Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

तिचे जग

Read Later
तिचे जग

लघुकथा

विषय- स्त्री आणि परावलंबित्व

उपविषय - तिचे जग

" नेहा , आटप पटकन. पाहुणे येण्याची वेळ झाली आहे " , आईने आवाज दिला.

नेहाला ही आता रोजचीच कटकट झाली होती. पाहायला पाहुणे येणार म्हणले की साडीचे टेन्शन असायचे.

तिला वाटत होते, ' लहानपणापासून मला गावामध्ये सगळ्यांनी ड्रेस मध्ये पाहिले आहे तर येणारा नवरा मुला ने ही ड्रेस मध्ये पाहायला काय हरकत आहे. साडीचा एवढा अट्टाहास कशाला? '

ती चडचीड करतच साडी नेसून बाहेर येत होती. अजून तिचा मेकअप बाकी होता. तसं ही ती मेकअप न करताही सुंदर दिसत होती. पण तिला मुलाकडचे पाहायला येणार होते त्यामुळे रोजच्या पेक्षा वेगळं दिसणं आवश्यक होतं. तिने हलकाच मेकअप चेहऱ्यावर चढवला. ती अजूनच सुंदर दिसू लागली होती.

"आई, किती गोंधळ घालतेस तू. माझे आवरून कधी च झाले आहे ", नेहा म्हणाली.

" अगं दोन तास झाले तू आवरत होतीस म्हणून लवकर आवरून बाहेर ये असं बोलले ", आई म्हणाली.

नवऱ्याकडील पाहुणे मंडळी आली व नेहाला पाहून गेली.

नेहाला मोठा भाऊ सुरेश होता. तो एका उच्च कंपनीमध्ये नोकरी करत होता. तो स्पर्धा परीक्षा ही देत होता. त्यामुळे त्याचे लग्न न करता धाकट्या बहिणीचे लग्न उरकून घ्यायचे ठरले.

नेहाची जेमतेम बारावी झाली होती. तिला शिक्षणाची आवड नव्हती मात्र तिचे अनेक छंद होते. तिला केक बनवायला आवडत होते . स्वयंपाक करण्याची ही आवड होती. तिला नवीन- नवीन रेसिपी बनवायला खूप आवडत असायच्या. तिने ठरवलं असतं तर हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करू शकली असती. पण घरच्यांनी तिला सरळ लग्नाच्या बेडीत अडकवून टाकायचे ठरवले.

नेहा युट्युब वर रोज नवीन- नवीन व्हिडिओ पाहत असायची. 

तिला ही वाटायचे की ,' आपले यूट्यूब चैनल असावे व आपणही शेफ प्रमाणे डिशेस बनवायला शिकाव्या '.

पण तिचे विचार हवेतच विरले.

घरी काही विषय काढला की घरचे सरळ तिला बोलायचे , " स्वयंपाकामध्ये जे काय तुला दिवे लावायचे आहेत ते दिलेल्या घरी लाव. सासरी घरच्यांना पोट भरेल तेवढा स्वयंपाक केला तरी आम्ही भरून पावलो ".

नेहाचे मन मात्र हे ऐकून खट्टू व्हायचे.

लहानपणापासून नेहा ने कधीच आपल्या आई-वडिलांकडे हट्ट केला नाही.

 तिला असे वाटायचे की, ' ते जे काही विचार करतात ते आपल्या भल्यासाठीच करत असतील '.

लहानपणापासून ती कधीच आई -वडिलांच्या आज्ञेबाहेर गेली नाही. तिच्यापेक्षा तिचा भाऊ मोठा असल्याने त्याच्या ही आज्ञेत तिला राहावे लागायचे. 

एक- दोन महिन्यांमध्ये तिचे लग्न ही जमले व अगदी साधेपणाने तिचे लग्न करून देण्यात आले. 

नेहाने लग्नाबद्दल खूप मोठे स्वप्न पाहिले होते. 

' हळदी पासून ते सासरी जाईपर्यंत मोठा फोटो अल्बम व व्हिडिओ शूटिंग करून घ्यायचे ' , असे तिने मनोमन ठरवले होते.

फोटो शूटिंग झाले पण बजेट कमी असल्याने थोडक्यात च आटोपले. फोटो अल्बम ही आकाराने छोटा बनवला गेला होता. हे सगळं तिच्या भावानेच लग्नाचं बजेट व देखरेख केलं होतं. 

नेहाला फक्त मुलगा पसंत आहे का एवढेच विचारण्यात आलं होतं.

संसारासाठी लागणारे सामान ही तिच्या आईने व मावशी ने तिच्या परस्परच घेऊन टाकले होते. नेहाला हे कळत होतं पण ती शांत राहिली.

सासर हे जुन्या परंपरेच्याच विचाराचे होते. नवी नवलाईचे दिवस संपले व तिचा खरा संसार सुरू झाला होता.

नेहा व नितीन, सासू-सासरे , एक छोटी ननंद होती.
तिचे सासर शहराच्या ठिकाणी होते पण घरी तिला साडीच नेसावी लागत असायची. तिची ननंद ही तिच्या च वयाची होती पण ती शॉर्ट कपडे घालत असायची. 

नेहाचे जग लग्ना अगोदर आई- वडील व भाऊ यांच्या अवतीभवतीच फिरत राहिले. लग्नानंतरही सासरच तिचे जग झाले. 

नेहाला वाटायचे की , ' आपली ओळख फक्त माहेर व सासरच्या घरापुरतीच न राहता बाहेरच्या जगात ही व्हावी. पण त्यासाठी कोणता तरी छंद पुढे घेऊन जायला हवा '.

नेहाला स्वयंपाक खूप छान जमत असायचा. सासरकडील मंडळी तिच्या स्वयंपाकावर व घर आवरणाच्या कौशल्यावर खूश होते.

एक-दोन वर्षानंतर तिने हळूच नितीन जवळ केक शिकण्याचा व यूट्यूब चैनल काढण्याचा विषय काढला. पण नितीन ने तो विषय उडवून लावला.

" आपल्या घराण्यात कधीही कोणीही युट्युब वर काम केलेले नाही. त्यामुळे सुनांनी फक्त घर आणि मुलं एवढंच सांभाळावं ", नितीन म्हणाला.

नेहाने परत तो विषय घरामध्ये कधीच काढला नाही.

ती ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती , त्याच बिल्डिंगमध्ये तिच्या दोन-चार मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांनी एकदा कॉन्ट्रीब्युशन करून प्रत्येक मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. तसा तिने तिचा प्लॅन नितीनला सांगितला.

" वाढदिवस साजरे करायला तुम्ही आता लहान आहात का? जो माणूस कष्ट करतो त्यालाच पैशाची किंमत कळते. तू दिवसभर घरी बसून राहते . तुला कष्टाची जाणीव काय असणार? " , नितीन म्हणाला.

त्या दोघांच्या बोलण्यामध्ये सासूनेही उडी घेतली.

" काय बाई हे नवीनच . तुमचा घरामध्ये वेळ जात नाही म्हणून तुम्हांला असले उद्योग सुचतात. आमच्या वेळी असलं काही नव्हतं बाई. कामं इतकी असायची आमच्या वेळी की त्यातून आम्हांला उसंतच मिळत नसायची " , सासू म्हणाली.

नेहाला आता आपल्यातील उणीव जाणवू लागली होती. 

तिला वाटत होते की, 'आपण लहानपणापासून कधीच आई-वडिलांकडे कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही त्यामुळे आताही आपण हट्ट करू शकत नाही. कारण तसा स्वभावच बनला आहे. आपल्या हातात चार पैसे नसल्याने आपण बाहेरच्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहोत '.

हे विचार तिच्या डोक्यामध्ये सतत येत राहिले. पण ती काहीच करू शकत नव्हती. 

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त घरातीलच कामे आवडीने करत असायची पण हे विचार चक्र तिच्या डोक्यामध्ये पिंगा घालत असत. 

माहेरी जरी जायचे असले तरी तिला सासूची परवानगी मिळाली तरच जाता येत होते. सासू म्हणेल तेवढेच दिवस तिला राहिला मिळायचे माहेरच्या माणसांसोबत. 

नेहाला वाटायचे की, ' संस्कारी बनून राहणे चांगले की वाईट. आपल्या मनाविरुद्ध काही झाले आणि जर आपण बोललो तर आपण वाईट ठरणार व असंस्कारी हे लेबल लागणार . मनाविरुद्ध होत असूनही जर आपण शांत राहिलो तर आपल्या मनाला त्रास होणार '.

नेहा सारख्या अशा कितीतरी ' नेहा ' घरोघरी आपल्याला पाहायला मिळतील. पण खरंच प्रत्येकीने ' ऐकावे जनाचे व करावे मनाचे ' या म्हणी प्रमाणेच वागायला हवे.

समाप्त

सौ . ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड

टीम - सोलापूरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Jyotsna Gaikwad

Electronic Engineer

Hobby to write articles

//