तिची पाऊलवाट भाग २९

तिची पाऊलवाट

#तिचीपाऊलवाट भाग 29

©स्वप्ना..

       सोनीची आई म्हणाली,"खरंच घेऊन चला ग हिला,..जगण्यातली गम्मत हरवून बसली आहे ती,..कधीच कुठे बाहेर पडत नाही,घर आणि टपरी एवढंच तिचं विश्व तिने हिला देखील काही दाखवलं नाही,..अग जरी मतिमंद असली तरी थोडाफार तिला निसर्ग दाखवावा तिला कळू द्यावं जरा तर फक्त जपत बसते तिला,.. काय बोलावं उगाच मग आम्हा मायलेकीत वाद होतात,..सोने चल भर कपडे,.."

      मंगल मोनीजवळ जाऊन बसली,"चला भुर जायचं का,..?"ती अंगठा चोखत आंनद व्यक्त करत होती,..तिला भुर कळतं असं तिच्या आजीने सांगितलं,..सोनीने मग कोपऱ्यातल कपाट उघडलं,..साड्यांवर हात फिरवत म्हणाली,"कित्येक वर्ष मी चांगले कपडे घालून कुठेच गेलेली नाही ए,..अनु तुझ्या आईच्या वाढदिवसाला मी काठाची साडी घालेल,..अनु म्हणाली,"अग सगळ्यांनी काठाचीच साडी घालायची आहे,..मस्त सोहळा साजरा करायचाय मला तिच्या वाढदिवसाचा,..सोनीने मनीसाठी काठाच्याच साडीच परकर पोलक घेतलं,..ते बघून अनु म्हणाली,"सोनी तुला आठवतं का,..चैत्रगौर आणि आपले असे परकर पोलके,.. तो फराळाचा खमंग वास,..आजीची गडबड,..ती आरास,..ती आपल्या दोघींची बायकांच्या हातावर अत्तर लावण्याची लगबग,.."

     सोनी म्हणाली,"आपल्या आठवणी सुद्धा अत्तरासारख्या आहेत,.. निघाल्या तरी दरवळल्यासारखं होतं ग,.."

      मंगल म्हणाली," बाकी गप्पा गाडीत बसून मारा,..आता आवरा नाहीतर इथेच संध्याकाळ होईल,.."

   आजीने मनीच्या वेण्या घालायला घेतल्या,..मनी सुंदर होती,केस,रंग,उंची,बांधा कुठेही बेढब नव्हती पण निसर्गाने बुद्धीचीच कमी का ठेवली की,..शापीत सौन्दर्य यालाच म्हणत असतील असं मंगलच्या मनात आलं,..तिला मनात ती बंदिश आठवली,..

"बिन खुशबू के फुलो कॊ भगवान भी ना चाहे,..

जब नही कुवर तुम साथ मे तो शृंगार क्योऊं करू हाये,.."

      अनु म्हणाली,"मंगल आपण गाडीतलं सामान नीट लावून घेऊ,..दोघी बाहेर पडल्या,..टपरीवर काही माणसं होती ,पण तो पोऱ्या चहा बनवून देत होता,..

     दोघींनी डिक्कीतल सोनीला देण्याचं सामान काढलं,..बाकी सामान नीट लावलं,..अनु सोनीसाठी बरंच काही घेऊन आली होती, काही किराणा,बरण्या,..बेडशीट ,..विशेष म्हणजे वापरलेल नव्हतं तर सगळं नवीन होतं,.. मंगलला कौतुक वाटलं किती छान आहे आपली सखी,..

        सगळं सामान सोनीला देत अनु म्हणाली,"आता हे गाव सोड आपण आता आईच्या प्रोजेक्टवर जाऊ तिथे बघ आई किती अनाथ,गरजू बायकांना घेऊन काय काय करते,.."

      सोनी फक्त हसली डोळ्यातली चमकच हरवली तिच्या हे अनुला फार तीव्रपणे जाणवलं ,सोनी अनुशी वाईट वागली असली तरी त्यामुळेच आपण बाहेर पडू शकलो आणि आज इथपर्यंत पोहचलो नसता आई तिथेच ह्यांच्या घरातल्या पोळ्या करत असती आणि आपल्याला एखाद्या सामान्य घरात सून असतो,..आपला चित्रकार हा प्रवास कदाचित झाला नसता हे अनुला कायम जाणवत असायचं,..म्हणून तर आपल्याला हीच ते वाईट वागणं आठवत नाही उलट यांनी दिलेला आधार आठवतो,चांगले क्षण आठवतात हे ही आता तिच्या मनात आलं,..

         मस्त टपरीवरचा गरमगरम चहा घेऊन सगळे निघाले,..सोनीने त्या पोऱ्याला सगळ्या सूचना दिल्या,...अनु तर गमतीने त्याला म्हणाली,"आता एकटा शिक टपरी चालवायला,कदाचित तुझी ही ताई येणारही नाही तिकडेच नवीन काम शोधेल,..

     मनु गाडीजवळ आली आणि तिला खुप आंनद झाला,..ती गाडीवरून हात फिरवू लागली,..तिच्या भाषेत तिने विचारलं,"माशी तू तू झझी गाडी अहहे कक्क.."अनु हसून म्हणाली,"हो आपली सगळ्यांची आहे म्हणत तिच्या डोक्यावर थोपटल,..आता अनुने गाडी चालवायला घेतली,..समोर अनुच्या बाजूला मंगल बसली,..मागे सोनी, तिची आई आणि खिडकीत मनी बसली,..तिला खुप आंनद होत होता.ती त्या टपरीवरच्या पोराला टाटा करत होती पण काच लावलेली असल्याने तिला अडथळा येत होता,..ती जोरजोरात ओरडायला लागली आणि काचेवर हाताने मारायला लागली,..अनुने पटकन काच खाली केला तेंव्हा तिने हात बाहेर काढून मोठ्याने ओरडत,.."दददददादा टातत्त्तटा,.."दादा टाटा असं म्हंटल तेंव्हाच ती शांत झाली,..

               गाडी गावाच्या बाहेर पडली आणि अनुने सोनीच्या आईला रस्ता विचारला,.. त्या मागे आईकडून जाऊन आल्याच अनुला कळलं होतं,.. शेवटी कश्या वागल्या तरी त्याही मैत्रिणी झाल्या होत्या,..एकमेकींना कधी काळी त्यांनी आधार दिला होता,..सांभाळून घेतलं होतं,..अनु या मार्गे कधीच आईकडे गेली नव्हती,..मंगलकडेच एवढया वर्षात ती पहिल्यांदा आली होती,..हा रस्ता नवीन असल्याने तिने विचारलं,..सोनीची आई म्हणाली,"रस्ता आता एकदम छान आहे पण आता वाजलेत चार आपल्याला जायला चार तास लागतील,..आईला फोन तरी करून ठेवू या,.."

     अनु म्हणाली,"नाही आईला काहीच सांगायचं नाही ए,..उद्या तिच्या वाढदिवसाला आपण सगळे तिला अचानक दिसणार आहोत,..तिला आपण येणार याची कल्पना पण नाही ए,..तिच्या त्या गरजू महिलांमध्ये तिथे आईच्या हाताखाली जी मुख्य काम करते उमा तिच्या मी सम्पर्कात आहे,..तिने आपली राहण्याची व्यवस्था केली आहे,..आपण आता रात्री आईकडे जाणारच नाही आहोत,..उद्या सगळी धूम करायची,..आज आपण पोहचेपर्यंत गोगटे मावशी,माझी आजी आलेल्या असतील तिथे आपली वाट बघत,..आज रात्री गेल्यावर तुम्हाला मी माझा सगळा बेत सांगेल,..तुम्ही आता निवांत राहा,..फक्त ह्या वळणावर गाडी वळवायची का ते सांगा,..

      सोनीची आई म्हणाली,"बस हे एक वळण आता सरळ जाऊ दे गाडी तुझ्या आईच्या गावीच जाऊ आपण पण चार तास अशीच चालू ठेव काय छान चालवते ग बाई तू गाडी,..खरं अनु सगळं नशिबानं घ्यावं हे नक्की,..आणि आपले पाप आपल्याला इथेच फेडावे लागतात ना,.."

     अनु म्हणाली,"असं काही म्हणू नका, ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी तिच्या नशिबात असे कष्ट लिहिले असतील,..तुम्ही तिला फक्त साथ द्या,..खरंतर जुन्या बायका म्हणतात ना,"माहेरी कष्ट केले तर सासरी सुख मिळतं आणि माहेरी मज्जा केली की सासरी कष्ट मिळतात,..तसं असेल सोनीच,..जाऊ द्या तो विषय नका आता काढू,..तुमचं माहेर, तुमचं लग्न यावर सांगा बर काहीतरी,.."

       तेवढ्यात मनीला तहान लागली,.. ती जोरजोरात ओरडायला लागली, सोनीने पट्कन तिला पाणी दिलं,..मंगलला सोनीची किवच आली,.. जरा म्हणून सुटका नाही सोनीची सतत तयारीत राहावं लागतंय असं मनात तिला वाटलं,..

      सोनीची आई म्हणाली,"तसा फार पुढारलेला आमचा काळ नसला तरी खूप मागासलेला नव्हता,..नऊवारीतली स्त्री आता सहावारीत आली होती,..बायका सायकल चालवत होत्या,..नोकऱ्या करायला सुरुवात झाली होती,..ह्यांच ठिकाण मला घरीच चालून आलं होतं,..तुमच्या मावशीआजीने माझ्या आत्याबहिणीच्या लग्नात माझं मंगलाष्टक ऐकलं होतं,..तशी माहिती काढून त्यांनी मागणी घातली हाती,..मला ठिकाण काही आवडलेलं नव्हतं कारण माझं माहेर खुप सधन होतं,.. फक्त मला सावत्र आई होती,..ती माझा रागराग करायची,..मला वडिलांनी समजावलं,..बघण्यातल ठिकाण आहे आणि मुख्य म्हणजे गावात आहे,..तुला कधी माहेरी येता येईल,..मलाही तुला कधीही पाहता येईल बेटा,.. मागे दोन बहिणी आहेत त्यांचा विचार कर,..मी वडिलांच्या समजवण्यावर तयार झाले,..माझ्या नवऱ्याच्या नोकरीपेक्षा सासऱ्यांचा हुद्दा मोठा होता,..घरात त्यांचीच चलती होती,..सासूबाईंचं काही चालत नव्हतं,..सगळा हुकूम सासऱ्यांचा,.. मला आधी खुप त्रास झाला,..त्यांच्या ओरडण्यावर तर मी खुप घाबरायचे,..ते सलग शिव्याच देत राहायचे,..मला माझे वडील कधी जोरातही बोलले नव्हते तर इकडे सरळ शिव्या,.. एकदिवस मी खुप रडले...

क्रमशः

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद.

🎭 Series Post

View all