तिची पाऊलवाट.--भाग 3
©स्वप्ना..
अनुला आठवलं आपलं बालपण आजी आजोबांच्या उबेत गेलं. पण, हायस्कूलला आजीने तिच्या बहिणीकडे मला आणि आईला ठेवायचं अस ठरवलं,..आपले वडील गेल्याचं दुःख आईने स्वतःवर इतकं पांघरलं होतं कि त्यामुळे तिला माझं भविष्य दिसायचं नाही,.. पण, आजी मात्र सजग होती.आपला इतका हुशार लेक गेला पण त्याची चिमणी तेवढीच हुशार आहे,तिला शिकवायचंच या जिद्दीने एकदा आजी आपल्याला तिच्या शहरातल्या बहिणीकडे घेऊन आली,.. आपण चांगल्या कळत्या वयात होतो. तेरा चौदा वर्षाचे असू ,..कारण आपले वडील गेले ते एक वर्ष वाया गेल्याने आठवीत येण्यापूर्वीच आपल्याला न्हांण आलं होतं,..आपल्या आई पेक्षा आजीनेच हे स्त्रीचं उमलवणं आपल्याला समजावंल होतं,. काही प्रेमाने आणि काही शिस्तीची जरब घालून..स्वच्छता नीटनेटकेपणा ते चार दिवस तिने सक्तीने करायला लावलेली विश्रांती आणि चौथ्या दिवशी तिचं न्हाऊ घालणं कडक कडक पाण्याने अंग पुसायला जवळ घेत गच्च मिठीत घेताना,.. नेमकं काय सांगू पाहायची तिच्या प्रेमातून स्त्रीजन्म,.. वेदना, प्रेम ,चैतन्य ,उत्साह आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या चमत्कारिक परीक्षा पास करणारा.. स्त्रीदेह कितीही संकटे आली तरी आनंदाची व्याख्या न विसरता कुटुंब बांधणारा एक सुंदर आत्मा हो असं काही सांगायचं असेल तिला,...कारण ती स्वतः तशीच होती ,एक उत्साही,.. आंनदी स्त्री,..
ती आपल्याला आणि आईला मावशीआजीकडे घेऊन आली आणि मावशीआजीला म्हणाली होती,.."माझ्या नातीला आणि सुनेला आसरा दे,..नात हुशार आहे ग माझी,..तिचं शिक्षण पूर्ण होऊ दे,..जन्मभर उपकार होतील तुझे,..माझी सूनतर हरवली आहे ग दुःखात पण ह्या उमलत्या आयुष्याचा काय दोष,.. ?मीच खोली करून राहिले असते ग, पण नवरा हा प्राणी तुलाही माहीत आहे,.. सहजासहजी गाव सोडायचा नाही आणि शेतीचंच तर जास्त उत्पन्न आहे ती तर तिथेच राहून करावी लागेल ना,.. तुला पैसे पाठवले मी पण,या दोघींना ईथे आसरा दे."
मावशीआजी तशी श्रीमंत होती. मोठा वाडा, गाड्या सगळं तर दिसत होत. अगदी थाटात बंगाईवर बसली होती. मस्त सोनेरी काठाचं बुट्टीदार नऊवारी गडद जांभळं पातळ,.. डोक्यावर घट्ट अंबाडा त्याला वेणी मोगऱ्याची मस्त टवटवीत,ताजी आणि दाट होती अगदी खोलीभर त्याचा दरवळ होता,..पुढे पुढे तर आपण तिला मोगरा आजी म्हणायचो..त्या मोगऱ्या सोबत तिची ओळख दाखवणारं लालचुटुक कुंकू कपाळी लावलेलं होतं अगदी रुपया एवढं,.. तोंडात पान होतं,.. हातातल्या सोन्याच्या पाटल्या बांगड्या मागेपुढे करत ती आजीला म्हणाली," ठेवून घेते मी यांना,..तुझा खुप आग्रह आहे तर,..पण घरातली कामं करावी लागतील,.. माझ्या नाती सोबत टाकते शाळेत हिला,.. तिचे कपडे वापरता येतील हिला,.. पण,..हिच्या आईने काही काम धंदा करावा बाई,..कोणी आयत हातात देणार नाही ,.."
तेवढ्यात मावशीआजीच्या सुनेने हाक मारली,..आणि मावशी आजी पडद्यामागे जाऊन सुनेशी बोलू लागली,..आपण सहज कोपर्यातली फुलदाणीचे फुलं हात लावून बघत होतो,.. तेवढ्यात सासू-सुनेची खुसपुस आपल्या कानी पडली. ती आजही आठवते.सून म्हणाली होती," अहो आई घरात खाणारी माणसं कुठे वाढवता उरावर?" त्यावर मावशी आजी म्हणाली," अगं वेडी आहेस आयत्या मोलकरणी चालून आल्या आहेत आपल्याला,.. आपण आपल्या कामवाल्या काढून टाकू,..बघ किती पैसे वाचतील? पातळ आणि जुने कपडे देऊ नेसायला आणि ती मागची पत्र्याची खोली राहायला देऊ, सगळ भंगार तर ठेवले त्या खोलीत,....त्यावर सुनबाई म्हणाली होती,"अगबाई खरंच सासुबाई फार हुशार आहात तुम्ही म्हणत दोघी खसखस हसल्या आणि पडद्याबाहेर आल्या आपली आजी आपल्या शून्यात हरवलेल्या आईला सूचना देत होती.अनुला नीट सांभाळ आणि तुही जपून रहा तेवढ्यात पडदा बाहेर येत मावशी आजी म्हणाली," चल ठरलं तर मग राहू दे या दोघींना इथे पण,..तू मात्र महिन्याला चक्कर मारायला विसरु नकोस, अगं यांचं सगळं बघायचं म्हणजे तुझी मदत लागणारच आहे ना,.. महिन्याला ती मदत घेऊन येत जा म्हणजे झालं. अगदी या महिन्यापासून ती मदत आणली असतील ना ग ? त्यावर आजी म्हणाली," हो आणली आहे ना असं म्हणत आजी मावशी सोबत झोपाळ्यावर बसली आणि आपल्या कमरेच्या चिंचेतून काही गुंडाळलेल्या नोटा दिल्या,.. झोपाळ्यावर बसलेल्या दोघी बहिणी अगदी सारख्या दिसत होत्या. पण,.. आत्म्यांमधला फरक असेल सोन्याने मढवलेली मावशीआजी तिच्याही पेक्षा आपली साधी आजी जास्त तेजस्वी आणि चैतन्यमयी भासत होती.आता अनु मनाशी म्हणाली,"तेव्हा ते तेज कळत नव्हतं,.. पण आता जाणवतं आपल्या आजीचा आत्मा आंनदी आणि त्यामुळे तिचे चैतन्याच वलय छान होतं,..आहे त्यात समाधानी होती आजी लबाड दुष्ट नव्हती.. मावशीआजीही तशी प्रेमळ असली तरी काहीशी स्वार्थी आणि हावरट ही होतीच,.. आम्हा दोघींना खाऊ घालणं तसं जड नव्हतं तिला आणि खरंतर कामवालीचा मोबदला न देता आम्हाला पोसायचं म्हणजे गणित सरळ होतं तरीसुद्धा मावशी आजीने आपल्या आजीकडून महिना बोली करूनच घेतली होती आताही आजीने आपल्या चिंचीतल्या जीवापाड जपलेल्या दोन नोटा तिच्यासमोर धरल्या तेव्हा मावशी आजीने त्या नोटा खसकन ओढत स्वतःजवळ ठेवल्या आणि आपल्यालाही जवळ ओढलं आणि प्रेमाने मुका घेत म्हणाली," तशी जड नाही ही चिमणी मला,.. पण महागाई तुलाही माहित आहे शहरात राहणं सोपं नाही.. आपल्या आजीने डोळे पुसले आणि अलगद आपल्याला जवळ घेत म्हणाली ,"माझा जीवित सोडून चालले आहे मी,.. तिला नीट सांभाळ,.. तिच्या शाळेत चक्कर मारून तिची प्रगती विचारत जा तिच्या बापाचे स्वप्न होतं तिला खूप मोठी झालेली बघायचं,..असं म्हणताना आजीच्या गालावरच्या अश्रूंनी आपला गाल भिजला होता,.. येते मी म्हणत आजी निरोप घेऊन गेली आणि त्या क्षणी खूप मोठा खड्डा आपल्या पोटात पडला होता. आईपेक्षा आजीचा आधार प्रेम सगळं उजवं होतं,.. आपली आई बुजरी आणि भित्री होती.पहिल्यांदा आपण आजी दूर गेल्यावर अनुभवलं होतं प्रेम करणारं माणूस दूर जाणं म्हणजे किती दुःख असतं,..आई मात्र पुतळ्यासारखे होती. पण कष्टाळू होती आजी निघून जाताच,.. मावशीआजी आईला म्हणाली," चाळीस पोळ्या कर,.. माझ्या सुनेला विचार कणकेचा डबा कुठे आहे ?,आणि जरा तेल लावून मुरत ठेव कणीक, माझ्या नवऱ्याला पोळी जराही कडक झालेली चालत नाही बरं का??"
हो म्हणत आई आमचे गाठोडे उचलत मध्ये जायला वळली आपणही तिच्या मागे जाणार तर मावशीआजी ने मला बोलावलं,.. तू कशाला जातेस??झोपळ्यावर तिने बळच बसवलं आणि मावशीआजीनेही आता आजी काढते तशी दृष्ट काढली,.. दोन्ही हातांनी कडकड बोटं मोडून काय छान दिसतेस ग ...अगदी तुझ्या बापासारखी चिमणी ते भजन छान म्हणतेस तू,.. तुझ्या आजीला म्हणून दाखवतेस बघ ते मंदिरावालं,...म्हण बरं,..तिने अस म्हणताच,आपण आधी घाबरलो होतो. पण ही आजी आपल्या आजी सारखीच वाटत होती. चेहऱ्याने आणि हसताना बोलताना देखील आपल्याला आपली आजी बोलते असा भास होत होता,.. मग जरा भीतभीतच आपण म्हणलं ते गाणं,..
" कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात,
मूर्ती तुझी असते देवा नित्य अंतरात,..
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात,.."
मावशी आजी एकदम खुश झाली कमरेत वाकत भराभरा आपल्या खोलीत जात तिने लाकडी कपाट उघडलं आणि एका छान डमरू सारख्या पितळी डब्यातून दोन काजू आणि काही मनुके काढत आपल्या हातावर ठेवले,..इथेच खाऊन घे बाहेर कोणाला दाखवू नकोस, पापा घेत म्हणाली," रोज मला गाणं म्हणून दाखवायचं बरं का?? जमलं तर तुला शिकवणी लावू गाण्याची,..तिचं हे वाक्य एकताच पलंगावर पडलेले नाना जोरात ओरडले," शिकवणी लावायला काय तिचा बाप पैसे देऊन गेला का?"
त्यांचा असा आवाज ऐकून आपण घाबरलो तर मावशी आजीने पटकन आपल्याला खोलीच्या बाहेर काढलं आणि खोलीचं दार लावून घेतलं.
©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा