तिचे नातेवाईक ( भाग तिसरा )

एखादी व्यक्ती झाडां सोबत भावनिक दृष्ट्या किती जोडली गेलेली असते याची एक विलक्षण कथा


तिचे नातेवाईक ( भाग तिसरा )

विषय: नातीगोती

" सर, आज माझा वाढदिवस याचा अर्थ मी जिथून मी आले आहे त्या  आश्रमात आज मी सापडली आहे  असा होतो. हो, मी अनाथ आहे. आश्रमाच्या बाहेर ठेवलेल्या पाळण्यात मला आज माझी आई मला सोडून गेली होती. ज्या दिवशी जो सापडतो ती त्याची जन्मतारीख असते. "

" जाऊ दे ग. बाहेरच्या जगात देखील,  तुझ्या भाषेत सांगायचं तर आश्रमात,जो ज्या दिवशी सापडतो ती त्याची जन्म तारीख असते. "

आता मला धक्का बसण्याची पाळी होती. नेहमी गप्प असणारी निराली बोलायला लागली होती.

" पण सर मी अनाथ आहे. किंवा मला माझ्या आईने आश्रमात सोडलं आहे या गोष्टीच मला कधीच वाईट वाटलं नाही . उलट तिने मला लहानपणीच आश्रमात टाकलं. हे खूप उपकार केले असं मी मानते. मी केडगावच्या  शारदा आश्रमात वाढले. मोठी झाले. मला याचा खूप अभिमान वाटतो. "

" आश्रमात वाढल्याचा अभिमान ? "

" हो सर, मला सांगा ना, तुम्हा सुरक्षित लोकांचं कुटुंब असून असून किती लोकांचं असू शकतं.? आई वडील आणि मुलं, जास्तीत जास्त आजोबा आजी. पण आमचा विचार करा सर, आम्हाला दर एक दोन महिन्यात एक एक भावंड मिळायचं. त्या नवीन येणाऱ्या बाळाची काळजी सगळे जण तितक्याच प्रेमाने घ्यायचे. आमच्या आश्रमात जवळ जवळ चाळीस च्या वर आया होत्या. ज्या माया करण्यात सख्या आईला पण मागे टाकतील.

तुम्हाला कल्पना पण येणार नाही. इतकं आम्हाला जपलं जायचं. बाहेरच्या कोणत्याही वाईट गोष्टींचा आमच्याशी कधी संबंध येऊ दिला जायचा नाही. त्या मुळे खूप सुरक्षित वाटायचं. आजकाल सर, तुम्हीच सांगा ना, मुलं रडायला लागलं तर आई त्याच्या हातात मोबाईल देऊन देते. आणि ते गप्प बसते. पण त्यातून ते काय संस्कार घेत काय काय शिकत याला जबाबदार कोण. "

मी दंग होऊन तिची हकीकत ऐकत होतो.
"हे सगळं ठीक आहे. पण तुझं हे झाडांच्या वेडाच काय ? " मी आज तिच्याशी पूर्ण बोलयचच ठरवल.

" वेडं नव्हतं सर. ते आमचं विश्व् होतं. आमच्या आश्रमात दुसरं असं काहीच नसायचं. सगळी कडे झाडंच असायची. आम्ही सगळ्या मुली त्या झाडांशी जोडल्या जायचो. एक मुलगी दाखल झाली की तिच्या नावाने एक झाडं लावायचं. आणि ती थोडी मोठी झाली की तिच्या वर त्या  झाडाची जबाबदारी सोपवायची. झाडांमुळे आम्ही  पार  जमीनीच्या खालपासून ते आकाशा पर्यंत एकमेकांशी जोडलो गेलो होतो. त्या मुळे आमचं कुटुंब आमच्या कुटुंबातले संबंध खूप जवळचे झालेले असतं.

पण मला जेंव्हा ही नोकरी लागली. तेंव्हा मला हे बाहेरच जग  एकदम परकं, अपरिचित  वाटायला लागलं. जिथं माझं कोणीच नव्हतं. आणि अचानक माझं नजर आपल्या ऑफिसच्या आवारात असलेल्या या फुलझाडांवर गेली. ते झाडं जणू मला हसत म्हणत होतं, वेडे मी आहे ना तुझ्या माहेरचा सक्खा नातेवाईक, इथे तुझ्या सोबतीला. कशाला काळजी करतेस.

आणि मी एकदम निर्धास्त झाले. आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्या झाडाला राखी बांधणार होते, त्याच्याशी गप्पा मारणार होते, त्याला पाणी पाजणार होते.

आणि मी आज त्याच्या प्रेमापुढे हरली. आज माझा वाढदिवस, मी त्याला भेटायला जायच्या आधी तेच मला या नव्या रोपाच्या रूपाने भेटायला अगोदर आलं.त्याच्या या प्रेमाच्या विराट दर्शनाने मला रडू आवरलं नाही सर. माफ करा. आणि ती ते रोप घेऊन गेली. "

आणि त्या रोपाला एखाद्या लहान मुलासारख कुरवाळून ती बाहेर घेऊन गेली.

थोड्या वेळाने सहज खिडकी बाहेर नजर गेली तर तिने झाडाला राखी बांधली होती आणि दोघांच काहीतरी हितगुज सुरु होतं.त्या सुंदर पहाटेच्या सूर्य प्रकाशात निराली विलक्षण सुंदर दिसत होती.

( समाप्त )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all