तिची पाऊलवाट भाग १९

तिची पाऊलवाट

#तिचीपाऊलवाट भाग 19

©स्वप्ना..        

         संगीताने परत माझ्या आयुष्यात पालवी फुटली,परत रियाज सुरू झाला,.. आजी आयुष्यातून वर्ज्य झाली होती,तरीसुद्धा रागांमध्ये जसा एखादा सूर वर्ज्य असला तरी कितीतरी गाणी सुंदर तयार असतात तसंच आयुष्य आहे हे आता समजलं होतं आजी वर्ज्य हे मानून आता आयुष्याचं नवीन गाणं मी रचत होते.

         पहाटेच आमचा रियाज सुरू व्हायचा,..रवीच्या बहिणीत आणि माझ्यात घट्ट मैत्री झाली होती,..अनु आपण दोघी जसं नवीन राग शिकलो की,प्रत्येक ठिकाणी तिच चीज म्हणत फिरायचो अगदी तसच आमच्या दोघींचं सुरू होतं,.. सुरांना छेडताना चढाओढ लागायची त्यात गुरुजी अगदी अवघड आलाप,ताना करून घ्यायचे,..रवीची बहीणही आता लग्नाची झाली होती, घरात ठिकाणं यायला सुरुवात झाली होती,..

                       मला मात्र आजी गेल्यापासून लग्न या विषयावर कोणी छेडलं नव्हतं,पण हल्ली रवीशी फोनवर बोलणं सुरू झालं होतं,..मनाला आता हुरहूर लागायची त्याचा फोन आला नाही तर,..काकु पण आवर्जून रवीचा फोन आला की मला कॅडलेसवर जोडून द्यायच्या मग बागेत बसून त्याच्याशी मस्त गप्पा होत होत्या,..कविराज तर खूप खुश होते,..प्रत्येक वेळी फोनवर नवीन कविता तयार असायची,..मी किती नशीबवान हे प्रत्यकवेळी तो म्हणायचा,.. मी विचार करायचे हा कसला नशीबवान ह्याला आपण नाही म्हंटलो असतो तर हजारो मुली मिळतील पण आपल्याला, खरंतर आपलंच नशीब चांगलं हे सगळे आयुष्यात आले,..मी आता खुप आंनदी असायचे, मला आता गुरुजींनी फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं,..आजीची चिंता मिटली होती,..मलाही ही माणसं मिळली होती आणि त्यातही वेड्यासारखा प्रेम करणारा रवी होता,..मन अगदी फुलून आलेलं होतं मग गाणंही तसच उमलायला लागलं,.. सूर आता ताकदीने लागायचे,हरकती,जागा गुरुजी सांगतील तश्याच यायच्या,..रवीची बहिणही तोडीस तोड होती त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण असायचं,..

          एकदा रवीच्या बहिणीला ठिकाण आलं आणि त्यातल्या एकाने माझी ओळख विचारली,..गुरुजी आणि काकूंना धड सुनबाई म्हणता येईना आणि धड लेक म्हणता येईना,..उद्या चालून लोक म्हणतील लेक होती तर सून कशी केली,..कसाबसा प्रसंग निभावला आणि रवीला तातडीने बोलवून घेतलं,.

          त्यादिवशी रवी येणार होता,..मला त्यादिवशी खुप आंनद वाटत होता, कारण ज्याच्यामुळे मला हे सुंदर आयुष्य मिळालं आज त्याला तब्बल दीड वर्षाने मी भेटणार होते,..मी मनात ठरवत होते त्याच्याशी मी कशी बोलेल,.. त्याच्या त्या कवितेला माझी चाल लावून झाली होती,त्याला ती कविता म्हणतच भेटावं का,..?छे काहीच सुचत नव्हतं,..कपडे तसे फारसे छान नव्हते आपल्याकडे,..काकु घेऊन देणार होत्या पण आपणच नाही म्हणालो,आता आणखी उपकार नको,रहायला घर आणि दोन वेळा जेवण हिच खुप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी पण आज मला रवीच्या आवडत्या रंगाची मोरपंखी साडीच घालावी वाटत होती,मी ती काकूंना मागितली,..त्यावेळी काकु एकदम भारी हसल्या आणि त्यांनी लगेच ती साडी मला दिली,..मी तयार झाले घरात देखील रवीच्या स्वागताची काकूने आणि त्याच्या बहिणीने जय्यत तयारी केली होती,..फुलांचा गालिचा, औक्षणच ताट, दारात सुरेख रांगोळी,.. दोघीही मस्त तयार झाल्या होत्या,.गुरुजींनी सुंदर सूर आळवणं सूरु केलं होतं,.. अगदी माझ्या मनातल्या भावनांची ते गाणं होतं.

      "देखो सखी साजन अयो,मन मोरा तो उड उड जायो.."

हे गाणं ते आळवत होते,..मी साडी सावरत होते,निसर्गाने रूप पूर्ण बदललं होतं,.. मघाशी असलेला उकाडा हरवून गेला होता,..

          आभाळ तसंच रवीच्या सोबत पहिल्या भेटीला झालं होतं तसच गच्च भरून आलं होत. सगळीकडे धूसर अंधार पसरला, मातीचा सुगंध घेऊन वारा नुसता सैरावैरा इकडे तिकडे पळत होतो,..तेवढ्यात फोनची रिंग वाजली रवी चा फोन होता,. रवीने आईला सांगितलं,"आई मंगलला छत्री घेऊन चहाच्या टपरीजवळ पाठव,..सासुबाई हसत म्हणाल्या ,"जा बाई मंगल कविराज आले बरं का तुमच्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी,..

               "त्यांच्या या बोलण्यावर लाजत, मी छत्री घेऊन निघाले,मला अगदी फुलपाखरासारखं उडावं वाटत होतं,मागच्या भेटीपेक्षा ही भेट हक्काची होती,..दीड वर्षाचा कालावधी लोटला गेला होता एकमेकांना बघून आजही रवी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिल का या कल्पनेने माझ्या आत तरंग उठत होते,..सारखं सारखं मोरपीस फिरल्याचा भास मला होत होता,..टपटप टपोरे थेंब सुरू झाले मी हातातली छत्री उघडलीच नाही तेंव्हा जशी भिजत पळाले तशीच त्या टपरिकडे पळाले,.. माझा पाय निसटलाच थोडा तोल गेला पण समोर सावरायला रवी उभाच होता,..त्याने हात पुढे केला माझ्या डोळ्यात खोलवर बघत मी हसले,..साडी सावरत कशीबशी सावरले,..टपरीवर मावशी उभ्याच होत्या,..तेंव्हापेक्षा बदल वाटला, हम्म कपाळी कुंकू नव्हतं,..पोरकं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं होतं बहुतेक,..आमची जोडी बघत त्यांनी ओवीच सुरू केली,..

       "साथ मिळावी रे अशी

          जशी जन्मचीही नाती,..

         काही येवो सुख दुःख

         हात सुटावा ना कधी,..

         अशी असावी रे जोडी,..

         रघु पोपटाची,.."

    मी लाजले, रवी मात्र म्हणाला,"हो हो मावशी अशीच आहे आता ही जोडी,सुखदुःखात साथ सोडणार नाही,..फक्त प्रेम देणार एकमेकांना,.. राहा राहा असेच राहा बरं म्हणत मावशीने हाताने दृष्ट काढली आणि कपाळावर बोट कडकड मोडली,..रवी म्हणाला,"मावशी प्रेमाचा चहा पाजणार ना,..?"मावशी म्हणाल्या,"हो आता बनवते."मी निशब्द होऊन रविकडे बघत होते ,सगळं स्वप्नवत वाटत होतं मला,..हा देखणा,राजबिंडा,हुशार,वैभवसम्पन्न नवरा आपला,..आजीचा विठ्ठल आणि नवस तेंव्हा उगाच मनात आठवून गेला,..पूर्वजांची पुण्याई यालाच म्हणत असतील कदाचित असंही मनात वाटून गेलं,..रवीने हळूच विचारलं,"मॅडम एकदम साडीत आल्या आम्हाला भेटायला,.."मी हसून म्हंटल तुझा आवडता रंग,तुझ्या एकदोन कवितेत ऐकला मग वाटलं करावं खुश कविराजाना,.."रवी म्हणाला,"असे नाही कविराज खुश होणार एखादी कविता म्हणून दाखव चाल लावून तरच आम्ही खुश,.."

            अनु मी त्यादिवशी ह्या तयारीत होतेच मला त्याची एक कविता गाणं बनून कधीच रुंजी घालत होती मनात,..मग मी लगेच सुरू केली.

    "मोरपंखी स्वप्न माझे

       सत्य होऊन उतरले,..

        ये अशी स्वप्नात माझ्या

        जणू चांदणे हे पसरले.."

तो ऐकत होता.आता मी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं,त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते,.. तो म्हणाला ,"मंगल हे सुंदर क्षण तुझ्यामुळे आहेत आयुष्यात.."तेवढ्यात मावशी म्हणाल्या,"आता हा सुंदर प्रेमाचा चहा घ्या मग."आम्ही चहा घेतला,..मावशी म्हणाल्या,"असंच निरपेक्ष प्रेम करत राहा एकमेकांवर,..आयुष्याच्या शेवटी दोघच असतात एकमेकांचे,..तेंव्हा हे निरपेक्षपणे केलेलं प्रेमच कामी येत बरं का,.."मावशीने खरंच तिच्या नवऱ्याला कसं सांभाळलं पण त्यांचंही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं म्हणूनच,..मावशी म्हणाली रवीला,"बाईला पैसाअडका नसला तर चालतो पण दोन शब्द गोड असले तर ती जन्मभर साथ निभावून नेते,.. माझ्या ह्या लेकीला नीट सांभाळ बरं का,..?माझ्या ह्या चहाच्या टपरित तुमचं प्रेम एकमेकांना भेटलं ह्या मावशीचे खुप आशीर्वाद आहेत पोरांनो तुम्हाला म्हणत मावशीने दोन गजरे अगदी आजी करायची तसेच माझ्या केसात माळले,.. त्याक्षणी ती परकी असुन मला खुप आपलीशी वाटली,..तिचा आशीर्वाद घेऊन मी आणि रवी एका छत्रीत निघालो,..मध्येच रवी माझ्या डोळ्यात खोलवर पाहात होता,..आम्ही निशब्द होतो,..एका नवीन आयुष्याला आजपासून सुरुवात झाली होती,..माझ्या मनात तेच गाणं रुंजी घालत होतं.

"देखो सखी साजन आयो,....

क्रमशः

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all