तिची भूक - भाग ३

Story of young aspiring women....

तिची भूक - भाग ३
©तेजल मनिष ताम्हणे

सुहास, एक उच्च शिक्षित, रुबाबदार व्यक्तिमत्व.दिवसा कॉलेज मध्ये लेक्चरर आणि संध्याकाळी प्रायव्हेट क्लास मध्ये .नोकरीला लागला. कॉलेज मध्ये सुहास सर सगळ्यांचे दोन कारणांसाठी अगदी लाडके, एक त्यांचा हीरो सारखा लूक आणि दुसरं म्हणजे उत्तम शिक्षक. क्लास मधील सगळ्या शिक्षकांची एकमेकांशी ओळख करून देण्यात आली तेव्हा स्वाती आणि सुहास ह्यांची प्रथम भेट झाली. कॉलेजच्या मुलींची सुहासला पाहून जी प्रतिक्रिया असते, तिच स्वातीची होती. स्वाती त्याच्याकडे एकटक पहात राहिली.

सुहास : "हॅलो, मी सुहास"

हात मिळवण्यासाठी आपला हात पुढे करत सुहासने स्वातीला आपली ओळख करून दिली.

स्वाती:" नमस्कार, मी स्वाती"

सुहासच्या हातात आपला हात देत, स्वातीने हात मिळवला. तिच्या हाताला झालेला त्याचा पहिला स्पर्श, तिच्या सर्वांगावर शहारे आणणारा होता.
आपल्याच वयाचा देखणा तरुण असं ह्या आधी स्वातीला कोणी हात मिळवून भेटला नव्हता. सुहासने अलगद आपला हात स्वातीच्या हातातून सोडवत, एक स्मित हास्य देत पुढच्या शिक्षिकेला भेटायला वाळला. तिची नजर अजुनी त्याच्यावर खिळून होती.

क्लासवरून घरी येताना स्वातीच्या मनात सुहास बद्दल विचार चक्र सुरू होतं. ती, त्याचा चेहेरा, हात मिळवताना झालेला स्पर्श पुन्हा पुन्हा आठवून मनोमन सुखावून जाई. एखाद्या कॉलेज कुमारी सारखी तिची अवस्था झाली होती. एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने स्वतःला भानावर आणलं. घरी येताच हात पाय धून आवरून तिने जेवणाची ताट मांडली. मुलं आणि हेमांत स्वाती घरी येई पर्यंत जेवणाचे थांबत असे. ती आल्यावर रोज सगळे एकत्र जेवण करत. जेवतांना मुलं स्वातीला संध्याकाळी खेळताना झालेल्या मजा मस्ती बद्दल सांगत होते आणि स्वाती फक्त ह्म्...करत होती. तिच मन अजुनी सुहासच्या विचारांचे हिंदोळ्यावर झुलत होतं.

तिला स्वतःची लाज वाटू लागली. बास! काय होतय असं. मनातल्या मनात तिने स्वतःलाच दम भरला. स्वयंपाक घर अवरल आणि ती झोपायला आत आली. हेमंत तिची वाट पाहत होता. स्वातीला ह्या दहा वर्षांच्या सहवासात अजून देखील हेमंत बद्दलच्या भावना स्पष्ट झाल्या नव्हत्या. लग्नं केलं म्हणून तो नवरा, एवढंच काय ते समीकरण! "पण हे असं कसं काही प्रेम, आकर्षण नसताना फक्तं एका छता खाली राहायचं? का तर नवरा बायको असं लेबल लावलं म्हणून? हे असं किती दिवस चालणार??" हा प्रश्न मात्र तिला आजच का पडवा? ह्याचं उत्तर तिच्या मनाने दिलं  ' सुहास '

आज सुहासला भेटून तिच्या मनात विचार आला,मी जर माझ शिक्षण पूर्ण करून, नोकरी करत असते आणि मग नंतर लग्नं केलं अस्त, तर सुहास सारखा एखादा तरुण, सुयोग्य आणि शिकलेला जोडीदार मला मिळाला असता. पण, नशीब! अजून काय, म्हणत ती गप्प बसली. हे विचारांचे तरंग उठत असताना हेमंतचा स्पर्श तिला झाला आणि ती पुन्हा वर्तमानात आली. हेमंतने नवरा असल्याचा त्याचा हक्क बजावला आणि तो सुखाने घोरत पडला. स्वाती अजुनी टक्क जागीच.अनेक वेळा तिला प्रश्न पडत असे शरीर सुखाची नक्की व्याख्या काय असेल? एक नैसर्गिक शारीरिक गरज? पण मग सुख असं का म्हणत असतील?? कारण स्वातीने ' सुख 'ही जाणीव, तो उचांक कधी  तिने अनुभवलाच नाही! पण आज संध्याकाळी जेव्हा क्लास मध्ये सुहासच्या हातांचा जेव्हा स्पर्श झाला, तो इतका सुखावून का गेला?? ह्या विचारांच्या तंद्रीत तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी दुपारी स्वाती क्लाससाठी तयार होऊ लागली. आज रोजच्या सारखी स्टार्च केलेली साधी कॉटन साडी,  न नेसता, तिने आज सोनेरी बॉर्डरची लाल कॉटन सिल्कची साडी नेसली. स्वतःला आरश्यात न्याहाळत तिला तिच्याच रुपाच कौतुक वाटलं. आज त्या लाल साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. साडीची लाली गालावर, ओठांवर उतरून आल्यासारखं वाटतं होत. कपाळावरची मॅचींग लाल टिकली, डोळ्यात काजळाची दाट रेघ, आणि तिच्या ओठा जवळचा तीळ तिच रूप अधिक लोभसवाण वाटू लागलं, आज तिला पाहून कोणाचंही भान हरपेल. पण हे सगळं तिचं कोणासाठी चाललं होतं?? स्वतः साठी?? नाही, आज ती स्वतःसाठी नाही तयार झाली.आज तिला मनापासून वाटत होतं, तिने छान दिसावं फक्तं सुहास साठी!!

सुहासच्या नजरेत, तिला तिची चांगली प्रतिमा निर्माण करायची होती, तिला सुहासशी मैत्री करायची होती. हे तिचे विचार तिलाच फार अल्लड, अवखळ वाटू लागले. पण कोणास ठाऊक आज असंच वागावं, वेड्या सारख असं तिने ठरवल. तिच्या मनाने तिला असं वागण्याची संमती दिली आणि स्वाती वागली एखाद्या वीस बावीस वर्षांच्या  नव्याने प्रेमात पडलेल्या तरुणी सारखी!

काही दिवस तिचं हे असंच सुरू राहिलं, रोज छान आवरून क्लासला जाणे, ती स्वतः वर खुश होती, सुहासने अशी काय तिच्यावर जादू केली, तिलाच उमजेना. तिला सुहास बद्दल सगळं जाणून घायचं होतं, त्यांच्याशी बोलावं असं तिला नेहेमी वाटे,पण काही दिवस, त्यांची भेट फक्त दहा पंधरा मिनिटे चहा घेताना, क्लासच्या मधल्या ब्रेक मध्ये होत असे. क्लास संपला की दोघे आपल्या मार्गाने जात.

एक दोन महिने त्यांचा थोडक्यात औपचारिक संवाद होता असे.सहज गप्पा मरण्या एवढी मैत्री झाली नव्हती आणि इतर चर्चा करायला तेव्हढा निवांत वेळ क्लास मध्ये मिळत नसे. त्या दिवशी स्वाती आणि सुहास ह्यांना क्लासचे मालक देशपांडे सरांनी आपल्या केबिन मध्ये बोलवून घेतलं. क्लासची पहिलीच नवीन शाखा, दुसऱ्या शहरात उघडण्यात येणार असल्याने त्यांना क्लासच्या इथल्या हुश्शार, अनुभवी शिक्षकांना महिन्यातून दोन दिवस परगावी कामा निम्मित पाठवायचे होतें. त्या संधार्बत स्वाती आणि सुहास ह्या दोन उत्तम शिक्षकांना पुढील सहा महिने नवीन शाखेत जाऊन महिन्यातले दोन स्पेशल क्लास घेण्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांचे खाणंपिणं, राहणं, सगळा खर्च क्लास तर्फे., जाण्या येण्याच्या भड्या व्यतिरिक्त महिन्याच्या पगारात जास्तीचे तीन हजार रुपये देण्यात येतील. कदाचित  नियतीला देखील सुहास स्वातीची मैत्री व्हावी असं वाटत असावं!

स्वातीसाठी एक सुवर्ण संधी चालून आली.सुहास सोबत परगावी, क्लासच्या कामासाठी दर महिना दोन दिवस जाता येणार. फक्तं ते दोघेच. घरून हेमंतची परवानगी मिळेल का? हा विचार देखील मनाला शिवला नाही, त्या आधीच तिचं स्वप्नं रंगवणं सुरू झालं.रात्री घरी आल्यावर तिने हेमंतला, देशपांडे सरांनी दिलेला प्रस्ताव सांगितला.

हेमंत :"कशाला हवेत आपल्याला जास्तीचे पैसे? आहे त्यात चांगलंच चाललं आहे आपलं. नको उगाच ते परगावी एकटीने जाणं.मुलांची पण गैरसोय होईल. दर महिना दोन दिवस जाणार, तिथे काय कुठे राहणार? नकोच ते"!

स्वाती :" सहा महिन्याचा तर प्रश्न आहे, तीन हजार मिळतील दार महिना ते पण दोनच दिवस जावं लागेल. म्हणजे एक रात्र फक्त नसेन मी, महिन्यातून एकदाच जावं लागणार आहे "

हेमंत: " हो पण एवढं सगळं कशा साठी?"

स्वाती :" चांगली संधी आहे "

हेमंत :" कसली संधी?"

स्वाती :" अ..अ...संधी, नवीन मोठ्या शहरात जाऊन शिकवण्याची. हा एक चांगला अनुभव मिळेल मला. उद्या मला जर अजून चांगल्या पगाराची नोकरी शोधयची असेल तेव्हा हा गाठीशी असलेला अनुभव कमी येईल"

" आणि अहो, मुलं मोठी आहेत अता, महिन्यातून एक रात्र मी नसेन म्हणून काही त्यांची गैरसोय होणार नाही. मी समजावून सांगीन त्यांना. मुलांच्या पुढील शिक्षण, आपल्या भाविष्यासाठी पैसा लागेलच. त्यामुळे ही चालून आलेली संधी का सोडावी??" 

हेमंत :" हम्म्.... ठोक आहे, बघ एकदा विचार कर"

स्वाती :" माझा विचार तर पक्का आहे. तुम्ही परवानगी दिलीत तर आनंदाने जाईन मी. आज तुमच्यामुळे मी इथवर आले आहे, मी शिक्षण पूर्ण केले , मला चांगली नोकरी मिळाली , माझी सगळी स्वप्नं पूर्ण झाली. आता ही संधी मला गमवायची नाही"

अखेर हेमंत कडून स्वातीला परगावी जाण्याची परवानगी मिळाली.

आज तो दिवस उजाडला जेव्हा स्वाती आणि सुहास दोघे क्लासच्या नवीन शाखेत परगावी जाण्यास निघाले. पुढील दोन दिवस सुहास आपल्या सोबत असेल, ही कल्पना स्वातीसाठी मोहक होती. पहाटे सहाच्या बसने दोघे परगावी निघाले. तीन तासांचा बसचा प्रवास कामाच्या गापा, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन, बारावीच्या मुलांसाठी नवीन टेस्ट सीरिज ह्या क्लासच्या गप्पांन मध्ये  सहज निघून गेले. क्लासच्या शाखेत पोचले. बॅग्स तिथेच ऑफिस मध्ये ठेऊन थोडा नाष्टा केला आणि सरळ कामाला लागले.आज पूर्ण दिवस दोन तास एक बॅच, अश्या बारावीच्या मुलांसाठी स्पेशल  चार बॅचेस होत्या.

रात्री आठच्या सुमारास क्लास संपून दोघे हॉटेलवर निघाले. स्वातीसाठी हा पहिलाच अनुभव, घरा बाहेर हॉटेल वर राहण्याचा, हे सगळं करण्याचं धाडस तिच्यात कुठून आले ते तिलाच ठाऊक. दोन रूमचे बुकिंग क्लास जवळच्या हॉटेल मध्ये केले होते. रूमवर  फ्रेश होऊन एक तासाने जेवणासाठी खाली भेटू, असं म्हणत दोघे आपल्या आपल्या खोलीत गेले. नऊच्या सुमारास खाली जवळच्या हॉटेल मध्ये जाऊन दोघे जेवले. ही संध्याकाळ, हा क्षण कधी संपूच नये असं स्वातीला वाटत होत. दिवस भरात कामाच्या गपा झाल्याने, थोडा वेगळा विषय म्हणून सहज इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. सुरवातीला विषय असा नाही, पण सुहास
काही बोलला, तरी ऐकत रहावे अशी स्वातीची अवस्था होती.

जेवल्यावर रात्री चालत हॉटेल वर परत येत असताना हलक्या सरी बरसू लागल्या. स्वातीने पटकन पर्स मधून छत्री काढली आणि दोघांच्या डोक्यावर धरली. काही क्षणातच पावसाने जोर धरला. एकाच छत्रीत दोघे कसेबसे पावसापासून स्वतःला वाचवत चालू लागले. खरं तर स्वातीला मनातून वाटू लागल की, असं रमत गमत निवांत चालावं, करणं त्या एका छत्री खाली कळत नकळत दोघांचे एकमेकांना होणारा स्पर्श तिला हवे हवेसे वाटणारे होते. तिला ती रात्र, तो पाऊस, त्यांचं असं पावसात एकत्र चालणं, हे सगळं असंच राहावं, कधीच थांबू नये असे वाटू लागले.....

क्रमशः

© तेजल मनिष ताम्हणे

🎭 Series Post

View all