तिचे नातेवाईक (भाग एक )

एखादी व्यक्ती झाडां सोबत भावनिक दृष्ट्या किती जोडली गेलेली असते याची एक विलक्षण कथा


तिचे नातेवाईक ( भाग एक )

विषय: नातीगोती

तिचं नावं निराली. खरोखरच नावाप्रमाणे ती निराळी होती कोणाशी बोलणं नाही की हसण नाही. नेहमी ड्युटीवर आली की पहिल्यांदा झाडांजवळ जायचं . त्यांची पाने निरखायची. फुले निरखायची. एखादं झाड  वाळलं असेल तर,  त्याला पाणी घालायचं. अगदी बारकाईने प्रत्येक झाडाचा निरीक्षण करायचं असा तिचा दिनक्रम. बाकी कोणाशी बोलण नाही की, कोणाशी संवाद नाही. कोणाशी जवळीक नाही . आपलं काम भलं की आपण भले. कोव्हीडच्या काळात आमच्या दवाखान्याच रूपांतर कोविड सेंटर मधे झाल, त्या मुळे दुसऱ्या युनिट मधल्या अनेक लोकांची तात्पुरती बदली आमच्या युनिटमध्ये झाली. होती त्या तात्पुरत्या बदलीमध्ये ती पण आली होती.  ती आमच्या इथला पर्मनंट स्टॉफ नव्हती. त्यामुळे तिची  जास्त कोणाशी ओळख नव्हती आणि मुळातच ती अबोल असल्यामुळे ती कोणाशीही जास्त बोलतही नसे. पण या वेगळ्या, छोट्या सतत झाडाजवळ दिसणाऱ्या मुली विषयी मला वेगळच  कुतूहल निर्माण झाल होतं. आमच्या दवाखान्याच्या आवारात आम्ही भरपूर झाडे लावलेली असल्यामुळे ती कोविड सारख्या काळात देखील अतिशय आनंदी असायची आणि कामावर आली की नेहमी झाडाजवळ बसायची.

त्या दिवशी माझं लक्ष सहज खिडकी बाहेर गेलं. सकाळ च कोवळं उन्ह पडलं होतं. रोजच्या प्रमाणे आजही ती झाडांजवळच बसलेली होती.त्या तिच्या जगात ती आणि ते झाडं या व्यतिरिक्त कोणालाच स्थान नव्हतं.

मी आत्ता पर्यंत फुलझाडांना न्याहाळतांना खूप जणांना पाहिलं आहे. पण तिचं झाडांजवळ बसणं आणि फुलांना न्याहाळणं इतकं विलक्षण वेगळं वाटायचं की सकाळच्या कोवळ्या उन्हात फुलझाडं आणि फुलं जणू तिच्याशी  खूप गुजगोष्टी करताहेत. तर कधी वाटायचं की एखादी आई आपल्या मुलांसोबत उन्हात गप्पा मारत बसली आहे. बरं ही मुलगी खूप अबोल. पण झाडांजवळ गेली की तिचा अबोला जणू संपून जायचा आणि एका गूढ भाषेत त्यांच संभाषण सुरु व्हायचं. कधी कधी मला त्या फुलांचा हेवा वाटायचा. बरं कधी फुलं तोडणं नाही की माळण नाही. फक्त त्यांच्या जवळ जाऊन बसणं. त्यांना न्याहाळणं. कोणाशी बोलण्याची गरज नाही. की कोणाचा संबंध नाही. एखाद्या फुलाला ईतका अलगद स्पर्श करायची की जणू काही एखाद्या बाळाच्या गालालाच आपण हात लावतो आहे.

मी तिचा बॉस. त्या मुळे जेव्हढ्यास तेव्हढं बोलणं व्हायचं. मध्यंतरी तिची अचानक कोविड पेशंट चेकिंग साठी एअरपोर्ट वर ड्युटी लागली. कोविडच्या काळात प्रत्येक ड्युटी इमर्जन्सी असल्यामुळे, जिथे ड्युटी लागेल तिथे जावं लागायचं.  तिची ड्युटी बद्दल कोणतीही तक्रार नसल्यामुळे तिने कोणतीही तक्रार न करता एअरपोर्टवर ड्युटी जॉईन केली.

कोणाशी जास्त बोलणं चालणं नसल्याने तिचं असणं आणि नसणंही त्या काळात कोणाच्या लक्षात यायचं नाही. पण माझ्या ऑफिसच्या खिडकीतून ती मला रोज दिसायची, ती अचानक न दिसायला लागल्या मुळे काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. काहीतरी सुनं सुनं.  ती फुलझाडं देखील निराधार वाटायची.  आई कामावर गेल्यावर मुलं कशी वाटतात न अगदी तशी. मी हे सांगतो आहे ना त्या पेक्षा जास्त तिचं त्या फुलांशी नातं होतं.

तब्बल ती दोन महिन्यांनी परत आली. आल्या बरोबर, मस्टर वर सही केल्या नंतर लगेच ती तिच्या लाडक्या फुलझाडांना भेटायला जायला ती वळणार तोच मी तिला म्हटलं .

" एक मिनिट निराली. ड्युटी कशी होती एअरपोर्टवर. ? "

" चांगली होती सर. पण विमानतळावर फुलझाडं मीस करायची मी."

" काम खूप असायचं ना. ?"

" हो, पण तिथं फुलझाडं असती ना तर  जाणवलं नसतं जास्त  काम.

" गुड. म्हणजे तुला फुलं खूप आवडतात तर. ठीक आहे. ठीक आहे. जा तू आता. " मी म्हटलं.

तिचं फुलझाडांवरच अफाट प्रेम खरंच अचाट होतं. पण तिच्या ईतक झाडांच्या प्रेमात पडलेल या आधी मी कोणाला पाहिलं नव्हत.

हे थोडं अनैसर्गिक वाटतं होतं.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all