तिची भूक - भाग १

A story about young aspiring girl

तिची भूक - भाग १

स्वाती, एक हुशार, मनमिळाऊ शांत स्वभावाची मुलगी. यंदा तिची बारावी, पहिल्यापासून अभ्यासू त्यामुळे स्वातीचा अभ्यास जोमान सुरू होता. घरात ती थोरली, तिच्या पाठीवर दोन बहिणी. घरची परिस्थिती बेताची, चाळीत दोन खोल्यांचे घर. वडील एका प छोट्या कंपनी मध्ये कारकून, त्यांना मिळणार पगार महिन्याचे  खर्च जेमतेम भागवत ते दिवस ढकलत होते. तिची आई गृहिणी, घरी लोणची पापड करून आई देखील आपल्या संसाराला हातभार लावत असे.

"बारावीची परीक्षा उरकली की स्वातीच लग्नं पण उरकून टाकू" त्यादिवशी वडिलांचे हे शब्द स्वातीच्या कानावर पडले. तिचं दुर्दैव की, ती अश्या काळात जन्माला आली होती," जेव्हा मुली हे परक्याच धन असतात" त्यांचं लग्न लाऊन दिलं की एक जबाबदारी संपली. आणि स्वातीच्या वडिलांना अश्या तीन परक्याच्या धनांची पाठवणी करायची होती.  बारावी नंतर डिग्री घेऊन नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं सर्व सामान्य स्वप्नं उराशी बाळगून ती जोमाने अभ्यास करत होती. वडिलांच्या ह्या वाक्यने तिचं बळ हिरावुन घेतले!ती हताश झाली, पण सांगणार बोलणार कोणाशी. कोण समजुन घेईल का??

स्वातीची बारावीची परीक्षा संपली, निकालाची वाटही न बघता तिचं लग्नं आलेल्या पहिल्या स्थळाशी लाऊन दिले. स्वाती दिसायला नाकी डोळी नीटस, ओठांच्या खाली हनुवटी जवळ तो काळा तीळ आणि नेहेमी ओठांवर असलेलं स्मित तिच्या चेहेऱ्याचा गोडवा वाढवत असे. तिला कोणीही पसंत करेल अशीच आपली स्वाती. आलेल्या पहिल्या स्थळाने स्वातीला पसंत केले. तिला अठरा वर्षे पूर्ण व्हायला अजून तीन महिने बाकी होतें पण वडिलांना अजून दोन मुलींचं शिक्षण करून लग्न लाऊन द्यायची घाई होती, त्यामुळे आलेलं हातचं स्थळ घालवणं त्यांना परवडणार नव्हतं.

हेमंत, स्वातीचा नवरा, तिच्या पेक्षा तब्बल
बारा वर्षांनी मोठा. वयातलं अंतर, रूप रंग ह्या गोष्टीचा विचार करून लग्नं करून द्यायला स्वातीच्या वडिलांची जमेची बाजू  नव्हतीच मुळी. हेमंतच्या घरच्यांनी लग्नं ठरवताना सांगितल्या प्रमाणे फक्तं
' मुलगी आणि नारळ ' एवढंच घेतलं. कोवळ्या वयातील स्वातीच्या आयुष्यात "पुरुष" ह्या बद्दल तिने काही कल्पना करण्याआधीच प्रत्यक्षात तिला भेटला, तो हेमंत.

लग्नाच्या पहिल्या रात्री बर्फापेक्षा थंड  पडलेलं स्वातीच्या शरीराशी त्याने त्याच्या मर्जीने संभोग केला. इथे तिचं मन, तिची इच्छा ह्या सगळ्याचा विचार करण्याची गरज त्याला कधी वाटलीच नाही. लग्नं म्हणजे हेच? एवढंच? ह्या सारख्या असंख्य विचारांनी तिच्या मनाचा ताबा घेतला होता अन् हेमंतने पती म्हणून तिच्या शरीराचा ताबा घेतला.

घरात स्वाती,तिचा नवरा, सासू सासरे आणि धाकटा दीर रहात असे. सकाळी उठून सगळ्यांचा चहा नाष्टा, धुणी भांडी,  दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हा स्वातीचा दिनक्रम. सासरच्या घरी तिला सगळ्यात काय आवडले असेल, तर तिथला संडास! दोन गोष्टींसाठी तिची ती प्रिय जगा होती. एक म्हणजे तिथे मनमोकळ रडता येत आणि दुसरं म्हणजे माहेरी चाळीत रहात असल्याने, सहा घरांमध्ये तीन कॉमन संडास. इतकी वर्ष घरा बाहेर संडासला जावं लागत होतं पण आता घरातच असल्याने तिच्यासाठी ते सुख होतं.

लग्नाला सहा महिने होत आले तरी नवऱ्याच्या प्रती, नक्की आपली काय भावना आहे हे अजुनी स्वातीला उमगले नाही. आला दिवस ढकलायचा, रात्र तिची नवऱ्याच्या नावे होती. तो शरीर सुख घेत होता, पण स्वातीसाठी ते सुख म्हणता येईल असं कधी नव्हत. अठराव्या वर्षी तिने शरीर सुखाच्या कल्पना ही केल्या नाही, त्या आधीच काम क्रीडा, तो अनुभव, तो प्रौढ नवऱ्याचा स्पर्श, तिला कधी सुखावून गेला नाही.

स्वातीची शिक्षणाची ओढ तिला शांत बसू देईना.सगळी हिम्मत एकवटून त्या दिवशी हेमंतशी बोलायच असं स्वातीने ठरवल."मी पुढे शिकले तर चालेल का? मला ग्रॅज्युएशन करायचे आहे. घरात राहून, घरचं सगळं करून मी अभ्यास करीन. बाहेरून परीक्षा देईन, म्हणजे रोज कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नाही. फक्तं ४-५ दिवस परीक्षे पुरतं जावं लागेल. तुमची परवानगी असेल तर मी घेऊ पुढच शिक्षण, चालेल का??" बरेच दिवस तिच्या डोक्यात हा विचार होता पण कसं विचारू, काय म्हणतील? ह्या प्रश्नांन मध्येच ती अडकली होती. हेमंतने स्वातीला पुढे शिकण्यास परवानगी दिली. शेवटी शिक्षणासाठी लागणारे पैसे, परीक्षा फी हे तर सगळं हेमंत देणार त्यामुळे त्याची मर्जी आणि परवानगी हवीच.ती मिळताच स्वातीला आज सहा महिन्यांनी मनापासून आनंद झाला.

तिच्या आनंदात आणखीन भर म्हणजे तिला मातृत्वाची चाहूल लागली.स्वातीने गोड बातमी दिल्याने सगळे खुश होते. घरचं काम, स्वतःची तब्येत, अभ्यास सगळं सांभाळण्यात तिची तारेवरची कसरत होत असे.पण शिक्षणाची प्रबळ इच्छा असल्याने तिने घरचं सगळं सांभाळत कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण केले. नऊ महिन्यांनी तिच्या कुशीत एक छोटासा कान्हा होता. स्वाती मातृत्वाचा सोहोळा साजरा तर करत  होती पण मनाने शरीराने ती एवढी मोठी जबाबदारी कशी पेलणार हा मोठा प्रश्न होता. तिच्या वयाच्या मुली जेव्हा कॉलेज, भटकणं, परीक्षा अभ्यास ह्या विश्वात होते, तेव्हा स्वाती शेक शेगडी, लंगोट दुपटी आणि बाळाला दूध पाजण्यात हरवली होती.

तिचा मुलगा आकाश आता दोन वर्षांचा झाला. आकाश अता मोठा झाला, आता त्याच्या पाठीवर एक बहीण हवी म्हणून घरच्यांनी तकादा लावला. स्वाती पुढे तिचं वेगळंच लक्ष होतं. कॉलेजचे हे शेवटचे वर्ष, तेव्हढ पूर्ण झालं की तिला बॅचलर डिग्री हातात मिळेल, स्वातीच ग्रज्यूएट होण्याचं स्वप्न काहीच महिन्यात वास्तवात येणार होतें.त्या आधी पुन्हा दुसऱ्या बाळाच्या जबाबदारी साठी नुकतीच वीस वर्ष पूर्ण झालेली स्वाती तयार नव्हती. ह्या विचारानेच ती अस्वस्थ झाली. नशिबाने तिला साथ दिली, शेवटच्या वर्षाची पररिक्षा संपली आणि काहीच दिवसांनी तिला दुसऱ्यांदा दिवस गेले.

एका गोंडस तेजस्वी मुलीने स्वातीच्या पोटी जन्म घेतला. स्वाती आपल्या विश्वात रमली होती परंतु आपण नोकरी करावी, पैसे कमवावे हे तिचं स्वप्न तिला शांत झोपू देईना. तिच्यात पहिल्या पासूनच एक ऊर्जा होती,  एक आग होती. शिक्षण पूर्ण करून दोन पैसे कमवायचे, घराला हात भार लावायचा, असं तिला नेहेमीच वाटत होते. मुलं लहान, घरात वयस्कर सासू सासरे त्यामुळे घरातून बाहेर पडून नोकरी करणं शक्य नाही मग घरी राहून काही करता आलं तर ? ह्या विचारात ती असताना तिला सुचलं की ती दुपारच्या वळेत घरात राहून पहिली ते बारावीच्या मुलांच्या शिकवण्या सुरू करू शकते.

ही शिकवणी घेण्याची कल्पना तिने हेमंतला बोलून दाखवली. लग्नाला तीन वर्ष होऊन गेली तेव्हा कुठे तिच्यात बिनधास्त बोलण्याच धाडस आलं होतं. तरी दोघा नवरा बायको मध्ये फार काही गप्पा, चर्चा होत नसे. घरातील वाण सामानाची यादी करणे, घरातलं काही काम असेल तर किंवा सासू सासरे, मुलानं विषयी काही बोलणं झालं तर तेवढंच काय ते दोघांमध्ये संवाद. वयातलं आंतर हे एक कारण ह्या दुराव्याच आणि दुसरं म्हणजे हेमंतचा अबोल स्वभाव. त्याच्या ह्या स्वभावामुळे स्वातीच्या भावनिक आणि बौद्धिक गरजा कधी पूर्ण झाल्याच नाहीत. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा ह्या पूर्ण झाल्यावर त्याची पुढील मागणी वाढत राहते, आणि ते स्वाभाविक आहे. स्वातीच्या मूलभूत गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्या. किंबहुना माहेरा पेक्षा इथे सासरी परिस्थिती चांगली असल्याने, म्हंटल तर स्वाती सुखात होती. पण तिला हवा तो भावनिक आणि आर्थिक आधार काही हेमंत देऊ शकत नाही असं तिला वाटत होते. म्हणून आपण स्वतः कष्ट करू, शिकवणी घेऊ आणि चार पैसे कमवू, ही तिची खटपट सुरू होती.

घर, मुलं आणि शिकवण्या हे सगळं नीट सांभाळता येत असेल, तर स्वातीला हवं तर ती घेऊ शकते शिकवणी, असं हेमंत म्हणाला. स्वाती मेहनती आणि तिला कामाचा उरक असल्याने तिने घर काम, स्वयंपाक, मुलांचं खाणं पिणं, खेळणं झोप आणि तिच्या शिकवण्या सगळं व्यवस्थित रित्या सांभाळलं. कोणाला काही तक्रारीची जागा तिने ठेवली नाही. दुपारचे दोन तीन तास शिकवणी घेऊन, ती  महिन्याला आता दोन हजार रुपये कमवू लागली. तिचा आत्मविश्वास वाढला, आपणही काहीतरी करू शकतो, ही भावना खूप  सुखावणारी होती.

कालांतराने स्वातीच्या क्लासचा चांगला जम बसला. बघता बघता सात आठ वर्षे सरली.सकाळी घरची काम झाली, मुलं शाळेत गेली की स्वाती कॉलेजच्या मुलांचे क्लास घेऊ लागली. आता ती महिना आठ ते दहा हजार रुपये कमवू लागली.हळू हळू पैसे कमावण्याची तिची भूक वाढू लागली.स्वतः पैसे कमवून स्वाती तिची आर्थिक गरज तर मिटवू लागली, पण तिची भावनिक आणि शारीरिक गरज त्याचं काय ?? हेमंत बरोबर ती फक्तं एका छता खाली रहात होती, लग्नाच्या बेडीत अडकून. नवरा म्हणून त्याचं सगळं भागत होते, पण स्वातीचं समाधान? तिची भावनिक गरज? शारीरिक सुख? तिची हीक भूक भागेल??

क्रमशः

©तेजल मनिष ताम्हणे

🎭 Series Post

View all