तिची पाऊलवाट.. भाग २

कथा तिच्या संघर्षाची.. तिने निवडलेल्या पाऊलवाटेची..
तिची पाऊलवाट(भाग 2)
©स्वप्ना...
    आजोबा आणि नातीच्या आशा बघण्याने अनु गडबडली आणि म्हणाली,"माफ करा हं,जुनं काही आठवलं आणि ही ओळ तुमच्या गाण्याशी जुळली,.."तसे आजोबा हात जोडून म्हणाले,"काही हरकत नाही ताई माफी काय मागता उलट छान वाटलं तुमच्या तोंडून ती ओळ ऐकतांना आणि ही रचना आहेच तेवढी छान आयुष्याच्या वारी तसं पाहिलं तर उर फुटोस्तोवर तर माणूस संपत्ती जमवायला धावतो पण तुकाराम महाराजांनी एका ओळीत मागितलं लईनाही,लईनाही मागण हे कळलं म्हणजे सोपं होतं ना जगणं,..?नाही का ताई?
      आजोबांचं बोलणं अनुला अंगावर पारिजातकाची फुलं पडल्यासारखं हलकं करणारं वाटलं ती आणखी मोकळेपणानं म्हणाली,"मी जरा या पारिजातकाच्या फांदीखली उभी राहू का??"
   "हो हो ऱ्हावा की तुम्ही आणि माझी नात दोघी ऱ्हावा,..तुमचा फोटो बी काढती आमची मंडळी,..ए अग फोटो घे मॅडमचा,..आपल्या चिमणीच्या वाढदिवसाच्या त्या पहिल्या पाहुण्या आहेत,."
  आजी पदराच्या ओच्याला हात पुसत लगबगीने आली,.. अनुने फोनची सेटिंग करून मोबाईल आजीजवळ दिला आणि त्या चिमणीचा चिमुकला हात घेत त्या लगडलेल्या फांदीखाली ती अक्षरशः उडी मारत गेली,..आजीने दोन तीन फोटो काढले तेवढ्यात आजोबा म्हणाले ,"अग, ते व्हीडो शूट का काय असतं ते कर ना,.."आजी लाजत हसत म्हणाली,"व्हय व्हय करते की,.."आजीने अगदी सराईतपणे बाजूच बटण टच केलं,..त्यावेळी आजोबांनी चटकन फुलांची फांदी गदागदा हलवली,..टपटप टपटप प्राजक्त अनुच्या आणि त्या चिमणीच्या अंगावर पडला ,..अनु क्षणभर लहान झाली त्या चिमणीसोबत,..आजोबा,आजी खळखळ हसले आणि म्हणायला लागले,.."आमच्या चिमणीला हाप्पी बड्डे टू यु,..."आजी लाजत म्हणाली,"असंच म्हणतात ना वो मॅडम,.."आजीच्या प्रश्नावर अनु हसत म्हणाली ,"हो हो असंच,हॅप्पी बड्डे टू यु,..अनुनेही सुर मिसळला,..चिमणी अगदी खुश.
       काही फुलं आपल्या ओंजळीत घेत अनु तेथून निघाली,..टपरी जवळ येताच आजीने मातीच्या मटक्यात चहा दिला,.."मॅडम तोस देऊ का चहासोबत भारी लागतो,..?" आजीच्या विचारण्याने अनु स्तब्ध झाली आज सगळे आजोळ इथेच दिसायचय का?? तिला आठवलं आजोबांकडे तो सायकल वर येणारा तो टोस्टवाला,.. आजोबा सकाळी ओट्यावर उभे राहुन त्याची वाट बघायचे,. तो ओरडत यायचा," यासीन का तेढा तोस चाय मे डूबा वो तो आधीच्या गायब,..."आणि खरंच तसंच व्हायचं कपातल्या चहात टोस्ट बुडवला की चहा गायब,..मग आजी त्या कपात परत थोडा चहा ओतायची आताही अनु म्हणाली,"आजी चहा कमी पडतो हो टोस्ट घेतला की,.." आजी खळखळून हसत म्हणाली,.. "तेवढेच दोन कप चहाचे पैसे होतात आम्हाला,.." त्यावर आजोबा लगेच म्हणाले," पण मॅडम आज तुमच्याकडून नाही घेणार आम्ही पैसे,.. तुम्ही आम्हाला लय आनंद दिला आणि चिमणीचा वाढदिवस पण आहे ना,.. आज फक्त तिच्यासाठी प्रार्थना करा तिला निरोगी ठेव म्हणून अहो पोरीला कॅन्सर झालाय,.. रक्ताचा.. सगळी शेती घर विकलं इलाज चाललाय पोरीचा,..तिचे मायबाप इलाजाच्या ये जा मध्येच अपघातात गेले ही,.."आजोबांना पुढे बोलणं सुचेना त्यांनी गळ्यातला बागायतदार डोळ्याला लावला,..तसं चिमणीने त्यांना हनुवटीला धरून डोळ्यांनी खुणावलं,.. आजी पुढे बोलू लागली,.." बसनी ईलाजला जात असताना बस अपघात झाला सगळे प्रवासी गेले,..आणि हि चिमणी त्यातुनही वाचली पुढं वाचायची असल म्हणून कदाचित,...मॅडम तिला भरभरून आशीर्वाद द्या,..तुम्ही मघाशी तो फोनमध्ये काढलेला फोटो दाखवला ना,...असं हसताना कितीतरी महिन्यांनी दिसली ती आम्हाला,..त्याला कारण तुम्ही हाय मॅडम,.."आजोबा मध्येच म्हणाले ,"ए तोस दे मॅडमला,.."
       अनु स्तब्ध झाली होती,.."आज नेमकं नव्याने आयुष्य काही शिकवतय का आपल्याला,.. बाळंतपणाच्या कळांना खचणारे आपण हे लोक बघा कुठली लढाई लढत आहे,..आपल्याला किती सिक्युअर लाईफ जगायची सवय लागली आहे,..अजूनही पोरांना कधी सर्दी झाली तरी आपण पॅनिक होतो,..आणि हे काय बोलावं अनुने डोळ्यात आलेलं पाणी पुसलं,..आणि टोस्ट खात सगळी चौकशी केली,.." ट्रीटमेंट कोणाकडे चालू आहे??" आणि तिला उत्तर आलं," डॉक्टर जोशी... आपल्या शहरातले.. आपला मित्र आणि आता...तिच्या मनात आलं यांना काही बोलायला नको,.. चहाचं ऋण आणि त्याहीपेक्षा आपल्या आठवणीतल्या प्राजक्ताचं आपल्या अंगावर असं ओघळणं त्याचे ऋण फेडण्याची हीच वेळ हे तिला जाणवलं,..तिला मनोमन सुखद वाटलं.
      परत एक सेल्फी घेऊन ती निघाली त्या चुलीकडे आणि प्राजक्ताच्या झाडाकडे तिने मन भरून बघितलं... गाडी सुरू करताना ते तिघे तिला प्रसन्न हसून टाटा करत होते तेवढ्यात तिला काही आठवलं आणि तिने पटकन डिक्की उघडली,.. ती ज्या मैत्रिणीकडे रस्त्यात रात्री थांबणार होती तिचे सासू-सासरे वयस्कर म्हणून तिने शाल आणि त्या मैत्रिणी साठी एकदम मऊ ब्लॅंकेट घेतलं होतं ते सगळं तिने ह्या तिघांना दिलं,.. आजी आजोबा नाही म्हणत होते तेंव्हा ती म्हणाली,.." आजी-आजोबा नाही म्हणू नका तुम्ही आशीर्वादाची ऊब दिली ही माझ्या भेटीची ऊब समजा,.. आजी-आजोबांनी सूरकुतलेले हात जोडले त्या क्षणी तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ती पटकन गाडीत बसली कितीतरी वेळ आरशात हलणारे हात दिसत राहिले... ठिपका होईपर्यंत,.. तिने एकक्षण डोळ्यातली आसव पुसली,..मनातले काजवे आजी-आजोबांच्या रुपाने परत चमकले म्हणत तिने डॉक्टर जोशी ला फोन लावला," हॅलो तुझा वेळ घेऊ का..? हल्ली तुझ्याकडे आजी-आजोबां नातीला ब्लड कॅन्सरच्या ट्रीटमेंटला आणतात का रे ? आपल्या शहराजवळच्या खेड्यातले आहेत बघ,.. मध्यंतरी त्यांचा मुलगा आणि सून अपघातात गेलेत..?" पलीकडून आवाज आला,"हो येस येस,.. आज आहे त्यांची अपॉइंटमेंट मी जस्ट पेशंट हिस्ट्रीच बघतोय,.. चिमणी म्हणतात ना ग ते नातीला,..?"अनु अधिक उत्साहाने म्हणाली," हो बरोबर तेच तेच,..माझे एक काम करशील,..? प्लीज यापुढे त्यांचा खर्च मला मॅसेज कर मी देईन तुला आणि हो माझं नाव फोन पत्ता काही हे देऊ नकोस एखाद्या सरकारी योजनेत हे सगळे झाले असे सांग आणि आज तर त्या चिमणीचा वाढदिवस आहे.. बघ जरा तुझ्या हॉस्पिटलमध्ये काही छान पैकी साजरा करता आला तर आणि एक विचारू चिमणी जगेल का रे?हे विचारताना अनुने गाडी बाजूला घेतली तिला एकदम रडूच फुटलं,.. म्हाताऱ्या आजी आजोबाचा आधार असेल रे जगण्यात,.. पुढच्या आयुष्यात एवढ बोलून ती रडत होती...
            डॉक्टर जोशी म्हणाले,"तिला ट्रीटमेंट योग्य चालू आहे आणि वर्षभरात ती बरी होईल आणि आता तुझी पेशंट म्हटल्यावर मला तिला बरेच करावे लागेल ना म्हणून तू रडू नकोस ना प्लिज अनुआजही तू रडलीस ना की वाईट वाटतं मला,.. माझ्या व्यावसायिक आयुष्यात तू पहिल्यांदा मला काही मागितलं आणि मी देणार नाही असं कधी होईल का ?मिसेस जोशी तू समजतेस तेवढा दृष्ट नाहीये तुम्ही आणि मी त्या चिमणीला आधीच स्वतः होईल तेवढी सूट दिली आहे आता तू सगळे पैसे भरणार आहे म्हंटल्यावर ओके डिअर,..चल रडू नकोस आणि काय ग अनु सकाळी मला न उठवताच पळालीस,..? रात्री ऑपरेशन उशिरापर्यंत चाललं मान्य आहे ग ,..तरी सुद्धा माझी बायको जिला एका पेंटिंग साठी नॅशनल अवॉर्ड मिळाले ते घेण्यासाठी ती चालली आहे तर मी नसतं का तुला बाय केलं,... असो लव यू डिअर.. टेक केअर ,.." म्हणत त्याने घाईतच फोन ठेवला,..एवढं बोलला हेच नशीब पण तो तरी काय करणार आज नामांकित डॉकटर आहे तो,..कॅन्सर साठी खरंच हातगुण आहे,..पण आज आपल्या पैंटिंगसाठी कौतुक केलं,..तिला हसू आलं,.. कळतच नाही हा कसा आहे,..? आजी म्हणायचीच," सगळी दुनिया माणसांना कळेल, पण,.. हे नवरा बायको एकमेकांना कळायला आयुष्य जातं,..रुसवे-फुगवे,..अबोला आणि प्रेम सगळ्याची गोळाबेरीज शेवटचं उतारवयाच आयुष्य देतं,..पण तोपर्यंत वेळ खूप निघून गेलेला असतो,.." खरंच डॉक्टर जोशी एक कोडं बनून आयुष्यात आलेले आपल्या जगण्यात,...गाडीच्या आरश्यात मागे पळणारी झाडे तिला परत मागे घेऊन गेली,...
क्रमशः..
©स्वप्ना मुळे (मायी)औरंगाबाद


🎭 Series Post

View all