Feb 23, 2024
नारीवादी

तिची पाऊलवाट भाग ३३

Read Later
तिची पाऊलवाट भाग ३३


#तिचीपाऊलवाट भाग 33
©स्वप्ना...
अनु म्हणाली,"दुःख हा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला मुख्य धागा आहे,..त्याशिवाय सुखाची जाणीव होणारच नाही ना म्हणून तर दुःख दिलेत आपल्याला,.. आणि तू म्हणते तस खुप वेगवेगळे दुःखाचे आकार घेऊन जगत असतो आपण कधी आपल्याला वाटतं आपलाच आकार मोठा असा विचार करून आपण आहे तो आकार खुप मोठा करुन ठेवतो,..पण सभोवताली पाहायला शिकलं की कळतं अरे आपल्यापेक्षा ह्याच्या दुःखाचा आकार किती मोठा आहे,..मग आपल्याला आपला आकार सांभाळून घेणं सोपं जातं,..ही तर माणसाची मानसिकता आहे,.."
मंगल म्हणाली,"अनु खरं आहे तू म्हणतेस तसं होतं,.. मला आजी गमावल्याच दुःख होतं तो आकार सतत मोठा वाटायचा पण आता रेवाला बघितलं की वाटतं ह्या लेकराची तर आई गेली,..हीच दुःख केवढं मोठं,..माझ्या सासुबाईंची तर लेक गेली,त्यांचा नवरा म्हणजे माझे सासरे असा भावना नसलेला पुतळा झाला हे दुःख केवढं मोठं,..त्यामानाने आपलं दुःख कमीच हे समजतं,.."
ह्या चौघींच्या गप्पात आजी आणि उमा दोघी ओट्यावर येऊन बसल्या,.. पौर्णिमेचं टिपूर चांदण अंगणात ..झाडांवर सांडलं होतं,..रात्रीची शांतता जाणवत होती,..गार वारा सुटला होता,..कुठतरी दूर पाऊस झाला असावा असा संदेश जणू त्याच्या गारठ्यात आणि त्याच्या हलक्या मातीच्या सुगंधात येत होता,..अजून तसे पावसाचे दिवस दूर होते,..पण रखरख उन्हाळ्यात कधीतरी,कुठेतरी असा अवकाळी पाऊस झाला तरी छान वाटतं,..
उमाच्या आजीने दुःखाचा विषय ऐकलाच होता आमचा,..आजी म्हणाली,"दुःखाचे आकार लहान असो मोठे असो,..पेलावे लागतात प्रत्येकाला ते चुकवता येत नाहीत,..ती पेलण्याची ताकद मागावी लागते विधात्याला,..आता हेच बघा जर जन्मलेल्या बाळाची आई गेली तर त्याला आईच दूध मिळत नाही तेंव्हा त्या बाळाच्या दुःखाचा आकार सगळ्यात मोठा असतो पण तो आकार ते लेकरू पेलतच असतं,.. आपल्याला वाटतं त्याला काय कळतं,.. पण त्याला ते दुःख भोगावं लागतच ना,..त्याला ते चुकत नाही,..देव बळ देतो त्याला पण त्याची आई नाही परत देत,..तसंच आपल्या दुःखच तो बळ देईल ते सहन करायला,..ती दुःख देणारच नाही असं नाही होणार,.."
सोनी म्हणाली,"खर आहे आजी तुम्ही म्हणता ते,आता मनी काही पूर्ण बरी थोडीच होणार,..तिचं मतिमंद असण्याचं दुःख मला सहजतेने स्वीकारून जगता यावं म्हणून तर आज मला इथे तुमच्यात पाठवलं त्याने देवाने,.."
एवढावेळ कमी बोलणारी उमा मात्र आता बोलली,.."काही वेळेस काही दुःखांचा आपल्याशी काहीही सम्बन्ध नसतो तरी ती दुःख देव आपल्याला का देतो,..?माझीच गोषय ऐका,..मी,आई, बाबा,माझा छोटा भाऊ,बहीण आणि माझी ही आजी खुप छान राहात होतो,.. एक मुलगा उगाच माझ्या आयुष्यात शिरला,..मला तू आवडतेस माझ्याशी लग्न कर म्हणून मागे लागला,..मला तो काहीच आवडत नव्हता तो एकदम गुंड प्रवृत्तीचा होता,..मी त्याला प्रत्येक वेळी टाळलं त्याने मला धमकी दिली तुझ्या घरच्यांना मारून टाकेल,.. मी खरंतर घाबरले घरी सांगितलं तर बाबा म्हणाले,"असा कसा मारेल तो आम्हाला तू नको घाबरू,तुला नाही आवडत ना मग ठाम राहा,.."
मी ठाम राहिले पण त्याने ठाम राहून माझं सम्पूर्ण घर उद्धवस्त केलं,..एवढं बोलून उमा आजीच्या मांडीत डोकं ठेवून खुप रडायला लागली,..आजीने तिच्या डोक्यावर हात फिरवला थोड्यावेळ दोघी शांत होत्या ,मग आजीच पुढे बोलू लागली,.."मला म्हातारीला देवाने सोडलं ह्या नातीसाठी,.. तो मुलगा तर गेला जेलमध्ये,..पण आमची माणसं हरवली,..आम्ही पोरक्या झालो,..काळ सगळ्या गोष्टींवरच औषध असतो,.. हळूहळू आम्ही सावरलो आमच्या दोघींचं विश्व तयार झालं,..मी मग बोलून बोलून उमाला लग्नासाठी तयार केलं,..चांगलं ठिकाण आलं म्हणून उमाला सासरी पाठवलं,..जमेल तसा लग्नाचा खर्च केला आणि काही दिवसात उमाच्या लक्षात आलं,..नवऱ्याला झटके यायचे,तो चालताचालताच कुठेही पडायचा,..मग उमा त्याला कांदा,चप्पल सगळं नाकापाशी हुंगवून उठवायची,...तो कधी कधी आक्रमक होऊन हिलाच मारायचा,..त्या लोकांना डॉकटरांनी सांगितलं होतं ह्याच लग्न करू नका,..पण त्यांनी आमची फसवणूक केली,..त्याला लग्नात खुप गोळ्या देऊन अस दाखवलं तो एकदम छान आहे,..पण हळूहळू हे कळाल्यावर मीच उमाला घटस्फोटासाठी तयार केलं,..कशासाठी राहायचं त्याच्या जवळ ?त्याला चक्कर आली की कांदे हुंगवंत बसायला,..ना नातीला शरीरसुख ना मानसिक सुख,..उलट चांगला असला की संशय ,मारहाण,.. उमा तर नको म्हणाली घटस्फोट,.. मला म्हणाली,"आजी मी करेल सहन लोक तुला नाव ठेवतील,.."मी खम्बिर होते मी म्हणाले,"उमा समाज तसाही स्त्रीलाच नाव ठेवतो,..तू कितीही तिथे झिजली तरी तुला काही किंमत नाही,तुझ्या शिक्षणाची नाही आणि त्यागाची नाही,..आपण बघू जगू एकमेकांना सहारा देत,..आणि एकटं राहण्यासारखं तू ही आता सक्षम हो,.."
आम्ही खुप झगडून घटस्फोट घेतला पण आम्हाला त्याच दुःख वाटलं नाही उलट माझ्या लेकरांन मोकळा श्वास घेतला,..समाजाने नाव ठेवले पण मी तिला सांगितलं,.."तिथं तुला नवरा मारत होता तेंव्हा समाज आला का मग आता समाजाचा विचार नाही करायचा,..स्वतःसाठी जगायला शिकायचं आणि दुःख सहन करण्याची ताकद मागायला शिकायचं,.."
या सगळ्यात माझा दोष काय होता,..? त्या मुलाने का माराव माझ्या कुटुंबाला,..?मला हक्क नव्हता का माझा जोडीदार निवडण्याचा,..?आणि ह्या कुटुंबाने मला का फसवाव,..?मला चारचौघीसारखा संसार करायचा होता ना,..ह्या दुःखाना मला का जोडलं आयुष्यात,..?
सगळे निःशब्द होते,..खरंतर प्रत्येकाला काहीतरी इतिहास होता,पण त्यांचा आज सक्षम होता,..आपापल्या परीने त्या आपली दुःख सांभाळत होत्या,..उमाचा इतिहास सोडला तर आज उमा चांगली यशस्वी महिला होती,..पद,प्रतिष्ठा मिळवत होती,..
आजी म्हणाली,"चला झोपून घ्या उद्या लवकर उठायचं आहे,.. सकाळी लवकर हॉलवर पोहचायचं आहे,..अनु आईला हे सरप्राईज बघून खरंच आंनद होईल ना,.."
अनु म्हणाली,"हो आजी तिला काहीच कल्पना नाही दिलेली मी येत आहे म्हणून,..खरंतर उमामुळे हे सहज शक्य झालं,अन्यथा आम्हाला कुठे उतरावं,?जेवण,झोपणं ?सगळं अवघड होतं,..आज आईकडे उतरलो असतो तर तिने हे काहीच करू दिलं नसतं,.. तिला काहीही सोहळे केलेलं आवडलं नसतं,.. तुमच्यामुळे हे शक्य झालं,..तुमची भेटही आयुष्यात महत्वाची होती खुप प्रेरणा मिळाली तुम्हाला बघून,ऐकून एवढं सगळं दुःख असूनही तुमच्यातली प्रसन्नता कमी झालेली नाही,तुमचा आंनद,उत्साह किती छान आहे,.."आजी म्हणाली,"अग जसे दुःखाचे आकार सांभाळत बसतो तसे सुखाचे,आनंदाचे आकार दिलेत ना देवाने जगण्यात ते सांभाळता आले म्हणजे जगणं सोपं होतं,.."
उमाने मध्येच विषय बदलला ती म्हणाली,"ताई तुम्ही म्हणाल्या तसं पोस्टर बनवून घेतलं आहे,.."आजी म्हणाली," अनु मला तुझी कल्पनाच फार आवडली,.. काल मी ते पोस्टर छापलेल पाहिलं,."तिची पाऊलवाट" तू अगदी योग्य नाव दिलं आहेस या सोहळ्याला,..खरंतर प्रत्येक स्त्रीची असते एक पाऊलवाट,..माहेरकडून सासरी गेलेली किंवा आयुष्यातले दुःखाचे कढ पचवत ती त्या वाटेवरून चाललेली,..कुणाची जास्त अवघड,कुणाची एकदम खडतर,तर कुणाची असते साधी सरळ फार खाचखळगे नसतात त्यावर पण अश्या पाऊलवाटा फार कमी ज्यावर अडचणी नाही,..जगण्याची खरी गम्मतच त्या पाउलवाटेवर असते,..तिथला संघर्ष ,तो अनुभव तिला घडवत जातो,ती कधी खचते तर कधी उभी राहते कणखर होऊन तुझ्या आईसारखी."
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//