तिची पाऊलवाट भाग ३२

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 32
©स्वप्ना..
अनु पण एकदम मंगलला म्हणाली,"मंगल आजीचंच घर वाटतंय ना,..तशी नेमकी आतून आजीच बाहेर आली,..या ग पोरींनो किती अंधार केला ग यायला,..माझा जीव काही लागेना बाई,..आमच्या उमच्याच मैत्रिणी तुम्ही मग काळजी तर वाटणारच ना,.."
उमा अनुच्या आईचा अगदी उजवा हात होती,..संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि इतरही महत्वाच्या गोष्टी ती सांभाळत होती,..घटस्फोटित होती,..आपल्या आजीसोबत इथे राहात होती ,..तिनेच आपल्या सरप्राईजच्या कल्पनेला साथ दिली,..खरंतर ती नाही म्हणू शकली असती कारण तिचं घर काही फार मोठं नाही आणि आपणही म्हंटलो होतो,"आम्हाला एखादं हॉटेल सांग,.." पण तिचं घर मोठं नसलं तरी मन मोठं आहे तिने इथे येण्याचाच आग्रह कायम ठेवला,..आणि आता आजीने जे आपुलकीने स्वागत केलं,..असं कुठल्या हॉटेलमध्ये झालं असत,..कोणीतरी आपली वाट बघत होत,..ही कल्पनाच किती सुखद,..डिक्कीतल सगळं सामान काढेपर्यंत अनुच्या मनात हे विचार चालू होते,..
आम्ही सगळ्याजणी घरात आलो,..उर्मीची आजी अगदीच चित्रातल्या बाईसारखी सुरेख आणि सुबक ठेंगणी होती,..आम्हाला सगळ्यांना पटपट पाणी देऊन ती गॅसकडे वळाली,.. वरणफळ आवडतात ना सगळ्यांना असं विचारत तिने कणकेत पाणी देखील घातलं,..खरंतर त्यांना उगाच त्रास असं मंगलला वाटलं आणि मंगल म्हणाली,"आजी खिचडी देखील चालेल हो,तुम्हाला उगीच त्रास आमचा,.."
मंगलच्या बोलण्यावर आजी म्हणाली,"अग, उलट असं पाहुण्यांनी घर भराव हे तर स्वप्न आहे माझं,..आज तुम्ही माझ्या लेकी, नाती आल्यासारखं वाटतंय मला तर मला तो आनंद तर घेउ द्या,..माझा आंनद असं बोलून हिरावून घेऊ नका ,..मी तुमच काही ऐकणार नाही,..स्वच्छ हात, पाय धुवून प्रवासाचे कपडे बदला,.. बाहेर ओट्यावर बसा गप्पा मारत,..वेलींवरच्या फुलांचा झुळकेसह सुगंध घ्या ह्या म्हातारीची बाग बघा अंधार असला तरी पौर्णिमेच्या चांदण्यात वेलीवरची फुलं किती सुंदर दिसतात बघा,अग असं वाटतं आकाशातल्या चांदण्या आपल्या वेलीवर येऊन बसल्या की काय,..जा बघा इथली काळजी नका करू,.."
मामी म्हणाल्या,"मी आहे आजीच्या मदतीला तुम्हीं बसा पोरींनो,..आजी मला सांगा काय करू ते,..असं म्हणत मामी हातपाय धुवून आजीजवळ शिरली,.."
सगळे फ्रेश झाले,..मनी आईच्या पदराला धरूनच फिरत होती,..आजीने एकदोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मनी काही आजीशी बोलेना,.. आजीच म्हणाली,"बर बर होईल आपली नीट ओळख मग बोल माझ्याशी मी आजी आहे तुझी म्हणत आजीने तिच्या डोक्यावर हात फिरवला,.."
मनी गोड हसली,..आणि आईसोबत ओट्यावर पळाली,..
आजीची बाग खरंच सुंदर होती,..मंगलचे तर डोळे सारखे भरून येत होते.. अगदी तिच्याच आजीची बाग होती ही,..
वरणफळाचा सुंदर,खमंग वास सुटला,..सगळ्यांच्याच पोटातली भूक चाळवली,.. उमाने पटापट ताट घेतले,..अनुने पाणी भरून घेतलं,.. आजी म्हणाली,"बायका पाहुण्या असल्या तरी काही ताण येत नाही कारण कुठे गेल्या तरी त्या सहजतेने थोडीफार मदत करतातच मग काय सगळ्यांची मदत होऊन पाहुण्यांचा काही ताण येत नाही आणि तेच जर पुरुष पाहुणे असतील तर ताट मांडण्या पासून उचले पर्यंत घरातल्या स्त्रीला उभंच राहावं लागतं,.."
त्या छोट्याश्या घरात मस्त गोल पंगत बसली,..सोनी मात्र मनीला घेऊन खुर्चीवर बसून खाऊ घालत होती कारण मनाची झोपेची वेळ झाली आणि ती त्रास द्यायला लागली होती,..वरणफळ अतिशय छान झाले होते,..आजीने त्यासोबत जुनं काळ झालेलं लोणच वाढलं होतं,.. आजी म्हणाली,"हे मुरलेल औषधी लोणचं आहे बर,..ते बघा फळीवर एकारांगेत चार बरण्या आहेत,..माझ्या बागेत लिंबाचं झाड आहे,खुप बहरतं सगळ्यांना वाटले तरी लिंब असतात मग मी शेवटी सगळ्या लिंबाचं लोणचं घालते गल्लीत पोरी बाळांतपणाला आल्या की त्यांच्या आया आवर्जून हे लोणचं घेऊन जातात,..त्यामुळे आता मला तर बरेच जण लोणचेवाली आजीच म्हणतात,.."
आजी खरंच भारीच होती एकीकडे बडबड करत होती एकीकडे जेवत होती ,..सगळ्यांना आग्रह करत होती त्यामानाने उमा शांत होती,..कदाचित काहीतरी मागील आयुष्याचा ताण घेऊन जगते हे पदोपदी जाणवत होतं,..घर मात्र अगदी प्रसन्न होतं,..कोपऱ्यात छोटं देवघर आणि इथेही काळभोर विठ्ठल हात कमरेवर ठेवून बघत होता सगळ्यांकडे गालात हळूच हसत,..जणू म्हणत होता,"बघा जगण्याचा पेपर सगळ्यांना सारखा दिलाय पण प्रत्येकजण त्याला कसा वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि सोडवतो,..प्रश्न भलेही वेगवेगळे असतील पण शेवटी त्या प्रश्नांची सोडवण्याची रीत तर सारखी असेल ना,..अडचणी,त्रास,आजार,ताण हे सगळे प्रश्न ह्यात कधीतरी मिळणार सुख हे चुकून छापलेल उत्तर नाहीतर बाकी जगणं हिम्मत धरून,आंनद मानून,सुख मानून ही तर रीत ते प्रश्न सोडवण्याची इथेच तर गडबडतात माणसं,.. मग काय मी हसत असतो असा कारण सगळेच तर माझे एकाच वर्गाचे विद्यार्थी असतात,..सगळ्यांना चैतन्य सारखंच दिलेलं असतं हे प्रश्न सोडवायला मग काहीजण हे प्रश्न सोडवताना मला आठवतात तर काहींना मी समोर असून दिसत नाही मग ते गुंतत जातात नैराश्यात,दुःखात आणि काही फक्त माझ्या स्मरणावर तरतात कारण त्यांना माहीत असतं आपल्या गुरुजींनी चैतन्य भरलं आहे आपल्यात,शांततेत सोडवू प्रश्न,दुःखी होणं नको आणि स्वतःतील चैतन्य कमी करण नको,..त्यातली ही आजी हे सगळं अनुच्या मनात घोळत होतं आणि आजीने हाक मारली म्हणाली,.. "अनुताई काय एवढा विचार चालला आहे आमच्या विठुरायला बघून,..?"
अनु म्हणाली,"आजी तुमचं वय तसं भरपूर दिसतंय,...तुमचा उत्साह पाहून वाटतं ही मूर्ती रोज उत्साह देते का तुम्हाला तुम्हाला कधी भेटतो का हा विठ्ठल,...?"आजी हसत म्हणाली,"खर आहे तू म्हणतेस ते,..आला दिवस रखडत रडत ढकलायला मला आवडत नाही,.. मी रमते त्याच्या भजनात,..मला भेटतो तो माझ्या हातून सुंदर बिनसुईचा हार तयार झाला की,मला भेटतो तो मी नियमीत घातलेल्या रोपाला सुंदर फुलं आले की,...सहज केलेल्या स्वयंपाकात चव उतरली आणि तुमच्यासारखे चेहरे समाधानाने जेवले की मला तो भेटतो,..कोणाला लोणचं पाठवलं आणि ती लेकुरवाळी जाताना जेंव्हा सांगते ,..तुमच्या लोणच्यामुळे चव आली जेवणात तेंव्हा भेटतो तो मला त्या समाधानात,..त्याच भेटणं असं रोजच्या जगण्यात असतं मग ते क्षण सतत शोधायचे ,जगायचे म्हणजे त्याच भेटणं अखंड चालू राहातं आणि त्यातच तो चैतन्य ओतत राहतो आपल्यात,.."
आजीचं हे बोलणं ऐकून डोळ्याला धाराच लागल्या होत्या,..मंगल तर म्हणाली,"आजी किती साधं सांगितलं तुम्ही त्याची भेट कशी होते ते,.."मामी म्हणाल्या,"खरं संतांनी म्हंटल तसच तर आहे एक तत्व नाम,..त्याच्या नामात,त्याच्या आठवणीत जगण्यासाठी लागणार बळ असतं ते रोज घ्यावं त्याच्याकडून,.."
खरकटे हात तसेच धरून बराच वेळ गप्पा रंगल्या,उमाने मात्र पटापट सगळं उचलून ठेवलं,..तशी उमा खुप चुणचुणीत मुलगी होती,..वयाने लहान दिसत होती,..आजी म्हणाल्या,"अंगणात शतपावली करा,..आम्ही तोपर्यंत झोपायची सोय करतो,.."
आम्ही चौघी बाहेर अंगणात आलो कारण मनी कधीच आजीच्या बाजेवर झोपून गेली होती,..
सोनी म्हणाली,"अनु आणि मंगल तुम्ही मला बळजबरी,आग्रहाने इथे आणून खरंच उपकार केले माझ्यावर,.सकारात्मक लोकं आयुष्यात असणं किती महत्वाचे असतात आणि त्यामुळे आपल्या विचारात किती फरक पडतो हे जाणवायला लागलं मला,..खरंतर दुःख कोणाला चुकत नाही फक्त ज्याच्या त्याच्या दुःखाचे आकार वेगवेगळे आहेत.."
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all