तिची पाऊलवाट भाग १२

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 12
©स्वप्ना..
पक्ष्यांच्या किलबिलाटाने अनुला जाग आली,.. तिने मोबाईल वर बघितलं तर अजून वीस एक मिनिटे वेळ होता,..ती पटकन फ्रेश होऊन आली,..अग्निहोत्राची रिंग अजून वाजली नव्हती, तिने पडदा बाजूला केला,.. अग्निहोत्राची तयारी केली..सुंदर निसर्ग चित्र होतं खिडकीच्या चौकटीत दिसणारं,.. लाल तांबड आकाश,.. दूरवर धूसर दिसणारे दूरवर हरवलेले डोंगर त्याच्या अलीकडे दिसणारी खळखळ वाहणारी नदी,..नदीवर काही करकोचे एका पायावर उभे राहून साधना करत होते,.. काही पक्षी आकाशात इकडून तिकडे भरारी घेत होते. हे सगळ बघण्यात अनु दंग झाली,.. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली,..अनुने अग्निहोत्र पात्र प्रज्वलीत केलं,..खिडकीत बसून शांतपणे आहुती दिली..श्लोक म्हंटला,..
"सुर्याय स्वाहा सुर्याय इदम न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम.."
गौऱ्यांचा तो धूर श्वासात भरून घेतला,..तिला छान वाटलं,.. तेवढ्यात मंगलंने हाक मारली, झोप झाली का ?" अनु म्हणाली ,"मस्त झोप झाली ग सकाळीच डोळा उघडला आणि कालच्या प्रवासाचा थकवा देखील गेला,.. पण मंगल आता लवकर निघायला हव आपल्याला कारण ना इथून दोन तासांवर वसलेले डोंगराच्या कुशीतलं एक गाव आहे ना तिकडे जायचे आहे,..उंबरगाव तुला आठवते ना मावशी आजीची नात सोनी,.. तिला भेटायला जायचे आहे ,..काही सामानही द्यायचे प्लीज लवकर आवर आपण जितकं लवकर बाहेर पडू तितकं पुढे लवकर सरकता येईल ग,.."
मंगल म्हणाली,"मी तयार आहे,..तू रेडी हो आईंनी तुझ्यासाठी छान गरम उकरपेंढीचा बेत केलाय,.."अनु म्हणाली,"मंगल तुझ्या सासुबाई एकदम कमाल आहेत ग,..किती कौतुक आहे माझं तसं पाहिलं तर किती कमी भेटलोय आम्ही,..खरंतर आपण सुद्धा मी मावशी आजीचं घर सोडल्यापासून कदाचित एवढं निवांत तर आताच भेटतोय,.. लेकरांच्या पहिल्या वाढदिवसाला,..कधी तरी एखाद्या प्रसंगाला,..पण एवढं खरं फोन आणि मन दोन्ही सम्पर्क ठेवून आहे नाही का,..?"मंगल म्हणाली,"हो ना तुझी प्रगती पेपरमध्ये येणारे पैंटिंग आणि कधीतरी गप्पात मी आपण जगलेला इतिहास सांगते त्यामुळे तुझ्याविषयी फार वाटतं त्याना,..आणि खर सांगू त्या तुझ्यामध्ये स्वतःला पाहतात,..त्यांनाही चित्रकलेच वेड आहे ना ग,..नेहमी म्हणायच्या तिला बोलाव चार दिवस आपल्याकडे,.. मागे माझ्या नंदेच्या त्या मोठ्या कार्यक्रमात तू तिकीट काढून आली होतीस तेंव्हा पण खुप खुश होत्या,..आणि होत होतं तो पर्यंत तुझं प्रदर्शन बघायला उभ्या उभ्या का होईना येऊनच जायच्या,.."
काहीसं आठवून अनु म्हणाली,"मंगल अग त्या दोघांसाठी मी शॉल आणल्या होत्या ग,पण काही कारणास्तव मला त्या रस्त्यात द्याव्या लागल्या ग,..तुला आता प्रवासात सांगेल मी त्या वस्तू मी कोणाला आणि का दिल्या,..?पण ,आता काय देऊ मी त्यांना,..?"मंगल म्हणाली,"अग असू दे ग,..तू काही दिलं तरी वस्तूने बदलणार प्रेम नाही त्यांचं,..त्या तृप्त आहेत त्यांना कोणाकडून कशाची अपेक्षा नाही ग,.."अनु म्हणाली,"तस नाही ग पण खुप दिवसांनी भेटलो काहीतरी आठवणीत राहील असं द्यायला पाहिजे ना,..हं येस माझ्याकडे कोरा कॅनव्हस आणि रंग आहेत,..ते नक्की आवडतील ना त्यांना,..?" मंगल म्हणाली,"अनुडे तू कधीपासून वस्तुंना माणसासोबत जोडायला लागली ग?"अनु म्हणाली,"अग तस नाही पण कधी कधी ना मनातून कोणाला तरी काहीतरी द्यावं वाटतं तस आहे हे,..थांब मी आता गाडीतून रंग आणि कॅनव्हस काढून आणते परत गडबडीत विसरायला नको ना,.."एवढं बोलून अनु पाळली गाडीकडे,.."
सासुबाई खाली बागेतच होत्या,...सुंदर नक्षीकाम असलेली चांदीची परडी घेऊन त्यात फुलं तोडत होत्या,..हळूहळू गुणगुणत देखील होत्या,..
"माझ्या कृष्णाला तुळस,..गणेशाला हा कण्हेर,..
आला बघा किती छान,.. परिजातका बहर..
सोन्यासारखा हा चाफा कसा सुगंध वाटतो,..
मोगऱ्याला जाऊन बघा कसा गुलाब भेटतो,.."

अनुला गम्मतच वाटली,..हे गाणं म्हणत त्या झाडाजवळ जात होत्या,.. काही फुल तोडून त्या झाडावर हात फिरवत होत्या,..जस आपण एखाद्या लेकराच्या पाठीवरून फिरवतो,..हे बघताना अनुला मंगलची आजी आठवली,..ती अशीच गाणं म्हणत,वेलींना,झुडपानां अंजारत गोंजारत फुलं तोडायची पण तिच्या हातात परडी नव्हती असायची तिच्या फाटक्या पदराची ओटी (ओचा)...त्यात ती सगळी फुलं तोडायची,..अनुला वाटलं मंगलच हे वैभव बघायला आजी हवी होती,..खरंतर मंगलला हे सगळं वैभव उपभोगताना आजी किती आठवत असेल ना,..?असा विचारही अनुच्या मनात आला,..
बागेत खुप फुलं उमलली होती,त्यांचा गंध बागेत दरवळत होता आणि रंगांची तर एकमेकांशी स्पर्धाच सुरू होती,.. फुलांचे आकारही किती वेगवेगळे,..काही फुलं सुगंध देणारी नसली तरी त्यांच्या रूपाने ती सगळ्यांना आकर्षित करत होती,..निळ्यातला एकदम रॉयल शेड असणारा गोकर्ण,..शेडेड जास्वंद ह्यांना वाऱ्यावर डोलताना बघून वेगळीच मजा वाटत होती,..लॉनवर पाय ठेवताच तळव्यांना एकदम थंडगार वाटलं,..अनु लगेच म्हणाली,"किती छान हा स्पर्श गवताचा एकदम मऊ आणि थंड,.."
तिच्याकडे वळत सासुबाई म्हणाल्या," हो गं अगदी फ्रेश वाटतो या गवतावर चाललं की मी तर सकाळी इथेच असते.दवबिंदू पडतात ना या गवतावर त्यांचा स्पर्श पायांना सुखद वाटतो एकदम थंड आणि फुलं तर सगळी मरगळ खेचून त्यांचा टवटवीतपणा कधी आपल्यामध्ये पेरतात तेच कळत नाही,.. खरंतर निसर्गच आपल्या जगण्याला प्रेरणा देत असतो नाही का?"
अनुला हे सगळं काही ठाऊक नव्हतं का पण त्यांच्या तोंडून ऐकताना तिला खूप छान वाटत होतं. कारण एक अनुभवी स्त्री हे सगळं बोलत असते,..वेगळ्याच विश्वासांन ती हे तत्वज्ञान सांगत असते,..तिला आत्ता या क्षणी वाटत होतं इथेच बागेत कॅनव्हस लावावा आणि फुलांच्या मध्ये असलेली ती स्त्री जी अनुभवाने, ज्ञानाने ,सुखाने आणि दुःखाने समृद्ध झाली आहे आणि तरीही त्या फुलासारखा तिचा चेहरा टवटवीत आहे,..हा चेहरा चित्रकाराची नक्कीच धांदल उडूवून देईल,..त्या फुलांच्या आणि स्त्रीच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा दाखवताना आणि निसर्गाचा निसर्गाशी हा संवाद दाखवताना चित्रकार नक्की भांबावून जाईल पण त्याला ते सगळं रंगात पकडताना खुप आंनद देखील मिळेल,.. हे सगळं मनात सुरू होतं आणि सासुबाई म्हणाल्या," अनु हे बघ गंमत एका पारिजातकाच्या झाडाला एक शिंपी पक्षी घरटे विणत आहे,.. त्याच घरट विणून झालं होतं पण आताही त्याने तोंडात कापूस आणला होता आणि घरट्याच्या आत तो कापूस घेऊन शिरला होता,..अनु म्हणाली किती सुरेख आहे ना निसर्गाचा हा पैलूपण,.." सासुबाई म्हणाल्या," बघना अप्रतिम आहे याचा असं हात पाय नसताना घरटं वीणण आपल्या पिल्लांसाठी आणि तेही इतकं सुंदर कि काही टोचू नये म्हणून मऊ गादी सुद्धा बनवली त्यांनी,.." अनु म्हणाली ,"बघाना एवढं सगळं सहज सुबक आणि आटोपशीर केला आहे .. हे बघून खरच देवाची प्रचिती येतेच नाही का ?"
सासुबाई म्हणाल्या अग मग कवितेत बहिणाबाई म्हणतातच ना,...किती छान सांगतात त्या...
" अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला,..देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला.."
सासुबाई म्हणाल्या," निसर्गाचं हे रूप सुंदर शब्दबद्ध करणं हेही एक दैवीच वाटतं मला. शब्दात मांडणं किंवा या निसर्गाला गाण्यातून सांगण,.. तर कोणी रांगोळी, चित्रात कोणत्याही कलेतून निसर्गाचे रूप व्यक्त करणं तोच तर असतो क्षण मनुष्याला दैवी अनुभव घेण्याचा निर्मितीचा क्षण,.. आता या पक्षाने हे घरटं करून तो क्षण आपल्याला दाखवला आता इथे बसून त्याला तुझ्या रंगात पकडून म्हणजेच निर्मितीची अनुभूती तुलाही घेता येईल की ,.."
सासूबाईंच्या ह्या बोलण्यावर अनुला आठवलं आपण कारकडे चाललो होतो.
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all