©स्वप्ना..
मंगलला वाटलं खरंतर आपल्या दोघींचे आवाज एकदम विरुद्ध,..आपला आवाज अगदी पुरुषीथाट असलेला वजनदार तर हिचा अहाहा अगदी गोड मिट्ट मधासारखा,..आताही तसाच लागलाय अगदी गोड मधाचा थेंब जणू,..
शेवटचा आलाप घेताना अनुला जाणवलं आपल्याला कोणीतरी बघतंय,ऐकतय,..तिने आलाप न थांबवता डोळे उघडले,..आणि समोर मंगलला बघून दोघींचे फक्त डोळे बोलले सुरांसोबत,..डोळ्यातून अश्रूही सुरांची साथ करत होते,.. मंगलने परत सूर मिसळला आणि दोघींनी तिहाई घेतली.
"हरि गुण गायरे,... हरि गुणा गायरे
हरि गुणा गायरे तू मना,..."
दोघी गळ्यात पडून रडल्या,.. मंगल म्हणाली,"अनु डे तू काही न सांगता आलीस,..अगं महिनाभरापूर्वी फोनवर बोललीस तेव्हा ही काही म्हणाली नाहीस. तुझी सरप्राईज द्यायची सवय गेली नाही काय ग?" तेवढ्यात अनुने मोगऱ्याचे गजरे मंगलच्या नजरेसमोर धरले,.. मंगलने मन भरून श्वासात घेतले आणि ते गजरे लावले लगेच आपल्या लांबसडक वेणीत,.. अनु गंमतीने म्हणाली ,"मंगल अग केस अजूनही सुंदर आहेत तुझे,.. रवी आजही तुझ्या केसांचा वेडा असेल ना.?"
हसत मंगल म्हणाली ,"अगं पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्या झालो आपण,..तरी असले प्रश्न तुझे ..बदमाश पोरगी...अनुला हसूच आलं तिने पोरगी म्हंटले या विशेषणाच,..पूर्वी ती हे विशेषण नेहमी वापरायची आपल्यासाठी,..पण आताही तिने ते वापरलं त्याचं.
तेवढ्यात रवी आला,"या या मेहुणी बाई एवढ्या व्यस्ततेतून मैत्रिणीला भेटायला वेळ मिळाला म्हणायचा.." रवीच्या प्रश्नावर अनु म्हणाली,"भेटत नसलो तरी प्रेम तसूभर कमी होणार नाही आमच्या मैत्रीत आणि बर आहे आम्ही भेटत नाही ते कारण तिचं पहिलं प्रेम मी आहे. मी नसते म्हणून तुमच्या वाट्याला प्रेम येतंय,.. मी जर सारखी भेटले तर तुमची फजिती आहे भाऊजी.." या वाक्यावर तिघे हसले आणि घरात आले.अनु मंगलच घर बघतच राहिली,..मंगल त्यावेळी तिच्या घराच्या कल्पनेच चित्र जसजसं आपल्या डोळ्यासमोर उभं करायची अगदी तसंच घर आहे हिच.. सुंदर,स्वच्छ, टापटीप, निसर्गाच्या कुशीतलं अगदी टुमदार घर होतं मंगलच घर,..
अनु घर बघताना मंगलने अनुचा हात दाबला,.. पायर्यांकडे जाताना लावलेला पेंटिंग,.. अनुने शिकत असताना एकदा मंगलला दिलं होतं..दोन सख्या तल्लीन होऊन गाणाऱ्या असं ते पैंटिंग होत,.. त्या दोघींच्या मध्ये दाखवलेला तो तानपुरा खूप सुंदर पेंट केलेला होता,..तेव्हाच मंगल म्हटली होती हे चित्र मी माझ्या हॉलच्या पायऱ्या चढून वर जाणार्या वाटेवर लावणार... आपली मैत्री आपली स्वर आपलं आयुष्य असंच तर असेल पायऱ्यांच्या दिशेने वर वर जाणारं,..
किती पॉझिटिव्ह विचारांची आपली सखी अनुला वाटलं,..अनुने मंगलला मिठीच मारली,.. मंगलने डोळे पुसत विचारलं," येडाबाई भूक लागली असेल ना,.. फ्रेश हो खाऊन घे,"अनु हो म्हणाली,..मंगल म्हणाली अनु माझ्या घराच्या मागे नदी आहे,.. आपण थर्मास मध्ये कॉपी घेऊन नदीच्या किनारी जाऊ सूर्यास्त बघायला आणि मग बोलू सगळं काही,... चल तुझी खोली दाखवते,.. अनुला खोलीत सोडून मंगल स्वयंपाक घराकडे गेली,..
अनुने ड्रेस बदलला,..खोलीकडे बघत अनुला वाटलं,..सगळं किती टापटीप आहे हीच,.. मंगल काहीच नाही बदलली..तेंव्हाही तिची छोटी झोपडी किती स्वच्छ छान प्रसन्न वाटायची,.. एखादी व्यक्तीचं असते का अशी??कायम व्यवस्थित,...
अनु फ्रेश होऊन हॉलमध्ये आली तोपर्यंत स्वयंपाक घरातून मस्त कांद्याचा वास येत होता. कांद्याच्या थालपीठाचा वास होता..मंगल डिश मध्ये लिंबाचं लोणचं आणि थालपीठ घेऊन आली, थालपीठ अगदी गरम गरम होत,..अनु म्हणाली," अग माझी आवडती डिश तू लगेच बनवलीस." तेव्हा हसत मंगल म्हणाली," मी नाही ग आई ने बनवली आहे,.. आमच्या आईंना तुझा केवढा अभिमान वाटतो,.. घरातल्या तुझ्या दोन्ही पेंटिंग अगदी कौतुकाने दाखवतात येणाऱ्या-जाणाऱ्यांना आणि म्हणतात प्रसिद्ध जागतिक दर्जा असलेल्या चित्रकाराच्या आहे त्या पेंटिंग,..
"मग आहेच आमची अनु तशी हुशार म्हणत मंगलच्या सासूबाई पाणी घेऊन बाहेर आल्या.. अनुच्या जवळ बसल्या आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,.." पोटभर खा, प्रवासातून आली आहे .काही न कळवता आलीस छान वाटलं,..मनाला एकदम आनंद वाटला. खूप दिवस झाले भेट नाही,. तरी तुझ्या चित्रकला प्रदर्शनाच्या बातम्या बघतो आम्ही,.. ऊर भरून येतो. आपल्या परिचयात एवढा मोठा कलाकार आहे या कल्पनेने मन सुखावतं..त्यांच्या या वाक्यावर अनुला जरा लाजल्यासारखं झालं. काकू तुम्ही फार कौतुक करत आहे तुमची सुनही तेवढीच हुशार आहे,..त्या हसत म्हणाल्या," मग सख्ख्या मैत्रिणी तुम्ही, हुशारी तसूभरही कमी नाही तुमच्या दोघीत,.."तेवढ्यात मंगलच्या सासऱ्यांचा चहासाठी आवाज आला तश्या सासूबाईं म्हणाल्या, "तुम्ही बसा गप्पा मारत मी त्या दोघांचा चहा करते,.. तुम्ही कॉफी घेणार आहात ना." त्यांच्या या वाक्यवर मंगल म्हंटली ,"आई आम्हाला नदीवर सूर्यास्त बघायला जायचं आहे तिकडेच घेऊ आम्ही कॉफी,.."त्यावर सासुबाई लगेच म्हणाल्या,"बरं करून ठेवते घेऊन जा थर्मास,.."सासूबाईंच्या ह्या वागण्याचं अनुला कौतुक वाटलं,..कुठला सासुपणाचा तोरा नाही ,अहंकार नाही आणि वाणी तर अगदी गोड,.."
थर्मासमध्ये कॉफी घेऊन बंगल्याच्या मागच्या पाऊलवाटेने दोघे हातात हात घालून निघाल्या,.. दोघींना वाटलं काळ पस्तीस वर्षे मागे गेला आहे,..आपण जस तेंव्हा तळ्यावर जायचो अगदी तसंच चाललोय जबाबदाऱ्या तेंव्हा कमी होत्या आणि आताही कमी झाल्या आहेत,..तेव्हाच्या पंधरा सोळा वर्षाच्या मैत्रिणी,..रस्त्यावर सोनचाफा बहरला होता,.. दोघींनी फुलं तोडून अंबाड्यात खोचली,.. मावळतीच्या सोनेरी प्रकाश पसरला होता,.. नदीकाठची पाऊलवाट असल्याने माती गार आणि ओलसर होती.त्यामुळे दोघांनी एका बोरीच्या झाडापाशी चपला काढल्या आणि पायाला होणारा थंडगार स्पर्श अनुभवत त्या निघाल्या,.. गार स्पर्श मनाला उत्साह देत होता.. मैत्रीचं विश्वच वेगळं ते कोणत्याही वयात फक्त आनंद देत होतं..दोघी नदीच्या किनारी आल्या स्वच्छ नितळ पाणी घेऊन वाहणारी नदी हीसुद्धा मंगलच्या स्वप्नात होती,..अनुला आठवलं हिंदी चित्रपटातील तो डायलॉग मंगलला फारच आवडायचा आणि तिने तो मनावरही घेतला होता,.. ती नेहमी एक्टिंग करून म्हणायची सुद्धा तो डायलॉग,..आता अनु म्हणाली,"ए मंगु तुझा तो डायलॉग म्हणणा प्लिज प्लिज,.."
मंगल हसत म्हणाली थांब म्हणते ग म्हणत ती जरा मागे गेली नेहमी प्रमाणे ऍक्शन करत म्हणाली,
"तुम अगर किसीं चीज को सच्चे दिल से चाहो,..
तो पुरी कायनात तुम्ही ऊस चीज को दिलाने मे लग जाती है..\"
ह्या तत्वावर प्रचंड विश्वास आणि सकारात्मकता असलेली मंगल आपल्या आयुष्यात उत्तम उदाहरण होती हा विचार अनुच्या मनात आला,.. मंगल ने हाक मारली तशी अनु भानावर आली.
मंगल म्हणाली," तो थोडा पाण्यात बुडालेला बोडखा दगड आहे ना त्यावर जाऊन बसू तिथून सूर्यास्तही दिसतो आणि वाहत्या पाण्यात पायही सोडता येतात,..
अनु म्हणाली," अग्निहोत्र करून घेऊन आधी." त्यावर मंगल हसून म्हणाली,"अनु अजूनही कुठेही असलं तरी करतेस का अग्निहोत्र??"अनु म्हणाली हो करते ग,....मंगल तू आणि तुझी आजी मुळात संघर्षाने आधीच खूप हिमती होतात,..कोणीच आधार नाही म्हटल्यावर तू आणि तुझी आजी आधारावीणा स्वतः ताठ वाढत गेल्या,..मी मात्र आधीपासूनच आधाराने वाढणारी वेल होते.. कोणाच्या ना कोणाच्या उबदार कुशीत कधी रागाने,कधी झिडकारून वाढत होते ,..पण आधीपासून गावाकडच्या आजीच्या कुशीत भावनांना जाणीव आली तिने रुजवलेलं हे अग्निहोत्र मनात होतच,.. वाटलं खरंच हा सूर्य सोबत करतो आयुष्यभर,..जगण शिकवतो, जगवतो,.. खरंतर प्रत्येक मनुष्याला खूप काही देतो.मग मला नेहमी वाटतं ही छोटी आहुती त्याला धन्यवाद म्हणायला द्यायला हवी ना..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)