तिची सौभाग्यलेणी

Truth of every women's life..

# तिची सौभाग्यलेणी

डाळिंबी पैठणी अन् देह तिचा आभूषणांनी सजला,

घायाळ तो होई दर्पणी पाहता तिजला.

जाणवे काही कमी सारखी न्याहाळीत बसला,

तिथेच मग कोपऱ्यात त्यास करंडा कुंकवाचा दिसला.

भरून मध्यमा तयात मग भांगेत सजविण्या आला,

झटकत हात तात्काळ तिने मात्र विरोध त्याला केला.

तु निघून गेलास मातीआड मग का हा अट्टाहास..?

आटलेल्या नदीला आता न उरे पाण्याची आस.

नाही हक्क सजण्याचा अन् माथी कुंकू मिरविण्याचा,

तु नसता जवळी मग नको हक्कही मज जगण्याचा.

बोट ठेवून अधरांवर त्याने तिला शांत केले,

स्पर्शून मस्तिष्काला ओठांनी अस्तित्वाचे प्रमाण दिले.

जरी गेलो सोडून देह तरी तुझ्यात जगतो आहे,

बनून तारा दूरदेशीचा तुलाच बघतो आहे.

माझ्या जबाबदाऱ्या तु कर्तव्य म्हणून स्विकारल्यास,

तुझ्या हक्काच्या गोष्टी मात्र विधवा म्हणून नाकारल्यास.

नाही कुठेही गेलो मी माझं अस्तित्व तुझ्यात आहे,

नको नाकारू तुझं सजणं त्याचं मूळ माझ्यात आहे.

नको पाळू रितीभाती अन् नको बुरसटलेले विचार,

जिवंतपणीच मरणाचा नको सोसू अत्याचार.

सांग ठणकावून जगाला मी सजेन माझ्या पतीसाठी,

मी निभावत असलेल्या त्याच्या प्रत्येक कर्तव्यासाठी.

मिळाला आत्मविश्वास जगण्याची दिशा नवी मिळाली,

लेवून सौभाग्यलेणी ती अस्तित्व जपण्या सज्ज झाली.

©® आर्या पाटील