमाच्या घरून निघाले तेव्हाच उमा त्यांच्याबरोबर आली नाही या भावनेने मानसच्या मनात येत होतं की आपलं काहीतरी इथे राहतंय की काय. लग्न झाल्यानंतर उमाच्या घरून मानस एकटा कधीच निघाला नव्हता. घरी आल्यावर हात पाय धुऊन थोडा आराम करून रात्री सगळेजण जेवले. मानस वरती त्याच्या खोलीत झोपायला गेला. इतक्या लगेच झोप येणार नव्हती म्हणून त्याने पुस्तक वाचायचं ठरवलं. त्याने पुस्तक हातात घेतलं पण त्याच्या मनात उमाचेच विचार होते. मानसने उमाला पत्नीचा दर्जा दिला नव्हता तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर उमाचा वावर ह्या खोलीत होता. जरी ती खाली झोपत होती तरीसुद्धा ती इथे आहे ही भावना त्याच्या मनात असायची. आज त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं. त्याच्या मनात आलं उमा बद्दल आपल्या तशा काहीच भावना नाहीयेत तरीसुद्धा तिचा विरह आपल्याला का जाणवतोय. तिच्या सहवासाची आपल्याला सवय झाली आहे का? तिने कायमच आपल्याबरोबर असावं असं आपल्याला का बरं वाटतंय. नंदिनी जिवंत आहे हे कळल्यानंतर सुद्धा आपण स्वतःहून तिच्या जवळ नंदिनीचा विषय कधीच काढला नाही. उमाला वाईट वाटू नये म्हणूनच आपण असं केलं असेल नाही का! आज आपण एकटे आहोत तरीसुद्धा आपल्या मनात नंदिनीचा विचार न येता उमाचाच विचार येतोय. हा कसला संकेत आहे.
त्याच्या मनात आलं आपण उमाला फोन करूया का? नको, ती झोपली असेल. कदाचित उमापण आपलाच विचार करत असेल. त्याने मोबाईल हातात घेतला आणि उमाचा नंबर फिरवला. क्षणाचाही विलंब न होता तिथून फोन घेतला गेला, म्हणजेच ती मानसच्या फोनची वाट पाहत होती.
"हॅलो तू झोपली नाहीस अजून"
"आई बाबांबरोबर गप्पा मारत होते. आता झोपतेच आहे. तुम्ही अजून जागे कसे?"
"नाही गं मी पण जरा वेळ वाचत होतो आता झोपेनच. काळजी घे स्वतःची आणि आई-बाबांची. शुभरात्री"
"शुभरात्री"
उमाच्या मनात पण मानसचेच विचार येत होते. आपली आठवण येत असावी म्हणूनच बहुतेक त्याला झोप येत नव्हती. उमा सुद्धा लग्नानंतर त्याच्यापासून कधी लांब राहिली नव्हती. तसं पण त्यांच्या लग्नाला जास्त काळ लोटला नव्हता तरीसुद्धा दोघांची, 'याद में तेरी जाग जागकर हम रातभर करवटे बदलते है'अशी हालत होती. त्याने आपल्याला फोन केला म्हणजे नक्कीच त्याला आपली आठवण येत असेल का! आपण त्याच्याबरोबर नाही हे त्याला जाणवत असेल का? की आपण नसल्यामुळे तो नंदिनीच्या विचारातच रमला असेल. आज आपण इथे आई-बाबांकडे आहोत तरीसुद्धा आपलं मन मानसकडे झेप घेत आहे. सगळ्यांचं मन असं बेलगाम धावत असतं का. 'अचपळ मन माझे नावरे आवरिता'. कुठेतरी वाचलंय की प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या मनातल्या सर्व इच्छा आपण पूर्ण करू शकतो. मानस आपला व्हावा ही आपली मनापासून इच्छा आहे. आपल्याला देवीने कौल पण दिला आहे. खरंच असं झालं तर मग माझ्यासारखी भाग्यवान मीच असेन.
चित्राताई अजून पण आपला फोन उचलत नाहीये. कदाचित त्यांना नंदिनीने सांगितलं असेल की तुम्ही काही प्रतिसाद देऊ नका. समजा तिथे जायला मानस पण तयार झाला तर तिथे आपल्याला काय ऐकावं लागेल. नंदिनी मानसला भेटायला तयार होईल का! भेटल्यानंतर त्यांच्यात पूर्वीचेच भावबंध निर्माण झाले तर आपल्याला त्यांच्या मार्गातून बाजूला व्हावं लागेल. या सगळ्याला आपण कसं काय तोंड देणार. आई बाबा तर पूर्णपणे खचून जातील. काय होईल ते त्या देवालाच ठाऊक.
विचार करता करता उमाच्या मनात आलं की आज इथं पहिलीच रात्र आहे आपण मानस पासून दूर आहोत. अजून उद्या पूर्ण दिवस, उद्याची रात्र त्यानंतर आपण घरी जाणार. तेव्हाच मानसचे दर्शन होईल. आपण इथे राहिलो ते मानसच्या पथ्यावरच पडलं असं त्याला वाटत असेल का.
सकाळी उठल्यावर उमाचा दिवस आईला मदत करण्यात सुरू झाला. काम करता करता ती बाबांशी गप्पा मारत होती त्यामुळे त्यांना एकटं वाटत नव्हतं. शाळेचा विचार येऊ नये असं तिला वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी बाबांनी उमाच्या हातचा आला घातलेला चहा घेतला आणि ते खुश झाले. उमाने खूप दिवसांनी तिचा प्रिय रेडिओ लावला. खूप दिवसांनी लावल्यामुळे तो खरखरत होता जणू उमाला सांगत होता की तू नाहीस तर मला कोणी हात पण लावत नाही. ती आईला म्हणाली,
"अगं हा रेडिओ तुम्ही कधी लावता की नाही. खरखर करतोय. अधून मधून लावत जा नाहीतर खराब होईल. शेवटी यंत्र आहे ते."
"हो आता उद्यापासून मधून मधून मी पण लावत जाईन. काम करता करता तुझ्यासारखी गाणी ऐकत जाईन."
इथे मानस सुद्धा सकाळी ब्रेकफास्टसाठी खाली आला तर त्याला उमा दिसली नाही. पटकन त्याला वाटलं की ती कदाचित मागेच उभी असेल म्हणून तो तिला हाक मारणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं उमा माहेरी राहिली आहे. त्याने शांतपणे ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली.
"काय रे मानस आज उमा नाहीये तर एकदम शांतपणे ब्रेकफास्ट चालला आहे. काय कसं झालंय काय सांगशील की नाही की आता तुला फक्त उमाशीच गप्पा मारायला आवडतं."
"आई तू पण ना. अगं आज मला जरा उशीर झालाय म्हणून मी भरभर खातोय."
"अरे बापरे उमाला उगाच दोन दिवस राहायला सांगितलं. एकच दिवस उमा नाही तर तुला लगेच उशीर व्हायला लागला. रात्री झोपलास ना नीट"
"हो ग बाई झोपलो. रोज सकाळी खाली यायच्या आधी उमा माझ्या सगळ्या वस्तू आवरून ठेवते ना. माझी पूर्वतयारी करून ठेवते."
"आता तिला आल्यावर सांगते तू लाडावून ठेवलेस माझ्या मुलाला अगदी आळशी करून ठेवलं. काही म्हणा उमा खूपच लाघवी आहे. थोड्याच दिवसात तिने आपल्या सगळ्यांना लळा लावलाय. आपल्यालाच नाही तर गीता आणि मंदा आहे तिला सुद्धा. त्या पण मला सकाळीच विचार होत्या उमा वहिनी नाही दिसत."
मानसला तर रोज सकाळी घराबाहेर पडताना उमाला बाय करायची सवय झाली होती. तिचं स्मितहास्य दिवसभर त्याला ताजतवानं ठेवत होते. कारमध्ये बसताना नेहमीप्रमाणे त्याने पायरीवर पाहिले. त्याचंच त्याला नवल वाटलं. गालातल्या गालात हसला. त्याच्या मनात आलं सर्वांसमोर उमाशी पत्नीप्रमाणे वागतावागता उमाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की निघताना, घरी आल्यावर तिचा चेहरा बघितल्यावरच आपल्या मनाला खऱ्या अर्थाने बरं वाटतं.
इकडे उमाला पण मानसची ब्रेकफास्टची वेळ झाल्यावर आज मानसने काय खाल्लं असेल. त्याला आपली आठवण आली असेल का. सवयीने त्याच्या तोंडातून आपलं नाव निघालं असेल का. असं झालं असेल तर आईनी त्याची चेष्टा केली असेल. आता तो फॅक्टरीत गेला असेल. उठल्यापासून कितीतरी वेळा तिला त्याची आठवण आली. आपण तर मानसवर मनोमन प्रेम करतो त्यामुळे आपली ही अवस्था होणारच होती. पण मानसला जर आपली आठवण येत असेल तर ती त्याच्या मनात आपल्याबद्दल काही भावना निर्माण झाली असेल म्हणून की घरातील एक व्यक्ती म्हणून आठवण येत असेल. इतक्यात रमाताईंनी तिला हाक मारली,
"अगं कुठे हरवली आहेस. तू आमच्या बरोबर सोबत म्हणून राहीली आहेस आणि अशी काय स्वतःच हरवून जातेस. मानसची आठवण येते का? त्यांना पण तुझ्याशिवाय करमत नसेल. पुढच्या वेळी राहायला येशील तर त्यांना पण बरोबर घेऊन ये बाई. असं मी म्हटलं खरं पण त्यांना आपल्याकडे जमायला पाहिजे. त्यांची आपल्याकडे गैरसोय होईल."
"नाही गं आई मानस तसे नाहीत. सर्व परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यांना कसलीच मिजास नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर सोहनींकडे कोणालाच मिजास नाही. सगळेजण खूप साधे सरळ स्वभावाचे आहेत. शीलाताई पण जर कधी आल्या नं माहेरी तर माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. कधीच नणंद बाईंचा तोरा दाखवत नाहीत."
"खरंच प्रत्येक मुलीला असं सासर मिळायला हवं गं. असं झालं तर कोणत्याही मुलीला सासुरवास कधी सहन करावा लागणार नाही. हुंडाबळी, आत्महत्या अशा काहीही केसेस कुठे ऐकायला मिळणार नाहीत."
"खर आहे तुझं."
(मानसच्या आठवणीत दंग झालेली उमा घरी जाईल तेव्हा काय घडेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा