तिची पाऊलवाट भाग ३८

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 38
©स्वप्ना...
डॉ.जोशीने माईक उमाच्या हाती दिला,..ते खुर्चीवर बसायला निघाले आणि त्यांना परत काहीतरी आठवलं आणि ते परत मागे उमाजवळ आले,..परत माईक हातात घेत म्हणाले,"खरंतर पुरुषाच्या आयुष्यात योग्य स्त्रीया आल्या की त्याच्या आयुष्याच सोन होतं म्हणतात,..आणि मी आज तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो हो मी तो नशीबवान पुरुष आहे,..धन्यवाद."
सगळा हॉल आनंदाने टाळ्या वाजवत होता,..आजी एकदम मस्त हसत होती,..आई तर सगळ्या कार्यक्रमाने भारावून गेली होती हे तिच्या नजरेतून दिसत होतं,..मनी ह्या सगळ्या गोंधळात सोनीला त्रास देत नव्हती तिला तिच्याच सारखी मैत्रीण मिळाली आणि ती तिच्यात रमली होती,..सोनीच्या डोळ्यात मात्र आता नवी स्वप्न दिसत होती,..हा कार्यक्रम तिच्यासाठी नवीन आशा जागवणारा होता,..
उमाने अनुच्या आधी मंगलला स्टेजवर बोलवलं,..मंगलने माईक हातात घेतला,..किती गोड दिसत होती मंगल आताही ह्या जांभळ्या साडीत,.. हीच किती यशस्वी स्त्री आहे कष्टाळू आणि प्रेमळपण,..
मंगल बोलायला लागली,.."काकु आणि माझी ओळख होण्याचं कारण मी आणि अनु गाढ मैत्रिणी,..मी तशी गरीब घरातली त्यामुळे मला चटकन कोणी मैत्रिणी मिळत नव्हत्या पण तेंव्हा गाण्याच्या क्लासला जाण्यासाठी मी आणि अनु मैत्रिणी होतो,..तेंव्हा काकूंचा सहवास होत होता,..काकु कधीच चिडत नव्हत्या पण काही गोष्टींचे अट्टहास मात्र असायचे,...क्लास बुडवलेला त्यांना चालायचा नाही,.. त्या म्हणायच्या एखादी गोष्ट करायची असेल तर त्यात सातत्य असावं नाहीतर यश मिळत नाही,..त्या अनुच्या मागे लागून गाणं करून घ्यायच्या,..कधीतरी अनुसोबत मलाही चविष्ट खाऊ पाठवायच्या,..आमचं वयही वेड होत तेंव्हा,.. आम्ही एकदा क्लास बुडवून तळ्याच्या काठी जाऊन बसलो होतो,..तेव्हा त्यांनी आम्हाला पडकल आणि छान समजावलं होतं मला आजही ते लक्षात आहे,..त्या म्हणाल्या होत्या,"संगीताचे हे सात सूर तुम्हाला शिकायला मिळताहेत तर शिकून घ्या आम्हाला इच्छा असून कधी नाही शिकता आलं,..त्या सुरांसोबत आयुष्य तालात बसेल मग जीवनगाणं छान जमून जाईल,.. संगीतात जादू असते ती जगायला शिका,..आम्ही फक्त ओव्या म्हणू शकतो जात्यावर तुम्हाला तिथंच नाही अडकायचं संगीत जगता यावं इतकं मोठं व्ह ह्या क्षेत्रात,..काकूंचे हे वाक्य माझ्या बाबतीत खरे ठरले,..काकु मी आज खरंच संगीत जगते कदाचित त्यादिवशी तुम्ही अस समजावल आणि मनाने त्याची नोंद घेतली,..मी खरंच आभारी आहे तुमची,..काकु तुमच्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी म्हणते ज्या तुम्ही मला नेहमी म्हणायला लावत होत्या,..
"आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा
पाव्यातला सुर जैसा ओठातुनी ओघळावा..."
एवढं गाणं म्हणून मंगलने उमाकडे माईक दिला.
उमाने आता अनुताईला स्टेजवर बोलवलं,..अनुने माईक हातात घेतला आणि ती फक्त म्हणाली,"आई"...तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं,..शब्द मुके झाले,.. कंठ दाटून आला,आई खुर्चीवरून उठली तिच्या डोक्यावरून हात फिरवला,..तिला थोपटत शांत केलं,..मग अनु बोलू लागली,"माझी आई,माझी आजी माझ्यासाठी खुप काही आहेत,..माझ्या आयुष्यतल्या ह्या अश्या दोन स्त्रिया आहेत ज्यांनी माझं आयुष्य घडवलं आणि म्हणून आज मी इथे आहे,..स्त्री आयुष्यची घडण खरंच एवढी सोपी असते का,..? कदाचित नाहीच,..स्त्री घडवण्यासाठी तिच्यामागे तेवढीच सक्षम स्त्रीच लागते,..इथे सगळ्यांचा जसा इतिहास आहे तसा मलाही आहे ,माझ्या आईला आहे,आजीला आहे,खरंतर प्रत्येक स्त्रीला असतो पण त्यातच ती रडत,गुरफटत बसली तर ती स्वतःला काहीच सिद्ध करू शकत नाही,..तुम्हाला तुमची चौकट तोडावी लागते,..ह्यासाठी प्रत्येक वेळी घरच्यांची मदत मिळतेच असे नाही,..कधी कधी एकटच लढावं लागतं,.. पण प्रयत्न खरे असले तर सापडते वाट,..आपण चालत राहायचं,..काटे,कुटे, खाचखळगे आले म्हणून घाबरून चालत नसतं,.. स्त्रीपणाचा कोश मात्र तोडावा सोडावा लागतो,..माझं शरीर,माझं बाईपण म्हणून लाजत बसलात तर कोणाला काही कीव येणार नाही तुमची उलट हिम्मत दाखवा कौतुक होईल,..बाईपण मिरवत बसाल तर पुरुष सत्ताच करेल तुमच्यावर तुम्हाला तुमच्यातल माणूसपण,भावना जपाव्या लागतील त्यासाठी लढावं,रडावं, पडावं लागेल मनाची तयारी ठेवा,..मला अशी सतत धडपणारी आई दिसली पण कधी जेंव्हा आजीच घर सुटलं,मामीच घर सुटलं तेंव्हा नाहीतर सुरक्षिततेच्या नावाखाली ती दडपून बसली होती आपली जगण्याची सगळी कौशल्य गुंडाळून,..ती गुलाम होऊन जगत होती,स्वतःच मत मांडण्याचं स्वातंत्र्य तिने दुसऱ्याला देऊन टाकलं होतं जेंव्हा ती सुरक्षितता खचकन ओढल्या गेली त्याक्षणी ती जागी झाली,..खरंतर मामीने मघाशी माफी मागितली पण मामी आयुष्यात मला आईला कधीच तुमचा राग आलेला नाही कारण ते होणं गरजेच होतं नाहीतर आजचा दिवस दिसला नसता,..
मी चित्रकलेच शिक्षण घेताना आम्हाला व्यक्तिचित्र हा विषय असायचा,..त्यात आम्हाला सतत रेखाटन करावी लागायची,..घरात आम्ही दोघीच असल्याने आई माझी मॉडेल होती,..ती शांत कधीच बसत नव्हती मी नेहमी म्हणायचे आई आमच्या कॉलेजचं मॉडेल सहा आठ तास हलत नाही,..आई म्हणाली,"मला कधीच असं एका जागी बसणं जमणार नाही ती आजही तशीच आहे,..मी कधी व्हिडीओ कॉल केला तर आई काहीतरी काम करतच माझ्याशी बोलते,..आमच्या कॉलेजच्या वरच आमची रूम होती,..खिडकीला एकदा पोळ लागलं होतं..त्या मधमाश्या सतत कार्यमग्न असायच्या आईला ते खुप आवडायचं तिच्या यशाचं हे गमक आहे. ती सतत कार्यमग्न असते,..त्यामुळे तिला नकारात्मक विचार करायला वेळही नसतो,..नवीन ध्येय ,नवीन संकल्प ती सतत करते,..माझ्या ह्या आईला माझा सलाम म्हणत अनु परत रडत आईच्या गळ्यात पडली,..
उमाने माईक घेतला,..अनु आणि आई दोघी स्टेजवर जाऊन बसल्या,..
उमा म्हणाली,"मैत्रिणींनो आपली ही ताई जी वयाच्या सत्तरीला आपलं जगण्याचं बळ वाढवते,..आपल्या डोळ्यात नवीन स्वप्न उभे करते,आपल्याला सतत ध्येयाशी जोडून ठेवते म्हणजे आपण रिकामं राहात नाही आणि नकारात्मक विचार आपल्या भोवती येतही नाहीत,..त्या ताईला आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे ना ,...त्यापूर्वी ताईच्या खास मैत्रिणीला मी इथे बोलवेल ,..उमाने माईक मधून गोगटे मावशी या अशी हाक मारली,..मावशी अगदी हसत ,उत्साहात उठली सगळयांना हाताने नमस्कार करत मावशी स्टेजवर आली,.. तिने माईक हातात घेतला,..
ती म्हणाली,"प्रत्येकाच्याच आयुष्यात खचून जाण्याची वेळ येते,..त्यावेळेला आपल्याला सावरत आल तर आपल्यासारखे नशीबवान आपणच असतो,आणि त्याक्षणी जर आपण तुटलो तर सगळ्यात दुर्दैवी आपणच असतो,..पण तिथे सावरण्यासाठी देवाने कोणाला ना कोणाला पाठवलेलं असतं,.. त्याला तुम्हाला तुटू द्यायचं नसतंच तो कोणाला तरी आपल्याजवळ पाठवतो आपल्याला फक्त ओळखता आली पाहिजे ती संधी,..कारण तोच असतो ऋणानुबंध जगण्यातला,..आपण बुडत असतो आणि आपल्याला वाचवणारे हात असतात माझ्या आयुष्यात अशी वेळ आली आणि ते हात होते अर्थातच तुमच्या ताईचे,..खरंतर मी तिला लाजळूच झाड म्हणून चिडवायचे पण ती खूप कणखर होती,..तिने मला प्रेरणा दिली आणि मी आयुष्याच्या निराशेच्या डोहात बुडतांना वाचले,..हे असे ऋणानुबंध असतात त्यांना जपायला शिकलं पाहिजे,मी खुप नशीबवान समजते स्वतःला त्या ऋणानुबंधात मी आहे आणि मला असंच राहायचय,..गोगटे मावशीने आईकडे पाहून हात पसरवले आई पण उठली आणि आईने मावशीला मिठी मारली,..हा ऋणानुबंध असाच राहू दे म्हणत,..सगळा हॉल आनंदात होता,टाळ्या वाजवत होता सोनीच्या मनीला काही कळत नव्हतं पण ती ही आनंदाने टाळ्या वाजवत होती,..आजी आता देखील पदराने डोळे टिपत होती.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all