तिची पाऊलवाट भाग ३१

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 31
स्वप्ना...
अनु म्हणाली,"आईने चालवलेल्या समाजकार्यातून आज अनेक घरांच्या चुली पेटतात, आईने हाताला काम दिलं आणि स्त्रीमधला आत्मविश्वास पक्का झाला,..आईने स्त्रियांचे गट केले,..त्यांचे सारखे असणारे कसब बघितले,..काही गट फक्त लोणचे तयार करतात,काही गट शेवया बनवतात, काही फक्त गोधड्या शिवतात,..काहीजणी पायपुसनी बनवतात,..काही फक्त वाळवणं बनवतात,..काही गट ह्या सगळ्या गोष्टींचं मार्केटिंग करतात,..कितीतरी गोष्टी ह्या परदेशात जातात,..आई त्यांना योग्य मोबदला देते,.. त्यांचा वेळ कारणी लागतो,..सगळ्या आईवर फार खुश आहेत,..मागे दोन वर्षांपूर्वी मी आईला भेटले होते,..तेंव्हा ह्या सगळ्यांनी मला सांगितलं आहे.. आईचा सत्तरावा वाढदिवस आम्ही करणार,..तू फक्त कोणाकोणाला बोलवायचं ते बघ,.. त्यांची सगळी तयारी आहे ,काही कल्पना आपल्या आहेत,..आता आपण रात्री शहरात जाणार जिथे आपल्यासाठी रूम आहेत,..तिथेच आपली जेवण्याची आणि झोपण्याची सोय केली आहे,..त्यांनी एक हॉल ठरवला आहे तिथे,..सजावट सुरू आहे फुलांची,..ती प्रवेश करेल तेंव्हाच तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत,..ती जिथून चालणार तिची पाऊलवाट सगळी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवायची आहे,..ती आजपर्यंत खुप चालली आहे काट्यावरून आता तिला गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालवायचं आहे,..तिच्या पाठोपाठ सगळ्याचजनी तिच्या वेगवेगळ्या समितीत काम करणाऱ्या बायकांना चालू द्यायचं आहे कारण तिने घडवली आहे त्यांचीही पाऊलवाट,..तिच्यासाठी सजवलं आहे मोठं सिंहासन त्यावर बसेल ती आणि आपण सगळ्यांनी अगणित दिव्यांनी तिला औक्षण करायचंय,.. तिने खरंतर उजळून टाकलंय अनेक स्त्रीयांचं आयुष्य तिच्या चेहऱ्यावर हे उजेडाच तेज बघायचंय,..तिच्या त्या पावलांना ज्यांना तिने कधीच जपलं नाही,..ती धावत राहिली त्या पावलांना,..चांदीच्या मोठ्या तबकात ठेवून,...त्यावर गुलाबजल हळुवारपणे सोडायचं आहे,..त्या पायांना मी मनापासून पुसून पूजणार आहे,..तिला हे सगळं नाटकी वाटेल आणि आवडणार पण नाही पण मी हे सगळं करणार आहे,..तिच्या अंगावर गर्भरेशीम शेला मला पांघरायचाय,..
आजपर्यंत तिच्या कॉटनच्या साडीत तोंड खुपसून बसताना मला कायम आंनदाशिवाय काही मिळालेलं नाही हे मला तिला त्या शेल्यातून सांगायचंय..तिला असं मुख्य जागी बसवून तिच्यासमोर बोलतील तिने घडवलेले हिरे,.. जे ऐकताना ती नक्कीच भावूक होईल पण मला तिला तो आंनद द्यायचा आहे म्हणून मनोगत सोहळा मध्ये ठेवला आहे,..केक कापण हे सगळं औपचारिक असलं तरी तिला ती सगळी मजा करू द्यायची आहे,..आणि तिच्यासाठी मी आणलं आहे सरप्राईज गिफ्ट ते देणार आहे मी तिला तेंव्हा बघा,.ह्या सगळ्यात ती सगळ्यांना भेटणार आहे,हसणार ,बोलणार आहे मला ते सगळं बघायचं आहे,..तिच्या आवडीच्या पदार्थांचा जेवणात समावेश आहे,..सुरळीची वडी,..तिला खुप आवडते,ती नेहमी म्हणायची,"आयुष्य असं सुरळीच्या वडीसारखं,..अनुभवाच्या सारणाने भरलेलं पण सुरळी अशी बाहेर ते सारण सांडू देत नाही त्यांना पकडून वरतून मस्त चकचकीत असते,..तसच तर असावं ना आयुष्य मध्ये किती चांगले,वाईट अनुभव असले तरी वरतून छान चकचकीत जणु त्या ओबडधोबड अनुभवांचा आपल्याला काही त्रासच झालेला नाही,..
मामी म्हणाल्या,"तिची आवडीची मुरड करंजी ठेवलीस की नाही,..?"
हो हो ठेवली ना मामी.. म्हणत अनु म्हणाली,"मंगल आईने आणि आजीने मला पाळी आल्यावर पहिले सांगितलं होतं,.मुरड करंजीच उदाहरण म्हणाल्या होत्या,जस मुरड आतलं सारण करंजीच्या बाहेर येऊ देत नाही तसं काही भावनांना जपायचं,त्यांना मुरड घालायची आपली प्रत्येक गोष्ट पूर्णच होईल असं नाही अश्या वेळी नाराज न होता खचून न जाता मनाला समजावता आलं पाहिजे,..ही मुरड तेच शिकवते,..अशीच मुरड ती कायम आयुष्याला घालत आली,.. आधी माझ्या वडिलांनी तिला अडवलं,नंतर आजी नंतर समाज अश्या अनेकांच्या दडपणासमोर स्वतःच्या ईच्छा आकांक्षाना मुरड घातली,..आणि विशेष तिला खाण्यात पण ही मुरडीची करंजी आवडते,..असे एक ना अनेक पदार्थाची रेलचेल उद्या वाढदिवसाला असेल,..त्या बायकांना आईला छान छान खाऊ घालायचं आहे..तिच्याविषयी बोलायचं आहे,.. तिला खुप आंनद द्यायचा आहे,..त्या सगळ्यांची तयारी आणि उत्साह पहिला की वाटतो आपण काहीच नाही त्यांच्या पुढे,.. आपल्यापेक्षा आपल्या आपल्या आईला जीवापाड जपणाऱ्या ह्या खऱ्या लेकी आहेत,..मधल्या कोरोनाच्या काळात त्याच तर होत्या तिला जपणाऱ्या,..मला तर येऊन तिला भेटता सुद्धा आलं नाही,..ती मला फोनवर म्हणायची काही काळजी करू नकोस माझी,..माझी एक अनु तिकडे असली तरी माझ्या कितीतरी अनु इथे आहेत मला जपणाऱ्या,..मग मला समाधान वाटयचं,.. आईचा प्रवास तसा एकटीचा होता पण आज किती जण जोडले तिने तिच्या पाउलवाटेवर,.."
मंगल म्हणाली,"खरंच काकुंच कौतुक आहे,..आजी म्हणायचीच तुम्हाला पैसा, प्रसिद्धी किती मिळली यावर तुमचं यश मोजयच नसतं यश हे तुम्ही किती माणसं कमावली ह्यावर मोजयच असतं,.. काकूंनी ते करून दाखवलं ग,..मागे बरीच वर्षे झाली त्याला माझ्या घरी आल्या होत्या,..आवर्जून माझ्या सासू सासऱ्यांशी बोलल्या,..माझ्या लेकीची खास मैत्रीण म्हणजे माझी लेकच आहे म्हणाल्या,.."
सोनी म्हणाली,"मला तर मागेच खुप आग्रह केला होता, माझ्याकडे चल म्हणून पण नाही हिम्मत झाली,त्यांना त्रास देण्याची पण आता वाटतं तुम्ही म्हणता तसं कोशातून बाहेर पडायला हवं,..काकूंच्या छायेत मलाही घडण्याची संधी असेल तर त्या संधीच सोनं मी करणारच,.."
एवढया वेळ शांत बसलेली मनी आईला म्हणाली,"अअअअ इ आआ पण ददददु सरी कडे,.."सोनी तिला जवळ घेत म्हणाली,"हो ग मन्या तुला नवं आयुष्य देण्याचा प्रयत्न करू,.."
अनु म्हणाली,"अग हिला आपल्या गप्पा समजतात की,.."सोनी म्हणाली,"हो तशी समज चांगली आहे ग तिला,..कळत पण वळत नाही असं आहे,.."
मंगल म्हणाली,"सोनी तुला राग नको येऊ देऊ पण अश्या मुलांना त्यांचं विश्व असतं ग आणि ते विकसित करायला पाहिजे,..तू चार भिंतीत तिला कोंडल आहेस,..ना नवीन माणसं, ना नवीन शब्द,न भाषा काहीही पडत नाही तिच्या कानावर,..खरंतर आपण बोलतोय याकडे तिचं लक्ष आहे हे किती विशेष,..तू खरंच तिच्यावर काम कर,.."
तेवढ्यात मामी बोलल्या,.."अनु पुढे डाव वळण लागेल तिथून गाडी आत टाक मग दहा मिनिटात गाव आलंच,..गप्पांच्या नादात रस्ता कुठे हरवला कळलं नाही,..अन्यथा तस दूर आहे हे चार तास म्हणजे,.."
अनु म्हणाली,"हो ना मामी कधी इतिहासात हरवून,कधी भविष्याच्या गप्पात आपण तर एकदम हरवलो पण मजा आली,..हा प्रवास वेगळा होता आपल्या पाचजणींचा,.."
सोनी म्हणाली,"खुप काहीतरी नवीन घडवणारा, आयुष्याला नवीन वळण देणारा ठरेल हा प्रवास,..तुम्हाला मी वचन देते की आता इथे काहीतरी निर्णय मी नक्की घेईल,.."
मंगल म्हणाली,"येस सोनी दॅटस द स्पिरीट,..असंच स्वतःला चेतवत ठेवायचं,..संकट काय आपल्याला घाबरवायलाच येतात,..आपला विश्वास ठाम असला की जमत सगळं,..हो ना मने दे टाळी म्हणत मंगलने हात पुढे केला,..ते लेकरू तर आनंदाने चित्कारलं,.. त्याला एवढे नवे चेहरे,.. इतक्या वेगळ्या गप्पा, हसणं, प्रवास सगळंच नवीन होत आणि त्यात हा निरागस जीव रमला होता,.."
अनुने उमाला फोन लावला,..तिने गांधी पुतळ्याच्या थोडं पुढे यायला सांगितलं,..अंधार पडला होता,..ती उमा ह्यांना घ्यायला रोडवर येऊन थांबली,..ती दिसताच अनुने गाडी थांबवली,..एका छोट्याश्या घरासमोर गाडी थांबवली होती,..मंगलला अगदी आजीच्या घराची आठवण आली,..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all