तिची पाऊलवाट भाग ३६

तिची पाऊलवाट
#तिचीपाऊलवाट भाग 36
©स्वप्ना,..
आईने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाली,"आणि ती बदमाश कुठे आहे?एवढा आगाऊपणा करून ती कुठे गेली मंगल नुसती हसली,..उमा म्हणाली,"काकु ह्या पोस्टरवरचा पडदा बाजूला करा,..आईने तो पडदा सरकवला,..सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या,.. तिची पाऊलवाट असं लिहिलेलं होतं,..खडतर वाट उंच टेकडीकडे जाणारी आणि त्या टेकडीवर उभी असलेली ती,..आईने ते बघून डोळे पुसले उमाने आईला खुर्चीवर बसायला सांगितले,..आई खुर्चीत बसताच अनु पडद्याबाहेर आली,.. उमाने अनुच्या हातात औक्षणच ताट दिलं,..अनु आईला औक्षण करणार इतक्यात थांब अनु अशी हाक आली,.. सगळ्या हॉलमधल्या नजरा दरवाज्याकडे वळल्या,..चक्क डॉ.जोशी उभे होते दारात,..अनुला खुप आंनद झाला,..अनु म्हणाली होती,"आईच्या या वाढदिवसाला आपण दोघांनी मिळून तिला औक्षण करायचं,.."
तिच्या या म्हणण्याला सत्यात आणण्यासाठी डॉ.जोशी अगदी वेळेत पोहचले होते,..अनुला अगदी मनापासून आंनद झाला,..तिला रडूच यायला लागलं,.. डॉ.जोशी धावत स्टेजकडे आले,.. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सासुबाई म्हणत त्याने वाकून नमस्कार केला,..अनुच्या लक्षात आलं आपण अजून आईला नमस्करही नाही केला,..तिने हातातलं औक्षणाच ताट त्याच्या हातात दिलं आणि तिनेही आईला नमस्कार केला,..आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला,..मग दोघांनी मिळून आईला औक्षण केलं,..सगळा हॉल हा सोहळा पाहात होता,..आईचे डोळे आंनद अश्रूने डबडबले होते.
औक्षण झाल्यावर उमाने माईक हातात घेऊन निवेदनाला सुरुवात केली,..तिने प्रथम डॉ. जोशी आणि अनुला बसण्याची विनंती केली,..ती म्हणाली,"हा सोहळा अनुताई साठी जितका महत्वाचा आहे तितकाच आम्हा संस्थेतल्या महिलांच्या जिव्हाळ्याचा आहे,.. अनुताईच्या आई म्हणजे आमच्या ताई ह्यांना कोणी वस्तूरूपी भेट दिली तर आवडणार नाही हे आम्हाला माहीत आहे,..त्या कधीच कोणाकडून काही घेत नाही म्हणूनच आम्ही सगळ्यांनी त्यांना आज अशी भेट द्यायची ठरवली आहे जी त्यांना स्वीकारावी लागेल ती आहे शब्द सुमनांनी त्यांचा कौतुक सोहळा,..आज आमच्यातल्या अनेक जनींना इथे येऊन बोलण्याची सवय नाही तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आमच्या शुभेच्छा मांडण्याचा त्याचा त्यांनी स्वीकार करावा,..मी सगळ्यात पहिले बोलावत आहे, आमच्या संस्थेच्या सगळ्यात जुन्या कार्यकर्त्या जनाबाई ह्यांना,.."
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि थकलेल्या जनाबाई स्टेजवर आल्या जनाबाई आईपेक्षा मोठ्या दिसत होत्या,..जनाबाईंनी सगळ्यांना बघून हात जोडले,..जनाबाई म्हणाल्या,"फार बोलायची सवय न्हाई पण,आज माझ्या जन्मदात्रीचा वाढदिवस,..तुम्हाला वाटत असल ही बाई तर ताईंपेक्षा मोठी दिसते मग ही ताईंना जन्मदात्री कशी म्हणते,..तर झालं असं ताईंनी दोन बचतगट घेउन ही संस्था सुरू केली,..एका गटात मी कुरडाया मावशी म्हणून लै फेमस होते,..मोठया ऑर्डर मी एकटी पूर्ण करायचे,..पण माझं दुर्दैव मला सासर लै खोडेल मिळल व्हतं,.. मारझोड करायचे,जेवायला द्यायचे नाही ,पैसे हिसकावून घ्यायचे,..तरी माझी कामं सुरू असायची,..एकदा तिसऱ्या पोरीच्या वेळी गरोदर होते मी आठवा महिना कुरडायाची मोठी ऑर्डर व्हती,..काहीतरी पैका मागे असावा म्हणून जीवाच्यावर उदार होऊन कुरडायचा चीक हटला आणि हित संस्थेच्या गच्चीत घेऊन चालले ते ओझं,..ताईंनी दोनदा समजावलं नको घेऊ ही ऑर्डर जीवाला बघ पण नाही ऐकलं आणि मग जीवावर बेतलं,..पातेलं घेऊन पायऱ्यांवरून निसटले,.. तसं ताईने लगेच दवाखान्यात नेलं,...पैसा लावला आणि मला वाचवलं,.. मुलगी झाली म्हणून सासरचे सगळे दवाखान्यात येऊन शिवीगाळ करत होते तर त्यांना गप्प बसवलं,..सासू म्हणाली,"मी न्हाई करणार हीच बाळंतपण,..तर ताई म्हणाली नका करू मी करते,..अन ह्या ताईन माझ्यापेक्षा लहान असून माझं तिसरं बाळंतपण केलं,..मला वाचवलं माझा जीवातला जीव वाचवला मग नातं अस घट झालं की जीवाला जीव देतो आम्ही,..म्हणून तर ही माझी जन्मदात्री हिच्या वाढदिवसाला एवढंच मागणं आहे देवाकडे,..पुढच्या जन्मी या माय माऊलीची आई बनव म्हणजे तिचे ऋण फेडता येतील,..ताई शुभेच्छा बरं अस आईकडे बघून म्हणत पदराला डोळे पुसत जनाबाई जागेवर जाऊन बसली.
उमा म्हणाली," यानंतर ताईची लाडकी आणि सगळ्या संस्थेचीच लाडकी गार्गी आपलं मनोगत सांगेल,.."
गार्गी अगदी पंचवीस एक वर्षाची होती,..आपली साडी सावरत ती स्टेजकडे आली,.. तिने आधी ताईला नमस्कार केला,..ताईने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला,..तिने ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आणि बोलायला सुरुवात केली,"मी खुप लहान आहे ताईविषयी काही बोलायला पण एवढं सांगेल त्या ताईने माझा आत्मविश्वास जागवला आणि मी जगले,..
मी छान शिक्षण घेत होते मला शिक्षिका व्हायचं होतं,.. इथल्या गावातच राहते मी,..माझं शिक्षण छान सुरू होतं पण माझं दुर्दैव माझ्यावर काही मुलांनी जबरदस्ती केली,..मला मारून टाकलं नाही उलट सोडून दिलं,...बदनामीचा रंग माझ्यावर चढला,..आई वडिलांना मी जड झाले,..डोळ्यात सलायला लागले,..पटकन लग्न उरकू म्हणून माहिती न काढता अश्या माणसाशी लग्न लावून दिलं ज्याला मी फक्त स्त्री म्हणून हवी होते,..त्याने त्रास देणं सुरू केलं मग मनाला बदल व्हावा म्हणून मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे आले,..ताईने बघितलं माझ्यातलं रंगाचं कौशल्य माझ्याकडून रंगीत तुकड्यांची रंगसंगती करून पॅचवर्क ओढण्या बनवून घेतल्या,..गावातल्या पाटलाच्या पोरीला दाखवल्या तिने जाताना लंडनला नेल्या,..आता ऑर्डरला खंड नाही,..हातातलं काम रिकामे विचार डोक्यात येऊ देत नाही,..ताईंनी मला दहा जणींची टीम बनवायला लावली,..त्यांना शिकवलं आज आमचा या संस्थेत रंगीबेरंगी नावाचा ग्रुप आहे त्याची मी मुख्य आहे आत्मविश्वास वाढल्याने आता नवऱ्याचा मार खाऊन घेत नाही सन्मानाने जगू द्या म्हणते,..आयुष्यात बलात्कारासारखी घटना होऊन आयुष्याचे तुकडे झाले पण ताईची साथ मिळाली आणि आयुष्य त्या सुंदर पचवर्कच्या ओढणी सारखं झालंय,..ताईंची पाऊलवाट आम्हालाही यशाच्या शिखराकडे घेऊन जात आहे,..एवढं बोलून तिने परत ताईला नमस्कार केला,..आणि ती जागेवर जाऊन बसली,..सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या..
उमा म्हणाली,"ही संस्था तशी लहान आहे पण इथे जी घडण होते ती महान आहे,.. इथे ताई तुमच्या मनात सकारात्मक विचारच पेरतात,.. तुम्ही कितीही नकारात्मक असले तरी काही दिवसात तुम्ही सकारात्मक होऊन जाता,..ताईसाठी मी आज एक कविता म्हणते."
"तिला तरी कुठे माहीत होती तिची ताकद,..
परिस्थितीने ती ही होती प्रत्येका पुढे वाकत..
एकदा झुगारलं तिने जगणं गुलामगिरीचं,..
बघू म्हणे अजमावून बळ स्वतःच्या मनगटाचं..
बांधली हिम्मत मनाची आणि झाली लढण्या सज्ज
गरिबी,संकट,मनस्ताप ह्या सगळ्यांच होतं तिच्यावर राज्य
नाही घेतलं पाऊल मागे हिमतीने पुढे जात राहिली,..
यशाची तिची पाऊलवाट साऱ्यांना प्रेरणा देणारी ठरली."
धन्यवाद,.. मी यानंतर ताईंच्या सासुबाईंना माईक देते त्यांनी मघाशी मला सांगितलं आहे मला बोलायचं आहे म्हणून,..
उमाने आजी समोर माईक धरला,.. आजी म्हणाली,"आंनद वाटला, मन भरून आलं,..जिला मी नेहमी बुजरी,भित्री समजत होते तिला आज इतकं मोठं झालेलं बघून उर भरुन आला माझा,..मी तिला मनापासून आशिर्वाद देते,.. अशीच प्रगती कर,..ह्या पोरीने म्हणलेली कविता अगदी खरी आहे आजीने उमाकडे हात दाखवला म्हणाली कवितेत जसं सांगितलंय,..तुमची पाऊलवाट अशी असावी की खरंच त्यावरून अनेकजण परत जाऊ शकले पाहिजे,..तरच त्या पाऊलवाटेला काही महत्व आहे,..तशी पाऊलवाट आखण्यात माझी सून यशस्वी झाली ह्यातच सगळं काही आलं,..थांबते मी आता म्हणत आजीने एका हाताने माईक दूर लोटला आणि एका हाताने पदराने डोळे पुसले.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all