तिची पाऊलवाट भाग ३४

तिची पाऊलवाट

#तिचीपाऊलवाट भाग 34

©स्वप्ना..

       अनु म्हणाली,"तिने तसं सोसलं पण हरवलेला आत्मविश्वास मिळाल्यावर कमावलं देखिल,..म्हणून आज उभी आहे आणि तिच्या पाऊलवाटेवरून खुपजणी सहजपणे पुढे जाऊ शकत आहे,..तिची पाऊलवाट जरी तिने एकटीने शोधली तरी ती आता कितीतरी जणींना चालायला कामी आली आहे,.."

     उमा म्हणाली,"माझ्यासारख्या ज्यांनी आयुष्य संपवून टाकावं म्हणून निर्णय घेतले अश्यांना तर त्या निर्णयावरून मागे फिरवण्याची ताकद आहे त्यांच्या पाउलवाटेत,.."

      आजी म्हणाली,"पोरींनो आता झोपा थकलेल्या आहात सगळ्याजणी,सकाळी लवकर जायचे आहे ना,..म्हणत आजी उठली,.."

      सगळ्याजणी आत आल्या अनुला आश्चर्य वाटलं आजी नातीच्या व्यवस्थित नियोजनाचं कौतुक वाटलं,..स्वच्छ छान बेडशीट अंथरूणांवर घातल्या होत्या,..प्रत्येकाला पांघरण्यासाठी आजीच्या नऊवारीच्या गोधड्या दिल्या होत्या,..अनुला आपल्या गावाकडच्या आजीची आठवण आली,..सगळ्याजणी अंथरुणावर पडल्या,..किती वेगळा दिवस गेला आजचा आणि आता रातरदेखील,..असं प्रत्येकीला वाटत होतं,..

      आजीने मोठा लाईट बंद केला,कोपऱ्यातल्या देवघरात समईच्या उजेडात रक्षण करणारा विठ्ठल स्पष्ट दिसत होता मंगलला वाटलं,..सगळं घर अंधारात असलं तरी तो कोपरा तो छोटासा गाभारा उजळलेला होता,..एखादा सूर ,एखादी तान मैफिल संपल्यांनातरही ओघळत रहावी मनात अगदी ह्या घरातल्या आजीच्या मनासारखी,..आजीचं मन लख्ख होतं म्हणून आजी एवढे आघात होऊन खचलेली नव्हती ह्या सगळ्या नंतरही ती शांत,समाधानी होती...

      मंगलला मात्र त्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचे भाव आवडले ह्या समईच्या उजेडात त्याच्या चेहऱ्यावर छाया प्रकाशाच्या खेळ असा सुरेख दिसत होता,..की काहीसा तो दुःखी असला तरी चेहऱ्यावरच हास्य टिकवून होता,..एकदम प्रसन्न ह्या आजीसारखाच.

     सोनी तर वेगळ्याच विचारात त्या विठ्ठलाला पाहात होती,..तूच बळ देतोस ना ह्यांना कसा शांत उभा आहेत,..मलाही असंच बळ दे माझ्या मनीसाठी,.. अस मनात म्हणत असताना नकळत तिचे हात जोडल्यागेले,..आणि डोळ्यातून पाणीही ओघळलं उशीवर,..

      मामी मात्र शांतपणे त्याच्याकडे बघूनच नाम घेत होत्या,..उमा सवयीप्रमाणे आजीच्या जवळ तिच्या अंगावर हात टाकून शांत झोपली होती,..आजी मात्र नामस्मरणात दंग होती,..ह्या सगळ्या लेकींना बळ देणारा विठ्ठल कमरेवर हात देऊन उभा होता त्यांचं रक्षण करत..

     सकाळी जाग आली तिच मुळात कोणीतरी दार ठोठावल म्हणून,..कोण म्हणताच फुलवाला अशी हाक आली,.. उमा लगबगीने उठली,..टपोरे गुलाब टोपल्यात घेऊन रामू आला होता,..उमाने त्याला ओट्यावर दाराशी बसायला सांगितलं,..आजीची तोपर्यंत अंघोळ देखील आटोपली होती,..काहितरी स्तोत्र म्हणत आजीने चहा करून रामुला दिला,..रामू निघून गेल्यावर आजी सांगत होती,..ह्याने आम्हाला फार मदत केली आमच्यावर असा आघात झाल्यावर,..असा काधी आला की चहा शिवाय जाऊ द्यावं वाटत नाही,..आपण कायम ऋणात आहोत त्याच्या पण अशी संधी मिळाली की सेवा करावी मनाला समाधान वाटतं दुसरं काय,..

      उमा म्हणाली,"मी अंघोळीला जाते जरा लवकर तुमच आवरा म्हणजे आमच्या आजच्या सत्कारमूर्ती तिथे पोहचण्याआधी आपण तिथे पाकळ्यांची ताट घेउन उभ्या असू,.."

       सगळ्यांनी पटापट आवरायला घेतलं,.. आजी ह्या लगबगीत प्रत्येकाला गरम चहा देत होती,.. बाहेर दाराशी परिजातकाचा सडा पडला होता,.. मनी मामी सोबत फुलं वेचत होती,..आजीने सुंदर गुलाबी पातळ नसलं होतं,.. देवापुढे रांगोळी,देवाची पूजा सगळं झालं होतं आजीचं,..देवाला फुलांनी सजवलं होतं,.. रात्रभर रक्षण करणारा विठोबा आता मस्त हाराने सजला होता,..छोट्याश्या वाटीत शिऱ्याचा नैवेद्य देखील करून दाखवून झाला होता..अनु म्हणाली,"आजी इतकं सगळं आवरून झालं तुमचं,..?"

      आजी म्हणाली,"काही गोष्टीचे नियम करून घेतले,..स्वतःसाठी म्हणजे मन ते करायचं म्हणून गुंतलेलं राहतं,.. बाईच मन रिकामं असलं की कुठेही भरकटत मग त्याला सवय लावायची असेल तर आपण असे पाश लावून घ्यायचे म्हणजे मन आंनदी राहतं,.. दुःखाचा फार विचार करत नाही,..सतत पुढचं आव्हान माहीत असलं की त्या आव्हानावर मन काम करत,.."

    उमा म्हणाली "चला मी आणि अनुताई पुढे होतो,..आजी तू सगळ्यांना घेऊन पोहच,..हॉल तसा जवळ आहे,..आजी लक्षात आहे ना तुझ्या राममंदिराचा हॉल,.."

    आजी म्हणाली,"हो हो आणते मी सगळ्यांना तू नीट जा,..धावपळ करू नकोस."

    अनु म्हणाली" मंगल मला एक कल्पना आहे तू आईसाठी स्वागत गीत म्हणावं,.."

   मंगल म्हणाली ,"चालेल मला काहीच हरकत नाही,..चल माझंही झालंच आहे मी निघते तुझ्या बरोबर,.."

     त्या दोघी निघाल्या...,निघताना आजीच्या पाया पडल्या..,आजी अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं बरं,.. खरंतर मंगलला तर माहेरच राहील नव्हतं आणि त्यात ह्या तर अगदी तिच्या आजीशी जळूत्यामिळत्या होत्या त्यामूळे तर तिला जास्तच भरून आलं,..आजीने दोघींच्या डोक्यावरून हात फिरवले,.. आजी म्हणाली,"अश्याच येत जा मग माहेरी,.. अग एकमेकींना जीव लावणं,..चार गोष्टींची शब्दांची,आपुलकीची देवाण घेवाण यालाच तर म्हणतात माहेर,..आपणच एकमेकींसाठी असे माहेर उभे करायचे म्हणजे,आई वडील नसल्याचे दुःख नको,..कोणाला दडपण नको,..पुन्हा या योग आला तर,.."

       तिघी हॉलवर पोहचल्या,..हॉल छानच होता स्वच्छ सुंदर...भरपूर उजेड असलेला,..कोपऱ्यात माईकची व्यवस्था होती,..छोटासा स्टेज त्यावर सजवलेली फुलांची खुर्ची,..घरून आणलेली फुलं उमाने कोपऱ्यात उभ्या असलेल्या दोन तरुण मुलींना दिले,..त्यांनी पटापट पाकळ्या केल्या,..वेगवेगळे रंगछटा असलेले गुलाब होते त्यात,..त्यातल्या काही पाकळ्या घेत त्या दोघींनी दारापासून फुलांची पाऊलवाट बनवली,..स्टेजच्या मागे अनुच्या पैंटिंगनुसार पोस्टर बनवलं होतं,.. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं,..

      "तिची पाऊलवाट,.. सत्तर वर्ष चाललेली..

       न थकता अविरतपणे दुसऱ्यांना मार्गदर्शक ठरलेली,.."

  त्या मुलींनी काही पाकळ्या छोट्या छोटया टोपल्यांमध्ये भरल्या,..मंगलने जाऊन माईक चेक केला,..तेवढ्यात एक मुलगी बाहेरून अली,..अनुला म्हणाली,"कारमध्ये आजी आल्या आहेत त्यांनी बोलवलं तुम्हाला,.."

      अनु धावत बाहेर आली,..आजी कारच्या खिडकीतून बघत होती,..अनु पळत आजीजवळ गेली,..दार उघडलं,..आजीने अनुचा हात घट्ट धरला,..अनुने आजीला मिठी मारली,.. अगदी घट्ट,..अनु म्हणाली,"आजी मी नशीबवान आहे,या सोहळ्याला तू आहेस,.."आजीने अनुचे पटापटा पापे घेतले म्हणाली,.."किती हुशार झाली ग माझी बाय,.."

        अनु म्हणाली,"आजी अग तीनवर्ष झाले आपल्याला भेटून,.."आजी म्हणाली,"मग काय त्या महामारीने कोणाला भेटू दिलं नाही,..आणि किती लोक नेले,..मी मात्र आहे हो अजून,..असं म्हणत एकही दात नसलेल बोळकं आजीने पसरवलं,.. त्याक्षणी अनुला आजी अगदी निरागस वाटली,..आजीच्या हातावर प्रचंड सुरकुत्या पडल्या होत्या,..हातपाय अगदी बारीक झाले होते,..तरी तब्येतीचे कुठले कारण न सांगता आपण पाठवलेल्या गाडीत न कुरकुरता ती आली होती तासभर प्रवास करून,..ह्या आईच्या सोहळ्यासाठी,..मनात काहिही असलं तरी तिला आईचा खुप अभिमान होता,..नेहमी म्हणायची,"माझ्या सुनेने स्वतःला सिद्ध केलं,..स्त्रीशक्ती आहे ती".

          हळुहळु पाऊल टाकत आजी हॉलमध्ये येऊन बसली,..मंगल भेटताच तिच्या गळ्यात पडली,..तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली,"किती गुणाच्या मैत्रिणी ग साथ नाही सोडली,.."आजीच्या पाठोपाठच गोगटे मावशी आली,.. सगळ्याजणी सांगितल्या प्रमाणे मस्त काठच्या साड्या घालून आल्या होत्या,..हळूहळू बचतगटाच्या वेगवेगळ्या समितीच्या बायका यायला लागल्या,..सगळ्या छान अवरून सावरून येत होत्या,..मोगऱ्याच्या वेण्या आईच्या गोधडी शिवणाऱ्या बाईने विणून आणल्या होत्या,..मस्त टपोरा मोगरा असल्याने सगळ्या हॉलमध्ये घमघमाट सुटला होता,..

      सोनी मनीला घेऊन आली,..ती आणि मामी आजी जवळच आल्या,..आजीने सगळ्यांना गोंजारलं,.. अनुला जाणवलं वयाचा परिणाम आजी अगदी थकली होती आणि शांत झालेली दिसत होती,..

क्रमशः

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all