तिची पाऊलवाट भाग २७

तिची पाऊलवाट
#तिचीपाऊलवाट भाग 27
©स्वप्ना..
रस्त्यावर वळण लागलं आणि उंबरगावची पाटी दिसली,..तस दोघींना हायसं वाटलं,..कारण ऊन खुप रखरख झालं होतं,..पोटात भूकेने खड्डा पडला होता,..मंगल म्हणाली,"अनु आता तुझी आणि डॉ. जोशींची लव्हस्टोरी इथून पुढच्या प्रवासात सांग,..आता तुझ्या सोनीच घर अगदी जवळ आलंय ना,..ती येणार आहे का आपल्यासोबत पुढच्या प्रवासाला,..
अनु म्हणाली,"मंगल ती नाही येऊ शकत तिची इच्छा असली तरी,.."मंगल म्हणाली,"का नवरा पाठवत नाही का,..?"अनु म्हणाली,"तिची फारच वाईट जीवनगाथा सुरू आहे,..आता तिच्याकडे गेल्यावर समजेल तुला आणि नाही समजलं तर पुढच्या प्रवासासाठी ही स्त्री रंगवून सांगते तुला,..खरंतर भोवतालची प्रत्येक स्त्री जगण्याची जबरदस्त प्रेरणा देत असते,..फक्त तिच्या आयुष्याशी निगडित घटना वेगवेगळ्या असतात,..सगळ्या स्त्रियांत एक कॉमन गुण जाणवतो मला,..त्या आपल्या कुटुंबासाठी खुप कणखर,कष्टाळू असतात,..फार क्वचित थोड्याफार आळशी असतील पण बऱ्याचजनी खुप खम्बिर असतात ,..त्यातही सोनी सारख्या पाहिल्यावर वाटतं खरंच कमाल आहे स्त्रीची,..मध्येच अनु म्हणाली,"ह्या चहाच्या टपरीजवळ थांबव त्या झाडाखाली पार्क कर,.."
मंगलने सावलीत गाडी उभी केली,दोघी गाडीतून उतरल्या,..टपरीवर सोनी उभीच होती,..ती लगेच पळत आली,.. मंगलतर आश्चर्याने बघतच राहिली,..ही सोनी,.. मावशीआजीची नात,..आपण गाणं शिकायला चाललो तर हसायची,..काय गळे काढता ग म्हणायची,..ही अशी कशी गबाळी झाली,..मनातच मंगल म्हणाली,"काहीतरी नवीन आयुष्य कळणार असं दिसतंय,.."
सोनी अनुच्या गळ्यातच पडली होती,..आज अनुला वाटलं आपल्याला हिचे पावडर,स्प्रे बघून तेव्हा हेवा वाटायचा ,..तिच्या आत्या परदेशातून वेगवेगळे पावडर,स्प्रे पाठवायची ..आज वाटतं हिच्या अंगाला साधी बाजारू स्वस्त पावडर लागते की नाही की,..
सोनीने टपरीवरच्या मुलाला काही सूचना दिल्या आणि दोघींना आत नेलं,..मंगल सगळं घर बघून आश्चर्य चकितच घर स्वच्छ होतं पण अतिशय,छोटं आणि खुज होतं,.. अनु बहुदा इथे सारखी येत जात असावी अशी सहजतेने वावरत होती,..सोनीने थंडगार मठातलं पाणी दिलं,..बसायला एक पलंग होता आणि दोन खुर्च्या,आम्ही खुर्चीत बसलो,.. पलंगावर कोणीतरी झोपलेलं दिसत होतं,..अनु म्हणाली सोनी तुझ्यासाठी काही सामान आणलंय ते गाडीच्या डीक्कीतून काढून घ्यायला सांग त्या मुलाला,..आणि हो तू मंगलला ओळखलं ना,..सोनी ने हातानेच हाय करत मी ओळखलं ना,.. पण मंगल तू ओळखलं मला,..मंगल म्हणाली,"सोनी खर सांगू अनु सोबत होती म्हणून मी तुला ओळखलं ग पण जर अशी तू मला भेटली असतीस तर मला नाही वाटत मी तुला ओळखू शकले असते,..अग पूर्वीची तू आणि आताची तू खूपच फरक पडलाय ग,..तू जशी डोळ्यासमोर आहेस त्यातली एक टक्का सुद्धा तशी राहिली नाहीस ग तू,..आम्ही बघ थोड्याफार फरकाने बदललो,..पण ओळखू येतोच ना,..सोनी मंगलच्या बोलण्यावर उदास हसत म्हणाली,"तुमच्या सुखाने तुम्हाला जपलं,..मला परिस्थितीनी पार बदलून टाकलं ग,.."
अनु म्हणाली,"सोनी आम्ही आहोत थोड्यावेळ आपण गप्पा नंतर मारू आता खुप भूक लागली आहे,..काय वाढते जेवायला,..?"सोनी म्हणाली,"तुम्ही चटकन फ्रेश व्हा,मला उपवास आहे,तुम्हाला मात्र गरम चुलीवरच्या भाकरी भरीत करते तुझ्या आवडीच्या,.."दोघी म्हणाल्या चालेल,..दोघी मागच्या अंगणात गेल्या,..गुलबक्षी अबोलीच कुंपण केलं होतं तिथे,..छोटा हौद,..शौचालय सगळं त्या अंगणात,..दोन चार वेली छतावर चढवलेल्या,..दोडके,शेंगा,..कोपऱ्यात तर वांगी होती,..सोनी येऊन पटकन चार वांगी तोडली खसखस पाण्याने धुतली आणि भिंतीला लागून असलेल्या चुलीत घातली,.. मंगल सगळं बघत होती,.. आपल्यापेक्षा किती चांगलं आयुष्य जगत होती ही तेंव्हा, आता हिच्या वाटेला एवढं वेगळं जगणं का?ही तर बारावी पर्यंत आपल्या समोर शिकत होती,..खरंतर अनु गाव सोडून गेल्यावर तसा संबंध तुटलाच होता हिच्याशी,पण आज अगदी इथे ह्या गावात,..चहाची टपरी तिच चालवते हे ही लक्षात आलं मघाशी ती त्या नोकर मुलाला सूचना देत होती त्यावरून,..पण एवढं का हीच आयुष्य बदललं,..हिला तर वडिल होते,आई खम्बिर होती,..पैसा अडका होता,..मग एवढा बदल,..मंगल विचारात उभी होती आणि अनुने हाक मारली,..चल गरम भाकरी खायला,..
घरातल्या स्वयंपाक खोलीत एक चौक होता तिथे छोटीशी चूल होती,..सोनीने बाजूला ताट मांडली होती,..मस्त वांग्याच्या भारताचा खमंग वास येत होता,..सोनीने गरम भाकरी केल्या दोघी मैत्रिणी मस्त जेवल्या,..जेवताना अनु म्हणाली,"अग मामी दिसत नाही ए,..म्हणजे मावशीआजीची सुन हे मंगलच्या लक्षात आलं,.."सोनी म्हणाली,"आज गावात भजन आहे आई तिकडे गेली ए,..तिला आता भजन कीर्तन ह्याचा नाद लागलाय,..येईलच थोड्यावेळात आता तुम्ही थोडा आराम करा,..मी एकदा टपरित डोकावते परत ही मनी जर उठली ना तर मग काही करू देणार नाही म्हणत आम्हाला समोरच्या खोलीत सतरंजी टाकून सोनी बाहेर गेली,.."
मंगलने अनुकडे पाहिलं आणि म्हणाली,"मी तर शॉक आहे हिची परिस्थिती अशी का झाली,..?नेमकं काय घडलंय,..?"दोघीत हे बोलणं सुरूच होत की सोनी आली,.. त्यांच्या सतरंजीवर बसली आणि एकदम हुंदका आला तिला,.."अनु नाही सहन होत ग आता सगळं,..आई सोबत राहून हिम्मत देते म्हणून पण मनी कडे पाहिलं की वाटतं तिला आणि मला दोघींना सम्पवून टाकावं,.. एवढं बोलून सोनी पदरात तोंड खुपसून रडायला लागली,.."
मंगल म्हणाली,"अनु,सोनी मला काही कळतच नाही ए नेमकं हे सगळं काय सोनी एवढ्या खेड्यात कशी,..?आणि ही सगळी परिस्थिती अशी का,..?"
अनु म्हणाली,"सोनी तू सांग बरं पहिल्यापासून सगळं म्हणजे तुला जरा हलकं वाटेल,.."
सोनीने डोळे पुसले,.."डोळ्यात कुठलेही भाव न ठेवता शून्यात जात सोनी बोलायला लागली,..अनुला आम्ही खरंतर हकलूनच दिलं घरातून तो आत्याचा मुलगाच खरतर बदमाश होता,..मी आणि तो प्रेम करायला लागलो एकेमकांवर तर अनुने आम्हाला अडवलं,मला म्हणाली,"सध्या आपलं शिक्षण घेण्याचं वय मी तुझ्या आईला सांगेल,..तिने असं म्हणताच त्यादिवशी त्याने हिला छेडलं तरी हिलाच आम्ही वाईट ठरवलं,..पुढे ह्या दोघी तर गेल्या निघून पण मी जरा धरबंध सोडून वागायला लागले,..आत्याचा मुलगा आत्या करेल आपल्याला सुन आपणही दुसऱ्या देशात जाऊ,..अशी स्वप्न बघत मी सहज झोकून दिलं स्वतःला त्याच्याकडे,..पण तो पक्का परदेशी होता जरी भारतीय असला तरी तिथल्या लोकांप्रमाणे त्यालाही कुटुंब ह्यात काही रस नव्हता,..त्याने प्रेम प्रेम म्हणत कधी शरीराचा ताबा घेतला आणि मी पायरी सोडली,..जिथं अनु मला थांबवायची तिथं तिलाच घरी ठेवलं नाही मग मला रोखणार कोणी नव्हतं,..वडिलांना त्यांची काम होती आणि आई तर आजी गेल्याने जरा जास्तच मोकळी झाली होती,..मला त्याची जवळीक आवडायची आणि मी चुकीच पाऊल उचललं,.. दोन महिन्यात माझी पाळी चुकली आणि आई एकदम जागी झाली,..रडापड गोंधळ झाला,..तो तर पंधरा दिवसांपूर्वीच त्याच्या देशी गेला होता,..आई वडिलांना मग मी सांगितलं सगळं,..आई आणि वडीलही विश्वासाने म्हणाले,"ताईशी बोलू आणि लग्न लावून टाकू वय तस कमी असल तरी ताई तिकडेच नेईल सूनबाईला मग काही ताण नाही,..वडिलांनी आत्याला फोन लावला पहिले दोन दिवस तर फोनच लागत नव्हता,..तेंव्हा एवढं सोपं नव्हतं ना फोन लावणं,..पण एक दिवस फोन लागला.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all