तिची पाऊलवाट भाग 4

ही कथा तिच्या प्रवासाची.. तिने निवडलेल्या एका वेगळ्या वाटेची..


तिची पाऊलवाट.. भाग 4
©स्वप्ना...
आजीचा मघाशी असलेला हसरा चेहरा पूर्ण बदललेला होता..नाना आजारी असतात हे आजीकडून माहित होत आपल्याला पण आजारी माणूस एवढा जोरात ओरडून बोलतो हे पहिल्यांदाच पाहिलं आपले असच अनुला वाटलं,..आपले गावाकडचे आजोबा कधीच रागवून बोलले नव्हते हेही आठवलं,..
आता मावशी आजीने खोलीचे दार लोटलं होतं आणि ती आजोबांशी वाद घालत होती,.. माझ्या गळ्यातलं गाणं दाबून टाकलं या लेकराला शिकवलं तर तेवढाच मला आनंद मिळेल,..घरात देवी ला संध्याकाळी पेटीवर प्रार्थना म्हणायची हे माझे स्वप्न तरी हे लेकरू पूर्ण करेल.. त्या सोनीला कशाचा नाद नाही,.. आणि गळ्यात आवाज नाही. या पोरीला आहे आवाज तर शिकवू ना तिला गाणं,..आणि पैसा पैसा काय करत आहे??साठवलेले काय वर घेऊन जायचे का?? जगून घेऊ द्या ना आयुष्यभर कुठे ठेवलं सतत दादागिरी करून तुमचेच नियम लादले माझ्यावर साधं मंदिरातही कधी जाऊ दिले नाहीत एकटीला,.. भजनी मंडळात गाण्याची हौस पूर्ण करावी म्हणून गेले तर चार चौघात मारत घरी आणत होतात आणि आता या पाच वर्षापासून तर अडकवून ठेवलं तुमच्या सेवेत,..आता तरी मला माझं जगणं जगून घेऊ द्या पोरी मधून त्यातून मिळणारा आनंद तरी नका हिरावून घेऊ अस म्हणत नंतर फक्त आजीच्या हुंदक्यांचा आवाज येत राहिला,.. आजोबा मात्र जोरजोरात शिव्या देत होते,..नाच गाण्याची आवड असलेली तमासगीर आहेस तू,.. असं म्हणत जवळ असलेला तांब्याच रागाने फेकून मारण्याचा आवाज आला होता,..
आपण घाबरून स्वयंपाक घरात पळालो. आई पोळ्या करत होती तिला जाऊन घट्ट मिठी मारली ,..ती पोळ्या करत होती,.. तिने पण आपल्या हाताचा विळखा आणखी घट्ट केला. आपल्या सारखी ती देखील या नव्या वातावरणात घाबरलेली होती. यापूर्वी अशी घट्ट मिठी आपण अनुभवली नव्हती आईकडून हे अनुला आठवलं,..
आपण आईला असे बिलगलो हे बघून आजीची सून म्हणाली," काय भूक लागली का??"तिने असे विचारताच मानेनेच नाही म्हणत आपण बाजूला झालो,. तितक्यात जोरात अनु अशी हाक आली,.. आपण पळत बैठकीत आलो. सोनू शाळेतून आली होती. मागच्या उन्हाळ्यात सोनू आपल्या आजीच्या गावी आल्यामुळे आपली चांगलीच गट्टी जमली होती. तेव्हा ती आपल्याला चार चारदा सांगून गेली होती.हायस्कूलला माझ्या शाळेत ये,.. आपण आज इथे आलो आहे हे तिला आणायला गेलेल्या आजीच्या पुतण्याने आधीच सांगून टाकलं म्हणून ती इतकी हाका मारत आली.. किती छान दिसत होती सोनू? अगदी टापटीप,.इस्त्रीचा ड्रेस,.. छान हेअर कट,.. स्कूल बॅग सगळं भारीच आणि एकदम छान होतं.. आपण मात्र खेडवळ सारखे उभे होतो तिच्यासमोर,..तिने येऊन मिठीच मारली तेव्हा तर तो तिच्या अंगाचा येणारा पावडरचा सुवास वा एकदम मस्त वाटलं,.. ताज्या मोगऱ्या सारखं पावडर खास तिच्या आत्याने फॉरेन वरून पाठवलं होतं,..नंतर तिच्या गप्पात कळलं,.. त्या सुगंधापासून का कोणास ठाऊक मोगरा आपल्याला आवडायचा हे ही आता अनुला आठवलं आणि ह्या सगळ्या आठवणीत गाडी एकांताचा रस्ता सोडून एका तालुक्याच्या रस्त्याने शिरली होती आणि नेमका समोरच गाड्यावर सुंदर हार गजरे विकणारा दिसला,..मोगरा दिसताच अनुने चटकन गाडी बाजूला घेतली,.. मोगऱ्याचे गजरे दहा घेतले, दोन वेणीला लावले एक गाडीतल्या गणपतीला आणि बाकी ओल्या फडक्यात बांधून घेतले कारण आता आपण जिच्याकडे जाणार तिला तर गजरे खूपच आवडतात आणि तिने तर आपल्यालाही गजऱ्याचं वेड लावलं होतं. ती नेहमी म्हणायची, "फुल जगायला शिकवतात,.. सुगंधाची लयलूट करायला शिकवतात,.. आणि निर्माल्य व्हायला शिकवतात.. खरंच प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने शिकणारी मावशीआजीच्या शेजारची मंगल मुळातच उत्साही आणि हुशार होती.. मावशीआजीने आपल्याला भांडून लावलेला गाण्याचा क्लासला ती मंगलच आपली पार्टनर होती,.. चालत सोबत येणारी, तिला बरेच शॉर्टकट माहीत असायचे क्लासकडे जायचे,..मावशीआजीच्या शेजारी छोटीशी पत्र्याची खोली होती तिची पण सुंदर झाडांमुळे टुमदार बंगली वाटायची,..गडद राणीकलरची गुलबक्षीची फुले आणि हिरव्या रंगाची दाट झाडी झोपडीला विळखा घालून होती..पत्र्यावर चढलेल्या जाई, जुई, मोगऱ्याच्या वेली त्याला येणारी भरगच्च फुलं त्या फुलांचे गाठीचे गजरे मंगलने आपल्याला शिकवले होते,..तिची आजी करायची तसे गजरे,..आजी अगदी भराभर आणि लांबसडक गजरे करायची,..कॉलनीत कोपऱ्यावर विकायला बसायची,..कधी कधी मंगल आणि आपण जायचो आजीसोबत गजरे विकायला,..जेंव्हा मावशी आजीला कळल तिने चांगलीच कानउघडणी केली होती आपली,.. स्पष्ट म्हणाली होती ती,"हे बघ अनु मंगल फक्त गाण्याच्या क्लासला सोबत आहे म्हणून तिची मैत्री ठेव,..बाकी काही आवश्यकता नाही तिच्या मैत्रिची,.. तिच्यासोबत गजरेबिजरे विकायला जायचं नाही,.. तुझं गाणं बंद करेल मी.. आजीच्या बोलण्यावर आपण मंगलची वकिली केली होती,.."आजी ती खूप हुशार आहे.. स्वतःच्या गाण्याचा क्लासची फिस ती दोन घरची भांडी घासून भरते,..ती कलाकार आहे,.. तिला तर आई-बाबा कोणीच नाही तिची आजी तिला खूप हिंमत देते,.. म्हणते," आयुष्यात कितीही अवघड प्रसंग आले तरी खचून जायचं नाही.. लढायला शिकायचं दिवस बदलत असतात,..कष्टाने चांगले दिवस येतील,आणि कष्ट करायला कधीच लाजू नये,..आजीने यावर आपल्याला रागवलं नव्हतं पण जवळ घेऊन समजावलं होतं..आजी म्हणाली होती हे बघ," ती मुळात गरीब आहे.. तिची गरज आहे गजरे विकण्याची,.. आपल्या सारख्या प्रतिष्ठित लोकांना असं दारोदारी गजरे विकणे चांगलं वाटत नाही,.. तुला सांगून ठेवते तिच्या सोबत फक्त गाण्याच्या क्लासला सोबत म्हणून जायचं,..नाही तर तेही बंद कर पक्या सोडेल तुला,..
आजीने पक्याचा नाव काढताच अनुच्या अंगावर काटा आला,.. हे आता जाणंवलं हा पक्या म्हणजे आजोबाच्या बहिणीचा नातू,.. गावातच राहायचा पण आपल्यावर वाईट नजर ठेवून होता,.. अनुला आत्तासुद्धा धस्स झालं किती काळ लोटला पण आठवणी आजही ताज्या वाटतात,.. पक्याची आणि आपली पहिली भेट झाली होती तेंव्हाच त्याची नजर आपल्याला आवडली नव्हती,..त्यादिवशी तर चैत्रगौरीचं हळदीकुंकू होतं,..आपण किती आनंदाने सोनूचं काठपदराच्या साडीच परकर पोलक घालून बायकांना अत्तर लावत मिरवत होतो,..तेवढ्यात पक्या आला,.. त्याने आपण छान दिसतोय म्हणून खसकन मागच्या खोलीत आपण पाणी प्यायला गेलो तेंव्हा ओढलं आणि आय लव यु पण म्हटलं होतं,..खरं तर आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा माणूस होता तो आपल्याला आवडायचाच नाही,.. आपल्याला त्याच्या अशा वागण्याने भीतीच वाटली होती त्या रात्रीच आपण मावशीआजीला त्याची तक्रार दिली आणि आजीने त्याची काय सोय लावली की तो नंतर आपल्याकडे बघायचा देखील नाही,..पण त्यादिवशी,..ती चैत्रगौर एवढी छान असून सुद्धा नंतर आपलं लक्ष नव्हतं नुसती छाती धडधडत होती त्याचा तो राकट किळसवाणा स्पर्श,..
खरतर किती खुश होतो आपण त्यादिवशी किती वाट बघितली होती मी आणि सोनुने त्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकाची,.. मावशी आजीला खूप हौस होती.. आजोबांनी तिला बाहेर जाऊ दिलं नाही तरी ती या सणवारातून जगून घ्यायची,..आंनदी राहायची.. तिची कलाकुसर सजावटीतून दाखवायची,.. सोहळा करता याचा तिला चैत्रातल्या गौरीचा.. हळदीकुंकू ठरवून झालं आणि ती गौरीच्या थाटामाटात लागली,.. रोज शाळेतून आले की खमंग वास घरभर दरवळत असायचा आपण आणि सोनू शाळेतून आलो की ओरडतच विचारतो आजी आज काय बनवले?? दोघींना जवळ घेत सांगायची ,"खमंग शंकरपाळी, गोड लाडू ,.."
रोज स्वयंपाक का नंतर आपली आई, मावशीआजी आणि तिची सून काहीतरी पदार्थ बनविण्यात गुंग असायच्या,.. आपल्या गावापेक्षा आई इथे जरा जास्तच रमली होती..
©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all