तिची घुसमट..(भाग ३)

सहनही होईना आणि सांगताही येईना त्यामुळे तिची होणारी घुसमट.


दोन दिवसांची सुट्टी संपवून राजीव पुन्हा शाळेवर रुजू झाला. आईने सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसांत त्याने भाड्याने एक छोटीशी खोली पाहिली शाळेच्याच बाजूला.

पुढच्या आठवड्यात राजीव स्नेहाला त्याच्या सोबत घेवून जाणार आहे हे अद्यापही घरात कोणालाच माहीत नव्हते.

पुढच्या शनिवारी तो सुट्टीसाठी जेव्हा घरी आला तेव्हा त्याने ही बातमी घरात सर्वांना सांगितली.

"दादा, मी तिकडे भाड्याने एक खोली पाहिली आहे. स्नेहाला घेवून जायचं म्हणतो तिकडे. तुमची काही हरकत नसेल तर जावू का उद्या तिला घेवून मी."

"बरं बरं, तुझ्या बी जेवणाची सोयच व्हईल त्याने. जा घिवून तिला."

"बरं बरं काय? तिला एकटीला सुधरणार आहे का तिथं नवख्या ठिकाणी?" आजी न राहवून बोललीच.

"अहो आत्या, स्नेहा काय लहान हाय व्हय आता. चांगली चौदावी पौतर शाळा झाली हाय तिची. तिला काय सुधरणार नाय मग?"

"तू गप ग कुंदे, तुला काय कळतं त्यातलं. त्यापेक्षा पोरी तू सोनीला आन मोनीला बी ने संगट. तेवढाच तुला त्यांचा आधार. तिथून जातील दोघी बी कालेजला आणि तिथून जवळ पण हाय त्यांचं कालेज."

आजीचे बोलणे कानावर पडताच स्नेहाने राजीवकडे पाहिले. आईलाही त्यांच्या मनाची घालमेल समजली.

"नाय नाय, ह्या दोघींना तिकडे पाठवलं तर इथं कामं कोणी पाहायची? त्यात आता मला नाही व्हत घरातलं आणि बाहेरचं.
आणि तसंही त्या दोघांमध्ये ह्या दोघींची लुडबुड कशाला पाहिजे. बरं दिसतं का ते. पोरी आता मोठ्या झाल्यात, म्या नाय त्यांना घरापासून आसं लांब पाठवायची."

"ठिव मग तुझ्या पदराला बांधून दोघींना बी. उद्या लग्न करुन सासरी तरी पाठीव दोघींना नायतर आयुष्यभर सांभाळाव्या लागतील अशाच."

आजीची विनाकारणची बडबड मात्र आता सुरु झाली होती.

स्नेहाला तर मनातून खूपच आनंद झाला होता. कारण आता यापुढे तिच्या संसारात इतर कोणाचीही लुडबूड असणार नव्हती. नुसत्या विचारानेच तिची कळी खुलली.

इकडे सोनी आणि मोनीला मात्र वहिनी जाणार, या विचारानेच पोटात गोळा आला होता. कारण आता घरातील कामाची सर्व जबाबदारी त्या दोघींवर पडणार होती.

"बरं का ग सोने मोने असं नवऱ्याचं सुख भेटायला बी नशीब लागतं बघा. तुम्ही बी असाच घरापासून लांब आणि एकटा राहणाराच नवरा शोधा बरं का. आमचं नव्हतं बाई एवढं मोठं नशीब. आमचा तर खटल्यात धुणी भांडी करूनच जीव जायचा. त्यातून वर नवऱ्याची मायेची फुकर तर लांबच राहिली, चार दोन जास्तीच्या लाथा मिळायच्या त्या येगळ्याच. एकाच घरात आम्ही चार चार जावा एकत्र नांदत व्हतो. तरी बी पाच पाच पोरं झाली आम्हाला. पण हल्लीच्या जोडप्याला शेपरेट रुम काय नि काय तो थाट. काई इचारुच नका बगा."

राजीवच्या आजीला तो बायकोला त्याच्या सोबत नेणार, ही गोष्ट फारशी रुचलेली दिसत नव्हती.

"अहो आत्याबाई, आता कवर ही अशी तुमची गाऱ्हाणी सांगत बसणार हाईत तुम्ही? तवाचा आणि आताचा काळ लई बदलला. नका त्याच त्याच गोष्टी आता उगळीत बसू. त्यांचं दिवस हाईत जगू द्या की त्यांला त्यांच्या पद्धतीनं."

"मग मी काय धरुन ठेवलं व्हय त्यांला, तू सासू असून तुला समदं पटतंय तर मग म्या मधी बोलणारी हाईच कोण ग?"

"बघा पोरींनो, तुमच्या आईला लेकी सोडून सुनंचीच जास्त पडली हाय. तुम्हाला बी अशीच सासू मिळू दे म्हणून देवापुढं हात जोडा जरा. त्याला बी नशीब लागतं बायांनो."

"व्हय ना, माझं देवापुढं हात जोडायचंच राहून गेलं वाटतं." राजीवच्या आईने म्हातारीला बरोबर टोमणा मारला.

आता म्हातारी तरी काय बोलणार ना यावर. तिनेही मग ऐकून न ऐकल्यासारखेच केले.

क्रमशः

अखेर राजीव आणि स्नेहा थाटू शकतील का त्यांचा नवा संसार? दोघांमध्ये असणारी मर्यादेची बंधने होतील का कमी? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all