तिची पाऊलवाट भाग १०

Tichi Paulvat


#तिचीपाऊलवाट भाग 10
©स्वप्ना..
सासूबाईंनी ओवी सुरू केली,..
"कसा दिला रे जनम
बाईच्या नशिबी देवा,..
सोडून मायेचं अंगण
सदा सासरीच ऱ्हावा.."
"कशी बाईची रे जात,..
चिवट वेली सारखी,..
झिजवते देह सारा,..
तरी साऱ्यांना पोरकी.."
त्यांना हुंदका आला,..थोड्यावेळ त्यांच्या डोळ्यातून नुसतं पाणी वाहात होतं,.. आठवणींचे कढ येत होते बहुतेक,..मंगल म्हणाली अनु तुझं गाणं होऊन जाऊ दे ना,.अनु म्हणाली,"आता फार शास्त्रीय गाता येत नाही मला,रियाज कधीच मागे पडला,..कधी कधी वाटतं आपण खरंच गाणं शिकलो होते का??सध्या एक भावगीतच म्हणते,..ह्या चंद्राला बघून तुला आवडायचं ते,..
"तोच चंद्रमा नभात तिच चैत्र यामिनी
एकांती मज समीप तिच तू ही कामीनी,तिच तू ही कामिनी
तोच चंद्रमा नभात,..

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे
मी ही तोच तिच तू ही प्रीती आज ती कुठे,..
ती न आर्तता उरात,.. स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप तिच तू ही कामिनी,.."
गाणं सम्पल तसं एकदम शांत वाटलं,..प्रत्येकीलाच,..रेवा म्हणाली,"मावशी किती सुंदर म्हणतेस ग तू देखील गाणं,..तू का नाही करिअर केलं ह्यात,..?"अनु म्हणाली,"सांगते तुला सध्या आजीचे आठवणींचे काजवे उजळू दे मग एक एक जण बोलू,.."
सासुबाई म्हणाल्या,"ओव्या हिम्मत द्यायच्या,माहेरची आठवण द्यायच्या आणि आनंदही द्यायच्या,..हे सगळं असं जगणं सुरू होतं पण अजून काही ह्यांच्या जवळ मी गेले नव्हते त्यामुळे आपल्या आई ऐवजी सासू आणि आजी ऐवजी अजेसासुबाई एवढा बदल हळूहळू पचनी पडत होत,..हे तसे खुप मोठे गायक होते,.. बऱ्याचदा पेटी घेऊन मला गाणं शिकवायला बसायचे,पण माझे सा नंतर सगळेच सूर जेंव्हा त्याच पटीत लागायचे तेंव्हा ते चिडायचे,..तीन चार दिवस ह्या शिकवणीत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं हा गळा काही सुरात गाणारा नाही,.. त्यांना खुप राग आला.तेंव्हा अजेसासूबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या,"अरे रागावू नकोस,तुझे आजोबा कसलेले गायक होते पण मला कधी गाणं आलं नाही म्हणून संसार कधी थांबला नाही आमचा,..जुळवून घ्यायचं,.."
आजीच्या वाक्यावर हे म्हणाले,"तुम्हाला फार घाई झाली होती ना माझं दुसरं लग्न करायची,..खरंतर मला गाणारी बायको हवी होती,.."आजी म्हणाली,"म्हातारा होऊन चालला होतास, कोण देणार होतं तुला पोरगी,..ही गरिबा घरची मिळाली म्हणून उगाच कांगावा करू नकोस,..तशी हुशार आहे,..किती पटकन मऊसूत पोळ्या करायला शिकली बघ,..गळ्यात नसली म्हणून काय झालं ,..हातात कला आहे पोरीच्या,..देवघर बघ किती सुंदर रंगवलं आहे,..चित्राची रेष अगदी लयदार आहे,.."हे म्हणाले,"गाण्याची लय नाही काय उपयोग त्या चित्राच्या लयीचा,.."
आमचं घराणं तस सगळं कलाकारांच त्यामुळे अजेसासूबाई आणि सासूबाईंनी ह्यांची कुरकुर फार नाही चालू दिली आणि मलाही सांगितलं तू ह्याच बोलणं फार मनावर घेऊ नकोस म्हणून,..खरंतर ते माझं वयही नव्हतं असलं काही माझ्या मनाला लागेल म्हणून,..कारण भावनांना जाणीव आलेली नव्हती अजून,..अल्लड पणा अजून कायम होता,.. आणि एक दिवस तो ही सम्पला,..कळीच फूल झालं,..बाराव्या वर्षीच मला न्हाण आलं आणि खुप मोठा बदल आपल्यात झाला हे समजलं,..फुलपाखरासारख्या उडणाऱ्या मला काही बंधन आली,.. लाज लज्जेची जाणीवही वाढली,..आधी खुप रडू आलं.हे काय असलं?पण सासुबाई,अजेसासूबाई आणि आई ह्यांनी छान समजावलं,..अजेसासुबाई म्हणाल्या,"स्त्रीच्या जातीने सगळे बदल सहज स्वीकारत गेलं की सगळं सोपं होत जातं,..बाईला चुकत काहीच नसतं मग उगाच रडत कुढत जगण्यापेक्षा देवाने दिलेलं स्त्रीपण आनंदाने स्वीकारायचं,.. बाईला चुकत काहीच नसतं मग उगाच रडत कुढत जगण्यापेक्षा देवाने दिलेला स्त्री पण आनंदाने स्वीकारायचं.
सासुबाई म्हणाल्या," भावनेला मुरड घालायला शिका चिऊताई,.. तुला करंजीला मुरड घालायला शिकवली ना तेव्हा काय सांगितलं, करंजीतल सारण बाहेर येउन नाही म्हणून असते ना ही मुरुड,..ती मुरड छान घातली कि करंजी मस्त होते,.. फुटून बाहेर येत नाही अगदी तसंच करायचं काही भावना या मनात ठेवायचा सतत राग, चिडचिड केली की घरातलं वातावरण बिघडतं तेही लक्षात घ्यायचं शेवटी माणसाचं जगणं पोटासाठी त्या पोटात जाणारा मार्ग अन्नपूर्णनेने केलेल्या अन्नावरच आनंदी का दुःखी हे ठरतं,.. या सगळ्यासाठी मुरड ही खूप महत्त्वाची मनाला मुरड घालण जमलं की बरच काही जमतं,..सासूबाईंच्या या वाक्यावर मात्र अजेसासूबाई चिडल्या म्हणाल्या," नाही सुनबाई मुरड घालावी ग पण त्यात स्वतःचे आनंद हरवता कामा नये हे ही लक्षात ठेवायला हवं ना आता तूच बघ ना इतकं करतेस माझ्या लेकासाठी पण,.. स्वतःचं अस्तित्व ठेवलस का काही,..सगळं त्याच्या सांगण्यावर वागत असतेस,..किती हुशार होतीस तुला चालून आलेली शिक्षिकेची नोकरी त्याने नाही म्हंटल की तू कच खाल्ली,..खरतर मी पाठीशी होते तुझ्या,.. इतकही नाही स्त्रीने सरबतातल्या साखरेसारख पाण्यात विरघळून जावं उलट तिने त्या सरबतात मिसळणाऱ्या सुगंध देणाऱ्या वेलची सारखं राहावं स्वतःचा स्वाद त्याला दिला तरी अस्तित्व सरबतात टिकलेलं विरघळून गेलेला नाही,.."
खरंतर त्या दोघी जे बोलत होत्या त्या गोष्टी पूर्णपणे माझ्या डोक्यावरून जात होत्या,..यातलं मला काहीच समजत नव्हतं,..स्त्रीने साखरे सारखं नाही तर वेलची सारखं राहावं,..मी ते बोलण सगळं मनात ठरवून ठेवलं,..पण हळूहळू कालांतराने कळत गेलं,..त्यावेळी आईसुद्धा बोलली होती,..खरंतर ती बिचारी साधीभोळी आधीच गरीब परिस्थितीने पिचलेली,ती तर म्हणाली होती,"आला क्षण नवऱ्यासोबत धीराने तोंड द्यावं,..यापेक्षा जास्त नाही काही सांगत मी,..शेवटी जोडीदार कसा यावरच सगळं अवलंबून असतं ग बाई,..एखादा आपल्याला सरबतातली
वेलची सारखं दरवळू देतो,..नाहीतर एखादा जोडीदार तिला साखरेसारखं विरघळून जा म्हणतो,..संसारावर फक्त पुरुषी अस्तित्व टिकवायचं म्हणतो,..वेगळं अस्तित्व हवंय कशाला?तू एक बाई आहेस आणि आता माझं आयुष्यच तुझं आहे.."
अजेसासूबाई,आई आणि सासुबाई काय सांगू पाहात होत्या त्यांच्या सांगण्यातून हे मला त्याक्षणी जरी नाही समजलं तरी हळूहळू समजतच गेलं की,..पाळी आल्यानंतर सासूबाईंच्या कुशीतून ह्यांच्याकडे जावंच लागलं,..स्त्रीला दिलेलं शरीरही मोठं अवघड कोड आहे हे त्यावेळी समजलं,..कळी फुलते ती कशी हे मनाचं आणि शरीराचं नातं जुळल्यावर कळलं मग ओढ लागली नवरा बायकोच्या नात्याची मग आलेलं गर्भारपण तेंव्हाही कळलं काय चिवटपणा दिलाय ग देवाने आपल्या शरीरात आणि स्त्रीपणातही,..निर्मितीची ताकद स्त्रीला दिल्याने खरंतर तिचा दर्जा वेगळाच,..पण हे सगळं सहज नाही तर सहन करावं लागतं,..ती बाळंतपणात खरच मृत्यूच्या उंबऱ्याला शिवून येते हे ही त्या जोडीदाराला समजलं तर तिला ह्या निर्मितीचा खरा आंनद वाटतो नाहीतर तो मोकळा आणि ती बसते जन्म देत लेकरं मोठे करत आणि तो जोडीदार त्याच्याच विश्वात,..हीच विश्व मात्र लेकरं,घर,सगळा संसार,..कधीकधी तिला वाटतही असेल संसार खर एकटीचाच आहे का??पण सप्तपदीच्या त्या वचनांना ती कुरवाळत बसते,..ती नाही झटकन,तटकन निघून जाऊ शकत,..स्त्री अशी बांधलेली असते तिच्या संसाराशी माझंही असच होत ह्या सगळ्यात अंगात असलेली चित्रकला कधी हरवत गेली कळलं नाही,..पाळण्याची दोरी हलवताना हळुहळु गाणं ओठी आलं,..नवऱ्यासोबत सूर फार जुळले नाही पण संसार तालातून जाऊ दिला नाही कारण तशी वेळ आलीच तर सासूबाईंनी सांगितलेली मुरड कामी आली,.. मन बऱ्याचदा सैरभैर व्हायचं पण लेकरांनी धरलेला पदर थाऱ्यावर आणायचा..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all