©स्वप्ना..
अनु म्हणाली,"काकु मी आलेच हं दोन मिनिटात,.." एवढं बोलून ती कारकडे पळाली कार मधून तिने कॅनव्हास रंग ब्रश काढले आणि पळतच परत बागेतली आणि काकूंच्या हातात कॅनव्हास ब्रश रंग हे सगळे देत ती म्हणाली तुम्हाला घ्यायची आहे ना अनुभूती मग तुम्ही घ्यायच हे बघा हे छोटे-छोटे कॅनव्हास प्रेम केलेले आहेत हे रंग आणि ब्रश रोज एक कोपरा निवडा याबागे मधला,.. एखादा दवबिंदू घेऊन चमकणारं पान,..हिरवं गवत,लालचुटूक जास्वंद,..किंवा हिरव्या पानांच्या मध्येच उमललेलं शेडेड गुलाब कितीतरी पेंटिंग तुमच्या इथेच तयार होतील काकु."काकु नुसतं तिच्या बोलण्याकडे बघत होत्या,..मध्येच म्हणाल्या,"आता ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे का,..?"
अनु म्हणाली," का नाही काकु? काल रात्रीच्या मैफीलीत नाही तुम्ही आयुष्यातले काही काजवे आठवून डोळ्यातून असावे गाळली आता त्या सर्व असवांचे पुन्हा काजवे करण्यासाठी हे खास स्पेशल गिफ्ट आहे,.. तुम्ही नाही म्हणू नका हं प्लीज,..माझ्यासाठी तुम्ही हे सगळ ठेवा,.. सासूबाईनी तर अलगदपणे कॅनव्हस आणि रंगावरून हात फिरवला,..तेव्हा त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळाले,..अनुलाही त्यांच्याकडे बघून रडु आलं,.. तिने सगळं सामान बाजूच्या खुर्चीत ठेवलं आणि सासूबाईंना घट्ट मिठी मारली. खरंतर चित्रकलेच्या सामानावरून आता त्यांच्यात काहीही संवाद झाला नाही,.. झाली होती फक्त कलेची भेट,..या हृदयीचे त्या हृदयी ही अवस्था,.."
तेवढ्यात रेवानी हाक मारली,"आजी आणि मावशी चला ना गं घरात मामी वाट बघते."
तिच्या आवाजाने या दोघींनी आपले अश्रू पुसले,एकमेकांना छान हास्य देत सर्व सामान घेत दोघी घरात आल्या,.. मंगलने हॉल मध्ये सामान आणून ठेवलं होतं. रवी आणि सासरे फ्रेश होऊन सोफ्यावर बसले होते ,..सासऱ्यांच्या जवळ त्यांची आवडती हार्मोनियम होती त्यावर ते आपले वाकडे बोट फिरवत होते,.. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते,. आजी म्हणाल्या," आयुष्यभर सकाळी याच हार्मोनियमवर रियाज करायचे,.. हिच्या सुरांसोबत तल्लीन व्हायचे,..पण आयुष्यात आलेल्या पॅरेलिसीस मुळे सगळं गेलं,..तेव्हापासून सकाळी उठले की ही हार्मोनियम जवळ घेऊन बसतात आणि तिच्यावर बोटं फिरवून असे रडतात ग"
अनुला वाईट वाटलं,..कलाकाराचे आयुष्य कसं वेगळेच असत ना असं मनात म्हणत ती रूम मधून सामान आणायला गेली आणि तयार व्हायला गेली. जाताना मंगलला म्हणाली,° अर्ध्यातासात निघायला हवं,.."
दोघी तयार होऊन हॉलमध्ये आल्या तोपर्यंत गरम उकरपेंडी तयार केली होती..तो नाष्टा प्लेटमध्ये देण्याची पद्धत सुद्धा सासुबाईंची अतिशय सुंदर होती,.. भात वाढण्याच्या मुदाळ्यात ती घालण्यापूर्वी त्यात पांढराशुभ्र नारळाचा चव,हिरवीगार कोथिंबीर घालून मग उकरपेंडी दाबून भरली होती,.. त्यामुळे तो नाष्टा जास्त छान वाटला ,..रवीने प्रेमाने आधी वडिलांना खाऊ घातलं आणि मग स्वतः खाल्ल,..सगळ्यांचे नाष्टे झाले आणि ह्या दोघी निघाल्या," निघताना दोघींनी सासू सासऱ्यांना नमस्कार केला,.. आताही सासरे अनुला आपली मुलगी समजूनच बोलत होते,..अडखळत अस्पष्ट म्हणते म्हणत होते," रेवाला ईथेच ठेवणार काय? अग तिला तिकडे शंकर महाराजांकडे गाणं शिकव."
अनु देखिल म्हणाली,"हो नक्की विचारते त्यांना हिला गाणं शिकवाल का.?तुमची ओळख सांगते,.."त्यावर वाकडच हसत थोडं शून्यात जात म्हणाले,"विचार विचार माझा खास दोस्त आहे तो,..पण आता भेटायलाही येत नाही,..फार मोठा माणूस झालाय ना,.."अनु म्हणाली,"तो जरी मोठा माणूस असला तरी माझे बाबा काही कमी कलाकार नाही,..त्यामुळे बाबा हिच सगळं ठरेपर्यंत तुमच्याजवळ राहू द्या हिला,.."बाबा मानेनेच हो हो म्हणत होते,.. हे सगळं म्हणताना अनुचा गळा दाटून आला,..तिला एकदम रडूच आलं तिथे रेवा, आजी, मंगल सगळेच रडायला लागले,रवीने बहिणीच्या आठवणीने आपले डोळे पुसले,.."
रवीन सगळं सामान गाडीत टाकत असताना अनुला म्हणाला, "आमची बायको पळून घेऊन चाललीस आहेस तू लवकर आणून सोड बरं का आमच्या घराची रौनक आहे ती."
अनु म्हणाली ,"बघू आमचा विचार झाला तर सोडू नाही तर ठेवू आमच्या दरबारातील गायिका म्हणून.."
रेवाला हे ऐकून खुप हसू आलं ,अनुने तिला पटकन जवळ घेतलं,..अनुचे डोळे पाणावले. काकूंना नमस्कार केला .काकू म्हणाल्या, "खूप यश मिळवत राहा अशीच येत राहा ग भेटीला आता आमचे राहिलेच किती दिवस तू दिलेल्या कॅनव्हसवरच्या पेंटिंग्स बघायला तरी इथे ये ग नक्की.."
गाडी दिसेनाशी होईपर्यंत सगळे रस्त्यावर उभे होते. मंगलच्या मागे वळून बघण्या वरून अनुच्या लक्षात आलं.काही वेळाने मंगल शांतपणे सीटला टेकली,.. तिने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं,..अनुचं आधी लक्षच नव्हतं.. रोड कडे बघतच अनु म्हणाली,"मंगल जगजीतसिंग ऐकायचं की आपल्या लतादीदी लावायच्या.." हे म्हणताना अनुने मंगल कडे बघितलं तेव्हा तिचे डोळे बंद होते,..आणि अश्रु गालावर होते.अनुने गिअरवरचा हात काढून तिच्या हातावर ठेवत विचारलं काय झालं मंग्या काही त्रास होतोय का? मंगलने डोळे उघडले गालावरचे अश्रू पुसत ती म्हणाली," त्रास नाही ग, खूप वर्षांनी तू भेटली आणि जुने दिवस आठवले त्या जुन्या दिवसा सोबत मनाने तुलना केली आणि मन भरून आलं.. अनुडे मी केवढी नशीबवान आहे ना ?जिथे आईबाबा ,भाऊ ,बहीण कोणी कोणी नव्हतं आणि त्या मंगलला ईतकी सोन्यासारखी माणसं मिळाली,.. पैसा ,प्रसिद्धी सोडून दे ती तर आपल्या मेहनतीचा खेळ असतो. पण अशी माणसे मिळाली म्हणून मला आजही वाटतं.आजीचे आशीर्वाद कष्ट मला किती कामी आले ना,.. तुला आठवत ना आपल्या पलीकडच्या कॉलनीत रवीचं हे कुटुंब राहायचं. किती सुंदर होती ती कॉलनी,तिथली काही घर आजीच्या ओळखीची कारण वर्षानुवर्षे त्यांच्या देवघरातल्या देवीला आजीचेच हार,गजरे जायचे.सिझन कोणताही असला तरी हार,गजरे कधीच चुकले नाहीआजीकडून,.. मोगरा ,चमेली ,कुंद ,सायली कोणतेही फुल आजी जीवाचा आटापिटा करून त्या घराभोवती लावलेला जपायची त्यांची छटाई करणं,..खोडा जवळची माती मोकळी करणं,खत घालून व त्यांच्याशी जवळ जाऊन संवाद करणं ,यामुळे त्या वेली सतत बहरलेल्या होत्या. मग आजी ठरलेल्या या घरी हार,गजरे देतच होती .रवीच्या आईचा स्वभाव छान त्यामुळे अजीशी तिची जास्तच घासट होती. आजीच्या बोलण्यात अनेकदा माझा उल्लेख झाला होता.आपण माझ्या सासऱ्यांचं गाणं क्लासमध्ये कार्यक्रमात ऐकलं हेदेखील त्यांना सांगितलं होतं आजीने. मी चार घरचे भांडे घासून गाण्याचे वेड टिकवल आहे, हे देखील आजी त्यांना सांगायची.
एकदा आजीला ताप आला होता., तरी आजीने गजरे बनवून ठेवले आणि ते देण्यासाठी मात्र मला जा म्हणाली,. मी नाहीच म्हटलं होतं.कारण तुला आठवतं आपण त्या कॉलनीत जास्त जात नव्हतो, कारण श्रीमंत असणारी ते लोक आपल्याला आवडायचे नाहीत. आपल्या क्लास मध्ये दोन तीन मुली तिकडच्या कॉलनीतल्या किती शिष्ट होत्या,.. तुला पुढच्या शिक्षणाला जावे लागले आणि मी फार एकटी पडले होते. त्यात आजीने आजारपण काढलं होतं. आजीच्या दुखण्याला पैसे द्यायला लागले,..त्यामुळे गाण्याच्या क्लासची फी भरता येईना,क्लास सुटल्यातच जमा होता,.. मला सुद्धा आयुष्य नको वाटायचं पण आजीकडे बघून परत शांत व्हायचे आणि आयुष्याचे नकारात्मक विचार काढून टाकायचे. परत स्वतःला सावरत हिम्मत धरायचे,.. त्या दिवशी शुक्रवार होता म्हणून छान मोगऱ्याच्या कळ्या मध्ये गुलाबाच्या पाकळ्या गुंफून आजीने सुंदर हार आणि गजरे बनवले बरं नसून रडतपडत तिने ते पूर्ण केलेच ..मला म्हणाली,"आता हे तुलाच नेऊन द्यावे लागतील."मी चिडले म्हणाले,"एखाद्यावेळी घेऊ दे ना विकत त्यांना बाहेरून तुझ्याच हातचे कशाला?"त्यावर आजी म्हणाली.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा