Jan 19, 2022
नारीवादी

तिची भूक - भाग ४ (अंतिम)

Read Later
तिची भूक - भाग ४ (अंतिम)

तिची भूक - भाग ४( अंतिम)
©तेजल मनिष ताम्हणे

एकाच छत्रीखाली पावसापासून स्वतःला वाचवत ते दोघे चालत राहिले.दहा मिनिटांचा पायी प्रवास करत हॉटेल वर पोचले. एकमेकांचा निरोप घेऊन दोघे आपल्या आपल्या खोलीत गेले. रूमवर येताच आवरत असताना, मागील दहा पंधरा मिनिटांत आलेला अनुभव, ते पावसात त्यांचं एकत्र चालणं, अनवधानाने एकमेकांना होणारे स्पर्श ते सगळं दृश्य जसंच्या तसं स्वातीच्या नजरें समोर उभ राहिलं.

स्वातीला, सुहासच्या वागण्याचे आश्चर्य वाटू लागले. तिला आत्ता जाणवलं, जेव्हा तिचा खांदा त्याच्या बाजूंना, त्याच्या अंगाला स्पर्श करत, सुहास त्याच आंग चोरून घेत, स्वतः ला आवरत तो थोडा छत्रीच्या बाहेर जात असे. दोन तीन वेळा असच झालं होतं. हे तिच्या आत्ता लक्षात आलं. अनोळखी शहरात, नव्याने ओळख झालेली, सह शिक्षिका स्वाती, एक तरुणी सुहासच्या सोबत्त होती, पण तो एक सभ्य पुरुष. त्याचं वागणं, बोलणं, त्याची देहबोली अतिशय शिस्तीत आणि सुसंकृत होती.

सुहसच्या वागण्याची जाणीव होताच तिला स्वतःच वागणं आठवलं. " माझ लग्नं झालंय,आज मी दोन मुलांची आई आणि काय असं माझ हे अवखळ, उतावीळ वागणं, शी! कहरच केला मी आज. माझ्या ह्या अश्या वागण्याचा सुहासने काय अर्थ लावला असेल? काय वाटलं असेल? मी अशी अधाश्यासारखी का वागत आहे? का मी हे असं वेड्या सारखं वागते आहे ?" मनोमन स्वतःशी संवाद साधत स्वाती भानावर आली.तिला तिचं वागणं आठवून स्वतःची लाज वाटू लागली!

मागच्या काही दिवसात ती एखाद्या कॉलेज तरुणी सारखं वागत होती. प्रथम दर्शनी समवयस्क तरुण पाहता त्याच्या  बद्दल वाटणारं आकर्षण, हो निव्वळ शारीरिक आकर्षण! काही काळाचे क्षणिक सुख आणि समाधान ह्या करत आयुष्य पणाला लागल असतं ह्याची भयंकर वास्तवादि जाणीव होताच ती खडबडून जागी झाली! हा काय पोरकटपणा लावला आहे मी?? इतका कसला माझा लोभिपणा? माझ चुकलं, मी अपराधी आहे, हेमंतची, माझ्या मुलांची! मला असं नको होतं वागायला. मनातली अपराधीपणाची भावना  स्वातीला असवस्थ करू लागली. हॉटेल मधल्या बेड वर पडून एकटक  छताकडे नजर लाऊन, ती शून्यात बघत होती. डोळ्यातले अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

डोक्यात विचारांचे काहूर माजले असताना तिचे विचार तिला भूतकाळात घेऊन गेले. घरच्यांनी माझ्या मना विरुद्ध लग्नं लाऊन दिलं, शिक्षण अर्धवट राहिलं. तेव्हा आई वडिल परिस्थिती पुढे लाचार होते. तीन मुलींची शिक्षण, लग्नं लाऊन देणं त्यांच्या साठी काही सोप्पं नव्हत. त्यावेळेस त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. माझ हेमंतशी लग्नं लाऊन दिलं. मला माहित आहे, आमची जोडी काही चार चौघांनसारखी नाही. ते माझ्या पेक्षा वयाने खूप मोठे. दिसला जरी
मी उजवी असले तरी आज मला खात्री आहे वागायला बोलायला ते माझ्यापेक्षा उजवे आहेत.तेव्हा लग्नं झाल्यावर मला वाटलं, संपल आता आपलं आयुष्य. त्यांच्या दोन खोल्यात राहून तिथेच खुरडत, रडत आयुष्य वाया जाणार. पण आज पहिलं तर, माझ काय वाईट झाल?

नशिबाने मला हेमंत सारखा जोडीदार मिळाला. हेमंत स्वभावाने शांत, अबोल असले तरी गेल्या अकरा वर्षांच्या सहवासात त्यांनी मला माझ्या शिक्षणात, घरगुती क्लास सुरू करताना आणि आत्ता मोठ्या क्लासेस मध्ये नोकरी करतांना कायम पाठिंबा दिला. एवढंच काय, आज देखील इथे परगावी मी कामा निम्मित आले, त्यांनी मला लगेच परवानगी दिली.  त्यांचा केवढा विश्वास आहे माझ्यावर. मी मात्र माझ्या मोहापायी वहावत गेले! हे कुठल्या सुखाच्या मृगजळामागे मी धावत आहे? आज जर माझ पाऊल वाकड पडलं असतं  तर मी सगळं एका क्षणात गमावलं असतं! हेमंतच्या विश्वासाला तडा गेला असता तर ? नाही नाही, बास!  हा फक्त विचार मला इतका त्रास दायक होतोय!

मला नेहेमी असं वाटे, नवरा म्हणून त्यांनी माझ्याशी छान संवाद साधावा,कधी माझ कौतुक करावं. पण हेमंत ने जरी दोन गोड शब्द कधी बोलले नसले तरी त्यांनी मला चुकून ही कधी अप शब्द ऐकवला नाही. त्याचं अव्यक्त प्रेम मी का आजपर्यंत समजू शकले नाही?? शब्दातच प्रेम व्यक्त केलं म्हणजे प्रेम? काहीवेळा शब्दाविना कृतीतून, अबोल प्रीत सुधा व्यक्त होते, आणि ते काळण्यासाठी मोठं मन लागतं! हेमंत ना समजुन घ्यायला मी कुठेतरी कमी पडले!

रात्रभर स्वातीचा स्वतःशी संवाद सुरू होता. हेमंत कडून न मिळणाऱ्या आनंदाच्या क्षणांना, बाहेर कुठेतरी मिळवण्यासाठी ती असं वागत होती. तिच्या ह्या वागण्यासाठी कालपर्यंत तिचं मन तिला समर्थन देत होतं, पण  सुहास एक सभ्य तरुण, त्याच्या प्रतिक्रिया, त्याची देहबोली नकळत स्वातीला खूप काही शिकवून गेली. आज सुहासच्या जागी जरी दुसरा कोणी असता तर कदाचित त्याने स्वातीच्या त्या एका मोहाच्या क्षणाचा गैर फायदा घेतला असता. सरलेल्या रात्रीच्या गर्भात स्वातीला आपली चूक उमगली.

रात्र भर रडून रडून सुजलेल्या डोळ्यांवर स्वातीने पाणी मारलं. दोन घोट पाणी पीत घश्याची कोरड मिटवली, तेव्हा कुठे विचारांचे वादळ थोडं शांत झाल्या सारखं वाटलं. घड्याळ पाहिलं तर पहाटेचे सहा वाजत आले होते. खिडकीचा पडदा बाजूला सारला आणि समोर जगातलं सगळ्यात सकारात्मक दृष्या तिच्या नजरेस पडल.पहाटेचा सूर्योदय! सूर्याची कोवळी किरणं तिच्या चेहेऱ्यावर पडली अन् तिच्या मनातले मळभ दूर झाले.तिने एक दीर्घ श्वास घेतला. आज पहिल्यांदा तिला जाणवलं तिचं हेमंतवर खरंच खूप प्रेम आहे आणि त्याच्या प्रेमामुळे तिच भरकटलेल मन योग्य मार्गावर आलं. अपराधी भावना तिच्या अंतःकरणात तळमळत होती पण तिची भूक, ती मिटवण्याचा तिचा अट्टाहास आज संपला होता!

©तेजल मनिष ताम्हणे

समाप्त

प्रिय वाचकहो,
पूर्ण कथा वाचल्या बद्दल मनापासून आभार. कथा काल्पनिक असून एका साधारण स्त्रीची घुसमट, अपेक्षा, तिचं भरकटलेल मन, त्याची व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे. मराठी भाषा, त्यातील व्याकरण चुका झाल्या असल्यास, कृपया मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद .

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Tejal Manish Tamhane

Home maker and Private Tutor.

Fun loving , Happy go Lucky person. Likes to write short stories and poems. Best friend of my daughters and a caring person at heart.