तिची पाऊलवाट भाग २१

तिची पाऊलवाट

तिचीपाऊलवाट भाग 21

©स्वप्ना..

         मंगलने पाणी पिल आणि म्हणाली,.."डोळ्यात साठलेलं पाणी आज खुप दिवसांनी मोकळं झालं अनु,..बरं झालं तू अशी थोडी निवांत आलीस,पण खरंच अनु स्त्रियांना चाळीशी नंतरच पहिल्या मैत्रिणी खुप आठवतात,..त्या जुन्या मैत्रिणींसोबत आयुष्यातला मुख्य काळ गेलेला असतो,..तो सगळा बोलून कधीतरी असं रीत व्हावं वाटतं,.. वर्षातून एकदा तरी अशी भेट असावीच नाही का?"

        अनु म्हणाली,"खरं आहे तुझं,काय होत ना मंगल पंचविशी पर्यंत लग्न होऊन त्यांनंतरची जी वीस एक वर्षे असतात ती अक्षरशः स्त्रीच्या आयुष्यात धावती असतात,.?ती त्या पंधरा ते वीस वर्षांत प्रत्येक भूमिकेला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते,..अर्थात समाजाच्या दृष्टीने ते आवश्यकच असतं कारण तिचं समर्पण,तिचा त्याग हाच कुटुंब आणि समाज घडवू शकतो,..ती जरा जरी तिच्या भूमिकांवरून हलली ना तर काहीतरी वेगळं होतं,..मुलं तरी बिघडतात, भांडण तरी होतात,.. खरंतर तिने हे समर्पण करणं हा अन्याय च आहे तिच्यावर पण आता जर स्त्री आणि पुरुष दोघांनी असे हात वर केले तर त्या कुटुंबाची वाताहात लवकर होते,..तिला करावाच लागतो त्याग बऱ्याच गोष्टींचा,..पण एका ठराविक वयानंतर तिला हे सगळं बोलून दाखवावं वाटतं, कोणीतरी समजून घ्यावं वाटतं,.. पण नेमकं त्यावेळी पिल्लं उडण्याच्या तयारीत असतात त्यांना मोठं आकाश खुणावत असतं,.. जोडीदार असतो तसा सोबत पण त्यांचा सहवास एकमेकांना कसा वाटतो ह्यावर त्यांची एकमेकांशी भूमिका असते,..अश्यावेळी जुन्या मैत्रिणी जास्त आठवतात ग,..ते अल्लड वय,ते जगलेले सोनेरी क्षण आठवलं तरी ताजतवान करतात,..म्हणून आज आपण भेटल्यावर तुला छान वाटतंय."

        मंगल म्हणाली,"ते काहीही असो पण खरंच छान वाटलं हे महत्वाच,...बरं अनु मी तर तुला बोलले माझं सगळं कसं झालं आता तुझी कथा सांग ना मलाही उत्सुकता आहे ग,की तुम्हाला मावशी आजीच्या सुनेने अपमान करून काढलं मग तुम्ही त्या पलीकडच्या शिंदेच्या वाड्यात गेलात,..तुझं बारावी म्हणून आई शहर सोडणार नव्हती ना,..आणि मग अचानकच तुम्ही निघून गेलात पण तू ही आज एवढी मोठी चित्रकार झाली,..तुझा तर सगळा ट्रॅक बदलला,..नेमकं काय घडलं,..आणि चक्क डॉकटर नवरा कसा आला ग आयुष्यात,..?"

              अनुने चहाची टपरी बघून गाडी थांबवली,..आपण चहा घेऊ आणि मग बोलू मंगल अस म्हणत दोघी गाडीतून उतरल्या,..अनुने चहावाल्याला विचारलं,"दादा उंबरगाव इथून किती दूर आहे,.."चहावाला म्हणाला ,"ताई नेहमीच्या रस्त्याने तर अर्धाच तास आहे पण आता ह्या नेहमीच्या रस्त्याला काम चालू आहे म्हणून तिकडन वळसा घेऊन जावं लागत उंबरगावला पण जरा लांब पडतो तो रस्ता आणखी दोन तास लागतील,.."अनु म्हणाली आणखी दोन तास ?पण तिथून पुढं रस्ते नीट आहेत ना,..चहावाला म्हणाला," सरळ उत्तरेकडे जाणार असाल तर एकदम लोण्यावाणी रस्ते हाय,.."अनु त्यांच्या वाक्यावर हसली आणि म्हणाली आणि पूर्वेकडे जायचं तर?तो म्हणाला,"निव्वळ बैलगाडीवाणी चालल तुमची गाडी तिकडच्या गावात जायचं तर,.."मंगल आणि अनु दोघी हसल्या,...

       टपरी जवळच्या रंजणातलं गार पाणी अनुने तोंडावर मारलं तो रांजण बघून तिला मावशी आजीकडचा रांजण आठवला खूपदा तो खोल गेला की उंची पुरायची नाही मग त्यावर रेलून आत कंम्बरे एवढं वाकायचं आणि त्या पाण्यात स्वतःला बघून हसायचं त्या आपल्याच प्रतिमेला बोटाने खेळायचं हे आठवून अनु मनाशीच हसली..,..पलीकडे शेत असल्याने वाऱ्यावर पिकं मस्त डोलत होती,..मोठ्या टायरचा झोका मोठ्या वडाला बांधला होता,..मंगल त्यावर जाऊन बसली,..अनुने बाजूला असलेली गवत फुलं तोडुन स्वतःच्या आणि मंगलच्या डोक्यात खोचली,..गरम चहा मातीच्या मटक्यातून दिल्याने दोघी खुप खुश झाल्या,..चहा घेऊन गाडीत बसताना अनु हसत चहावाल्याला हसत म्हणाली,"मला उंबरगाव नंतर लोण्यातण जायचं आहे बर का?"त्यालाही हसू आलं,..मंगल म्हणाली,"आपणही किती वेगवेगळे शब्द बोलायचो,..हळूहळू जगणं,राहणीमान सुधारत गेलं आणि मग भाषाही नाही का अनु,..अनु म्हणाली,"हो ग स्त्रीच आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलत म्हणजे मुळात अगदी खाण्यापिण्याच्या सवयी पासून तिला स्वतःला बदलूनच घ्यावं लागतं,..भाजीच्या पद्धती,पोळी लाटण्याची पद्धत,अगदी उठण्याच्या वेळा, कपडे सगळं सगळं बदलत,लेकरं झाल्यावर आणखी बदल होतात,.."

         मंगल म्हणाली,"तुझे हे बदल ऐकायचे आहेत मला,आता आपण चहा पिऊन मस्त टवटवीत झालोय ना आता तुझी कथा ऐकव गाडी मी चालवते,..अरे वा मॅडम चालवा मग तुम्ही म्हणत अनुने चावी मंगलला दिली,..मंगल हसत म्हणाली,"अनुडे तुला आपला सायकल शिकण्याचा किस्सा आठवतो ना,..मंगलने एवढं विचारतच अनु एकदम हसायला लागली म्हणाली,.."कसल्या वेड्या होतो आपण,..त्या सायकलच्या नादात दोनदा क्लास बुडवला होता आपण,..आणि पहिल्याच वेळी एकमेकांवर धडा धड आपटून गुढगे काय भारी फोडून घेतले होते,..आणि आजी रागवेल म्हणून दोघींच्या घरी सांगता आलं नव्हतं,..गुढग्यावरचा फ्रॉक खाली ओढू ओढू गुढघा लपवत क्लासमध्ये बसलो होतो आपण,..आणि रुपया तास ह्या बोलीवर आणली होती आपण सायकल,..मंगल म्हणाली,"तू उंच होतीस म्हणून तुला तरी तोल सांभाळता यायचा पण मी आपली बुटुक बैंगन चारदा पडायचे,..पण आपण जिद्दी होतो,..शिकलोच सायकल.."

           अनु म्हणाली,"तेच तर वैशिष्ट्य असतं ग बाईमध्ये तिने ठरवलं तर ती ते करतेच,..आज स्त्री वैमानिक,रेल्वे ड्रायव्हर होते ते काय उगाच नाही,..पण आपल्यात होतीच जिद्द म्हणून तर आज आपण आपली चारचाकी घेऊन हिंडतोय,..कदाचित सोबत राहिलो असतो तर आयुष्य आणखी वेगळं घडलं असत,..तुला आठवत ना आपल्याला मोठी संगीत अकादमी काढायची होती,..आपण गाणं शिकायचो तेंव्हा घरून काही बोलणे,मार खाऊन आलो असलो तरी विसरून जायचो,मग वाटायचं अरे काय जादू आहे या संगीतात,..आपण कुठेतरी वाचलं,ऐकलं होतं संगीत एकून झाडांच्या फळं, फुलांमध्ये खुप वाढ होते,..गायी ,म्हशी खुप दूध देतात,..माणसाच मन आंनदी राहतं,.. हे सगळं ऐकून आपण एकदा म्हंटलो होतो,..आपण दोघी खुप संगीत शिकू आणि खुप विद्यार्थी घडवू,..मोठी संगीताचीच शाळा काढू अस वाटायचं आपल्याला,.. पण मंगल नियतीने काही वेगळच लिहून ठेवलं होतं,.. मला आणि आईलाही वाटलं होतं आता मावशीआजीकडेच आपला कायमचा मुक्काम असेल,..पण घटना काही वेगळ्याच घडत गेल्या,..मावशीआजीचे मिस्टर इतके आजारी असताना आजीचमध्ये देवाघरी निघून गेली,.."

          मंगल म्हणाली,"हो ते आठवत ना मला,आम्ही आलो होतो तेंव्हा तुमच्याघरी, तेंव्हा जमलेले सगळेच लोक म्हणत होते,"जाण्याची परिस्थिती तर माणसाची होती,पण चालत्या फिरत्या आजीच गेल्या,..आजी गेल्यावर मला आणि आईला जास्तच पोरकं वाटायला लागलं त्या घरात कारण मावशीआजी सुनेला चोरून लपून जीव लावायची आम्हाला,..पण दाखवताना अस दाखवायची की आमचा वापर करून घेते,..ती गेल्यावर सुनेच्या हातात सत्ता आली,..

                    सुनेने मावशीआजीची आजोबांची जबाबदारी आईवर टाकली ती म्हणाली,"हे बघ त्यांना आता झोपेची गोळी दिली आहे त्यामुळे ते आता उठत नाहीत पण सकाळी उठले की चहा ,पाणी,दात घासून देणं हे वेळेत कर त्यांचं शी,सु करायला तो आपला रामागडी येईलच,..आई घाबरली किती झालं तरी स्त्रीला परपुरुषाला स्पर्श करायला नको वाटतो,..आणि आजोबा शांत,संयमी नव्हते,चिडके आणि सतत ओरडणारे,आईला वाटलं आपला तर काहीच निभाव लागणार नाही त्यांच्यापुढे,.. 

क्रमशः

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all