Login

तिचे कर्तव्य भाग 1

About Relation

"अहो आई, साड्या आवडल्या का तुम्हांला? रंग खूप छान आहेत ना! तुमच्या आवडीचे रंग आहेत ना!"

स्नेहाने आपल्या सासूबाईंना उत्साहाने विचारले.

"हो,छान आहेत गं साड्या आणि रंग तर माझ्या आवडीचेच आहे. छान चॉईस आहे तुझी."

सासूबाईही सुनेचे कौतुक करत आनंदाने म्हणाल्या.

"अगं, पण दोन का आणल्या गं? आणि किती महागड्या किंमतीच्या साड्या आहेत या? मला कपड्यांवर एवढा खर्च केलेला आवडत नाही. माहिती आहे ना तुला?"

सासूबाई चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणत स्नेहाला म्हणाल्या.


"आई, एक साडी तुमच्यासाठी आहे व एक माझ्या आईसाठी आणली आहे. तुम्हांला जो रंग जास्त आवडत असेल ती साडी तुम्ही घ्या. दुसरी साडी मी माझ्या आईला देणार आहे."

सासूबाईंच्या खोचक प्रश्नाला शांतपणे उत्तर देत स्नेहा म्हणाली.

स्नेहाचे उत्तर ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव जाऊन थोडेसे रागाचे भाव उमटले. ते भाव लपवण्याचा प्रयत्न करत त्या स्नेहाला म्हणाल्या,

"मला वाटलं..दोन्ही साड्या माझ्यासाठीचं आणल्या आहेत. म्हणून म्हटले तसे..."


सासूबाईंनी चेहऱ्यावरील भाव लपविण्याचा किती प्रयत्न केला तरी, स्नेहाला त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेल्या हावभावावरून व त्यांच्या बोलण्यातील बदललेल्या स्वरातून.. त्यांच्या मनात काय सुरू आहे? त्यांना पुढे काय म्हणायचे आहे? याचा अंदाज आला होता.

आता या सर्व गोष्टी अंगवळणी पडल्यामुळे आणि नको तिथे वाद करण्यापेक्षा शांत राहत.. आपले काम करत राहणे. असे स्नेहाने ठरवलेले असल्याने, ती सासूबाईंशी या गोष्टीवर जास्त काही न बोलता आपल्या कामात गुंतून गेली.


'आपली सून आपल्याशी कितीही चांगली वागत असली तरी तिच्या माहेरचे नाव निघताच...सासूबाईंच्या चेहऱ्यावर आठ्या का उमटतात?'

हा प्रश्न स्नेहाला नेहमीच पडलेला असतो.

तिने अनेक ठिकाणी पाहिले होते की, मुली सासरी काही कळू न देता आई वडिलांना मदत करत असतात. त्यांचा हेतू एवढाच असतो की, आपल्यामुळे घरात वाद नको.

पण स्नेहाचे म्हणणे होते की,
आई वडिलांना मदत करायची तर ती सासरच्यांना न सांगता किंवा लपून-छपून का करावी? उलट त्यांना सांगून, त्यांच्या देखतच करावी. कारण सून किती चांगली वागत असली आणि तिच्या माहेरचे कितीही चांगले असले तरी.. सासूबाईंना वाटत असते की, 'आपली सून इकडूनच सर्व घेऊन जात असते आणि माहेरचे नाव सांगत असते. माझा मुलगाच सर्व खर्च करत असतो.'


क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all