तिची पाऊलवाट भाग ५

तिची पाऊलवाट.. प्रवास तिने निवडलेल्या वेगळ्या वाटेचा
#तिचीपाऊलवाट भाग-5
©स्वप्ना..
आजीची सून तिला मैत्रिणी सारखी वाटायची. गावाकडे तिला भावना व्यक्त करायला कोणीच नव्हतं इथे तरी ती जरा हसत खेळत होती आजीच्या सुनेसोबत रमत होती. दुपारच्या फराळ बनवण्याच्या कार्यक्रमात मावशी आजीच्या ओव्यांमध्ये ती देखील सूर मिसळायची,.. तेव्हा वाटायचं आपल्या आईला देखील गाणे येतं ?? एक दिवस तर ती एकटीच ओवी म्हणत होती,..
" अरे संसार संसार
दोन जिवाचा विचार
देतो सुखाले नकार आणि दुखाले होकार.."
हे म्हणताना ती मधेच रडायला लागली तेव्हा मावशी आजीने किती समजावलं होतं. हे बघ परमेश्वराच्या मृत्यूच्या निर्णयात आपण कोणी काही करू शकत नाही,.. पण असं समजायचं की तुला मुक्तपणे जगण्यासाठी हे असं घडलं असेल..आम्ही पाहिला आहे तुला किती बंधनं होती लग्नानंतर.. तू तर पूर्णपणे मिटून गेलीस,.. लग्नाआधीची काय मला माहीत नव्हतीस का? माझं सासर तुझं माहेर एकच तर गाव,..तुझी हुशारी पाहून तर तुझी सोयरीक सांगितली होती ग मी माझ्या बहिणीला. तिलाही माझ्यासारखी हौस,..तिचा पोरगा हुशार असला तरी माझ्या नवऱ्यासारखाच संशयी निघाला ,..मग काय सगळे बंधन आलेच.. सगळी हुशारी दबली ग तुझी,..तुझ्या लेकीला सगळे स्वातंत्र्य होतं पण तुझ्या बाबतीत का असा होता काय माहित?
तेव्हा आई उदास हसत म्हणाली," मला पंगू करून टाकलं त्याने,.. एवढे वर्ष शहरात राहिलो.. पण कधी मोकळं जगू दिलं नाही,..दरवेळी बंधन ह्याच्याशी बोलू नको,इकडे जाऊ नको,तिकडे बघू नको,हसू नको,..हे करू नको,हे घालू नको,..ना शिक्षणाचा न कलेचा कुठलाच उपयोग करू दिला नाही जगताना आणि आता तो गेल्यावर सगळ्यांना वाटत होतं मी खंबीर व्हावे म्हणून पण,.. माझ्यातला बळ ,माझा आत्मविश्वास त्याने सुरुवातीलाच काढून घेतला,.. साधी भाजी आणायची असेल तर मला कधी बाहेर जाऊ दिलं नाही आणि आता सगळे एकटीवर सोपवून गेला.. मी तरी कशी हिंमत करणार पण,मावशी तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी सांभाळून घेतलं हे नशीबच माझं आणि माझ्या लेकीचं..
एवढे बोलून आई रडायला लागली..आपल्याला खुप वाईट वाटलं पण तेंव्हा आपण काहीच ऐकलं नाही असं दाखवलं आणि त्यानंतर आपण आपल्या आईवर जास्त प्रेम करायला शिकलो,..कारण तिच्या बोलण्यावरून कळलं लग्नापूर्वीची स्त्री कितीही हुशार असली तरी तिची हुशारी मिळणाऱ्या जोडीदारावर टिकून असते.. आपली मिटलेली आई आज आपल्याला कळली होती,.. पण तेव्हाच आपण ठरवलं होतं तिच्यातली ती तिला शोधून द्यायची म्हणून तर आज एकटी एवढ्या दूर राहून कितीतरी समाजकार्यात गढून गेली आहे,..स्वतःच्या लेकीकडे यायला वेळ नाही तिला,..आपल्या या भेटीविषयी आपण तिला काहीही सांगितलं नाही,.. तिला जेव्हा आपण भेटू तेंव्हा चांगलंच सरप्राईज होणार आहे तबाबल दोन वर्ष झाले तिला प्रत्यक्ष भेटून,..
फोनवर व्हिडीओ कॉलमध्ये दिसते तशी अधूनमधून,.. पण खरंच आपल्या अगदी जवळच्या माणसांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो,.. आईच्या कॉटनच्या साडीचा तो मऊस्पर्श आणि मायेचा सुवास,.. तिचा तो सुरकुतलेला हात,..अनुला आईच्या आठवणीने भरून आलं,..
आईचा सत्तरावा वाढदिवस आपण ठरवला तसाच करायचा आहे,.. आजीला सेपरेट गाडी करून बोलून घेतले मावशीची सुन उषा तर आपल्याबरोबरच निघेल,..आता आपण आपली मैत्रीण मंगल हिच्याकडे जाणार ती सोबत आली तर घेऊनच जाऊ,..आणि खास पाहुणे जीला आईने आज अस घडायला मदत केली होती ती मावशी आजीची भाडेकरू गोडसे मावशी,.. तशी तीही 70 वयाची असेल पण,.. आपण फोन करताच किती उत्साहाने म्हणाली,"तुझ्या आईचा म्हणजे माझ्या लाजाळूचा वाढदिवस आणि तुला आईचा वाढदिवस एवढा छान करायचा,.. मग मी नक्कीच येणार ग ,..तुमच्या आयुष्यातल्या दुःखाच्या क्षणाचे भागीदार झालो आता सुखाचा क्षणाचे साक्षीदार होणार ग चिमणे,.. मी येतेच माझी गाडी घेऊन,..
गोडसे मावशीकडे स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर आहे खर तर तिचाही संघर्ष कठीण होता पण तिच्या हिमतीला दाद द्यावी अशी स्थिती गोडसे मावशीची,..सगळं आठवत अनु मनात म्हणाली," स्त्रियांमध्ये किती ताकद असते ना,..कठिण आयुष्य खेचून नेण्यासाठी असणारा सकारात्मक आशावाद जणू जन्मतःच स्त्री स्वतःबरोबर घेऊन येते,.. म्हणून ती जगते आणि काही वर्षात ती पूर्ण बदलते ती पहिल्यासारखी राहत नाही आणि स्त्री ताकदीची हि गोष्ट पकडून आपण केलेली ती पेंटिंग "तिची पाऊलवाट" आणि तिला मिळालेला हा अवॉर्ड,..खरं तर या सगळ्या स्त्रियांचा जवळचा वाटत आहे,..
आयुष्यात आलेल्या स्त्रियांचं जगण्याचं रेखाटन आपण मनावर करत गेलो आणि त्या रेखाटनातूनच आपला कॅनव्हास,.. स्त्रीची ताकद दाखवू शकला.. खरंच या सगळ्या जर तयार झाल्या तर या सगळ्यांनाच आपण घेऊन जाऊ या सगळ्यांचे हात या पुरस्काराला लागायला पाहिजेत,..
या सगळ्या विचारात गाडी कधी दाट झाडीच्या रस्त्याला लागली ते अनुला कळलंच नाही,..मंगलच्या स्वप्नातलं प्रत्यक्षात उतरलेलं घर,..गजरे विकणारी मंगल आज किती मोठी गायिका झाली आहे,..तिची स्वप्न बघण्याची, सकारात्मक विचार करण्याची सवय खरंच चांगली होती,..ती नेहमी म्हणायची,"आपण आयुष्यात जसा विचार करतो तसंच घडत असतं,..म्हणून नेहमी चांगलाच विचार करायचा,.."अश्या विचारांची मंगल खरंच तिच गायक होण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं,..
मघाशी ह्या मंगलच्या विचारातूनच आपण किती आठवणी परत जगून आलो या विचाराने अनु हसली आणि बंगल्यासमोरच्या बहव्याच्या झाडाखाली अनुने गाडी लावली.बहव्याचं झाड मंगलला खूप आवडायचं म्हणायची,"माझा मोठा बंगला असेल आणि त्यापुढे झुंबराच झाड असेल,.."ती नेहमी या झाडाला झुंबराच झाड म्हणायची,..त्याला द्राक्षासारखे लटकणारे फुलं जणू निसर्गातले झुंबर आहेत असंच वाटायचं तिला,.. म्हणायची सोहळा साजरा करायला डेकोरेशन आहे हे निसर्गाचं,.. तिला ते झाड स्वतःच्या गॅलरीतून दिसावं अशी ईच्छा होती,..ती देखिल पूर्ण केलेली दिसते मॅडमने म्हणत अनु बंगल्यात शिरली,.. अनु दबकत हिरवळीवर पावलं टाकत चालू लागली कारण बंगल्यात शिरताच तानपुऱ्याचे सूर अनुच्या कानी पडले आणि त्या पाठोपाठ सुंदर आलाप,..आहाहा,.."देस राग"..मंगलचा वजनदार आवाज अगदी शास्त्रीय गायकीला शोभणारा आणि देस रागाची आपली आवडती चीज,..अनुला पुढे जाऊन ही सुरांची समाधी मोडावी वाटेना,..तिला वाटलं ह्या उलट आपणच ह्या सुरांसोबत समाधी लावावी,..ह्या स्वरांना ह्या शब्दांना उतरू द्यावं आपल्या आत जिथे खरंच माझा हरी वाट बघतोय या सुरांची,..कुठेतरी आपलं गाणं सुटून गेलं,..मग आपल्या ह्या आत्म्याला वाईट वाटतच ना,..पण आज मिळतीये संधी ऐकण्याची तर भिजून घेऊ द्यावं त्यालाही या सुरांमध्ये असा विचार करत अनुने गवतावरची खुर्ची नीट आहे ना हे बघून तिथेच सुरांकडे मन वळवलं,.. हे सूर ओळखीचे नव्हे आपलेही,..आपणही कधीतरी किती रमून जायचो ह्यात,..आताही सूर अनुच्या आत झिरपत होते,..
"हरीगुणा गाय रे तू मना,..
का हे भटकत फिरे निसदिना,..
छिन भंगुर याहा जगत पसारा
माया जाल बिरथा कल्पना,.."
ह्या शब्दांसोबत येणारे आलाप,..अनु तल्लीन झाली,..त्या ओळखीच्या सुरात सूर मिसळल्या गेले आणि आतमध्ये मंगलला जाणवलं दुसरा सूर दुरून येणारा,.. पण ओळखीचा,..ती धावत अंगणात आली,.. अंगणात अनु खुर्चीत बसलेली होती,..डोळे बंद होते आणि अनुचा सूर तर असा लागला होता की सोबतचा तानपुरा बंद झाला ह्याचेही तिला भान नव्हते,..ह्या क्षणी मंगलला दोघी आठवल्या गाण्याच्या क्लासमधल्या,.. सरांनी शिकवलेला एखादा राग आवडला की दोघी त्या रागाच्या मागेच लागायच्या,..बागेत,गच्चीत,मोगऱ्याची फुल तोडताना,..शांत तळ्याकडे मग तोच आवडलेला राग आळवल्या जायचा,..आताही तेंव्हासारखीच अनु गातीये असं मंगलला वाटलं.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)

🎭 Series Post

View all