तिची पाऊलवाट भाग १६

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 16
©स्वप्ना..
मातीचा घमघमणारा सुगंध येऊ लागला आणि मला मनात शंका आलीच,हा पाऊस नक्कीच जवळपास कुठेतरी पडायला लागलाय आणि तो आता आपला पाठलाग नक्की करणार,..पावलांचा वेग आणखी वाढला,वाऱ्याचा वाढलाच होता,..आणि टपकन टपोरा थेंब गालावर पडला,मी वर बघितलं तर असे अनेक मोती आकाशातून एकमेकांशी स्पर्धा करत वेगाने खाली यायला लागले,..माझ्या चेहऱ्यावर त्यातले बरेच फुटले आणि बरेच खालच्या मातीकडे झेपावले,..उन्हाने भाजलेली ती माती,गटागटा ते पाणी पिऊ लागली आणि त्यातून एक मनाला आंनद देणारा सुगंध पसरू लागला जणू अत्तर सांडलं त्या टपोऱ्या मोत्यांमधून,..मी आता चालणं सोडून पळायला लागले,..पण त्याचा वेग जास्त होता,..तो रिमझिम न पडता रपरप पडत होता,..मी पटकन एक बंद दुकान होतं त्याच्या छताखाली बारीक होऊन उभी राहिले, पाऊस तिरपा असल्याने काहीसा मला लागतच होता,.. मी ओढणीने माझे हात झाकू पाहत होते,. वाऱ्यामध्ये गारठा असल्याने मला थंडी देखील वाजायला लागली होती,आता अंधार जास्तच दाटून आला होता..आपण खरच फसलो आजीच ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं मनाला वाटून गेलं. पण घरा पासुन बरीच पुढे मी नेमकी अडकले होते, इथून मागे ही जाता येईना आणि पुढेही जाता येईना. पाऊस मात्र वेगात सुरु होता आणि तेवढ्यात माझ्यासमोर एक मोटरसायकल येऊन थांबली.त्यावर असलेली व्यक्ती हेल्मेट काढत होती आता ती इथेच ह्या आडोश्यात थांबणार हे मी ओळखलं आणि मला जरा रागच आला,काहीशी भीती देखील वाटली,..पण ती भीती जास्त टिकली नाही रस्त्याच्या पलीकडे असलेली चहाची टपरी एवढावेळ मला दिसली नव्हती,आता ह्या माणसासोबत इथं एकटं उभं राहायचं तर कोणी सोबती आहे का म्हणून जेंव्हा मी नजर फिरवली तेंव्हा मला ती टपरी आणि तिथे स्टोव्ह जवळ एक बाईच दिसली,..अनु खरंच मला तेंव्हा हायसं वाटलं,किती गम्मत असते ना स्त्रीमनाची,..एखादी परपुरुषाची सोबत म्हंटल की मन घाबरत पण परस्त्री सोबतीला खरंतर मला दुरून सोबतीला होती ती तरी जरा बर वाटलं,.."अनु हसत म्हणाली,"तश्या आपण फार भित्र्या होतो ग,..आजकाल जसा बोल्डपणा मुलींमध्ये आहे तितक्या आपण बोल्ड नव्हतो ना,..कदाचित तेंव्हा स्त्री संरक्षण कायदे फार कडक नव्हते,.."मंगल म्हणाली,"अनु तसे आताही कायदे कडक असले तरी स्त्री सुरक्षितच असंही म्हणता येत नाही ग,ती उपभोग्य वस्तू आहे हे समजण जेंव्हा समाज बंद करेल तेंव्हा तिच्यावर होणारे अत्याचार थांबतील एवढे मात्र खरे."अनु म्हणाली,"बरं ते नंतर बोलू रोमँटिक मोडवर तुझी कथा आली आहे,पुढे काय ते तर सांग,..कोण होता हेल्मेट मध्ये हिरो,..?"मंगल हसत म्हणाली,"माझ्या आताच्या आयुष्याचाच हिरो होता तो,गाडीवरून उतरून थांबलेला,पण मी त्याच्याकडे पाहिलं नव्हतं त्यामुळे मला आधी लक्षात आलं नाही,..पण जेंव्हा तो म्हणाला,"आज सुरांचा आणि पावसाच्या तालाचा पाऊस इथेच आहे वाटतं,.."त्याने असं म्हणताच मी वळून पाहिलं,..रवीच होता,..आताही माझ्या डोळ्यात खोलवर बघत होता,..मला शहरल्यासारखं झालं,..खरंतर पावसामुळे मी ओली झालेच होते,ओढणीने स्वतःला झाकत होते, काहीशी लाजले देखील त्याक्षणी,..तो मात्र मस्त हसत होता माझ्या फजितीवर,..काय ग छत्री घेऊन निघायचंस ना?त्याच्या या वाक्यावर मी फक्त हं एवढंच केलं,..
त्याला लक्षात आलं मी जरा जास्तच अबोला दाखवते आहे,..तो म्हणाला,"रोज तर शिकवणी झाली की माझ्या ताईशी, आईशी छान गप्पा मारता येतात तुला,मग माझ्याशी का अगदी मुकी असल्यासारखी वागतेस?मला खुप बोलायचं आहे ग तुझ्याशी,..तू अगदी माझ्या कवितेत असते तशीच आहेस,तुझं गाणं, तुझी जगण्याची जिद्द मला खुप प्रेरणा देतं,.. आई जर आमच्यावर कधी रागावली की बऱ्याचवेळा तुझं उदाहरण देते आम्हाला,.."ती गजरेवाल्या आजीची नात बघा,कमवून आजीला सांभाळते आणि संगीताचं वेडही जपते एक दिवस फार मोठी कलाकार होईल ती,.."आई असं म्हंटली की मला खुप अभिमान वाटतो तुझा आणि तू मला आणखी आवडू लागतेस,..कारण माझ्या कवितेच्या कल्पनेतली स्त्री अशीच तुझ्यासारखी नाजूक तरी चिवट,सुंदर तरी कणखर,लाजाळू तरी बेधडक आयुष्याला भिडणारी,..खरंच ताकद असते ग स्त्रीमध्ये."बोलता बोलता तो एकदम थांबला,..आणि जरा चिडला काय ग तुला फक्त गाणं म्हणता येत का?बोलता नाही येत?
एवढ्यावेळ गप्प बसलेली मी त्याला हसत म्हणाले,"मला खुप थंडी वाजत आहे,..माझे दात वाजत आहेत त्यामुळे मला बोलणं नाही जमत ए."तो म्हणाला चल समोर चहा घेऊ मस्त गरमागरम,.. मी म्हणाले ,"पण पाऊस."तो म्हणाला,"तसही त्याने भिजवलच आहे आपल्याला,..त्याच्या प्रेमात नाही का?"एवढं बोलून खट्याळपणे परत खोडकर नजरेने त्याने माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं,..पाण्यात दगड टाकला की कसे हलके तरंग निर्माण होतात ना अगदी तसं झालं मला त्याक्षणी,..
मी त्याच्या पाठोपाठ पळाले चहाच्या टपरीकडे,. एके ठिकाणी जरासा पाय निसटला म्हणून,\" आई ग\" असं ओरडताच त्याने पटकन हात पुढे केला, मीसुद्धा आधारासाठी माझा हात त्याच्या हातात दिला..अनु त्याक्षणी तो स्पर्श खूप काही वेगळेच सांगून जाणारा वाटला, वेड वय,.. वेडा निसर्ग ,..मनाला हुरहूर लावणारा होता. मी त्याच्या हाताच्या स्पर्शाने शहारले,.. चटकन त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवून त्या चहाच्या टपरीत गेले,.. त्या मावशी मघापासून तसही आमच्याकडे बघत होत्या,..खरंतर मघाशी मला त्या मावशीचा आधार वाटला होता,..पण आता का कोणास ठाऊक मला तिची अडचण वाटायला लागली होती,.. रवीचे डोळे,त्याची खट्याळ नजर, उगाचच मनाला हुरहूर लावत होती. मी परत परत चोरून रविच्या चेहऱ्याकडे पाहत होते,.. खरंच खुपच देखणा होता तो,.. पावसात त्याचे केस थोडे ओले झाल्यामुळे तो अधिकच छान दिसत होता,.. त्याने त्या मावशींना दोन चहा बनवायला सांगितले आणि तू माझ्याशी बोलू लागला,"मंगल तू इतकं सुंदर गातेस तुला कवितेला चाल लावणं सहज सोपं होतं असेल ना,..अग,माझी एक छान कविता आहे,..त्याला चाल लावायला मदत कर ना,मला ती कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये सादर करायची आहे ग,.."मी काही बोलायच्या आता तो सुरू झाला,..कविता अशी आहे..
"ना बोलता जे समजते.
ना व्यक्त होता उमलते,..
नाते कसे माझे तुझे,..
सखे सांग मजला ते,..
दे अर्थ जगण्याचे नवे
दे पंख उडण्या मज नवे
नाते कसे माझे तुझे....
कवितेत मी गुंग झाले होते,नव्हे जगत होते मी ती कविता कारण रवी परत माझ्या डोळ्यात खोलवर बघत त्या कवितेतल्या सखीला शोधत,व्याकुळ होऊन ती कविता माझ्यासमोर म्हणत होता,..तेवढ्यात मावशींनी मध्येच,"हा घ्या कविराज प्रेमाचा चहा,.. तुमच्या प्रेमकवितेला,."म्हणत दोन काचेचे ग्लास समोर धरले,..मला तर रागच आला त्या मावशीचा पण नंतर कळलं ह्याच्या ओळखीची होती मावशी,..बऱ्याचदा मित्रांना घेऊन हा इथे काव्यवाचन आणि चहापान करतो,..मावशी नुसती चहा देऊन थांबली नाही म्हणाली,"रोजच्या दुनियदारीच्या कवितेपेक्षा ही आजची प्रेम कविता आवडली बरं का मला,.."रवी त्यांच्या वाक्यावर खळखळून हसला,..मला तर इतका राग आला होता त्या मावशीचा,..मावशी गेल्यावर रवी म्हणाला,"ही मावशी फार हुशार आहे बरं,.. सुंदर ओव्या स्वतः रचते आणि म्हणते,..तुला ऐकायची का त्यांची ओवी,.. थांब त्यांना सांगतो मी,..माझी परवानगी हो असं गृहीत धरून त्याने मावशींना हाक मारली.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all