Jan 22, 2021
नारीवादी

तिची पाळी आणि बरच काही

Read Later
तिची पाळी आणि बरच काही

            सुनिधी आज थोडीशी  घाबरलेली  अस्वस्थ आणि थकल्या सारखी वाटत होती तरी तिची नाष्ट्याची आणि सुजय म्हणजेच तिच्या नावऱ्याचा डबा तयार करायची लगबग सुरू होती. सुजय ऑफिससाठी तयार होत होत तिला पाहत होता. तिचा पडलेला चेहरा त्याच्या नजरेतून सुटला नव्हता. सुनिधीने नाष्ट्याला केलेले पोहे आणि चहा  डायनींग टेबलवर आणून ठेवले आणि सुजयला आवाज दिला.

 

सुनिधी,“ सुजय नाष्टा करून घ्या!” ती म्हणाली.

 

सुजय,“ आलोच!” अस म्हणून टेबलवर येऊन बसत किचन मध्ये जानाऱ्या  सुनिधीला तो म्हणाला

“ तू पण नाष्टा कर माझ्याबरोबर बस!” 

 

सुनिधी,“ नको अजून तुमचा डबा तयार व्हायचा आहे. मी नंतर करेन नाष्टा तुम्ही करून घ्या!” ती थकलेल्या आवाजात म्हणाली

 

         सुजय उठला आणि तिच्या मागे किचन मध्ये गेला आणि तिला स्वतः कडे वळवत तिच्या कपाळावर हात ठेवत काळजीने म्हणाला.

 

सुजय,“ निधी तुला बरं वाटत नाही का? आपण डॉक्टरकडे जायचे का? मी ऑफिसमध्ये नाही जात आज!” 

 

सुनिधी,“ असं काही नाही.मी ठीक आहे.” ती त्याच्या पासून नजर चोरत म्हणाली.

 

सुजय,“ तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय की तुला काही तरी होतंय. काय झालंय सांगशील का आता?” त्याच्या आवाजाला आता धार आली होती.

 

सुनिधी,“माझी पाळी आली आहे त्यामुळे पोट दुखतंय थोडं! बाकी काही नाही.” ती घाबरुन रडत म्हणाली.

 

सुजय,“ मग त्यात इतकं घाबरण्यासारखं आणि न सांगण्या सारखं काय आहे? जास्त दुखतंय का पोट! आपण डॉक्टरकडे जाऊयात का?” तो तिचे डोळे पुसत प्रेमाने म्हणाला.

 

सुनिधी,“ नाही डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही!माझ्याकडे आहेत गोळ्या! तुम्ही नाष्टा करा मी पोळी-भाजी करते तुमच्या डब्यासाठी!” ती ओट्याकडे वळत म्हणाली.

 

सुजय,“ नको मला डबा मी कॅन्टीनमध्ये जेवण करेन आज! तू चल माझ्या बरोबर नाष्टा कर!” तो तिला खुर्चीवर बसवत म्हणाला

 

       सुनिधी मात्र सुजयच्या अशा वागण्याने थोडी सुखावली होती. दोघांनी नाष्टा केला सुजय ऑफिसाठी निघाला आणि दारातून परत घरात काही तरी आठवलं म्हणून परत आला.

 

सुजय,“ निधी सॅनिटरी पॅड आहेत का तुझ्याकडे की आणावे लागतील? मी संध्याकाळी येताना घेऊन येईन” तो सहज म्हणाला.

 

सुनिधी,“ सध्या आहेत पण मी घेऊन येईन आज!” ती संकोचून म्हणाली.

 

सुजय,“वेडी आहेस का तू?  तुला इथले काही माहीत नाही आणि तू अशा अवस्थेत कुठे शोधत फिरणार मेडिकल! मी घरी येताना घेऊन येईन संध्याकाळी! तू आरामकर आणि काही तरी बनवून खा!”

 

        सुजय आणि सुनिधी अवघ्या दोन  महिन्यां पूर्वी लग्न झालेले नवविवाहित जोडपे! सुजय आणि सुनिधीचे अरेंज मॅरेज! सुजयने इंजिनिअरिंग करून M. B. A केलेला आणि बेंगलोरच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉबला होता. तो नुकताच पुण्याहून  सुनिधीला घेवून बेंगलोरला शिफ्ट झाला होता.  

 

         सुजय मनमोकळ्या  स्वभावाचा तर सुनिधी सुजयला कायम घाबरून आणि बिचकून राहणारी त्याच्याशी जेव्हढ्यास तेव्हढे बोलणारी! 


 

           संध्याकाळी सहा वाजता सुजय त्याच्या जवळ असलेल्या चावीने दार उघडून घरात आला. त्याला सुनिधी बेडरूम मध्ये झोपलेली दिसली म्हणून तो आवाज न करता  फ्रेश होऊन किचन मध्ये गेला आणि चहा करून बेडरूम मध्ये घेऊन  गेला आणि सुनिधीला हळूच उठवत म्हणाला.

 

सुजय,“ उठा निधी मॅडम!चहा आणि बिस्किटे घ्या” 

 

      सुनिधी उठली आणि फ्रेश होऊन आली. सकाळ पेक्षा ती आत्ता रिलॅक्स दिसत होती.हे पाहून सुजयला ही बरे वाटले.ती सुजयला म्हणाली.

 

सुनिधी,“ तुम्ही कशाला केलात चहा मला उठवायचे ना!” ती संकोचून बोलत होती.

 

सुजय,“ त्यात काय इतकं मी केला तर! बरं मी कुकर लावला आहे.ती बघ शिट्टी वाजली. आज मस्त भात-वरण खाऊ!”तो हसून म्हणाला.

 

सुनिधी,“  कशाला उगीच त्रास घेतलात मी केला असताना!तुम्हाला स्वयंपाक करायला येतो!” 

 

सुजय,“ मी काय अगदी मास्टर शेफ नाही पण कुकर लावता येतो मला! काय ग सारख सारख मी केलं असत मी केलं असत! इतका संकोच कशाचा वाटतो तुला?” तो जरा नाखुषीनेच म्हणाला.

 

     त्यावर सुनिधी काहीच बोलली नाही. दोघे जेवले आणि झोपायला बेडरूममध्ये गेले. सुजयने हळूच विषय काढत  बोलायला सुरुवात केली.

 

सुजय,“ निधी सकाळी तू इतकी का घाबरली होतीस जसा काही गुन्हाच केला आहेस?”

 

सुनिधी,“ कारण मी एका वेगळ्या घरगुती वातावरणातून आली आहे!”ती  म्हणाली

 

सुजय,“ म्हणजे?” तो म्हणाला.

 

सुनिधी,“ माझा दादा माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे.त्याला नोकरी लागली आणि सानिका वहिनी आमच्या घरात लग्न होऊन आली.पण आमच्या घरात पाळी बाबतीत वातावरण खूप तंग आहे. माझ्या दादाला महिन्याचे पंचवीस दिवस हवी हवीशी वाटणारी त्याची बायको तिच्या त्या पाच दिवसात नकोशी होते. तो त्या पाच दिवसात तिच्याशी धड बोलत नाही.एवढेच काय पण दादा तिच्या त्या दिवसात हॉल मध्ये झोपतो.आमच्या बाबा आणि दादाला ही सॅनिटरी पॅड आणण्याची लाज वाटते.त्यांना ते  आणायला लागणे म्हणजे अपमान वाटतो! वाहिनीचा अनुभव मी जवळून पहिला आहे वहिनी मला  लग्न होताना म्हणाल्या देखील “ताई नवरा किती ही प्रेमळ असला तरी तो बाईचे बाईपन आणि तिची त्या दिवसातील अवस्था  कधीच समजून घेत नाही.बाईच्या बाईपणाच्या कळा तिला एकटीलाच सोसाव्या लागतात. या सगळ्यामुळेच मी घाबरत होते सकाळी! ” ती म्हणाली आणि  तिच्या ही न कळत त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन विसावली


 

सुजय,“ तुझ्या घरचे इतके सुशिक्षित असून ही ते असे वागतात ऐकून खरंच त्यांची कीव करावीशी वाटते. आमच्या घरचे  वातावरण पूर्ण वेगळे आहे. सुरभी  माझी बहिण माझ्या पेक्षा दोन वर्षांनी लहान! ती चौदा वर्षांची असताना रजस्वला झाली आणि त्याचा आमच्या घरात छोटे खानी सोहळा झाला.मामा ,आत्या आणि बरेच जवळचे नातेवाईक तिच्यासाठी कपडे आणि खाण्याच्या विविध वस्तू घेऊन आले तिचे खूप कौतुक झाले.तेंव्हा मी सोळा वर्षांचा होतो आणि हे काय चालले आहे हे मला कळत नव्हते. तेव्हा बाबांनी मला या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या नंतर मी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आणि मग या गोष्टींचे शास्त्रोक्त ज्ञान मिळाले.आमच्यात बाबा आणि मी आई आणि सुरभिला लागणारे पॅड कायम आणून देत असतो. कारण त्यात लाजण्यासारखे आणि अपमान वाटून घेण्यासारखे काय आहे? ती एक नैसर्गिक क्रिया आहे बाकीच्या नैसर्गिक क्रिये सारखी आणि त्यातून तर आपला जन्म होत असतो. ती एक नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. पण या सुशिक्षित अडाणी लोकांना कोण सांगणार? त्या काळात बाईची शारीरिक आणि मानसिक स्थिती नाजूक असते. प्रत्येक स्त्रीला कमी-अधिक प्रमाणात या गोष्टीचा शारीरिक त्रास हा होत असतो. पण या काळात तिला समजून घेण्याची आणि तिची काळजी घेण्याची नितांत गरज असते. पण तुझ्या घराच्या लोकांसारखे लोक नेमकं उलट वागतात आणि मग  लाजून संकोचून बऱ्याच स्त्रिया त्याचे पाळीशी निगडित आजार मुकाट पणे सहन करतात आणि ते आजार विकोपाला गेल्यावर त्याचा उलगडा होतो. तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.मग पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून स्त्रीला विश्वासात घेऊन तिची काळजी घेणे आवश्यक असते. हे बघ निधी मी तुला होणारा शारीरिक त्रास वाटून घेऊ शकत नसलो तरी मी तुझी काळजी तर नक्कीच घेऊ शकतो आणि हो मला इतकं घाबरण्याची आणि संकोचण्याची तुला काहीच गरज नाही मी तुझा नवरा आहे!” तो हसून म्हणाला.

     

     सुनिधी मात्र सुजयचे हे बोलणे ऐकून समाधानाने गाढ झोपली. कथा काल्पनिक पण डोळ्यात अंजन घालणारी!


 

     या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule