तिची पाऊलवाट भाग २०

तिची पाऊलवाट

#तिचीपाऊलवाट भाग 20

©स्वप्ना...

         एका छत्रीतून ते घरापर्यंत जाणं अगदी आयुष्यभर छान आठवत राहतं,.. कधी रुसवा फुगवा झाला की रवी म्हणतो,..

    "प्यार हुआ इकरार हुआ है प्यारसे फिर क्यू डरता है दिलं.."त्यादिवशी रवी छत्रीत हेच गाणं गुणगुणत होता ना,..घरी आल्याबरोबर काकूंनी आम्हाला दोघांना पहिल्यांदा एकत्र औक्षण केलं,..घरात येताच त्याच्या बहिणीने अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या,..खुप सुंदर स्वागत केलं,..अनु खरंच ते दिवस आजी गेल्याच्या दुःखाचे असले तरी तेवढेच सुखाचे होते,..म्हणजे मन एकाच वेळी ऊन सावली,आंनद दुःख अनुभवत होतं,.. रवीच्या बहिणीच्या आधी आमचं लग्न करण्याचं ठरलं आणि घरात एकच लगबग सुरू झाली,..ह्यांना खुप नातेवाईक होते,..लग्न पंधरा दिवसात करायचं ठरलं आणि भराभर सगळे नातेवाईक गोळा झाले,..

          तेंव्हा मी पहिल्यांदा इतकी माणसं इतक्या जवळून अनुभवत होते अनु,..आजीसोबत राहून एकटी आजी,..थोडीफार तू आणि जिथे काम करायचे तिथले दोनचार डोके,गुरुजी,काकु,रवीची बहीण, एवढेच माणसं माझ्या आयुष्यात आलेले,..आता मात्र रविच घर गच्च भरलं काकू,मामा, मावशी ,आत्या सगळे नातेवाईक दोन्ही कडचे गुरुजींचे,काकूंचे इतकी माणसं एकत्र सांभाळणं खुप अवघड होतं पण माझ्या सासुबाईंच ते कसब वाखाणण्याजोग होतं,.. प्रत्येकाशी प्रेमाने,आदराने बोलत होत्या त्यामुळे कोणी दुखावत नव्हतं आणि भांडतही नव्हतं,..खरंच बायकांना असं जमायला हवं म्हणजे लग्नकार्यात वाद होणार नाहीत ,..अनु म्हणाली,"खरंय नाहीतर लग्न कार्य म्हंटल की बाई चिडते,रडते रुसते आणि सगळ्यांच्या आंनदी क्षणांवर पाणी फिरवते,.."मंगल म्हणाली,"हो पण हल्ली नाही राहील आता असं आता स्त्रियांनाही लक्षात आलंय क्षणाचा सोहळा करायचा,..काही स्त्रिया आहेत अपवाद पण, स्त्री बदलत चालली आहे .

               अनु म्हणाली,"बदलतातच अस नाही स्वभावाची जी घडण तश्या स्त्रिया वागतात काही हट्टी, काही रागीट,काही प्रेमळ,भित्र्या,....मंगल म्हणाली हो,"आमच्या त्या व्हरडातच होती एक गुरुजींची मावस बहिण,..खुप रागीट, तापट, स्पष्ट बोलून मन दुखवणारी प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणारी,..काकूंही जरा बिचकून होत्या तिला,.. तिने आल्यादिवशीच नवरी इथे का?म्हणत गोंधळ घातला,..गुरुजींनी सांगितलं तिला कोणी नातेवाईक नाहीत,..आपणच लग्न करून घेणार,..हे ऐकून तर ती जास्तच बिथरली,.. अरे असं कसं,रवी काय रस्त्यावर पडलाय का?कशाला अशी अनाथ ब्याद गळ्यात बांधायची,..तिला दुजोरा द्यायला काकुंकडची एक मामी होतीच,.. बायकांनी कुजबुज करून घर डोक्यावर घेतलं,.. इतकं की मला सारख्या डिवचायला लागल्या,..माझ्या डोळ्याचं पाणी थांबेना,..माझा चेहराच पडला,.. गुरुजींनी हे ओळखलं आणि एक दिवस दोघींना समोर घेत म्हणाले,"मी बघतोय तुम्ही माझ्या सुनेला घालून पाडून बोलताय तुम्हाला जर आमच्या या सोहळ्याचा त्रास होत असेल तर दरवाजे उघडे आहेत पण आमच्या आनंदात विरजण नका घालू.. खरतर स्त्रीने स्त्रीला जाणलं पाहिजे पण इथे तर तुम्हाला वाटतंय तिला अनाथ म्हणून वाऱ्यावर सोडून द्यावं,.. का उद्या तुमच्यावर ही वेळ आली आणि कोणी आसरा नाही दिला तर कसं वाटेल,..?"सासऱ्यांच्या ह्या बोलण्यानंतर त्या दोघींनी घरात पुढे ही चिडचिड केली नाही आणि मग मलाही कोणी वाईट बोललं नाही,.. रवी आणि त्याची बहिण लग्नाची खरेदी खूप आनंदात करत होते, प्रत्येक गोष्ट घेताना आजीची खूप आठवण यायची, शालू घेताना तर आजी जास्त प्रकर्षाने जाणवली, आठवली तिला गुलबक्षी रंग खूप आवडायचा मला म्हणायची लग्नात तुला गुलबक्षी रंगाचा शालूच घेऊ बरका,.. मीदेखील मग तिच्या आठवणीत गुलबक्षी रंगाचाच शालू घेतला. लग्न सहा दिवसांवर आल होत,माझी सगळी हौस पुरवली जात होती,तशी मी कशाचाही हट्ट करणार नव्हतेच कारण आपण परिस्थितीने इतके शहाणे झालो होतो की हे मिळतंय हेच खुप ही भावना होती,..रवीची आई मात्र मला वारंवार म्हणायची,मंगल मन मारू नकोस,तुझ्या नशिबाने आपण संपन्न आहोत,तुला जे आवडेल ते घे,किमती कडे बघू नकोस,..पण मी सगळं आजी असती तर आपण कश्या किमतीच सगळं घेतलं असतं तसच निवडल,..मंगळसूत्र तर अगदी साधं निवडलं तेंव्हा रवी म्हणाला," अग लखलखीत सोन्याच घे ना,.."मी हसून म्हणाले,.."सोन्यासरखं माणूस आयुष्यात आलं आता सोनं काही आवश्यक नाही,.."सासूबाईंनी ह्या वाक्यावर अगदी मिठीच मारली मला,..सगळं दृष्ट लागावं इतकं सुंदर झालं ग आयुष्य,.. लग्नदेखील दणक्यात झालं,..ते सुरुवातीचे मोरपंखी दिवस,ते हळवे क्षण सगळं सगळं उपभोगायला मिळलं, मी कधी त्यांची होऊन गेले माझं मलाच कळलं नाही,..आणि हळुवार चाहूल लागली कैऱ्या,चिंचा खाण्याची,..ते सुरुवातीचे त्रास सगळं सासूबाईंनी आईसारखी माया करत सांभाळलं,त्यामुळे ते अवघड क्षणही सोपे वाटत गेले,..आपल्या आयुष्याला कधी दुःखाची किनार होती हे विसरून देखील गेले होते मी,..दणक्यात ओटीभरण झालं,..मला आवडणारी गर्भरेशीम हिरवीगार साडी रवीने मला घेतली होती,...माझ्या प्रत्येक शब्दाला रवी झेलत होता,..सासुबाई म्हणायच्या,.."बाईची आई होणं सोपं नसतं, पुनर्जन्म असतो ग बाईचा,.."

        त्याक्षणी मला वाटायचं आपल्याला आई हवी होती,..तिने माहेरी नेलं असतं, आपले लाड पुरवले असते,..आपल्या मागेमागेच ती फिरली असती,..कुठलंही दुखणं तिला सहज सांगता आलं असतं त्याक्षणी आई नसल्याचं दुःख मात्र मला फार जाणवत होतं.खरंतर सासुबाई माझी काळजी घेत होत्या पण आई,आजी ह्यांची आठवण मला येतच होती.

रवीच्या बहिणीचं त्यात लग्न ठरलं त्यामुळे सासुबाईंची कसरत होत होती,माझे दिवस भरत आले होते,..मी तर अगदी हवेतच होते,..कोणी पाठीशी नसताना आज मला सगळी सुख मिळत होती,.. आणि मला जमिनीवर आणण्याचं काम माझ्या बाळाने केलं,..अनु माझं बाळ पोटातच शेवटच्या क्षणी गेलं ग,..ह्या वर्षभरात जेवढा आंनद मी आयुष्यात उपभोगला त्याच्या कितीतरी पट दुःख परत माझ्याकडे आलं,.. त्याक्षणी मला ते दुःख पचवणं जड झालं,..मी हरवून गेलं,मी सतत कोशात असायचे,..मला अन्न पाणी गोड लागेना,.. सगळ्या घरावरच दुःखाची कळा पसरली,..मला परत प्रकर्षाने जाणीव झाली,सुख हे चिरकाल टिकणार नसतं,.. पण मनुष्य ते सहज स्वीकारू शकत नाही,..मी इतकी तुटले ह्या प्रसंगाने की मला वाटायचं जगातली सगळ्यात दुःखी मीच,.. खरंतर मी या आधी किती दुःख भोगलं होत,

.आईबापाच्या मृत्यूचं, आजीच्या जाण्याचं,.. तरी ह्या दुःखाला इतकं हळवं व्हावं,..मला सगळे क्षण आठवायचे,गर्भारपणात बागेत लावलेली रोपं,.. तो झोपळा खास रवीने बागेत टांगून घेतलेला,..घरातल्या त्या काही जागा जिथे बसून मी ,सासुबाई आणि रवीच्या बहिणीने बाळा साठीच्या गप्पा मारल्या होत्या,..

        रवीने मग ह्यावर उपाय म्हणून बदली करून घेतली,..आम्ही ह्या गावात आलो,..गुरुजींना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा त्यांनीही घर सोडण्याची तयारी दाखवली,..रवीच्या बहिणीचं लग्न इकडे आल्यावरच केलं,..हळूहळू ह्या वास्तुचं बांधकाम करायचं ठरलं आणि मी मग रमत गेले,ते दुःख विसरून पुन्हा ह्या नव्या आयुष्यात ,..घर अगदी तुला हवं तसं करायचं हे सासुबाई,सासरे सगळ्यांनी सांगितलं,..माझ्या स्वप्नातली वस्तू उभी राहायला लागली आणि परत संसार वेलीवर फुलं उमलले,..ह्यावेळी आईपणाने धोका दिला नाही,..बाळ एकदम छान होते ,दोन्ही वेळेस,..ह्या सगळ्यात हळूहळू आयुष्य पुढं सरकत गेलं,..माझा रियाज सासऱ्यांनी करून घेतला आणि मला गायिका बनवलंच सुरांसोबत मी रमत गेलं घडत गेले, वर्ज्य सुरांनी गाणं सुंदर बनत हे माहीतच होत ना,... 

क्रमशः

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all