Feb 23, 2024
नारीवादी

तिची सुट्टी.. अंतिम भाग

Read Later
तिची सुट्टी.. अंतिम भाग
तिची सुट्टी.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की मंजूबाई चित्राला शिकवून जाते. आता बघू पुढे काय होते ते.


"चित्रा, एक फर्मास चहा होऊ देत गं." मित्रांसोबत गप्पा मारल्याने ताजातवाना झालेला जयेश सोफ्यावर बसत म्हणाला.

"आई, कॉफी.." ब्रश हातात घेतलेला नील ओरडला.

"मला बोर्नव्हिटा.." ब्रश करताना पियु ओरडली.

"मलापण घोटभर दे हो चहा." सासूबाई म्हणाल्या. एवढे आवाज देऊनही चित्राचा आवाज येत नाही म्हणून नील तिला शोधू लागला.

"आई... आवाज नाही का ऐकलास? रिप्लाय तर दे काहीतरी."

"काय रिप्लाय द्यायचा?" चित्राने उलट विचारले. आईच्या उलट्या उत्तराची अपेक्षा नसलेला नील हडबडला.

"ते म्हणजे.. देते असं. तू नेहमी म्हणतेस ना."

"वाजले किती?" चित्राने विचारले.

"त्याचा काय संबंध?"

"प्रश्न नको.. उत्तर दे."

"बारा.." नील निरूत्साहाने म्हणाला.

"आता कॉफी घेतल्यावर जेवणार कधी?"

"मी माझं बघीन ना.. मोठा झालो आहे मी."

"हो ना.. मग तसं वागायला शिक. तुला कॉफी प्यायची आहे तर पी.. पण नंतर कप घासून.. फोडून नाही.. धुवून जागेवर ठेवून द्यायचा. मी स्वयंपाक करून ठेवते आहे. तो हाताने घ्यायचा."

"आई, प्लिज यार.. एक दिवस तर सुट्टी मिळते. त्यात कटकट नको ना."

"मी कटकट करतच नाहीये. मी फक्त सांगते आहे."

"एक घोट चहासाठी किती वाट बघायची?" तोपर्यंत जयेशही आत आला.

"आता चहा घेतल्यावर जेवणार कधी?" चित्राने तोच प्रश्न परत विचारला.

"कधी म्हणजे? काय घाई आहे? जेवू आरामात. तू काय केले आहेस ते सांग."

"मी वरणातली फळं करणार आहे."

"एक दिवस तरी चांगलं काही खायला कर." जयेश परत चिडला.

"हॉटेलमधून मागवा जे हवं ते. मी हेच करणार."

"आईला बाहेरचं जेवण चालत नाही माहिती आहे ना?"

"म्हणूनच हे करत होते. अजून एक, जेवायला वेळ असेल तर चहा घेतल्यानंतर जरा वरची जाळीजळमटं काढून टाका." चित्रा म्हणाली.

"का? तुझी मैत्रिण नाही का आली?" जयेश कुत्सितपणे म्हणाला.

"मंजूबाई येऊन गेल्या. आणि अजून चार दिवस येणार नाहीत. त्यामुळे हातासरशी कामं करून टाका. आणि हॉटेलमधलं खाऊन झालं की भांडी घासून ओटा पुसून ठेवून द्या."

"तू कुठे चालली आहेस?" जयेशने घाबरून विचारले.

"स्वयंपाक नाही करायचा तर मी जाते पार्लरमध्ये. घरी नाहीतर तिथे तरी आराम मिळेल."

"चित्रा, काय नाटक लावले आहेस हे?" सासूबाई चिडून म्हणाल्या.

"नाटक आणि मी? शक्य तरी आहे का? त्याचं काय आहे हिंदीत एक म्हण आहे, घी सिधी उंगली से नही निकलता तो उंगली टेढी करो. तुमचं ना तसं झालं आहे. प्रत्येकाला स्वतःची पडली आहे. पण माझा विचार कोणी करतं? आठवडाभर कामं करून तुम्ही थकता.. तुम्हाला आरामाची , ताजेतवाने होण्याची, छान खाण्याची गरज असते. आणि माझं काय? कोणताही वार असला तरी माझा दिवस त्याच वेळेस चालू होणार. तुम्हाला वेळेत चहानाश्ता, जेवण मिळावं म्हणून मी सगळं वेळेत तयार ठेवायचं. उरलेल्या वेळात हे जे 'तुमचं घर' आहे ते स्वच्छ ठेवायचं, तुमचे कपडे धुवून, इस्त्री करून जागेवर ठेवून द्यायचे. का? तर ते माझं काम आहे? आणि तुमच्या कामाचं काय? आणि जयेश.. मंजूबाईला जे माझी मैत्रिण म्हणालास ना, ते अगदी बरोबर आहे. तिच एकटी आहे जिला माझी काळजी वाटते. म्हणून न सांगतासुद्धा माझी जास्तीची कामं ती करत असते." चित्रा बोलून मोकळी झाली.

"बरं.. घे तू तुझी सुट्टी.. म्हणजे तू कर आराम.. आम्ही घेऊ हाताने. काय रे नील?" जयेश म्हणाला.

"हो.. आणि धुवून जागेवरही ठेवू." नीलने पुस्ती जोडली.

" आता तरी खुश आई?" इतका वेळ चिडलेल्या आईला बघून पाठी लपलेल्या पियुने पुढे येऊन विचारले.

"आजच नाही.. दर रविवारी."

"हो ग.. माझी आई.. दर रविवारी करू." यावेळेस सासूबाई म्हणाल्या.

"मग ठीक आहे.. पण तरीही आज जेवायला वरणातली फळंच."

"तू जे म्हणशील ते.." सगळेजण एकत्र म्हणाले.


तिची सुट्टी.. संशोधनाचा विषय. खरंतर ज्या दिवशी सुट्टी त्यादिवशी कामे प्रचंड वाढलेली असतात. आठवड्याभराची भाजी, फुले, संपलेल्या गोष्टी. आठवडाभर कामाला जाऊन ती सुद्धा थकली असेल हा विचार कोणीच करत नाही. तो मांडण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//