Jan 23, 2022
वैचारिक

तिची काहीच चूक नाही...

Read Later
तिची काहीच चूक नाही...

सुहास चे स्थळ आले तसे मनाली हरखून गेली. हँडसम, स्मार्ट, एकुलता एक मुलगा आणि इंजिनिअर अशा सर्व 'गुणसंपन्न 'असणाऱ्या सुहासच्या बघताच क्षणी प्रेमात पडली.. सुहास चा ही होकार आला आणि महिन्याभरातच दोघांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले.
मनाली आणि सुहास ला एकमेकांना समजून घेण्यास फारसा वेळ ही नाही मिळाला. लग्न थोडे घाई गडबडीतच झाले. ..

सुहास एकुलता एक मुलगा असल्याने आईचा अत्यंत लाडका होता. प्रत्येक गोष्टीत आईची परवानगी घेतल्याशिवाय तो पुढे जात नसे.
अगदी हनीमून चे ठिकाण ही सुहास ने आई वडीलांसोबत चर्चा करून ठरवले.
मनाली घरात नवीन असल्याने तिने हे फारसे मनावर घेतले नाही.

जशी ती सासरी रुळायला लागली तसे हळू हळू तिच्या लक्षात येऊ लागले की घरातील सर्वच गोष्टी सासू -सासऱ्यांच्या परवानगीनेच कराव्या लागतात. आपल्यावर सासूबाई नेहमी लक्ष ठेऊन असतात. ती कुठे जाते, कशी जाते, काय करते याचा तपशील त्यांना रोज सांगावा लागायचा.
शिवाय तिला दर महिन्याच्या पगार ही त्यांच्या हातातच द्यावा लागे. नाईलाजाने ती सगळा पगार सासूबाईंच्या हातात देई... पण तिला स्वतःसाठी काही घ्यायचे असल्यास सासूबाईं कडे मोकळ्या मनाने पैसे ही मागता यायचे नाहीत..
              आपण कमावलेले, आपल्या हक्काचे थोडे तरी पैसे आपल्या जवळ असावेत म्हणून हे सारे तिने सुहासच्या कानावर घातले. त्याने ही आईचीच री ओढली...मी ही इतकी वर्ष हेच करत आलोय तू ही तेच करावेस अशी माझी अपेक्षा आहे..
             सुहास ही ऐकत नाही म्हणताच तिने सासूबाईंना स्पष्टच सांगितले, थोडे पैसे सेव्हिंग करून मगच घरी देत जाईन मी...हे ऐकताच सासूबाईंनी सुहासला उलट सुलट सांगून त्याचे कान भरले. तसे त्याने मनाली सोबत भांडण काढले... माझ्या आईला उलट बोललेले मला चालणार नाही, शिवाय तुझ्या पैशांचा हिशोब हवाच कशाला तुला? आई मॅनेज करते ना सगळे....आणि तू एकुलती एक सून आहेस या घरची. या नात्याने ही जबाबदारीच आहे तुझी.. हे घर तुझेच तर आहे, आम्ही ही तुझीच माणसे आहोत...

हे जरी खरे असले तरी मनाली ला काही पटत नव्हते.
तिच्या माहेरची माणसे येताच सासूबाई आणि सुहास खूप चांगले वागायचे. मनाली ला आम्ही किती सुखात ठेवले आहे, इथे तिला कशाची ही कमी नाही, असा आव आणायचे.
जेव्हा सासरची मंडळी गोळा व्हायची तेव्हा मात्र मनाली घरचं काहीच बघत नाही, सून आली तरी अजूनही मलाच पाहवे लागते सारे...असा सासूचा सूर असायचा.

सुहास ने मनालीला ताकीद दिली होती....या घरातून तुझ्या माहेरी कोणती ही गोष्ट जाता कामा नये. अगदी एक पैसा सुद्धा...
सासूबाई मनाली आणि सुहास ला फारसे एकत्र ही येऊ देत नसत. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये सुनेने काहीही बोलायचे नाही अशी सासूबाईंची ऑर्डरच होती मनालीला..
एकदा -दोनदा तिने हे माहेरी सांगितले. पण आई वडिलांनी उलट मनालीला च समजावले. अजुन तू नवीन आहेस त्या घरी...हळू- हळू होईल सगळं नीट .. थोड ॲडजस्ट करावं लागत मुलीला..

मनाली ने हे सासऱ्यांच्या कानावर ही घालण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या बायको पुढे माझे काहीच चालत नाही, अशा आविर्भावात त्यांनी ही हात वर केले.

हळू हळू मनाली ला माहेरी जाण्यास ही सुहास ने बंदी घातली. काही कारणाने ती माहेरी जायची आणि जाताना सुहास नेहमी तिच्या सोबतच असायचा. त्यामुळे तिला मोळकेपणाने वागता -बोलता यायचे नाही..
याचा परिणाम म्हणून मनाली आजकाल उदास राहू लागली... नकारात्मक विचारांचा परिणाम तिच्या मनावर, शरीरावर ही होऊ लागला.

हे सर्व सोडून सरळ माहेरी निघून जावे का?... ती माहेरी निघून गेली तरी सुहास ला काहीच फरक पडणार नव्हता.. कारण यांचे जगच वेगळे होते.. ज्यामध्ये तिला कुठेच स्थान नव्हते... तिला माहित होते, आई वडिलांना आपली मुलगी जड होणार नव्हती...कारण तिच्याकडे स्वतः ची उत्तम पगाराची नोकरी होती. खरे कारण कळाल्यानंतर त्यांनाही वाईटच वाटणार होते.
शेजारी -पाजारी थोडे दिवस टोमणे मारतील, गॉसिपिंग करतील आणि विसरून जातील.
मग यासाठी स्वतः च्या आनंदाला ,सुखाला का मुरड घालावी? असल्या खोट्या आणि दिखाऊ नात्यांत आता कसलाच अर्थ उरलेला नव्हता..

लग्नाला अवघे सहाच महिने झाले.. सुशिक्षित घर -दार पाहून लग्न केले. सुखी संसाराची स्वप्नं पाहिली... एखादी स्त्री आपल्या नवऱ्याकडून ज्या अपेक्षा ठेवते त्याच अपेक्षा सुहास कडून ठेवल्या ..आणि सासरच्या मंडळीं कडून ही..काय चुकले माझे?

खूप विचार करून तिने आज ऑफीस मधूनच परस्पर माहेरी जाण्याचा निर्णय घेतला...आई बाबांना सारे काही सांगणार होती ती. सासू -सासऱ्यांनी, सुहास ने माफी मागितल्यास पुन्हा नव्याने संसाराला सुरूवात करण्याचा प्रयत्न करणार होती...मात्र सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा अटीवरच.. आणि जर नसलेला संसार मोडलाच तरी पर्वा करणार नव्हती....कारण तिची काहीच चूक नव्हती..

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now