तिची पाऊलवाट.. भाग ७

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट 7
©स्वप्ना..
खरंतर प्रत्येकाला आयुष्यात खूप काही दिलेले असत. मग रोज होणारी संध्याकाळ या आभारासाठी आणि सकाळ आशीर्वादासाठी ठेवावेच वाटतो. त्याला क्षणभर भेटावं मनातून.
बरं मंगल गप्पात वेळ होईल, मला तयारी करु दे म्हणत अनुने पर्स मधलं छोटसं अग्निहोत्राच पात्र,एक छोटी शेणाची गौरी,..आंब्याची पळी,एक वाटी, तुपाची डबी, तांदूळ आणि काड्याची पेटी काढली सगळी तयारी करून पश्चिमेकडे तोंड करून दोघी मैत्रिणी बसल्या हातात हात गुंफून.., क्षणभर शांतता होती पक्षांचे आवाज तेवढे येत होते. अजून सूर्य बराच वर होता. मंगल म्हणाली,"त्याला डोंगरामागे लपायला जायला वेळ आहे अजून."
तिच्या या वाक्याला पकडत अनु म्हणाली,"कदाचित आपल्या आयुष्यासारखं ना मंगला,.. बघ ना आता आपण आयुष्याच्या अशाच काहीशा टप्प्यावर आहोत उगवून खूप वेळ झालाय,. भर माध्यन्हाचे चटके सोसून झालेत..आता थोडं शांत वाटतंय,..तो उतरणीला लागलाय पण तो कसा उतरणीतही सोनेरी ऊन पसरवतोय ना आता आपणही आपल्या आयुष्यातून सोनेरी ऊन पसरवायचं,..नवरा,लेकरं, नातेवाईक हे तर आहेतच पण याशिवाय आज पर्यंत आपल्याला सोबत असणारा समाज याचेही ऋण फेडायचे,..तो सोनेरी ऊन वाटणारा सूर्य आता आपण आहोत.. सांगता येत नाही आपण डोंगराआड कधी जाऊ,..
मंगल म्हणाली," अनु तू बोलत आहेस आणि मला आजीची आठवण आली ग ती तर सांगायची आपल्याकडे काही नव्हतं तोपर्यंत ठीक आहे,..पण त्याने भरपूर दिले तर समाजाचे ऋण फेडता येतील असं बघायचं कोणत्याही रुपानं, कोणत्याही कृतीनं,ते शोधायचं शेवटी देह चंदनासारखा झिजवण्यासाठी दिला आहे देवाने,.. करत राहा आनंद मिळत राहतो.. आयुष्यात सांगता येत नाही कधी सूर्यास्त होईल पण आयुष्यात सोनेरी ऊन पसरवत रहा,.. "
अनु म्हणाली," खरंच मंगल किती बदलत जातो आपण, काळही बदलतो आणि काळाच्या ओघात माणसं हरवत जातात.. पण त्या माणसांचे शब्द आठवणी तशाच मनात राहतात. तुझी आजी खरच प्रेरणेचे स्थान होती सगळ्यांसाठीच,.. तिची जिद्द वाखाणण्याजोगी होती तिने जगण्यात शिकवलेले फुलांचे अर्थ तर कायम लक्षात राहतील.. मला तर नेहमी किती छान हाक मारायची,\"अनुबाई\" आल्या का ..मी कधीकधी मावशी आजीकडून नाराज होऊन आले तेव्हा तर आवर्जून मला जवळ घेऊन समजवायची आणि आयुष्यातला तो भयानक प्रसंग पक्याने माझ्यावर केलेला तेव्हा तर तिने कुशीत घेऊन जो धीर दिला त्यानंतर मी त्या गोष्टी सहज मनातून काढू शकले आणि नव्या वळणाला लागले ग." मंगल म्हणाली," खरंच उमलण्याचे आपले ते दिवस सुंदरही होते आणि घोर लावणारेही उमलत्या वळणाचा तो टप्पा काही वेगळाच होता नाही का?मन वेगळ्याच वेगाशी स्पर्धा करायचं,..कशाची म्हणून भीती वाटत नव्हती." सगळं करून बघावं वाटायचं सुंदरही राहावं वाटायचं,..छान दिसावं वाटायचं,.. मनसोक्त हुंदडावं वाटायचं,..घरचा बंधन तर नकोच वाटायचं,.." तुला आठवतं का ?आपल्या गाण्याचा क्लास मधला तो तबलजी किती आवडायचा आपल्याला,.. त्याचे ते झाकीर हुसेन सारखे उडणारे केस भुरळ घालायचे आपल्याला,..
एकदा आपण क्लासमध्ये गुरूपौर्णिमेच्या गाण्याच्या कार्यक्रमात गेलो आणि येताना रस्त्यात लागलेला चिंब पाऊस आठवतंय,..अनु म्हणाली ,"अगदी त्या पावसासारखं ओलं ओलं आठवतंय,.. वयाची वेगळीच तान असते आणि आपण बेफाम होऊन गिरकी घेत असतो,.. नेमकच रखरखत्या उन्हामुळे अंगाची आणि जमिनीची काहीली झालेली होती आणि त्या भाजलेल्या मातीवर टप टप सांडलेले त्या आकाशातले मोती जणू फुटून त्यातलं अत्तर शिंपडत होते,..आभाळ सगळ मातकट झालं होतं,.. आता आहे अस सोनेरी पिवळा ऊन क्षणात हरवलं होतं,..वारं तर किती गार,सुगंधी आणि ओलं होतं,.. आपण दोघी नेमकच आपल्या क्लास मधलं गाणं
"कुहू कुहू बोले कोयलिया..."
हे म्हणून आलो होतो..गाणं तर जबरदस्त झालं होतं. त्यामुळे कौतुकाच्या लाटेवर तरंगतच आपण बाहेर पडलो होतो,..घमघमणारे मोगऱ्याचे गजरे आणि नेमकच निसर्गानेही पालटलेलं रूप त्या वयाला आवडणारच म्हणून टप टप पावसात पळायला लागलो पण एका क्षणी त्याचा वाढलेला जोर मग आपण शोधलेला आडोसा त्या चहाच्या टपरीचा आणि नेमका तिथेच उभा असलेला आपला आवडता तबलजी,.. आपण दोघी एकमेकींकडे बघून नेमकं काय लपवून हसलो काय माहिती पण आपल्या आतपर्यंत काही तरी हल्ल होतं,.. ज्याला बघायला रोज जीव डोळ्यात गोळा व्हायचा तो या अशा धुंद वातावरणात आपल्या सोबत होता,..आनंदामुळे दोघींचा मोगरा सुगंधाने अधिकच बहरला होता आणि त्यात त्याने विचारलं," चहा घेणार का?" आपण दोघी मानेनेच \"हो\" म्हणालो होतो,.. अद्रकाचा वास घमघमत होता..चहा मस्तपैकी उकळत होता. त्याने विचारलं कोणत्या शाळेत जातात तुम्ही? कोणत्या वर्गात आहात? त्यावर आपलं \"नववी\" हा शब्द ऐकताच तो म्हणाला," आणि शाळा कोणती?" पुढचं बोलेपर्यंत आलेला चहा,.. चहा घेताना काही काळ असलेली शांतता..त्यातच आपल्या दोघींची पावसाला तळहातावर घेण्याची धडपड,.. खरंतर पावसाचा कमी होणारा जोर कमी होऊ नये असंच वाटत होतं आपल्याला,..
मनातून आवडणार माणूस अवचित आणि अशा गोड वातावरणात भेट म्हणजे आनंदाला उधाण आल्यासारखं झालं होतं. तो म्हणाला," काय सुंदर गायलात तुम्ही दोघी आता क्लासमध्ये गाणं,.. मला तर तुमच्या सुरांमध्ये भिजावं की तबल्याच्या साथीने सोबत पळावं तेच कळत नव्हतं,.. त्याच्या कौतुकाने मोहरून शहारून गेलो होतो आपण,.. तेवढ्यात तो म्हणाला," शाळा नाही सांगितली..कोणती शाळा आहे तुमची? तिथे संगीत विषय शिकवतात का ग? त्यावर तू म्हंटली," हो शिकवतात ना खूप छान शिकवतात प्राजक्ता ताई आहेत आम्हाला.." त्यावर तो एकदम खुल्ला आणि म्हणाला," म्हणजे तुमची शाळा \"शारदा भवन\"आहे का? मला माहित आहेत तुमच्या प्राजक्ता ताई.. आवडतात का ग तुम्हाला त्या? आपण दोघी \"हो खूप आवडतात\"..त्यावर त्याच वाक्या \"मलाही खूप आवडतात".
त्याच्या या वाक्यावर आपण दोघे किती जोरात ओरडलो होतो. काय तुम्हाला पण आवडतात म्हणजे?? चहावाला आपल्याकडे पाहायला लागला होता,.. या तिघांचं नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज बांधत होता. हे आठवूण आताही अनु आणि मंगल खळखळून हसल्या,..काय पोपट झाला होता आपल्या दोघींचा जेव्हा तो म्हणाला," आमचा आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालाय,.. आता या पुढे तुम्हाला गाण्याचा क्लास चा निरोप द्यायला मुद्दाम शाळेत येईल मी त्यानिमित्ताने तेवढीच नजर भेट होईल,.. नाही का ?चला निघू मी पाऊस जरा थांबलाय."
हे सगळ आठवून बोलताना आत्ता देखील अनुच्या डोळ्यात हसता हसता पाणी आलं,.. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली," किती वेड वय असत ना,.. वेड्या गप्पा, वेडी स्वप्न, त्यातल टिकलय काय तर फक्त आपली वेडी मैत्री,.."
मंगल म्हणाली," मैत्री वेडी आणि निस्वार्थी आहे म्हणून तर टिकली आहे ग, आणि त्या त्या वयाचे ते ते अनुभव असतात,..शरीरातले बद्दल निसर्गाची ओढ त्यातही प्रेमासारखी सुंदर गोष्ट अनुभव अशी वाटणं त्यात गैर काय होतं?"
अनु म्हणाली," गैर काही नसलं तरी सगळं बरोबर असत असेही नाही पण या अनुभवातून तर जगणं शिकतो आपण.."
तेवढ्यात सूर्यास्ताची रिंग मोबाईलवर वाजली,.. दोन मिनिटे आधीच ती रिंग वाजते असं म्हणत अनुने चटकन गौरी पेटवली., सोनेरी ऊन पसरवणारा सूर्य आता एकदम लालसर केशरी गोळा दिसत होता. त्याचा डोंगराकडे जाण्याचा वेग वाढला आणि काही क्षणात तो मावळला. त्याक्षणी अनुने चिमूटभर तांदूळ वाटीत घेतले त्यावर थेंबभर साजूक तूप घातलं,.. आणि तांब्याचा पळीने आहुती टाकली आणि तो नेहमीचा श्लोक म्हंटला.
"अग्नये स्वाहा अग्ने इदम् न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम्.."
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all