तिची पाऊलवाट..

ही कथा एका स्त्रीची.. तिने निवडलेल्या एका वेगळ्या स्वतःच्या पाऊलवाटेची..


तिची पाऊलवाट. (भाग पहिला)
©स्वप्ना
नेहमीच्या आत्मविश्वासाने अनुने आपल्या आवडत्या रंगाच्या लाल गाडीचा कव्हर काढलं आणि ड्रायव्हिंग सीटवर ती बसली. साइड मिरर नेट सेट केले मधल्या आरशात स्वतःला बघितलं आणि वयाच्या पन्नाशीतही स्वतःतली पस्तिशीची दिसल्यासारखी स्वतःलाच भुवया उडवुन “चले,..लेटस गो…” म्हणत बिनधास्त रिव्हर्स गिअर टाकला.
लेकान आणि लेकिन यु .एस. ला जाण्यापूर्वी शंभरदा ओरडून झालं होतं. आई आता ही खटारा गाडी बदल अग नवीन टेक्नोलॉजी असलेल्या भरपूर गाड्या आल्या आहेत. त्यांच्या या वाक्यावर आपण काही न बोलता फक्त स्माईल द्यायचो त्यावर दोघे ओरडायचे,
“फार हट्टी आहेस तू नाहीच बदलणार तुझी लालपरी..”
शेवटी लेकानं जाण्यापूर्वी ह्यातच बॅक कॅमेरा बसवून घेतला. त्याला माहित आहे,आई आयुष्यात कोणतीही गोष्ट मागे करायला कचरतेच त्यात गाडी रिव्हर्स घेणं हे देखील आलं. म्हणून एक दिवस हा रिव्हर्स कॅमेरा बसवून त्याने आपली दिवसभर प्रॅक्टिस घेतली हे तिला आठवलं आणि आताही सवयीप्रमाणे कॅमेऱ्यात बघण्याऐवजी मागे बघताना तिला हसू आलं,..तिने स्वतःला मुलगा देतो तश्या सुचना देत कॅमेऱ्यात बघितलं,.."इकडे,इथे आई इथे दिसतंय मागचं, तुला मागे बघण्याची गरज नाही आता,.."मनाशी हसत बघताना तिला कॅमेऱ्यात बघताना दिसली बंगल्याची पूर्वेकडची छोटी भिंत त्याच्या खाली डोलणारी पिवळी शेवंती आणि त्या पिवळ्या रंगाशी स्पर्धा करत भिंतीवर उगवलेली सूर्य देवाची स्वारी,...ती म्हणाली ,"अय्या,मघाशी आपण पूर्वेकडच्या खिडकीत बसून अग्निहोत्र केलं त्याक्षणी ह्याच उगवण म्हणजे अगदी दुधाळ ढगातून लालछटा घेत अलगद,शांतपणे आगमन वाटलं आणि आता दहा एक मिनिटात किती चमकदार झालाय हा आणि त्या दुधाळ ढगांनाही ह्याने ह्याची सोनेरी झालर चढवलीये,...अस म्हणत तिने स्टेरिंगचे हात काढून परत त्याला जोडले,..त्याक्षणी तिला आजी आठवली,..लहानपणीच आपल्याला अग्निहोत्राच महत्त्व सांगणारी,..त्या आठवणी सोबत ती कधी बंगल्याबाहेर पडली आणि रस्त्यालाही लागली तिचं तिलाच कळलं नाही,..
मोकळा काळभोर रस्ता,..काहीसा धुक्याचा असला तरी काही ठिकाणी त्या सोनेरी उन्हाने चमकणारा,..गाडी सोबत सुर्यही पळत होता,..ती मध्येच त्याला बघायची,.. त्याच लक्ख होणं वाढत चाललेलं,..तिला परत आजी आठवली,..लहानपणी तिच्या गोधडीत,उबदार कुशीत त्या मऊ नऊवारीच्या पदराच्या मायेच्या वासात आणि तिच्या सुंदर गोष्टीत आपण झोपून जायचो,....सकाळी जाग यायची ती खरपूस गौऱ्यांच्या धुराने,.त्यात बारीक कपूराचा सुवास देखील यायचा आणि त्या सुवासासोबत आजीचा खणखणीत आवाज,..
\"सुर्याय स्वाहा,..सुर्याय ईदम न मम,
प्रजापतये स्वाहा,..प्रजापतये ईदम न मम,.."
हे ऐकू यायला लागलं की आपण गोधडी बाजूला करून पळत सुटायचो,..मागच्या अंगणाकडे,.. आजी अक्षदांची दुसरी आहूती देणार की पटकन हात लावायचो त्या तांब्याच्या पिटुकल्या पळीला,..त्या पळीत असायच्या गाईचं तूप लावलेल्या अखंड अक्षदा,..आजी आपल्याकडे बघून प्रसन्न हसायची,..डोळे मिटून बसायला लावायची ,..आजीची नेहमीची वाक्य
"पृथ्वीवर डोळ्यांनी दिसणारा हा देव,.. ह्याच्यामुळेच सगळी सृष्टी चालते,..धान्य पाणी,झाडे,प्राणी ह्याच्या मुळेच जगतात,..आपल्याला अन्न ह्याच्या मुळेच तर मिळतं,.. मग ह्याचे आभार मानायला नको का,..?त्याला म्हणावं,"तू आम्हाला खुप काही दिलंस,..त्यातलंच हे थोडं तुला अर्पण करतोय गोड मानून घे आणि असाच आशीर्वाद सर्व सृष्टीवर ठेव,...ह्या सूर्याला आपण काही फुलांचा हार घालू शकत नाही पण हा अग्निहोत्रातला अग्नी आपल्या भावना त्याच्या पर्यंत पोहचवतो,.. बघ त्याच्या कडे तुला काय पाहिजे ते माग त्याला ,..बुद्धी,आरोग्य तो नक्की देईल पण ,..मनापासून म्हणायचं हं,..हे सगळं सांगत ती स्वतः डोळे मिटायची त्याक्षणी तर अगदी देवघरातल्या देवीच्या मूर्तीसारखे शांत भाव तिच्या चेहऱ्यावर,.. मध्येच किंचीत हसायची तेंव्हा वाटायचं जणू तिचा संवाद चालू आहे देवा सोबत..तिने डोळे उघडले की आपण हासुन म्हणायचं ,"झाल्या का सूर्यदेवाशी गप्पा ?काय बोलतेस ग त्याच्याशी?? तेव्हा आपल्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणायची," तू लहान आहेस ग पिल्लू,..काय सांगायचं तुला चिमणाबाई ??पण एक सांगते तुला कसं आई रागवली की तू माझ्या कुशीत येऊन रडतेस आणि मग मी तुला समजलं की तू उड्या मारत निघून जातेस तशीच मी ही माझं दुःख त्या सूर्यदेवाला सांगते आणि रडून घेते तोही मला जवळ घेतो आणि मग मी पण तुझ्या सारखीच उड्या मारत कामाला लागते... चल जास्त प्रश्न विचारू नकोस चुलीवरचा चहा प्यायचा आहे ना तुला ??असं म्हणत आजी परसात घेऊन जायची,... ती चुलीचा धुरकट वास,..तो खरपूस चहा... आहाहा ती आता गाडीतही म्हणाली आणि आता तिला तो चुलीचा वास गाडीमध्ये पण जाणवलं म्हणून तिने पटकन गाडी बाहेर पाहिलं. एका विस्तीर्ण वडाखाली सजलेली टपरी "खास चुलीचा चहा" अशी पाटी लिहिलेली. तिने पटकन गाडी बाजूला घेतली तसाही सकाळी गडबडीत चहा राहिला आणि आज आपण ठरवलं होतं सकाळी नवऱ्याचा आणि आपला चहा नाही करायचा..आपण घेऊ बाहेर आणि तो इतक्या वर्षांनी तरी स्वतःच्या चहासाठी जरा धडपडून बघेल घरातले चहा साखरेचे डबे तरी कळतील त्याला,..आता हे आठ दिवस फक्त आपले आपल्याला हवे तसे म्हणत ती टपरीजवळ आली...चुलीजवळ एक आजी हात गच्च भरून हिरव्यागार बांगड्या खळखळ वाजवत चुलीजवळ फुकणी फुकून फुकून चुलीतले लाकुड मागेपुढे करत होत्या आणि पलीकडे सांडलेला पारिजातकाचा बहर आजोबा आणि नात टोपलीत भरत होते,.. आजोबांच्या उठी गाणं सुरू होतं,..
" पोटापुरते देई विठ्ठला, लय नाही लय नाही मागण,आता लय नाही लय नाही मागण..."
सुंदर सकाळ, पक्षांचा किलबिलाट आणि ही चुलीवरचा चहा मिळणारी टपरी अनुला वाटलं देवाला सगळं मनाप्रमाणे द्यायची इच्छा झाली का? या प्रश्नाचा तिचं तिलाच हसवलं आणि तिने आजींना विचारलं आजी चहा मिळेल का?? आजीने वळून बघितलं आणि तोंडभरून हसत म्हणाली,
"चहा मिळल आणि गरम पोहे बी मिळतील.."अनुला तशी भूक नव्हतीच त्यामुळे ती चटकन म्हणाली," पोहे नको चहाच करा मस्त खरपूस करा,.."आजी मनमोकळं हसत म्हणाली," आता करते तुम्ही बसा इथं,.."त्यावर अनु चटकन म्हणाली,"आजी मी परिजातकाकडं जाऊ का??आजी आश्चर्य दाखवत म्हणाली,"या बया जावा कि,...त्यात काय ईचारता."आजीच्या या वाक्यावर ती पुन्हा तिच्या आठवणीतल्या वयात गेली आणि आठ दहा वर्षाची झाली,..."
अंगणात शेणाचा सडा आणि त्यावर पडलेली केशर काड्यांची फुलं.. रोज संध्याकाळी झोपताना आजोबा म्हणायचे बघ काही चांदण्या या झाडावर राहायला आल्या आहेत त्यांना आकाशात जागा मिळाली नाही ना म्हणून,...तेंव्हा खरंच त्या झाडाकडे पाहिलं की असंच वाटायचं अंधारामध्ये चमकणारी ती पांढरी शुभ्र फुल,..आजोबा पुन्हा म्हणायचे ह्या चांदण्या सकाळी तुझ्या अंगणात पडतील त्यांना तुझ्या आजीच्या नऊवारीचा ते मऊकापड आपण अंथरून म्हणून घालू,.. त्यांनाही आजीची ऊबदार कुशी देऊ आणि हसायचे,.. आपण संध्याकाळी रोज आजीच्या जुन्या नऊवारीचा पदर टाकून ठेवायचो आणि खरंच सकाळी तो पदर गच्च भरलेला असायचा फुलांनी मग आजोबांसोबत त्याचे मोठे मोठे हार करायचे अंगणातल्या छोट्या गणपतीपासून देवघरातल्या सगळ्या मुर्त्यांना आणि हो शाळेत जाण्यापूर्वी आजोबा न्या
यचे त्या जुन्या हेमांडपंथी मंदिरातल्या काळ्याभोर महादेवाच्या पिंडी साठी खास मोठा हार करायचा... आजीने देठं मोडून शिकवलेले ते हार देठ मोडून एकीकडे केशर काड्या ची रास आणि एकीकडे चांदण्या ,...त्या परिजातका खाली आजोबा हेच गाणं म्हणायचे,..
"पोटापुरते देई विठ्ठला..आता ह्या आजोबांनी म्हंटल आणि तिच्या तोंडून आपसूकच ओळी आल्या आता लई नाही लई नाही मागण,...हे ऐकून झाडाखाली फुले वेचुणाऱ्या आजोबांनी आणि नातीनं एकदम तिच्या कडे पाहिलं..

क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all