तिची पाऊलवाट.. भाग ८

तिची पाऊलवाट..


#तिचीपाऊलवाट भाग 8
©स्वप्ना..
शेणाच्या गौऱ्यांचा धुरकट वास,पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सूर्य मावळला तरी मागे उरलेला संधीप्रकाश त्याला आता अलगद काळोखाची किनार चढेल,..
अग्निहोत्र झालं आणि अनु आणि मंगल दोघी एकदम शांत बसल्या होत्या,..नदीच्या वाहत्या प्रवाहाचा खळखळाट अगदी स्पष्ट ऐकू येत होता,.. काही क्षणाने अनु म्हणाली,"ह्या तबलजीच्या एकतर्फी प्रेमातून बाहेर पडायला तसा आयुष्याचा काही काळ आपल्याला दुःख ह्या भावनेत काढावा लागला,..खरंतर आपल्या दोघींना एकदम तो आवडायचा हीच किती गम्मत होती,..त्याने फक्त एकीला हो म्हंटल असत तर आपली मैत्री टिकली असती का ग?कसला बावळटपणा आपला,..पण काही म्हण त्या वयातली ती हुरहूर,ती ओढ,ते वाट बघणं ह्या सुंदर मोरपंखी भावना मात्र आपल्याला जगता आल्या,..एकतर्फी प्रेम असलं तरी,..
मंगल म्हणाली,"देवाने सगळं आयुष्य आखलेलं असतं. आपण फक्त अनुभव घेत जगायचं असतं,पण आपल्या गुणांचा,कष्टाचा कस लागतो हे मात्र नक्की,.. तूच बघ ना तुझं गायक होण्याचं स्वप्न तुला तर किती वेगळ्या वळणावर घेऊन गेलं,.. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात सासूबाईंचा फोन आला,"हॅलो अग मुलींनो,दाट काळोख होण्याच्या आत घरी या,पाऊलवाट नदीकाठची आहे,साप, विंचू,काही बारीक जीव ह्यांची भीती असते नदीच्या किनारी,घरी येऊन गप्पा मारा तुम्ही,मला काळजी वाटते."मंगल म्हणाली,"आलोच हं आई",चल ग निघू या...दोघी निघाल्या थंडगार पाण्यातले पाय खडकावर उमटवत,..पण एकमेकींशी काहीही न बोलता,..ती सूर्य मावळल्यानंतरची झालेली वेळ अशीच निशब्द ठेवावी वाटली त्यांना,..
बंगल्यात शिरताच समोरच्या वृन्दावनाजवळ त्याच्या छोट्याश्या देवळीत मिणमिणता दिवा लावलेला दिसला,..ती देवळी त्या शांत प्रकाशाने उजळून निघाली होती,..मंद अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता,..सासुबाई तिथेच खुर्चीत जपमाळ घेऊन बसल्या होत्या,.. आजीला एकदम आजीची आठवण झाली,तल्लीन होणं काय असतं ते आजीच्या चेहऱ्यावर दिसायची आणि ती जपाच्या प्रत्येक नामागणिक राममय होत जायची,..हळूहळू तिचा एकदम शांत व्हायचा,..आता मंगलच्या सासूबाईंचा चेहरा तसाच दिसत होता,एकदम शांत,निर्विकार,तसं पाहिलं तर त्यांचंही वय आता भरपूर होत,..सत्तरीच्या जवळपास असेल,..पण त्या वयाला लाजवेल असा उत्साह, प्रसन्नता आणि सगळ्यांना वाटायला भरभरून प्रेम आहे त्यांच्याकडे,..मंगलचे सासरे गेल्या पंधरा वर्षात अंथरुणाला खिळून आहेत,देव काही त्यांची लवकर सुटका करत नाही पण त्याचा कुठलाही बाऊ न करता,..त्याचा ताण स्वतःच्या जगण्यावर न येऊ देता ह्या अगदी शांत आहेत,..राग,तणतण,चिडचिड असा कोणताही भाव चेहऱ्यावर आणि जगण्यातही नाही,..सगळं अगदी सहज स्वीकारून सुरू आहे.
काय अनु आवडली का आमची नदी,?त्यांच्या प्रश्नावर अनु भानावर आली,.. जपमाळ आपल्या पितळी डबीत ठेवताना त्यांनी अनुला विचारलं आणि म्हणाल्या हातपाय धुवून घ्या आज मस्त गरम पुऱ्यांचा बेत आहे,..मंगल तू फक्त सगळ्यांना वाढण्याचं बघ मी करते गरम गरम पुऱ्या,..रेवा आहेच माझ्या मदतीला..अनु लगेच म्हणाली,"काकु अहो आम्ही दोघी असताना तुम्ही कशाला करताय,..आयत तुम्ही खा आमच्या हातचं,.. आणि एवढा रस पुरीचा बेत कशाला करत बसताय, मी काही पाहुणी नाही तुमच्याकडे,..सासुबाई हसत म्हणाल्या,"अग पाहुणी नाहीस पण माझ्या लेकीसारखीच आहेस ना,..ती पण तुझ्याचसारखी होती बरं,.. सगळ्या कलेत हुशार,..पण आयुष्यच फार थोड लिहून आणलं होतं तिने,.."एवढं बोलत असताना काकूंनी पदराला डोळे टिपले मग मंगलने विषय बदलला,.."अग तू आईच्या हातच्या पुऱ्या खाऊन बघ मस्त टम्म फुगलेल्या,..एकदम भारी असतात हे म्हणत अनुला मंगलने डोळा मारला,.."
तिघी घरात आल्या,..रवी आणि मंगलचे सासरे हॉलमध्ये बसलेले होते,..अनुने नमस्कार केला,..तश्या सासुबाई म्हणाल्या आपली सुमी आली आहे,..त्यांच तोंड पूर्ण वाकड झालं होतं,..हाताची बोटं देखिल वाकडी होती,..सुमी आहे हे ऐकताच चेहरा खुलला त्यांचा,..तो वाकडा हात त्यांनी डोक्यावर ठेवला,..सगळं अंग थरथरत होतं,..सासूबाईंपेक्षा वयाने बरेच मोठे दिसत होते ते.त्यांची गायकी आपण ऐकली होती,..क्लासच्या एका कार्यक्रमात ह्यांच गायन होतं,.. तेंव्हा नावदेखील होतच ह्यांच,...सासुबाई स्वयंपाकघरात गेल्या,..त्या पाठोपाठ अनु,मंगल गेल्या,..सासुबाई म्हणाल्या,"अनु राग नको मानुस ग,..तू सुमी म्हणून सांगितलं मी त्यांना,..पण काय करणार ग वयाचा आवाका पाहता आता अश्या बातम्या सहन होणार नाहीत,आणि ते दुःख घेऊन जगावं लागेल त्यांना उरलेले क्षण,..सुमी मध्ये फार जीव होता,तिचा अभिमान होता त्यांना,.. पोरगी सगळ्याच कला घेऊन आली होती,..आता तिची ह्या महिन्याभरात फार वाट बघत आहेत,..मघाशीच मला म्हणाले कोण आलंय,.. तेंव्हाच सांगितलं सुमी आली आणि रात्र होण्याच्या आत नदीकडे पळाली,..त्यांना खात्रीच पटली कारण सुमीला नदी फार आवडायची ना,..हे सांगताना परत त्यांना रडू आलं,..त्या म्हणाल्या,"माझ्या मेलीच असंच होत ग हल्ली,डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही बघ लेकीच्या आठवणीने,..एवढं बोलून त्यांनी रेवाला हाक मारली,.."रेवा इकडे ये राजा,.."रेवा पळत आली, काय आजी,..रेवा सुमीची मुलगी आहे ग,..मावशीला नमस्कार कर बेटा,.. मघाशी ती शाळेतून भरतनाट्यम शिकायला गेली होती म्हणून तुला दिसली नाही,..रेवाने पटकन वाकून अनुला नमस्कार केला,.. तस अनुने तिला नकोग म्हणत दोन्ही हाताने उचलून गळ्याशी लावलं,..आई किंवा वडील कोणीही आयुष्यातुन हरवलं की काय मनस्थिती असते हे अनु चांगलं ओळखून होती,..रेवा अगदी गोड होती दिसायला,..दोन वेण्या,टपोरे डोळे,..उंच आणि सावळीच असली तरी नाकीडोळी अगदी तरतरीत दिसायला,..रेवा बोलायलाही नम्र वाटली,..अनुला वाटलं कितीही आजी आजोबा,मामी प्रेम करणारी असली तरी आपलं घर ते आपलं असतं,.. आई बाबा सोबतच हक्काचं,.. आजीने आणि नातीनेच गरमगरम पुऱ्या केल्या,.. रवीने आधी वडिलांना खाऊ घातलं,..पथ्य तसं काही नव्हतं त्यांना त्यामुळे गरम पुरी आवडीने खाल्ली पण एकच खाल्ली,..आजी म्हणाल्या हल्ली जेवण खुप कमी झालं आहे त्यांच,..आज तरी लेक आली म्हणून खुश आहेत,..रेवाला सारख विचारत असतात तुझी आई कधी येईल,..तिला फोन लावून दे,..एक ना अनेक..मागे पुढे करत सगळ्यांची जेवण आटोपली,..अनु म्हणाली तुम्ही उगाच एवढा घाट घातला,..साधी खिचडी देखिल चालली असती,..त्यावर सासुबाई म्हणाल्या,."एकतर तू उद्या जेवायला थांबत नाही म्हणतेस,..मग तुझ्यासारख्या मोठ्या चित्रकाराचा पाहुणचार करायचा कधी ग,..?"रवी हसून म्हणाला," मग आमच्या नॅशनल आर्टिस्ट मेव्हणीच आदरातिथ्य करायला मिळणं आधीच अवघड त्यात संधी मिळाली तर तू उगाच आढेवेढे कशाला घेतेस,..हे घे तुझ्या आवडीचं मघई पान,.. मघाशी तुम्ही नदीकडे गेल्यावर मी खास जावून घेऊन आलोय,..."अनुचे डोळे भरून आले,..अगदी सख्ख्या भावजी सारखं नातं टिकवून होता रवी,..अडीअडचणीला पटकन उभा राहणारा,.. हसत खेळत नातं हलकं फुलक ठेवणारा,..खरंतर मंगल नंतर आपलं लग्न झालं तेंव्हा सुद्धा रवीने मदत केली होती,..मध्यंतरी भेटी कमी झाल्या पण नात्यात दुरावा नाही आला,..आपल्या घरातले चौघांचे वाढदिवस,अनिवर्सरी सगळं लक्षात ठेवून आवर्जून फोन करतो,.. आपल्याकडून कधी त्याच्या वाढदिवसालाही फोन करणं झालं नाही तर त्याचा राग नाही,रुसवा नाही,पुढच्या भेटीत वचपा पण नाही,..साधं सरळ प्रेमाने वागणं प्रत्येकाशी अगदी आपल्या मुलांशी देखील,..आता मघाशी पण स्वतःच जेवण सोडुन वडिलांना किती प्रेमाने खाऊ घालत होता..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all