
तिची भूक - भाग २
©तेजल मनिष ताम्हणे
स्वाती आणि हेमंतच्या लग्नाला ह्या वर्षी दहा वर्ष पूर्ण होतील. दोन महिन्यांपूर्वी तिच्या धाकट्या दीराचे लग्नं झाले. धाकटी जाऊ आता घरात आली. लहान घर, त्यात नवीन जोडपं, वयस्कर सासू सासरे, स्वाती हेमंत आणि त्यांची मुलं. एवढ्या गोतावळ्यात, म्हणजे आठ माणसांना तीन खोल्यांचं घर म्हणजे सगळ्यांची खरं तर गैरसोय होत असे. स्वाती आणि हेमंत ह्यांनी आपलं वेगळं बस्तान बसवले. घरा जवळच दोन खोल्यांचं घर भाड्याने घेतल आणि त्यांचं चौघांच कुटुंब तिथे स्थलांतर झाले.
नवीन घरात नवीन आयुष्याला सुरुवात करताना स्वातीच्या डोळ्यात मोरपिशी रंगांची स्वप्नं रंगू लागली. तिच्या पसंतिने तिचं लग्न झालं नसलं तरी मागील दहा वर्षात सहवासाने तिला हेमंत विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली होती. तिला हेमंत ने कायम आधार दिला होता. स्वातीच पुढील शिक्षण, तिचा स्वतःचे ट्युशन क्लास सुरू करणे ह्या सगळ्यात नेहेमी त्याची साथ होती. मुळातच शांत, अबोल स्वभावाचा हेमंत, त्याने कधी स्वतीकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली नाही, ना कधी मागील दहा वर्षात स्वाती बद्दल चार कौतुकाचे शब्द बोलला असेल. बायकोची स्तुती करणं, स्व्यांपाकाची तारीफ हे सगळं त्याला कधी जमलंच नाही. त्याच्या भावना त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अव्यक्त असायच्या.
लहान घरात, इतक्या माणसांच्या गोतावळ्यात आपण रहातो म्हणून कदाचित इतकी वर्ष हेमंत मोकळेपणाने बोलले नसतील, असं स्वातीला वाटत होते. आता जेव्हा ते दोघेच राजा राणी आपल्या वेगळ्या घरात, त्याच्या आपल्या विश्वात जातील तेव्हा हेमंत आपल्याशी औपचारिक संवाद सोडून, काहीतरी वेगळं बोलतील अशी स्वातीने स्वतःची भाबडी समजूत काढली. आपला नवरा त्याचं प्रेम व्यक्त करेल, बायकोचे लाड कौतुक करेल, प्रेमाने जवळ घेईल ही एका सर्वसामान्य स्त्रीची ईच्छा, तिच स्वातीची देखील हिच एक छोटी अपेक्षा. नवरा बायकोच नातं, त्याचा अर्थ, त्याची अर्तता हे सगळं कळण्या आधीच ती त्यात नात्यात बांधली गेली होती.
नवीन घर भाड्याने घेतल्या पासून खर्च खरं तर वाढला होता. घर भाड, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी, इतर घर खर्च सगळं होत. खर्च आणि गरजा वाढू लागल्या तेव्हा तिने नोकरी करण्याची इच्छा हेमंतकडे व्यक्त केली. पैशांची कमतरता अशी नव्हती पण तरी शिकवण्या घेण्यापेक्षा नोकरी करून चार पैसे जास्त मिळत असतील तर काय हरकत आहे. तिची हुशारी आणि तिचा ट्युशन घेण्याचा मागील सात आठ वर्षांचा अनुभव गाठीशी आसल्याने, स्वातीला एक नामांकित क्लासेस मध्ये नोकरी लागली. महिन्याला रुपये अठरा हजार पगार देणार होते आणि कामाच्या वेळा दुपारी चार ते रात्री नऊ. मुलांचा तसा प्रश्न नव्हता, त्यांना सासू सासऱ्यांकडे संध्याकाळचे दोन तास स्वाती पाठवू लागली. संध्याकाळचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवला की रात्री घरी आल्यावर तिची धावपळ होत नसे.
नवीन चांगल्या पगाराची नोकरी सुरू झाली. स्वकमाईचा पैसा तिच्या हातात खुळखुळू लागला. कुठल्याही लहानसहान गोष्टींसाठी आता हेमंत कडे पैसे मागावे लागत नसे. तिला हवं तसं तिने घर सजवल, घरात वाण समान भरलं, मुलांसाठी, हेमंत आणि स्वतःसाठी नवीन कपड्यांची खरेदी केली. आयुष्यात पहिल्यांदा स्वातीला इतकं मोकळं वाटू लागल. कसलं दडपण नाही, कोणाला खर्चाचा हिशोब द्यायचा नाही, ना कोणाला कसलं स्पष्टीकरण द्यायचे होत.
मोठ्या क्लास मध्ये नोकरी करत असताना तिथल्या सह शिक्षिकांना पाहून स्वाती मधल इतके दिवस कोमेजलेल स्त्री मन उमलू लागलं. वयाची तिशी जवळ येत असताना स्वातीला स्वतः साठी तयार व्हावं छान कपडे घालावेत, नीट नेटक राहावंसं वाटू लागलं. एरवी नवऱ्यासाठी तयार होणारी स्वाती,तिने काही वेगळं नवीन काही घातलं तरी हेमंत कडून कधी स्तुतीचे दोन शब्द चुकून कानावर पडले नाही. तिचं नवं रूप, साज शृंगार ह्याने तिच व्यक्तिमत्व अधिक खुलल. तिच्यात नव्याने आलेल्या आत्मविश्वासामुळे तिच्या चेहेऱ्यावर एक वेगळच तेज एक वेगळी चमक आली होती.
क्लासचे काम जोमाने सुरू झाले. स्वातीच्या बुध्दीला चालना मिळाली, तिला, तिचं आवडीच क्षेत्र मिळाल्याने ती मेहनतीने आणि मनापासून काम करू लागली. काहीच महिन्यात क्लास मधली सगळ्यांच्या आवडीच्या झाल्या " स्वाती मॅडम". तिच्या आवती भोवती कायम विद्यार्थ्यांचा घोळका असे. कुठल्याही लहान मोठ्या अभ्यासाच्या समस्या ती चटकन सोडून, सहज सोप्या भाषेत मुलांना समजावत असे.
क्लास मधल्या मुली तर स्वातीकडे अधिक लक्ष देऊन, तिच निरक्षण करत असायच्या. स्वातीच्या कडक स्टार्च आणि इस्त्री केलेले कॉटन ड्रेस कधी साड्या, छान नाजून कानातले, ओठाला हलकीशी लिपस्टिक आणि तिच्या ओठां जवळचा लक्ष वेधून घेणारा मोहक तीळ. ह्या सगळ्याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं, स्वाती मॅडम मुलींच्या अती आवडीच्या,त्या जितक्या हुशार तितक्याच दिसायला सुंदर! रोज एकदातरी तिला कोणी तरी सांगायचं, "मॅडम, आज तुम्ही छान दिसताय".
स्वातीला स्वतःची स्तुती ऐकायची आधी कधीच सवय नवती. ज्या स्तुतीची अपेक्षा तिला हेमंत कडून होती, ती इथे क्लास मधल्या विद्यार्थी, सह शिक्षिका ह्यांच्या कडून पूर्ण होऊ लागली. तिला हे सगळं आवडू लागलं, कोणाला नाही आवडणार?
नवीन नोकरी, आवडीचे विषय शिकवून आणि रोज स्वतःची स्तुती ऐकून स्वाती खूप खुश, आनंदी राहू लागली. हेमंत मात्र सुरवातीला नाराज होता कारण तो कामावरून घरी आला की त्याला गरम चहा हातात द्यायला स्वाती नसे.स्वातीचं घरी उशिराने येणं, आल्यावर दमल्यामुळे रात्री लवकर झोपून जाणं हे सगळं हेमंतला खटकु लागलं. घरात पैसा येऊ लागला, स्वातीच्या नोकरीचा घराला मोठा आधार होत आहे, हे पाहून तो गप्प राहिला.
क्लासची नोकरी ही स्वातीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. नोकरीमुळे तिला एक चांगलं दर्जेदार आयुष्य मिळालं, तिच्या मुलांना ती चांगलं खाणं पिणं, कपडे, खेळणी सगळं सगळं देऊ शकली जे एकट्या हेमंतच्या पगारात कधी शक्यच नव्हतं. बघताबघता नोकरीला वर्ष पूर्ण झालं. संसाराची घडी व्यवस्थित बसली असं म्हणे पर्यंत तिच्या आयुष्यात ' सुहास' नावाचं वादळ आलं.सुहास, क्लास मध्ये नुकताच नवीन रुजू झालेला एक हुशार, रुबाबदार तरुण शिक्षक....
क्रमशः
©तेजल मनिष ताम्हणे