तिची पाऊलवाट भाग ३९

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 39
©स्वप्ना,..
उमाने गोगटे मावशीला खुर्चीवर बसवलं आणि आईची खुर्ची मध्येभागी ओढली,..आणि माईकमध्ये सगळ्यांना सांगितलं ज्याची आपण वाट बघतोय ते ताईंचे शब्द आता आपल्याला ऐकायचे आहेत,.. आता मीदेखील स्टेजसोडून समोर बसणार आहे,..एवढं म्हणून उमा समोरच्या खुर्चीत जाऊन बसली..
आईने माईक हातात घेतला,पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली,..आईचे डोळे पाणावले होते,.. आईने सगळ्यांना हात जोडले,..माझा वाढदिवस सोहळा करण्यासाठी तुम्हीं आलात मला खुप आनंद झाला आहे,..तुम्ही मला खुप मोठया जागी नेऊन बसवलं आहे,तेवढी मोठी मी नाही ए,हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे,तुम्ही मला तुमच्या आयुष्यात एवढं महत्वाचं समजता,..पण मघाशी माझी मैत्रीण गोगटे जसं म्हंटली तसं हा सगळा ऋणानुबंधाचा खेळ आहे,..मी जशी तुमच्या आयुष्यात आले आणि तुम्हाला प्रेरणा मिळली तसं तुम्ही माझ्या आयुष्याला नकळत प्रेरणा दिलेली असते,..पुलं म्हणतात तसं
"ह्या हृदयीचे त्या हृदयी,.."
हे असं नकळत प्रेरणा देणं त्याला आवाज नाही पण भावना आहेत,..त्या भावनांशी आपण जोडले जातो,..एकमेकांना सोबत घेऊन माझा हा प्रवास आहे,..त्यामुळे ह्या संसंस्थेच्या यशात वाटा तर सगळ्यांचा आहे,..तुम्ही सगळे सोबत होता म्हणून मी त्या शिखरावर पोहचले आहे,..पाउलवाटेवर तुम्ही भेटलात म्हणून तिकडे जाणं सोपं झालं आहे,..आज माझ्या लेकीने माझं एवढं कौतुक केलं ती लेकच माझ्या जगण्याची प्रेरणा होती,..नवरा गेल्यावर मनात कितीदा आत्महत्या करावी असे विचार आले आणि त्याक्षणी चिमुकल्या हातांची मिठी गळ्याभोवती पडायची,..मनाला समजवायला हे कारण पुरायचं,.. कधी समोर सासुबाई दिसायच्या लेकाचे दुःख पचवून जगतच होत्या ना,..त्यांनी प्रेरणा दिलीच जेंव्हा आम्हाला दुसऱ्या गावी ठेवलं तेंव्हा महिन्याला आम्हाला भेटायला यायच्या,..हिम्मत होती त्यांच्यात आजही आहे,गावी एकट्याच राहतात माझ्यातली हिम्मत त्यांच्यामुळेच आहे,..
कधी कधी सगळं छान असतं नसतं पण माणसाला सोबत चांगली हवी असते, ती सोबत मला मामीने दिली,..आणि माझ्या लेकराला सोनीने दिली,..एकलकोंड होऊन जगण्यात निराशा नाही येऊ दिली ह्या दोघींनी..
कधी कधी माणुस इतका स्वतःला कोशात गुरफटून घेतो की त्याला स्वप्न बघण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची जिद्द हरवते,..ती जिद्द आम्ही दोघींनी एकमेकांना दिली,..कोणी तुमच्या लक्षात आलं असेल गोगटेने,..आईने आताही गोगटे मावशील अंगठा दाखवला तिने देखील तसं केलं..
आई म्हणाली जगण्याची जिद्द दाखवणारे काही माणसं असतात त्यातली मंगल आणि तिची आजी होती,.. भांडे घासून,हार बनवून उदरनिर्वाह करून कला जपणाऱ्या मंगलने जिद्द शिकवली मला आयुष्यात.
माझ्या जावायाने मला नम्रता शिकवली,..आणि माझ्या लेकीने तर जगणंच शिकवलं,..जेंव्हा फक्त आम्ही दोघीच राहायला लागलो तेंव्हा ती मला आणखी जवळून कळायला लागली,..तिची मेहनत,तिची निर्णय क्षमता,ती कळत नकळत मला बऱ्याच गोष्टी शिकवू लागली आणि मग माझाही आत्मविश्वास आणखी वाढू लागला,..
संस्थेच्या सगळ्याच महिला तर मला सतत घडवतात,..त्यांचे जगण्याचे प्रवास मला अचंबीत करतात,..मला त्याक्षणी वाटतं आपला प्रवास तर काहीच नाही ह्यांच्या पुढे मग ती माझी अपंग सखी आणि तिचा जोडीदार असो किंवा गार्गी असो जी एवढ्या लहान वयात बलात्कारासारख्या घटनेला बळी पडून आज हिम्मत बांधून उत्साहाने जगते,..जनाबाई सारख्या मोठया बायकांनी उलट मला माया लावली मी फक्त निमित्त म्हणून उभी होते पण ह्या सगळ्यांसोबत ऋणानुबंधच होते,..मला प्रेरणा देण्यासाठी तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आहात,.. माझा हा दिवस तुम्ही इतका सुंदर केला आहे की मला खरंच ह्या सोहळ्याबद्दल शब्दही नाहीत त्याचं वर्णन करायला,..मला असंच प्रेम देत राहा,आपण सगळ्याच एकमेकींच्या जगण्याच्या प्रेरणा आहोत,..हे ध्येय आयुष्यात ठेवा नेहमीच कोणी दुःखी जीव आपल्याला सुखावता आला,सन्मानाने जगवता आला तर नक्कीच आयुष्यात आपण यशस्वी झालेलो असतो.
आईने माईक उमाकडे दिला,..हॉलमध्ये टाळ्या वाजताच राहिल्या,..आई आता आजीजवळ येऊन बसली,आजीने आताही तिच्या पध्दतीने कपाळावर बोटं फिरवून दृष्ट काढली,..दोघींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं,..
उमाने आता माईकवर जेवणासाठी सगळयांना आग्रहाची सूचना केली,..हॉलमध्ये सगळे ग्रुप करून बोलायला लागले,..काही जणांची जेवणाची लगबग सुरू झाली,..
आजीने अनुला जवळ ओढलं,.. अनुचे पापे घेतले,..बाजूला नातजावायाला बसवलं त्याची पाठ थोपटली म्हणाली,"खरंच तुमची निवड योग्य आहे पण माझ्या नातीची त्याहून योग्य आहे,..स्त्रीला माहेर हे फार महत्वाच असतं, ते कसेही असो गरीब,श्रीमंत,..दूर जवळ कसही असलं तरी तिथे आपल्याला नवऱ्याने आपल्या आई वडिलांना सन्मान द्यावा ही तिची ईच्छा असते,.. बरेचसे पुरुष तोच देत नाहीत मग ती आयुष्यभर कुढत असते त्या संसारात तिला वाटत असतं,..मी याच्या आई वडिलांचं सगळं करते,..आणि ह्याला माझ्या आई वडिलांना सन्मान देता येत नाही ते ही काही क्षणांसाठी,..ते तुम्हाला जमलं माझी नात खुश तिला ह्यापुढे काही नको.
आजीचं वाक्य अगदी खरं होतं आज आईला केवढा आनंद झाला जावाई आला तर,..
आजीच्या वाक्यावर डॉ.जोशीने भुवया उडवत अनुकडे पाहिलं,..खरंच ती खुश होती,..तेवढ्यात मंगल तिथे आली,"काय भावजी आमच्या अनुशिवाय दोन दिवस करमत नाही तुम्हाला,..लगेच आलात."
डॉ.जोशी म्हणाले,"अहो येणारच होतो तसही माझी बायको फार कमी मागण्या करते माझ्याकडे त्या पूर्ण करायलाच हव्या ना,.."जोशींच्या या वाक्यावर सगळेच हसले.
गोगटे मावशी जरा घाईतच होती आपल्या भाच्च्याशी बोलून,मैत्रिणीच्या गळ्यात पडून,सगळ्यांना टाटा करत निघून गेली,..संस्थेच्या मुली एक एक करून अनुशी बोलायला येत होत्या,..मंगल आजीशी गप्पा मारत होती,..
सोनी मनीला खाऊ घालत होती,सोबत तिला मिळालेली मैत्रीण होती आता सोनी तिच्या आईसोबत बोलत होती,..तिची आई सांगत होती, तिलाही पहिले मुलीच्या मतिमंदपणाचं वाईट वाटायचं पण ताईंनी नवे स्वप्न जगवले डोळ्यात,हिला त्यांनी विशेष शाळेत टाकलं आणि मला गोधडी विणण्याच्या गटात घेतलं,..गोधडीचे जोड देताना मला शिकवलं खराब तुकडा फेकून न देता आपण कसा आतल्याबाजूने घालतो आणि वर चांगलं कापड लावून गोधडी सुंदर बनवतो तसं तिच्या मतिमंदपणाला कर,..काहीतरी दिलं असेल तिच्यात ते शोध,.. त्यांनी हे सगळं सांगितल्यावर मी तश्या नजरेने तिला बघायला शिकले,.. तिला रंग खेळायला दिले तर ती चित्रात खुप रमायला लागली,..संस्थेच्या सगळ्या भिंतीवर तिने वारली पैंटिंग केलंय,.. आता ती मला फार त्रास देत नाही मलाही तिच्या मतिमंदपणाचं फार वाईट वाटत नाही,.. दोऱ्याचे टाके आता जसे गोधडीला सुंदर बनवत जातात तसे आता नवीन स्वप्न बघण्याचे टाके आयुष्याला घालत असते मी,..तू पण राहा इथे ह्या दोघींना आपण घडवू,..
सोनीला आनंद झाला आता अनुची आई जशी मनोगतात म्हणाली,"आयुष्यात कोणीतरी निमित्त बनून येत संधी सांगायला,..तशीच ही असावी,..सोनीने ठरवूनच टाकलं नवीन आयुष्य जगायचं आता."
उमा सगळ्यांना आवर्जून आग्रह करून वाढत होती,..उमाची आजी आली होती,अनुने त्यांची ओळख आपल्या नवऱ्याशी आणि आजीशी करून दिली,..आजीला ओळख करून देताना अनु म्हणाली,"आजी काल मी ह्या आजीच्या गोधडीत झोपले होते,.. अगदी तुझी आठवण आली मला,.."मग दोन्ही आजी खूप वेळ बोलत होत्या,..अनुभवाचे प्राजक्त एकमेकींना वाटत होत्या,..
अनु मंगलला म्हणाली,"बायका खरंच अश्या कश्या असतात ना छोट्याश्या भेटीत किती एकमेकींशी सहज आपलंसं वागतात,..बघ ना ती सोनी ह्या दोन्ही आज्या,..सगळा हॉल गप्पांमध्ये रंगला होता.पाऊलवाटेचा सोहळा नक्किच अनुच्या मनाप्रमाणे झाला होता.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद.

🎭 Series Post

View all