तिची पाऊलवाट भाग १५

तिची पाऊलवाट
#तिचीपाऊलवाट भाग 15
©स्वप्ना..
        काकु असं म्हणताच,.. मी म्हणाले,"काकु मी आत जाऊन बघू का हार,..काकु म्हणाल्या जा पण लगेच बाहेर ये,..आतमध्ये संगीत शिक्षण चालू आहे,..हो म्हणत मी संधी मिळल्यासारखी आत पळाले गणपतीचा फोटो कमी उंचीवर होता म्हणून तिथे नमस्कार करून उगाच हार खालीवर करून बघितला,..त्यांचं शिकवण सुरू होतं,.. त्याच ओळीवर अजून ते अडलेले होते तिला ते स्वर लागतच नव्हते,..मी एकदम खुदकन हसले आणि नेमकी गुरुजींची म्हणजे आताच्या माझ्या सासऱ्यांची माझी नजरा नजर झाली,..माझं असं हसण त्यांच्या लक्ष्यात आलं आणि ते रागावले,.."ए पोरी इकडे ये ग,..हसते काय अशी ?संगीत काय असतं माहीत तरी आहे का?तेवढ्यात घाबरून काकु आत आल्या,.."अहो रागावू नका तिला, ती हार बघायला आत आली,..चल ग बाहेर असं म्हणत काकूंनी माझा हात धरला. तसे गुरुजी म्हणाले,"थांबा,तिला संगीतावर हसता येतं जरा तिचा सूर बघू द्या आम्हाला,..चल बैस ग इथे,आता ही रचना म्हण हिच्यासोबत म्हणजे तुला कळेल आपण किती चुकीच्या वेळी हसलो,..
      मंगल अनुला म्हणाली,"खरंतर मला कळत होतं की हसून मी मोठी चूक केली होती,. पण तिचा स्वर इतका विचित्र लागला होता की मला हसूच आलं,.."अनु म्हणाली,"काय भारी आहे ग तुझी स्टोरी,..मग काय केलं तू."अग ऐक ना खरी मजा पुढे घडली,..मी मघापासून तो तराणा ऐकत होते मग काय मला लगेच तो गळ्यात बसला.. गुरुजींनी आधी दोनदा तिला त्या ओळी म्हणायला लावल्या आणि मग माझ्याकडे वळाले, म्हणाले,"म्हणा ताई आता तुम्ही,..मी नेहमी प्रमाणे आपल्याला जसं गाण्याच्या क्लासमध्ये शिकवलं तसंच केलं,..सगळ्या वाद्यांना आणि गुरुजींना नमस्कार केला,..खरंतर आर्थिक परिस्थितीने माझा क्लास सुटला असला तरी गळ्यातल गाणं रुसल नव्हतं,..मी डोळे मिटले आणि तराणा सुरू केला,.. 
         "तना तनाना देरे ना,तदारे दानी..
           तनात दारे दानी दानीत दानी,
           नादिर दिरदा रे दानी तदारे तारे दानी,
             नादिर दिरदिर तुम दिरदिर दिरदिर दिरदिर,
                        असा सुंदर तराणा होता ग मी तर भान हरपले होते,..
सोबत पेटी,तबला सुंदर साथ होती,..खुप दिवसांनी असं गायला मिळालं ह्याचा मनापासून आंनद झाला होता मला,..आपण क्लासमध्ये नाही का नवीन चीज शिकवली की कश्या वेड्या होऊन गायचो अगदी तसंच झालं मला."
            तराणा संपला मी डोळे उघडले,..गुरुजींनी टाळ्या वाजवल्या,..क्या बात है बेटा,.. बहोत खूब,..कुठे शिकलीस,..मी नम्रपणे म्हणाले,"संगीत काही वर्षे अग्निहोत्री सरांनी शिकवलं पण आता नाही जात शिकवणीत,..हा तराणा तुम्हीच शिकवला गुरुजी,.." गुरुजी आश्चर्याने म्हणाले ,"मी कधी शिकवला,..?फक्त एकदा सांगितला बेटा,." तेवढ्यात रवी हॉलमध्ये आला आणि म्हणाला,"बाबा अहो तुम्हीच शिकवलं आहे तिला, गेटमध्ये तासभर तुमचा तराणा ऐकून रस्ता रोको करत उभ्या होत्या ह्या मॅडम,..रवीने तेंव्हा खट्याळपणे माझ्याकडे बघितलं तेंव्हा ती नजर उगाच आवडली मला,..पण स्वतःला लगेच सूचना दिली मी,..उगाच प्रेमात नाही पडायचं आपल्याला त्याच्या डोळ्यात बघून कारण आपली झोपडी आणि हे कुठेच जुळणार नाही,..मी स्वतःला सावरून बसले,..गुरुजी म्हणाले,"तू रियाजाला येऊ शकतेस,..तुला जर गाणं मनापासून शिकण्याची ईच्छा असेल तरच,..वेळेच्या बाबतीत मी अगदी शिस्तीचा आहे,..आणि काही खाण्यापिण्याची बंधन तुला पाळावे लागतील,..तेल तूप जरा कमी कर जेवणात,..मी उदास होऊन म्हणाले,"गुरुजी तूप डोळ्याला दिसत नाही,..आणि तेल फोडणीला मिळालं तरी खुप."
       गुरुजींनी आश्चर्याने काकूंकडे आणि माझ्याकडे बघितलं,..तश्या काकु म्हणाल्या,"ही त्या फुलवाल्या आजीची नात,..लोकांचे भांडे घासून गाणं शिकणारी,.."गुरुजी म्हणाले,"गळ्यात ताकद आहे तुझ्या,..मेहनत घेतलीस तर लक्ष्मी चालत येईल तुझ्याकडे,.. फक्त रियाज चुकायला नको."मी म्हणाले,"मी आजीशी बोलून कळवते,..आजी हो म्हणाली तर नक्की येते उद्या,.."काकु आणि गुरुजींना नमस्कार करून मी निघाले घरी आले तर तो तराणा ओठावर होताच,..आजी म्हणाली,"काय म्हणाल्या काकु,..हार,गजऱ्याचे पैसे दिले का लगेच?मी म्हणाले,"आजी मी तर विसरूनच गेले ते घ्यायचे,..आणि आता या पुढे नकोच घ्यायला त्यांच्याकडून आपण पैसे कारण अग फार मोठी गम्मत झाली,गुरुजी नेमकं एका मुलीला गाणं शिकवत होते,..आजी लगेच म्हणाली,"निळसर डोळे आणि कुरळे केस असलेले होती का ती मुलगी,..?हो आजी त्यावर आजी लगेच म्हणाली,"अग ती मुलगी आहे त्यांची,.."मला आश्चर्य वाटलं कारण ते किती कडक भाषेत रागवत होते तिला,.. उद्या जर तराणा जमला नाही तर क्लास बंद इतकही रोखठोक बोलले होते तेज..आणि ते ही आपल्या मुलीला,..कमाल आहे मी आजीला म्हणाले..आजी म्हणाली,"अग फार कडक शिस्तीचा माणूस आहे तो,..आणि नेमकं मुलाच्या गळ्यात संगीत नाही त्याचा ओढाही दुसरीकडेच आहे,..पण ही पोरगी गाते छान म्हणून ते तिच्यावर काम करत आहे,...उद्या मोठी गायिक बनवायचं आहे तिला,..मंगल तुला त्यांची शिस्त पाळावी लागेल,..त्यांची फिस,..आजीने फिसचं नाव काढताच मंगल म्हणाली,"ते फिस घेणार नाही आपल्याकडून,..म्हणून तर म्हणते आता या पुढे गजऱ्याचे पैसे आपण घ्यायला नको त्यांच्याकडून,..फक्त आजी मला वेळेत काम आटोपून तिथे पोहचावं लागेल,..आजी म्हणाली ,"करशील तू बरोबर,आवड असली की सवड मिळतेच तू कामाला लवकर बाहेर पडत जा,.."
      अनु मला खरंच ओढ लागली मग गुरुजींच्या शिकवण्याची,..बारीक बारीक गोष्टी,गाण्यातल्या हरकती,बारीक जागा घ्यायला गुरुजी शिकवायला लागले,.. सुरांचा आंनद आणि तालाच पाऊस मनाला उभारी देऊ लागला,..आजी हार,गजरे करून ठेवायची ते घेऊन मी धूम पळायचे गाणं शिकायला,..काकु खुश वेळेत हार मिळतात म्हणून,..अधून मधून रवीची नजरा नजर होत होती,..पण मी ती टाळत होते,मनाला कितीही वाटलं तरी फार मोठी दरी होती ना आमच्यात ती कशी मिरवणारा,..?"
       अनु म्हणाली,"मिटली ना बाई दरी ती कशी ते तर सांग,नेमकं कधी झालं मग इशारो इशारो मे ..?"मंगल म्हणाली,"ती तर फार मोठी गम्मत आहे बाई,..एक दिवस मला क्लासमध्ये पोहचायला उशीर होत होता,..काळे कुट्ट ढग आकाशात सैरभैर होऊन फिरत होते,..अधून मधून एखादी वीजही निसर्गाचा फोटो काढून गडप होत होती,..थंडगार वार सुटलं होतं,.. दुपारचे चार वाजत असले तरी सात वाजता जसं धूसर होतं, तस अंधारून आलं होतं,आजी म्हणाली,"जाऊच नकोस आज गुरुजीकडे,..माझा उग जीव लागणार नाही तू परत येईस्तोवर,.."मी एकदम चिडलेच आजीवर म्हणाले,"आजी आता पावसाळा सुरूच झालाय, हे असं निसर्गाचं रूप तर आता रोजच होणार ना ग,मग मी किती दिवस माझं गाणं दूर ठेवू,.. आजी मला थांबवू नकोस,आधीच उशीर झालाय जाऊ दे म्हणत मी छत्री न घेताच घाईत बाहेर पडले,..वारं खरंच भनाण झालं होतं,..ओढणी तर जागेवर थांबायला तयार नव्हती, केस तर नुसते भुरूभुरू उडत होते,..माझे पावलं मला झपाझप शिकवणीकडे खेचत होते,..काल सुरू केलेली बंदिश गुरुजी आज पूर्ण शिकवणार होते,..ती बंदिश मनात रुंजी घालत होती,..
        ""सावरीया हो तुम मेरो,सावरीया हो तुम मेरो,
           मुरली बजावत मोह लियो रे,..सावरीया,हो तुम मेरो."
  एकीकडे ही बंदिश ओठावर होती,आणि मनात मात्र आज हा पाऊस मला पोहचू देतो की नाही ही भीती..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all