तिची पाऊलवाट भाग २३

तिची पाऊलवाट
#तिचीपाऊलवाट भाग 23
©स्वप्ना...
सुरुवातीला चित्रकला सोपी वाटत असली तरी जसं त्या विषयाच शास्त्रोक्त अभ्यास सुरू झाला तस लक्षात आलं आपण समजतो तेवढा सोपा नाही हा विषय,..पण रस घेण्यासारखा आहे,..अवघड जायचा पण आंनद आणि आव्हान दोन्ही समोर ठेवयाचा हा अभ्यास,..रखाटनांपासून रंगांशी खेळण्यापर्यंत वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही,..आई आईच्या विश्वात दिवसभर दंग आणि मी माझ्या अभ्यासाच्या विश्वात रमलेली,..रात्री जेंव्हा दमून एकमेकांजवळ झोपायचो तेंव्हा आई कुशीत घ्यायची,कपाळावर आपले ओठ टेकवत म्हणायची,खुप मोठी हो,..तुला लागेल तो खर्च मी कष्ट करून पुरवेल,पण तू स्वतःला असं सिद्ध कर की पुढे आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेस,कोणाचा आधार नसला तरी,आपल्याला जस मध्ये लाचार होऊन जगावं लागलं तस जगणं आता आयुष्यात परत कधीही आपल्या वाट्याला येऊ द्यायचं नाही, म्हणूनच खुप मन लावून शिकायचं,.."
आई अस बोलायला लागली की मी तिला अजूनच बिलगायचे,..तिचा स्पर्श तिच्या मऊ साडीचा पदर तोंडावर घेऊन झोपायला मला फार आवडायच,..या संघर्षमय परिस्थितीने मी आणि आई खुप एकमेकावर खुप प्रेम करायचो,..ती थकायची पण दुसऱ्या दिवशी परत उत्साहाने कामाला लागायची,..मेसमध्ये उरलेलं अन्न फेकून देणं तिला आवडायचं नाही,..तस अन्न कधी उरलंच तर ती ते घेऊन बसस्टँड,स्टेशन वर जाऊन तिथल्या अनाथांना वाटायची,..तिच्यात ते समाजसेवेच बीज आधीपासून होतंच,.. कॉलेजच्या एखाद्या गरीब मुलाला पैसे देणं नाही जमलं तरी जेवणासाठी कोणाला अडवायची नाही,..आज ना उद्या देईल ग तो पैसे, पण कोणाला उपाशी नको ठेवायला असं वाटायचं तिला,..गोडसे मावशी अधून मधून तिला भेटायला यायची,..दोघी मग मस्त गप्पा मारायच्या,..खरंतर मावशी भेटण्याआधी आई खुप लाजरी,बुजरीच होती,..आणि गोडसे मावशी नवऱ्याच्या जाण्याने खचलेली,..दोघींनी एकमेकांच्या स्वभावाचा फायदा करून घेतला,..नवरा गेला तरी न खचता लेकरांसाठी जगायचं आईने तिला शिकवलं आणि ती तशी इतर बाबतीत बोल्ड होती,..तिने आईला समाजसेवा,इतर गप्पा,मोकळं बोलणं शिकवलं,..दोघींनी एकमेकांना उभं केलं एवढं नक्की,..
मंगल म्हणाली,"म्हणजे मावशी आजीचं घर सुटलं हे एका दृष्टीने चांगलंच झालं म्हणायचं,.."अनु म्हणाली,"हो कस आहे ना मंगल,कधी कधी वाईट घटनांमुळे आयुष्य बदलत पण ते योग्य आणि चांगल्या मार्गावर येतं त्यामुळे त्या वाईट घटनांचं काही वाटत नाही,..खरतर मला तो त्या अमेरिकेच्या मुलाचा प्रसंग पचवायला किती जड गेला होता,.. किती घाबरले ,भेदरले होते मी,..झोपेतही मला वाटायचं आपल्या ड्रेसच्या हुकला कोणी हात लावतय का,..दचकून उठायचे मी तेंव्हा तुझ्या आजीने मला किती समजावलं होतं,.. झाला प्रसंग डोक्यातून काढून टाका,..नेहमी असंच होत असत अस नाही,..गोडसे मावशीने खुप समजावलं होत,..पण काळ ह्याच अश्या गोष्टींवर औषध असतो,..काही दिवस वाटली अशी धसकी, पण हळूहळू कमी होत गेला डोक्यातून तो विषय,..चित्रकलेने तर निसर्ग हा कसा सौन्दर्याचा खजिना आहे हे शिकवलं त्यात मानवी देह आणि विशेष करून स्त्री देहही किती सुंदर आहे ह्याची जाणीव करून दिली,..अग मोठे मोठे आर्टिस्ट नग्न मॉडेल बसवून रेखाटन करतात,..रंग,रेषा ह्यामध्ये तो देह सुंदर दाखवण्याचं त्यांचं कसब असतं,.. ते चित्र पूर्ण करताना त्यांना त्या देहावर पडलेला छाया प्रकाशाचा खेळ खुणावत असतो,..तो देह हा स्त्री,पुरुष आहे का त्या मागच्या वासना कधीच हरवून ते फक्त रंगांच्या दुनियेत हरवलेले असतात,..मग माझी देहाची भीती कमी झाली,..देहाच काय ग?आत्म्याला जपता यायला हवं हे लक्षात आलं,.."
मंगल म्हणाली,"अनु किती मोठया गप्पा मारते ग,..खरंच प्रवास कलाकारासोबत सुरू आहे ह्याची जाणीव झाली अगदी,.."मंगलच्या या वाक्यावर अनु हसली,"तू काय कमी कलाकार आहेस का ग,..तुझी भाषा फक्त स्वरांची आहे आणि माझी रंग रेषांची,."
मंगल म्हणाली,"पण ह्या प्रवासात हे डॉकटर कुठे भेटले ते काही समजलं नाही ग,.."
अनु म्हणाली,"तो तर निव्वळ योगा योग समज जसं हे चित्रकलेच शिक्षण माझ्या आयुष्यात योगायोगाने आलं तसंच त्या चित्रामुळे डॉकटर माझ्या आयुष्यात आले,..त्याच झालं असं की आमच्या कॉलेजच्या वार्षिक प्रदर्शनात एका लेडी डॉकटरला माझे पैंटिंग आवडले आणि तिने मला तिच्या नव्या हॉस्पिटलसाठी पैंटिंग बनविण्याची मागणी केली,..काम तसं जोखमीच होतं कारण तिला,फुलं, पान,निसर्ग अश्या कुठल्याही आशयाचे पैंटिंग नको होते,.. त्यांना हवं होतं,.. तिथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बरं होणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावरच समाधान,..डॉकटर आणि पेशंटमधलं विश्वासाचं नातं,.. फक्त हात विश्वास देणारे,..अश्या खुप वेगवेगळ्या आशयाची चित्र त्यांना हवी होती,..मला अभ्यास करून ती चित्र करावी लागली,..मी खरोखर त्यांच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते सगळं अनुभव घेऊन मग पैंटिंग बनवत होते.
सगळे पैंटिंग तयार झाले आणि हॉस्पिटलमध्ये उदघाटनाच्या अदल्यादिवशी लावण्यात आले,..ज्या दिवशी उदघाटन होतं त्यादिवशी मी जाऊ शकले नाही पण नंतर मला डॉकटर मॅडमने आवर्जून बोलवून घेतलं,..माझी पहिली खुप मोठी कमाई माझ्या हातात पडली,.त्यांनी ठरवलं त्यापेक्षा जास्त पैसे माझ्या हातात ठेवले होते मला आश्चर्य वाटलं तर म्हणाल्या,"आमचे एक मित्र आहेत त्यांना हे पैंटिंग फार आवडले त्यांनी खास बक्षीस म्हणून तुला हे द्यायला सांगितले आहेत,..ते बक्षिसाचे
पैसे वेगळ्या पाकिटात होते,..घरी आल्यावर मी जेव्हा ते पाकीट उघडलं त्यात एक चिठ्ठी होती,..मनातल्या भावना योग्य पद्धतीने रंग,रेषातून उतरवणाऱ्या चित्रकाराला मनस्वी शुभेच्छा.. माझ्या मनाला त्या कौतुकाने उभारीच मिळाली,..काही दिवसांनी परत त्या डॉकटर मॅडमचा फोन आला आणखी काही हॉस्पिटलमध्ये पैंटिंग करून हव्या होत्या,..माझी डिग्री पूर्ण होण्याआधीच मला कामं मिळाली,.. आईची आणि माझी आर्थिक स्थिती दोघींच्या कष्टामुळे सुधारायला लागली,..आजीला नियमित पैसे पाठवता येऊ लागले,.. आईचा आत्मविश्वास अगदी वाढला होता,..आई आता बचतगट चालवू लागली तिने अनेक बायकांना स्वयंरोजगार मिळवून दिला,..तिला अनेक मैत्रिणी झाल्या,..एकलकोंड्या, रडक्या,भित्र्या आईचं व्यक्तिमत्त्व एकदम बदलून गेले,..ती वेगळ्याच आत्मविश्वासाने वावरू लागली,..गावाकडे आजोबा वारले तेंव्हा आईने आणि मी आजीला आमच्या सोबत राहण्याचा खुप आग्रह धरला पण आजीने ऐकलं नाही,..मी आणि आईने मिळून छोटस घर देखील घेतलं,.. आईने आता खाणावळ बंद केली होती,..त्या घरातच आता ती अनाथ बायकांना स्वयंरोजगार देत होती,..शिवणकाम,गोधड्या शिवणे,विणकाम तिने स्वतःतले कौशल्य नव्याने शोधून या बायकांना ते शिकवले,..ती त्यातच रमायला लागली,..माझा वेळ तर पैंटिंग पूर्ण करण्यात जात होता,..एक दिवस त्या डॉकटर मॅडमचा फोन आला,..त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलवलं होतं,.. मी तिथे गेले तेंव्हा मॅडमच्या केबिनमध्ये एक तरुण बसलेला होता,.मॅडमने ओळख करून दिली,.."हे डॉकटर जोशी,..तुला मागे मी एक स्पेशल पाकीट दिलं होतं,..हे कॅन्सर तज्ञ आहेत,..ह्यांना काही पैंटिंग करून हव्या आहेत,.."
मॅडम बोलत होत्या तेवढ्यात त्यांना तातडीचा कॉल आला आणि त्यांना जावं लागलं,..केबिनमध्ये मी आणि डॉक्टर जोशीच होतो,..त्यांनी बोलायला सुरुवात केली,..मला एक पैंटिंग बनवून हवं आहे,..ज्यातून माझ्या भावना मला दाखवता येतील,..मी त्यांच बोलणं ऐकत होते आणि माझ्या डोक्यात कॅन्सर म्हणजे जीवघेणा आजार त्याच्या वेदना आणि त्यातून बरं होणाऱ्या भावना दाखवणं तस अवघड हा विचार माझ्या डोक्यात चालू असताना डॉक्टर जोशी मला म्हणाले.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all