तिची पाऊलवाट भाग २४

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 24
©स्वप्ना..
"अनु मॅडम मला आता हॉस्पिटलसाठी पैंटिंग नको आहे,मला जरा वेगळ्या विषयाची पैंटिंग हवी आहे,..मला सांगण्यात जरा अवघड वाटतंय तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण मला एक मुलगी आवडते, मला तिला हे सांगायचं आहे,मला तिला विचारायचं आहे,मला आयुष्यभर साथ देशील का?पण मला हे शब्दात नाही चित्रातून विचारायचं आहे,..मला प्लिज त्या आशयाच चित्र काढून देताल का,..?"
मी चटकन हो म्हणाले नाही,जरा गडबडले,..त्याने ते ओळखलं आणि लबाडपणे म्हणाला,"लक्षात नाही येत आहे का तुमच्या, थोडक्यात मी तिला मागणी घालतोय असं दाखवायचं आहे चित्रात,.."मी चटकन म्हंटल आणि तिने नाही म्हंटल तर,..डॉ.जोशी जरा चिडलेच,..मॅडम तुम्ही चित्र काढा,..बाकी मी बघेन ना,..मला परवा पर्यंत देऊ शकाल का असे चित्र आणि विथ फ्रेम द्या,पैसे आताच घेऊन जा वाटल्यास,..मी हसून म्हणाले,"पैश्याची घाई नको पण मला अस चित्र जमतंय का ते बघू द्या,.."त्यावर जोशी म्हणाले,"अहो आता अस समजा तुम्हीच ती मुलगी,..त्याने असं म्हणताच वेड मन उगाच फुलून आलं पण सावध मनात पूल देशपांडेंच्या ती फुलराणी नाटकातले ते संवाद आठवले फुलरणीचे ,..
"कुंपणापर्यंत सरड्याची धाव
टिटविने करावी का दर्याची हावं,..
सोन्याच्या कंठाला सुतळीचा तोडा,..
हे मनात आलं आणि वाटलं कुठली स्वप्न बघतोय आपण,..हा हुशार,बुद्धिमान,नामांकित डॉकटर आहे शहरातला,.. त्याच्या मैत्रिणीसाठी तो सांगतोय आणि तो आपल्याला फक्त ती तू आहे समज म्हंटला,..तरी आपण स्वप्न बघतोय,..स्वतःला जाग करत मी त्यांची पैंटिंग कल्पना ऐकून घेतली,..दोन दिवस मी ते पैंटिंग करत होते,..मध्येच मी जातही होते त्या स्वप्नात,असाच कुठूनसा येईल राजकुमार माझ्याही आयुष्यात असा विचार करत ते पैंटिंग मी कल्पना केली त्यापेक्षाही खुप सुंदर झालं होतं,..
डॉक्टरांनी ते घेऊन मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं,..तिथे वरतीच डॉकटर राहात होते मला नोकराने वरती जायला सांगितलं,..अगदी राजवाड्यासारखच घर होतं,..खालच्या दरवाज्यापाशी मी जरा थबकले कारण अगदी आई घालते तिच चप्पल दारात हाती,..मला मनात आलं आई इथे कशाला येईल?आपण कालपर्यंत हे पैंटिंग करताना तिला सांगितलं होतं डॉकटर जोशी कडचे पैंटिंग आहे म्हणून तेंव्हा तिने काही सांगितलं नाही ती ओळखते म्हणून,..मग ही चप्पल,..असेल दुसऱ्या बाईची,..एक सारखी दिसणारी माणसं सुद्धा आहेत जगात या तर चपला ह्या विचाराने स्वतःशीच हसत मी वर गेले,..
परिसर एकदम प्रसन्न होता,.. मंगल तुझ्या आजीची होती तशी विठ्ठल मूर्ती काही पायऱ्या चढून झाल्यावर एका कप्प्यात काचेचा दरवाजा लावून बसवलेली होती,..मंद समई तेवत होती,..दाट मोगऱ्याच्या फुलांचा हार त्याला घातला होता,..मला कौतुक वाटलं मनात विचार आला,..डॉकटर इथून येता जाता किती तणावात असतील,किती कठिण आजार असलेले पेशंट त्यांच्याकडे येतात,..त्यांना बरं करण्याचं कसब ते येता जाता ह्या विठुरायाला मागत असतील का,..?आपल्याला जसं अवघड विषयावर पैंटिंग करायचे असले की आधी त्याला मनात नमस्कार करून आपण सुरुवात करतो,तसंच ह्यांचंही होत असेल पण खरंतर ही विज्ञानवादी माणसं,..
त्या मूर्तीसमोर उभं राहून हे सगळे प्रश्न मनात सुरू होते आणि तेवढ्यात हाक आली,"अग अनु तिथे जिन्यात का उभी आहेस,..?ये वर ये..."त्या काकूंनी मला हाक मारली खरी पण मला आश्चर्य वाटलं ह्यांना माझं नाव कस माहिती झालं,..?मी दबकतच हॉलमध्ये जाऊन बसले,..दारातल्या रंगोळीपासून सगळं सुबक,रेखीव,स्वच्छ आणि जागच्या जागी आणि प्रशस्त होतं,.. मी बसले तो सोफादेखील एकदम प्रशस्त,..मी अंगाच कोंडोळ करूनच बसले,..इतक्या मोठ्या घरात यायलाही भीती वाटायची तेंव्हा,.. त्यांनी पाणी आणून दिलं आणि म्हणाल्या,"तू निवांत बैस,अरविंद मघाशीच मला सांगून गेला,..अनु नावाची मुलगी पैंटिंग घेऊन येणार आहे,..तिला पाहुणचार कर म्हणून,त्याला इमर्जन्सी आली आहे खाली हॉस्पिटलमध्ये त्यामुळे जावं लागलं,..
"मी जरा कसनुस हसत म्हंटल,"मी ही पैंटिंग आणली आहे ती ठेवून जाते,..पैसे नंतर दिले तरी चालतील,.."खरंतर माझ्या अनुभवावरून मी पैंटिंग ताब्यात दिलं की पैसे लगेच घेत होते,..कारण बऱ्याच लोकांनी मला पैसे द्यायला त्रास दिला होता,..आता ह्या पैंटिंगचे पैसे घेऊन मला लगेच रंग आणायचे होते,पुढच्या पैंटिंग साठी पण आता इथे बसणं मला नको वाटत होतं,..जरा अवघडल्यासारख वाटलं,..हा विचार मनात चालूच होता आणि त्या कॉफी घेऊन आल्या,..
उगाच काहितरी गप्पा मारत कॉफी घेऊन झाली आणि पायऱ्यांवर काही सूचना खाली देत डॉकटर जिना चढू लागले,.. सलाईन तयार ठेव,ब्लड ऑर्डर करून ये,.. तू त्या चार नंबरच्या पेशंटला बघ,..हे सगळं सांगत डॉकटर येत होते,..त्यांची आई म्हणाली,"हे सतत असं चालू असत ह्याच,..कोण मुलगी ह्याच्या सोबत संसार करेल ग,..?मी बोलून गेले किती मोठं कार्य आहे त्यांचं,.. लोकांना देवच वाटत असतील ते इतक्या कठीण आजारातून जगणं शिकवतात ते माणसांना,..हे वाक्य संपेपर्यत जोशी वरती आले,..मला बघताच म्हणाले,"नमस्कार चित्रकार,..माफ करा जरा उशीरच झाला,..आई ह्यांना काही चहापाणी केलंस का?आणि मॅडम पैंटिंग आणली का?बघू बरं कशी बनवली पेंटिंग?"
मी त्यांच्या ह्या प्रश्नावर डोळे त्यांच्या आईकडे तिरपे केले आणि डोळ्यांनीच खुणावले आईसमोर दाखवायची,..?ते जोरजोरात हसत म्हणाले,"अहो आई तर खुश होईल माझा मुलगा एखादया मुलीविषयी विचार करायला लागला म्हणून धन्य वाटेल तिला दाखवा तिच्यासमोर,.."त्यांच्या या वाक्याने मलाच गडबडल्यासारखं झालं,..मला काय तुमचीच आई म्हणून म्हंटल ,..असा भाव चेहऱ्यावर आणत मी पैंटिंग मोठ्या कापडी पिशवीतून काढलं मी ते पॅक करून आणलं नव्हतं,..ते त्याने स्वतःच्या डोळ्यासमोर धरलं आणि म्हणाला ,"वा माझ्या मनातले भाव अगदी बरोबर ओळखले तुम्ही,..आई हे बघ म्हणत त्याने पैंटिंग आईसमोर धरली,..काकु म्हणाल्या,"वा अरविंद कोणी तरी आवडलं म्हणायचं तुला आता जोडीदार म्हणून,.. अगदी तुला हवी तशीच आहे ना,..स्वतःच्या विश्वात रमणारी,..सुंदर,भावना व्यक्त करणारी,..पण अनु मलाही चित्रातली मुलगी अगदी तुझ्यासारखी दिसतेय ग,.."त्यांनी अस म्हणताच मला घामच फुटला आपण स्वतःला बजावत त्यात आपल्या भावना उतरू देत नव्हतो तरी चित्र तसंच झालं का,..?वेळ निभावून नेण्यासाठी मी म्हणाले,"माफ करा पण सर म्हणाले होते ना समज तू ती आहेस,..ते नकळत चित्रात कल्पना केली गेली,.."
डॉकटरच्या आईने जरा आवाज चढवला,..असं कसं म्हणतेस जे मनात ते चित्रात असं होत असतं,.. डॉकटर म्हणाले,"अग ती समोरची मुलगी हे पैंटिंग स्वीकारेल का,..?ती म्हणेल ना चित्रात तर दुसरीच मुलगी आहे ,तिलाच विचार जाऊन लग्न करशील का?"त्या डॉकटरने आणि आईने मला कोंडीतच पकडलं बाई,..
मंगलने गाडीच थांबवली रस्त्याच्या कडेला,..म्हणाली,"काय भारी जोडीदार ग तुझा,..जेवढा बुद्धिमान तेवढा चतुर,..मग नेमकं पुढं काय झालं,..अनु म्हणाली,"मंगे तुला पिक्चर बघताना जशी उत्सुकता लागते तशीच आताही लागली,..काही बदलली नाहीस,..गाडी चालव वेळेत पोहचायचं आहे, मी सांगते तुला पुढे काय ते,.."
मंगलने परत गाडी सुरू केली,..अनु परत साईड मिरर मध्ये मागे पळणाऱ्या झाडांकडे बघत बोलू परत मागच्या आठवणीत रमून बोलू लागली,..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all