तिचे मन

Story Of A Woman Who Is Hurt By Behavior Of Others
"हॅलो, कशी आहेस तू आता? हो मला आईने सांगितले तुला बरं नाही म्हणून.. काळजी घे.. आणि हो काही लागलं तर नक्की सांग." सायलीचा फोन सुरू झाला आणि समीर व मायराने एकमेकांकडे पाहिले आणि चला आता अर्धा तास तरी हि आपल्यासोबत नाही असे म्हणत एकमेकांना टाळी दिली आणि आपली उरलेली वेबसिरीज पाहायला सुरुवात केली.. साधारणता चाळीसेक मिनिटांनंतर सायली आली..
   "अरे, ऐकलस का? त्या मामांच्या सुनेला ना करोना झाला."
   " हो, तुझ्या सुरूवातीच्या बोलण्यावरून ते कळले. मग तू काय मामांशी बोलत होतीस का?"
    "नाही, मी तिच्याशीच बोलत होते."
    " अग, पण तू तिच्याशी जास्त बोलताना मी तुला कधीच पाहिले नाही."
    " हे बरे आहे? मी तुझ्यासमोर बोलत नाही , म्हणून बोलतच नाही? आणि ती ना क्वारंटाइन आहे. वैतागली असेल एकटी बसून, म्हणून केला रे फोन."
   " बाबा, ममा ना जगन्मैत्रीण आहे. ती कोणाशीही बोलते. तुम्ही जाऊ द्या तो विषय आपल्या दोघांना नाही जमणार ते", मायराने विषयच संपवला.

       समीर, सायली आणि त्यांची गोड मायरा.. तिघांचे एक छोटे आणि सुखी कुटुंब.. समीरचा छोटासा व्यवसाय होता.. सायलीची नोकरी.. आणि मायराचे कॉलेज सगळे छान सुरू होते. सायली हि अगदीच माणूसवेडी होती. सगळ्यांचे म्हणजे फक्त माहेरचे नाहीत, सासरचे ,कामावरच्या माणसांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवणे ,त्यांना विश करायला तिला फार आवडायचे. जवळच्या लोकांची आवडनिवड लक्षात ठेवून त्यांना त्यांच्याच आवडीची भेटवस्तू देण्याच्या तिच्या पद्धतीचे तर सगळीकडे कौतुक व्हायचे. वाचन, बागकाम या सगळ्यांची आवड त्यामुळे तिथे झालेल्या ओळखी, शाळेचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप त्यामुळे भरपूर मोठा मित्रपरिवार होता तिचा.. ती सुद्धा घरकाम, ऑफिस, मुलगी हे सगळे सांभाळून सगळ्यांच्या संपर्कात असायची..कोणी आजारी असेल , काही अडचणीत असेल तर जसे कळेल तशी ती मदतीला जायची ते हि शक्य नसेल तर फोन तर करायचीच..
   
       " काय ग, रात्री दहा वाजता कोणाचा फोन आता?"
       " अरे तुला माझी ती मैत्रीण माहित आहे का योगिता म्हणून?"
      " हजार मित्रमैत्रिणी तुझ्या, किती लक्षात ठेवायच्या?"
     "मग विचारतोस कशाला?"
    " हि वेळ आहे का फोन करायची?"
    "अरे , तिचा मुलगा हॉस्टेलवर आहे म्हणून थोडी निराश आहे ती. त्यात तिचा नवरा सुद्धा चार दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला आहे. एकटे वाटत होते म्हणून तिने फोन केला."
     " व्वा, आता तू कौन्सिलिंग पण सुरू केलेस का? थोडा वेळ आम्हा घरच्यांना पण द्या कि.."
     "तुमच्यासाठी नेहमीच तर असते मी. पण असे वाटते कि आपल्या चार शब्दांनी लोकांना बरे वाटत असेल तर का नको करायला."
     " याला हरकत घेणारा मी कोण? पण लोक आपल्या सोयीने वागतात, हे विसरू नकोस. तुलाच याचा नंतर त्रास होईल याची मला भिती वाटते."
    "चल सगळी आपलीच माणसे आहेत , कोणी असे वागणार नाही," असे हसून सायली समीरला म्हणाली खरे पण आतमध्ये कुठेतरी तो जे बोलतो आहे हे खरे आहे हे तिला माहीत होते. आजकाल बरेचजण तिला गृहित धरायला लागले होते..काही दिवसांपूर्वी तिच्याच मावसभावाच्या मुलीच्या वाढदिवसाचे फक्त तिलाच आमंत्रण नव्हते. बरे त्याचे आणि तिचे काही भांडणंही नव्हते. जेव्हा बाकी सगळ्यांचे फोटो तिने पाहिले खरेच वेगळे पडल्याच्या भावनेने तिचे डोळे पाणावले होते.दिवसभर ती गोष्ट तिला खुपत होती. तिचा मूड बघून समीर आणि मायराने गप्प राहणेच पसंत केले होते. रात्री त्या भावाचा फोन आला,
   " हॅलो ताई.."
   " बोल ना.."
    " सॉरी.."
     " कशासाठी?"
    " अग मला वाटले तुझी वहिनी तुला फोन करून, आणि तिला वाटले मी आणि या गडबडीत तुला आमंत्रण द्यायचेच राहून गेले."
    "ठिक आहे रे. होते असे कधीतरी."
    " मला माहीत होते, तू चिडणार नाहीस. एक काम कर तुम्ही सगळे उद्याच इथे या. आपण परत पार्टी करू."
     " नाही रे, सध्या जरा मला बरे नाही.. त्यामुळे नको.. मी बोलू नंतर?"
  खरेतर तिला त्याचा राग नव्हता आला पण खूप वाईट वाटत होते. हा खरेच बोलवायला विसरला कि त्याला बोलवायचेच नव्हते , नाही म्हटले तरी हा विचार डोक्यात येतच होता..
       " समीर , तुला काय वाटते , मी लोकांच्या खूप पुढे पुढे करते?"
      " नाही, का ग? काय झाले?"
      " काही नाही, योगिताचाच फोन आला होता. तिने कोण बोलले हे सांगितले नाही. पण म्हणे , हिच्याच बरे सगळ्यांचे वाढदिवस लक्षात राहतात. आम्हाला पुढे पुढे करायची सवय नाही ना म्हणून.. सगळीकडेच हिचे नाव , आम्हाला काही जमत नाही का? पण नाटकं नुसती हिची.. 
तू सांग मी काही नाटक म्हणून सगळ्यांशी बोलते का?" सायलीला रडू येत होते.
      " हे बघ, बोलणारे बोलतात, आता तुझा स्वभाव आहे लोकांमध्ये मिसळून राहण्याचा, सगळ्यांनाच नाही जमत ते. मग हे असे होतच राहणार. तुझा स्वभाव बदलणार का तू?" समीर तिला समजावत म्हणाला..
      " हो आता मलाही तेच वाटतय.. काही जणांना फक्त गरज असेल तरच मी आठवते, इतर वेळेस माझे काय चालले आहे ते सुद्धा कोणी विचारत नाही.." सायली खरेच दुखावली गेली होती..पण तिला काही हे सगळे बंद करणे जमले नाही. कमी मात्र नक्कीच झाले होते. याच्यावर उंटावरची काडी ठरली एक प्रसंग...
          जवळ जवळ पंधरा दिवस सायली आजारी होती. प्रत्येक वेळेस येणाऱ्या मॅसेजेसला उत्तर देणे शक्य नाही म्हणून तिने स्टेटस ठेवले होते. नॉट वेल म्हणून... पण मोजून काही लोकांनीच जेव्हा तिची चौकशी केली ,तेव्हा तिच्या मनात येऊन गेले, हिच का ती लोक जे त्यांच्या अडचणींसाठी किंवा कामासाठी वेळकाळ न बघता मला फोन करत होते. पण आज मला एक मॅसेज करायला त्यांना वेळ नाही. संक्रांतीचे सगळेजण नवीन कपडे घालून छान छान फोटो अपडेट, अपलोड करत होते, पण आपण मॅसेजही करत नाही म्हणून एकालाही साधे विचारावेसे सुद्धा वाटले नाही.. हिच अशीच असतात का आपली मानलेली माणसे? न राहवून हे सगळे विचार तिने लेकिला आणि नवर्‍याला बोलून दाखवले.. मानसशास्त्र शिकणारी लेक यावर म्हणाली, " ममा जग हे असेच असते, असेच चालू राहणार असते.. आपल्याला ठरवायचे असते कसे वागायचे.. तू ना थोडी या सगळ्यातून बाहेर यायला शिक.. थोडी परिघावर रहा, म्हणजे तुला कसलेच वाईट वाटणार नाही.."
     "अगदी बरोबर आहे तुझे, मी ना कोणामध्येच आता गुंतवून घेणार नाही स्वतःला.."
     इतक्यात सायलीला तिच्या नणंदेचा फोन आला, " वहिनी पुढच्या महिन्यात अमकीतमकीचा वाढदिवस आहे. आपण तिला सरप्राईज देऊ या का?"
     " हो ताई .. मी काय म्हणते.....


"


हे पाहून समीर आणि मायराने डोक्यावर हात मारून घेतला....




कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका...

सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई