तिची पाऊलवाट.. भाग १४

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 14
©स्वप्ना...
आजी म्हणाली,"ही सेवा तर घडायलाच हवी,..एवढे वर्ष अविरतपणे त्यांच्या देवीला हार ,गजरे देते मी ह्या सेवेतून माझ्या मनाचे काही नवस बोललीये मी,..तेंव्हा त्यात खंड पडलेला मला आवडणार नाही,..मंगे तू या म्हातारीसाठी जा बरं,.."
एवढ्या वर्षात पहिल्यांदा आजीचं काम म्हणून मी त्या कॉलनीत गेले,..अगदी लहानपणी जात होते पण कळायला लागल्यापासून त्या दहा बारा वर्षात नव्हते गेले कधी,..घर तस मला पुसट आठवत होत,..आजीनेही तिच्या पद्धतीने खुणा सांगितल्या होत्या,..झुंबराच्या झाडाखालचा बंगला,..पिवळेजर्द झुंबर आहेत,लाईट लावल्यासारखे,..मी कॉलनीत शिरले आणि समोर बहव्याचं झाड दिसलं मला,..गेटपर्यंत गेल्यावर मला हाक मारावी की नाही ह्या विचाराने तिथेच थांबवलं कारण बंगल्यातून सुंदर सुरांचा पाऊस पडत होता,..मन अगदी तृप्त झालं त्या सुरांना ऐकून,..शास्त्रीय संगीतातला तराणा हा प्रकार कोणी कोणाला तरी शिकवत होत,.. एवढंच मला कळलं,..शिकवणारा आवाज पुरुषी होता आणि शिकणारा स्त्रीचा होता,.. सोबतीला पेटी,तबला दोन्ही वाजत होते,.. एका ओळीवर गाडं थांबलं होतं,.. काही केल्या ते सूर तिच्या पकडीत येत नव्हते,..मला मात्र ते सूर चांगले लक्षात आले आणि मी त्याक्षणी बंगल्याच्या बाहेर ती ओळ पेटीवर वाजली की म्हणत होते,..तबल्याची साथ जणू माझ्या सुरांसोबतच चालू होती,..मी इतकी गुंग झाले की त्या बंगल्यातला रवी माझ्या मागे येऊन मला "एक्स्क्यूज मी मॅडम म्हणत होता ."मी वाटेतच उभी राहून तो तराणा गात होते,..त्याला कसेही करून मध्ये जाता येईना,तेंव्हा त्याने हलकेच खांद्याला स्पर्श केला,..मी वळून बघताना माझा केसांचा लांब शेपटा खांद्यावरून झपकन मागे टाकला,..तो नेमका त्याच्या चेहऱ्यावर लागला,.. त्या शेपट्यावर असलेल्या मोगऱ्याच्या गंधाने रवीने दीर्घ श्वास घेत म्हंटल,.."वा मोगरा तर अगदी टवटवीत आहे,.."
मी तर रागावत म्हंटल,"एका मुलीला न विचारता स्पर्श कसा काय केला तुम्ही,..?"तो म्हणाला ,"अगदी खरं त्याबद्दल माफी मागतो पण ती मुलगी मला माझ्याच घरात जाऊ देत नसेल तर,..तिला हाका मारल्यावर जर तिला लक्षात येत नसेल,..म्हणजे मला तर वाटलं बहिरी आहे की काय,..?म्हणून तुमची संगीताची तंद्री मोडत हाताने सरकवण्याचा प्रयत्न केला,..म्हणजे तशी चूक माझी असली तरी तुमची तेवढीच आहे नाही का?मी मग जरा खजिल झाले,..माफ करा पण मलाही आत यायचं आहे ,काकूंशी काम आहे,..हो का चला मग असं म्हणत त्याने हातानेच खूण केली,कमरेत जरासा वाकत म्हणाला,"लेडीज फर्स्ट,.."मला हसूच आलं,..मी पटकन पळाले,..नेमक्या काकु अंगणातच होत्या माझ्या हातातली गजऱ्यांची ओळखीची पिशवी बघत म्हणाल्या,"अगबाई फुलवाल्या आजींची नात ना ग तू? मंगल ना तू ?किती मोठी झालीस ग,..ये बैस या झोपाळ्यावर,.."मी बसले त्या सुंदर सागवानी झोपाळ्यावर,..रवी उगाच बाजूने खोकलत घरात गेला,..काकु म्हणाल्या,.."अरे सर्दी,खोकला झाला का रे रवी,..?"त्यावर तो शहाणा म्हणतो कसा,"नाही ग आई,..लांब शिंगाची गाय उभी होती दारात,तिला हट करायला गेलो तर तिने शेपटी मारली ग तोंडावर त्या शेपटीचे केस नाकात गेले त्यामुळे शिंक आल्यासारखी वाटते,.."मी झोपाळ्यावर बसून रागानेच त्याच्याकडे बघितलं आणि तो लगेच डोळे मिचकावून निघून गेला,.."त्याच्या तसं करण्याने मला शहारल्यासारखच झालं,..दिसायला तसा देखणा,रुबाबदारच होता,..रोखून खोलवर डोळ्यात बघण्याची सवय त्याला तेंव्हाही होती,..इतकी सुंदर आमची पहिली भेट होती,.."
गाडीत पाणी आहे का ग अनु?मंगलने विचारलं,..अनु म्हणाली ,"आहे ना पण पटकन पी आणि पुढे सांग,..मला खुप दिवसांची तुझी मॅरेज स्टोरी ऐकायची आहे ग,..दरवेळी उडत उडत काही किस्से सांगितले,..आज किती वर्षांनी आपण अश्या मोकळ्या भूमिकेत आहोत ना मंगल,..माझे मुलं बाहेरच्या देशात गेले आहेत,..तुझा मुलगा आता शिक्षण पूर्ण करून येईल,..तश्या जबाबदाऱ्या आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत ना आपल्या,.."
मंगलने पाणी पिल आणि म्हणाली,"जबाबदाऱ्या कमी नाही होत ग अनु नकळत आपण मनाने स्थिर होत जातो,..जास्त ताण घेणं सोडतो आणि मग वाटतं जबाबदाऱ्या कमी झाल्या,.."अनु म्हणाली,"तू म्हणतेस तसही असेल कदाचित,..वयाचा एक धावपळीचा टप्पा आपण सोडला की मन थोडं अध्यात्मिक गोष्टींकडे वळतं,आणि तिथे सार सापडत,..ती एक शक्ती सगळं चालवत असते,आपण निमित्त पण आपल्याला वाटत असतं ग सगळं आपणच तर ओढतोय,..त्यामुळे त्या जबाबदाऱ्या जास्त वाटतात,.. त्याच्यावर हवाली करायला अध्यात्म शिकवत आणि मग आपल्याला वाटत जातं,.. आपण एकदम हलके म्हणजे जबाबदारीतुन सुटलोय,..पण खरंतर आपण भार त्या शक्तीवर सोपवायला शिकतो आणि हे घडतं.."
मंगल म्हणाली,"बरोबर आहेस तू म्हणतेस ते,माझ्या सासुबाई हेच तत्व ठेवून जगतात म्हणून दहा वर्षांपासून आजारी असलेला नवरा सांभाळत आहे तरी आंनदी आहेत,..पण त्या खरंच आधीपासून अश्याच आहेत ग,..त्यादिवशी मग मला झोपाळ्यावर बसवून त्या आत गेल्या पटकन माझ्यासाठी डिशभर चिवडा, बेसनाचालाडू घेऊन आल्या,..माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,"गुणी आहेस,जिद्दी आहेस,आजीची सेवा करतेस नक्कीच तुझं आयुष्यात खुप चांगलं होईल बाळा,..बस मी आता गरम चहा आणते तुला,..त्या आत गेल्या आणि मी सभोवती पहात राहिले,..घरातून सूर तर अजूनही येतच होते,..मी बसले तिथून हॉल दिसत होता पण हॉलचा काहीसा भागच दिसत होता,.. तिथेच मैफिल चालू होती हे लक्षात आलं माझ्या पण गात कोण होतं हे दिसत नव्हतं,..मी बंगल्यात बंगला सभोवती नजर टाकली बंगल्यात अतिशय सुंदर बाग होती,.. सर्व झाडांची कटिंग खूप छान पद्धतीने केलेली होती,.. वेगवेगळ्या प्रकारची फुले उमललेली होती. प्रत्येक झाडांसाठी कुंड्या अतिशय कोरीव आणि रेखीव होत्या अगदी एकसारख्या,.. ते सगळं बघून मला अजीची बाग आठवली,.. मोडक्या तोडक्या प्लास्टिकच्या जुन्या फेकलेल्या खोक्यांमध्ये,बाटल्यामध्ये, पिशव्यांमध्ये,डब्यांमध्ये आजी कशातही झाडं रुजवायची,.. पण ते झाड चांगलं करून, त्याची रोपे करून ती अनेकांना द्यायची,कितीतरी जण म्हणायचे ,"आजीच्या हाताने झाड रुजत ग बाई,.."
ही बाग खरंतर कितीतरी सुंदर होती,. या बंगल्याला साजेशी शोभेल अशी बाग होती,हिरवीगार,..मला ती खूप आवडली पण आजीने वाढवलेली बाग याहून सुंदर आहे हे मात्र मनात जाणवलं,.. आजी प्रत्येक रोपावर जीव लावायची,त्या रोपांना खत घालणं, त्यांची माती मोकळी करणं, त्यांना पाणी देणे ,त्यांच्याशी संवाद साधून त्यांना गोंजारण आजी हे आवर्जून करायची आणि मग ती झाड तशीच तिला जोमाने फुले द्यायची..
या बागेतही फुले खुप होती पण हे आपल्याच आजीकडून का गजरे घेतात ??हा प्रश्न मला पडला मी हा विचारच करत होते. तेवढ्यात काकू चहा घेऊन आल्या," मंगल काय विचार करतेस एवढा ?" मी म्हणाले," काकू एक प्रश्न विचारू तुमच्या घरी एवढी फुलं असताना तुम्ही आजी कडूनच गजरे का घेता ?काकू हसत म्हणाल्या," अग मंगल फुलं जरी आमच्याकडे असली तरी त्यांना गुंफायची सुंदर पद्धत फक्त तुझ्या आजीकडेच आहे ..आम्ही काय फुलांना सुया टोचतो,.. मग ती लगेच अर्धमेली होतात,..तुझी आजी मात्र मोठ्या हुशारीने त्या छोटयाशा फुलांच्या हिरव्यागार दांड्या गुंफून काढते,..सुईचा स्पर्शही होऊ देत नाही त्याला,..उलट स्वतःच्या मायेच्या स्पर्शाने ती फुलांची टवटवीत राहण्याची शक्ती वाढवते,..त्या हॉलमधला चतुर्थीचा हार बघ अजून किती छान आहे,..तीन दिवस झालेत त्याला घालून.
क्रमशः
©स्वप्ना मुळे (मायी)

🎭 Series Post

View all