Mar 01, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग (कविता वायकर)-भाग २

Read Later
तिचं जग (कविता वायकर)-भाग २


"पाहिले सीमा, यासाठीच म्हणत होतो मी; नको धावूस मृगजळाच्या पाठी. तू आतापर्यंत एवढं सगळं केलं, लेकरासाठी दिवसरात्र खस्ता खाल्ल्यास; त्याचा काय उपयोग झाला?"

बायकोसाठी सुजयचाही जीव तीळतीळ तुटत होता. गेल्या एक ते दिड वर्षापासून सीमा स्मितासाठी आणि तिच्या बाळासाठी स्वतःला विसरली होती. स्वतः अजून आई नव्हती झाली पण धाकट्या जावेच्या गरोदरपणात तिने जणू स्वतःच्या मातृत्वाचा सोहळा मनी सजवला होता.
नऊ महिने स्मिताला तिने फुलासारखे जपले होते. तिला काय हवं नको ते सारं सीमाने पाहिलं होतं.

स्मिताच्या रुपाने जणू ती स्वतः तिचे आई होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी जगत होती. कृष्णाच्या जन्मानंतर तर सीमाचे जणू विश्र्वच बदलून गेले. कित्ती तो आनंद? स्मिता आणि कृष्णा यापलीकडे तिला दुसरे काहीच दिसत नव्हते. त्या दोघांभोवतीच तिचे नवे जग तयार झाले होते जणू आता.

स्मितालादेखील सीमाच्या या वागण्याचा खूप हेवा वाटायचा. सीमामुळेच स्मिताने डिलिव्हरीनंतर चार महिन्यातच ऑफिस जॉईन केले. सीमासारखी मोठी आई असेल कृष्णाची काळजी घ्यायला तर कोणती आई निर्धास्त राहणार नाही?

कृष्णाची शी-शू, त्यांचं खाणं-पिणं, झोप या साऱ्या गोष्टींची सीमा अचूक काळजी घेत होती. एवढंच नाही तर कृष्णाला पाहून घरातील सर्व कामेदेखील ती मोठ्या आनंदाने करत होती. तशा सासूबाई होत्याच म्हणा मदतीला.

"मी स्वतः आई झाले असते तर आज मला हे सगळं करावंच लागलं असतं." असे म्हणत, येणारा प्रत्येक दिवस सीमा कृष्णासोबत आनंदाने जगत होती. तसेच आई न होताही स्वतःचे आईपण मात्र मनापासून जपत होती.

"ताई मी खूप नशीबवान आहे ओ, तुमच्यासारखी माया लावणारी जाऊ कमी आणि मोठी बहीण मला मिळाली. आजकाल कोण करतं ओ कोणासाठी एवढं? आणि जावे जावेच्या नात्यात तर बिलकुलच नाही."

"अगं कोण म्हणतं आपण जावा जावा आहोत? तुझ्या रुपात मला माझी लहान बहिणच मिळाली आहे."सीमाच्या मनाचा मोठेपणा तिच्या प्रत्येक शब्दातून आणि वागण्यातून नेहमी जाणवायचा स्मिताला.

परंतु, कोणाची दृष्ट लागली या प्रेमाच्या नात्याला देवच जाणे? 

कृष्णा जसजसा मोठा होत होता तसतसा दिवसेंदिवस स्मिताच्या वागण्यात मात्र बदल होत होता. जणू काही सीमाने कृष्णाशी साधलेली अतिजवळीक तिला खटकत होती. सुजयला या गोष्टी जाणवत होत्या, स्मितामध्ये होत असलेला बदल तो जवळून पाहत होता. वेळोवेळी तो सीमाला अप्रत्यक्षपणे त्याची जाणीव करून देत होता. पण सीमा, स्मिता आणि कृष्णाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिला चुकीचे काही दिसतच नव्हते.

अखेर कृष्णाच्या पहिल्या वाढदिवशी जे व्हायला नको होते तेच झाले. स्मिताला आई म्हणून जो मान मिळायला हवा होता तो मात्र सीमाला मिळाला. लेकरू इतकं रडत होतं की, ते जन्मदात्या आईजवळदेखील राहायला तयार नव्हतं.

शेवटी सर्वांच्या आणि विशेष करून सासूबाईंच्या आग्रहास्तव सीमाने त्याला जवळ घेतले. आणि आश्चर्य या गोष्टीचे की, तो इवलासा जीवदेखील सीमाच्या त्या प्रेमळ स्पर्शाने लगेचच शांत झाला.

खऱ्या अर्थाने ही जणू यशोदा माईच्या प्रेमाची, तिच्या त्यागाची खरी ताकद होती. उदरात नऊ महिने बाळाला न वाढवताही ती जशी कान्हाची आई झाली होती अगदी तशीच सीमा कृष्णाची आई बनली होती.

सोप्पं नाही हो, बाळाला जन्म न देताही एखाद्याच्या लेकराची आई बनून त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व बहाल करणं. मातृत्वाची भूक जर मनापासून असेल तर मग असे आईपण जगणे आणि जपणे, सोप्पे झालेच म्हणून समजा.

सीमा जरी यशोदा बनून कृष्णाची काळजी घेत होती, तरी स्मिताला मात्र ते आता खटकू लागले होते. खरा मान तिचा असतानाही तो सीमाला मिळाला, हे असे सगळे घडत असताना कोणत्या आईला वाईट वाटणार नाही म्हणा? पण त्यानंतर जे काही झाले ते मात्र सर्वांसाठी अनपेक्षित तर होतेच पण त्याबरोबरच सर्वांच्या कल्पनेच्या पलीकडे होते सारे काही.

गेल्या काही दिवसांपासून स्मिता खूप बदलली होती. तिची चिडचिड खूपच वाढली होती.

"अरे! लिमिट असतं की नाही काही गोष्टींना? मलाही वाटतं माझ्या मुलासोबत थोडा वेळ एकटीने घालवावा, त्याच्याशी खेळावं, त्याला कुशीत घेवून अंगाई म्हणत झोपवावं, पण आजकाल मी जन्म देवूनही माझा मुलगा माझ्याच वाट्याला येईना झालाय. सारखी आमच्या मधेमधे लुडबूड करत असतात सीमा ताई. थोडा वेळ त्याला घेवून बसलं की, \"स्मिता जा तू आराम कर थोडावेळ, तोपर्यंत मी त्याला खाऊ घालते.\"
अरे! नाही मला आराम करायचा, कसं लक्षात येत नाही त्यांच्या. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या का मी? नाही सहन होत रे सतिश आता."

"स्मिता वहिनीच्याही भावना समजून घे ग जरा. काय झालं तिने हे सगळं केलं तर? अगं तूच तर म्हणतेस ना की, \"ताई आहेत म्हणून, नाहीतर माझं काय झालं असतं?\" मग आता तूच असं बोलतेस? अगं कृष्णा म्हणजे वहिनीचं सर्वस्व बनलाय ग. तिचं विश्व बनलाय तो आता. किती मनापासून करते ती त्याचं सगळं. अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्याला जीव लावते. मग आपणही तिच्या भावनांचा आदर नको का ठेवायला?"

"खरंय रे तुझं. पण नाही माहित मला आजकाल काय होतंय?खूप भीतीही वाटते रे. खरंच, ताई आहेत म्हणून मी खूप टेन्शन फ्री आहे कृष्णाच्या बाबतीत. पटतंय मला सगळं.पण आजकाल माझं मलाच कळेना झालंय, नेमकं काय होतंय मला? ताईंची त्याच्याप्रती असलेली अतिकाळजी, नाही आवडत मला. मी आई आहे कृष्णाची. मलाही कळतात काही गोष्टी. इतकीही अडाणी नाही मी. हे का कळत नाही त्यांना?"

स्मिताच्या मनात निर्माण होणारी ही अनाकलनीय भीती, तिची होणारी घुसमट सतिशला समजत होती. पण तिला सांगून, बोलून सध्यातरी काही गोष्टी पटणाऱ्या नव्हत्याच. म्हणून तिला शक्य तितक्या शांततेत तो काही गोष्टी समजावून सांगायचा.

तिच्या मनाची नाजूक अवस्था तो काळजीपूर्वक जपत होता. डिलिव्हरीनंतर विनाकारण अशी चिडचिड होणं स्वाभाविक आहे; हे त्यालाही ठाऊक होतं. म्हणून तर वेळोवेळी तो तिची समजूत काढत तिच्या मनातील भीती दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करत राहायचा.

पण कृष्णाच्या बर्थ डेच्या दिवशी मात्र परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली. आनंदात वाढदिवस पार तर पडला, पण पाहुणे गेल्यानंतर जे काही झाले ते सर्वांसाठी अगदी शॉकींग होते. घरात कोणाला वाटलेही नव्हते की, या एवढ्याशा कारणावरून स्मिता घर सोडून जाण्याची इतकी टोकाची भूमिका घेईल.

स्मिताने तिचा निर्णय ऐकवल्यावर सीमाने मात्र खूपदा माफी मागितली तिची. खूप मनधरणी केली, पण स्मिता मात्र तिच्या मतावर ठाम होती. आता ती कोणाचेही ऐकेल असे वाटत नव्हते.

हा सर्व प्रकार सुरू असताना ते लहानगं लेकरु मात्र सीमाकडे येण्यासाठी धडपडत होतं. पण त्याला तरी काय माहीत, हेच तर त्याच्या जन्मदात्रीला नको आहे.

सीमाच्या अश्रूंचा बांध आता ओसंडून वाहत होता. खूप विनवणी करुनदेखील तिचे सारे प्रयत्न निष्फळ ठरत होते.

सतिशनेही स्मिताला खूप समजावले. पण ती ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हती.

"हवं तर तू चार दोन दिवस माहेरी जा, बरं वाटेल तुला. आल्यावर बोलू आपण या विषयावर." सतिश स्मिताच्या मनाचा अंदाज घेतच बोलला.

"तू येणार नसशील तर तसे सांग. मी जाते माझी माझी. पण आता एक क्षणही मी या घरात थांबणार नाही." तिनेही स्पष्ट शब्दात तिचे मत सतिशला सांगून टाकले. आता त्याचाही नाईलाजच होता.

"आता खूप उशीर झाला आहे स्मिता, आज नको उद्या सकाळी जाऊयात. इतक्या उशिरा रुम तरी कुठे मिळणार?" सतिशने तात्पुरती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. \"राग शांत झाला की होईल स्मिता शांत.\" असे वाटले त्याला क्षणभर.

परंतु,"आपण आईच्या मैत्रीणीच्या फ्लॅटवर राहूयात. तसेही शमा मावशीने आईला सांगितले आहे, कोणी भाडेकरू असेल तर सांग म्हणून. त्यांचे जुने भाडेकरू नुकतेच दुसरीकडे शिफ्ट झालेत. योगायोगाने फ्लॅट रिकामाच आहे सध्या आणि आईच्या घरापासून अगदी पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे.

स्मितानेही लगेचच सतिशच्या प्रश्नावर आधीच पर्याय शोधून ठेवला होता जणू. तिचे हे बोलणे ऐकून सर्वांना मात्र धक्काच बसला.

क्रमशः

खरंच वेगळं राहण्याचा स्मिताचा निर्णय तिचा स्वत:चा असेल की, दुसऱ्या कोणाचा? तसेच नोकरी सांभाळून कसं सिद्ध करेल ती तिचं मातृत्व?जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//