तिचं जग (कविता वायकर)-भाग १

देवकी बनून कान्हाला जन्म देणं सोप्पं पण यशोदा बनून त्याचा सांभाळ करणं त्याहीपेक्षा कठीण.


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
फेरी दुसरी - जलद कथामालिका लेखन
विषय - तिचं जग (कविता वायकर) भाग १

"अहो तुम्ही तरी थांबवा ना त्यांना. नका ना इतकी टोकाची भूमिका घेवू देऊ."

"जावू दे सीमा, आता बोलून काहीच उपयोग नाही. आपण नाही कोणाला अशी जबरदस्ती करू शकत."

"इतक्या सहज हे कसं काय बोलू शकता हो तुम्ही? मी नाही राहू शकणार कृष्णाशिवाय."

"सीमा भानावर ये, ते त्यांचं बाळ आहे. तू नाही असा हक्क गाजवू शकत त्याच्यावर."

"हक्क कुठे गाजवत आहे मी, पण त्याची आता इतकी सवय झाली ना मला की, एक क्षणही मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय."

"यालाच तर हक्क गाजवणं म्हणतात ग सीमा. नको ना असा लहान मुलासारखा हट्ट करुस. त्यांना नाही राहायचं आता आपल्यासोबत. समजून घे ग थोडं."

सुजय समजूतदारीच्या शब्दात बोलत होता. पण सीमा मात्र कृष्णाच्या प्रेमात आंधळी झाली होती.

"म्हणजे तुम्ही नाहीच ऐकणार तर माझं? थांबा मीच थांबवते त्यांना. हवं तर सतिश भाऊजी आणि स्मिताच्या पाया पडते. पदर पसरते त्यांच्यासमोर पण त्यांना नाही मी इथून कुठेच जाऊ देणार."

"सीमा थांब, असं काहीच करणार नाहीयेस तू. प्लीज, सांगतो ते ऐक, मला उगीच चुकीचे वागायला भाग पाडू नकोस."

"मी आज तरी तुमचे काहीच ऐकणार नाही. तुम्ही ओरडा माझ्यावर, हवं तर मारा मला; पण हेही लक्षात ठेवा की, कृष्णा माझं विश्व आहे. एक छोटंसं जग गुंफलंय मी त्याच्याभोवती माझं. मग आता तुम्हीच सांगा, त्याच्याशिवाय मी काय करू आता?"

सुजय समजावून थकला होता, पण सीमा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हती. स्वतःची मातृत्वाची भूक ती कृष्णाकडे पाहून, त्याला खाऊ-पिऊ, न्हाऊ-माखू घालून भागवत होती.

आज स्मिता कमी आणि सीमाच कृष्णाची आई जास्त झाली होती.

सीमा आणि सुजयच्या लग्नाला सात ते आठ वर्षे उलटून गेली. पण अजूनही सीमाची कूस काही उजवली नव्हती. त्यावरुन आजही सासूची बोलणी तिला ऐकावी लागत असत. चार माणसांत तिला कमीपणाची जाणीव करून दिली जायची.

शेवटी,
"मातृत्व म्हणजे स्रीचा अनमोल असा दागिना..
त्याशिवाय शोभा नाही तिच्या जीवना.."

असो....पण, आज मात्र स्मिताने कहरच केला. इतक्या दिवसांची तिच्या मनातील भडास एका क्षणात तिने बोलून मोकळी केली.

"हे पहा सीमा ताई, आजपासून मी माझ्या कृष्णाचं सारं काही करेल. तुम्ही नाही काही केलं तरी चालेल. खूप दिवसांपासून मला हे सांगायचंच होतं तुम्हाला. पण कसं बोलू, बोललं तर तुम्ही दुखावल्या जाल; हा विचार करून आजपर्यंत मी शांत होते पण आता न राहवून तुम्ही मला बोलायला भाग पाडलंच."

"स्मिता अगं चुकलं असेल माझं पण मी तरी काय करू? सर्वांनी आग्रह केला म्हणून तर मी कृष्णाला घेवून बसले ना. आणि माझ्याशिवाय नसता ग शांत बसला तो. मान्य आहे तू आई आहेस त्याची, पण तू ऑफिसला गेल्यावर मीच असते ना त्याच्याजवळ. लळा लागलाय ग आम्हाला एकमेकांचा. आणि आधी तूच तर घेवून बसली होतीस ना त्याला. पण तो नव्हता शांत राहत म्हणूनच तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता."

"पण काय गरज होती हे असं करण्याची? मी आई आहे त्याची, मी माझं पाहून घेतलं असतं. कोणी सांगायचं आणि तुम्ही लगेच त्याला माझ्या हातातून ओढून घ्यायचं? अहो एकदा तरी माझ्या मनाचा विचार करता ना. किती आनंदाने लेकराच्या वाढदिवसाचा घाट घातला मी. आज चार चौघांमध्ये माझी काय इज्जत राहिली? स्वतः मात्र वाहवा मिळवली." बॅगा भरता भरता स्मिताच्या मनातील राग बाहेर पडत होता. रागाच्या भरात ती काय बोलत आहे, हे तिचे तिलाही समजत नव्हते.

"स्मिता चुकले ग माझे पण त्यावेळी मला फक्त आणि फक्त त्याचे रडणे दिसत होते. तो शांत व्हावा एवढीच माझी अपेक्षा होती. बाकी मान अपमान हा काहीच उद्देश नव्हता माझा."

"बस्स!! आता पुढे काहीच बोलू नका तुम्ही ताई. आज माझी लायकी तुम्ही दाखवून दिलीत. मी फक्त कृष्णाला नऊ महिने पोटात वाढवलंय. एवढाच काय तो माझा हक्क त्याच्यावर. बाकी माझं  सारं मातृत्व मी तुम्हाला बहाल केलं. पण निदान आजच्या त्याच्या या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी त्याच्यापासून तुम्ही लांब राहायला हवं होतं बस. इतर वेळी मी काहीही बोलले नसते आणि याआधीही कधी बोललेदेखील नाही, पण आता खूप झालं. नाही सहन होत आता."

क्रमशः

सीमा थांबवू शकेल का स्मिताला? चुकून जर थांबवलेच सीमाने तिला तर ती यापुढे सीमाला कृष्णाला हात लावू देईल का? आणि नाहीच थांबली तर सीमा कशी राहू शकेल कृष्णाशिवाय? या सर्व गोष्टी जाणून घ्या पुढील भागात.

©®कविता वायकर

🎭 Series Post

View all