तिचं जग (कविता वायकर)-भाग ४ अंतिम

देवकी बनून कान्हाला जन्म देणं सोप्पं पण यशोदा बनून त्याचा सांभाळ करणं तितकंच कठीण.


एके दिवशी रात्रभर लेकराची किरकिर सुरू होती. आता सकाळी सकाळी कुठे त्याला शांत झोप लागली होती. स्मिता आणि सतिशची झोप काही नीट झालीच नाही त्यामुळे.सकाळचे पावणे सात झाले असतील.
"लेकरू झोपलंय तर पटापट कामे आवरुन घ्यावीत," म्हणत स्मिता उठणार त्याआधी तिने मायेने अलगद आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले.

पण तिला धक्काच बसला. कृष्णा तापाने फणफणत होता. काय करावे? स्मिताला काहीच सुचेना. सुजयने आणि स्मिताने कृष्णाला घेवून मग लगेचच दवाखाना गाठला. पण एवढ्या सकाळी डॉक्टर अजून आले नव्हते.

डॉक्टर येईपर्यंत ड्युटीवर असलेल्या नर्सने प्राथमिक उपचार सुरु केले. थंड पाण्याने लेकराला पुसत असताना त्याचे रडणे मात्र स्मिता आणि सतिशच्या जिव्हारी लागत होते. दोघांचेही डोळे पाण्याने डबडबले होते.

डॉक्टर आल्यानंतर त्यांनी कृष्णाला तपासले. व्हायरल इन्फेक्शनमुळे कृष्णा आजारी पडला होता. "अजून दोन तीन दिवस तरी हे असेच सुरू राहील," डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार औषधेही दिली.

दवाखान्यातून घरी येईपर्यंत स्मिता एक शब्दही बोलली नाही सतिशसोबत आणि बोलणार तरी काय आणि कशी ना? कारण तिला खूपच अपराधी वाटत होते. मनातील भावना अश्रूंवाटे ओसंडून वाहत होत्या.
"या सर्वाला आपणच जबाबदार आहोत," हे समजण्याइतपत ती नक्कीच हुशार होती. तिने सतिशची मनापासून माफी मागितली.

"हरले रे सतिश मी.आई होवूनही या आईपणाच्या परीक्षेत मात्र सपशेल नापास झाले मी. खरंच स्वतःला आई म्हणून घ्यायचीही लाज वाटते आहे आज. आईच्या शब्दात येवून मी डोक्यात राग घालून घेतला आणि घर सोडण्याचा इतका मोठा निर्णय घेतला. पण माझ्या या चुकीची शिक्षा आज माझ्या लेकराला भोगावी लागत आहे, याचेच खूप वाईट वाटत आहे मला."

रडतच स्मिताने तिचे मन मोकळे केले. तेवढ्यात दारात तिचे आई बाबा उभे. सतिशने फोन करून त्यांना सर्व हकीकत सांगितली होती. आई दोघांसाठी डबा घेऊन आली होती. लेकरासाठी साजूक तुपातील मऊ मऊ शिरासुद्धा आणला होता आईने. शेवटी आईचेच मन ते, लेकीसाठी आणि नातवासाठी धाव घेणारच.

स्मिता मात्र आज आईसोबत थोडी हटकूनच वागत होती."या सर्वांला जेवढी मी स्वतः जबाबदार आहे तेवढीच आईसुद्धा जबाबदार आहे. कशाला उगीच माझ्या सुखी संसारात नाक खुपसलं तिने? लेकीची इतकीच काळजी वाटत होती तर चार हिताच्या गोष्टी सांगायच्या होत्या तिला समजून, नाही की तिचे कान भरायला हवे होते. आणि मी पण एक मूर्ख, कोणी कितीही आणि काहीही सांगितले तरी मी मात्र त्यावर लगेच विश्वास ठेवला?"

स्मिता खोल विचारांत गुंतली होती.

"लग्न करून सासरी गेले त्या दिवसापासून सीमा ताईंनी मला लहान बहिणीसारखा जीव लावला. घरातील कामाचे कधी दडपण जाणवू नाही दिले की कधीच कोणत्या कामाची अपेक्षासुद्धा केली नाही. मी नोकरी करते, पण एकदाही बोलल्या नाहीत, ती नोकरी करते आणि घरातील कामे मी एकटीनेच का करायची म्हणून?
\"शेवटी ज्याचे त्याचे नशीब असते, आपल्याकडे जे नाही त्यासाठी उगीच रडत बसण्यापेक्षा आपला आनंद आपणच शोधावा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे परमेश्वराची काही ना काही तरी योजना ही ठरलेलीच असते.\" या अशा विचारांच्या सीमा ताई, कोणाबद्दल काय वाईट विचार करणार? पण हे त्यावेळी का नाही लक्षात आले माझ्या?"

विचार करता करता स्मिताच्या अश्रूंनी आता परिसीमा गाठली.

"स्मिता, नको ना ग रडू. होईल कृष्णा ठीक. लहान मुलं आजारी पडल्याशिवाय थोडीच ना मोठी होणार आहेत."

लेकीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आईने पदर पुढे केला.

"थांब आई! बोलणं सोप्पं असतं ग, पण प्रत्यक्षात जेव्हा काही गोष्टी घडतात तेव्हाच त्याचे गांभीर्य समजते. आता माझे डोळे पुसून काय उपयोग? घडणाऱ्या गोष्टी तर घडून गेल्या. आता डोळे पुसण्याऐवजी वेळीच कानउघाडणी केली असती तर आज ही वेळच आलीच नसती, असे नाही का ग वाटत तुला? अगं दोन महिन्यापूर्वीपर्यंत किती बाळसे धरले होते लेकराने आणि आता बघ काय अवस्था झाली आहे त्याची? सीमा ताईंवर इतका अविश्वास दाखवला आणि त्या परक्या केअरटेकर बाईवर मात्र क्षणात विश्वास ठेवला मी."

"मान्य आहे मीच तुला काही गोष्टी सांगायला नको होत्या. पण मलाही मन आहे ग. जेव्हा काही गोष्टी चुकीच्या असो अगर नसो पण मनाला त्या खटकतात ना तेव्हा मन मात्र आपल्या हक्काच्या व्यक्तीचाच आधार शोधू पाहतं. जो आधार मला तू सोडून कोणात दिसूच शकत नव्हता त्यावेळी. सीमा ताईंबद्दल बोलले मी तुझ्याजवळ.पण मी चुकीची असू शकते असे एकदाही नाही का ग वाटले तुला?"

"माफ कर स्मिता मला. मीही नातवाच्या प्रेमात वाहवत गेले ग. खरंच त्याला तुझ्यापासून कोणी दूर करेल, अशी भीती मलाही वाटली. म्हणूनच भावनेच्या भरात काही चुकीचे सल्ले दिले मी तुला. मागच्या दोन महिन्यापासून तुझी होणारी ताणाताण पाहून मलाही त्या गोष्टीची जाणीव झाली."

"जाणीव झाली! तरी अजूनही गप्पच बसलीस? अगं काय नाही केलं सीमा ताईंनी माझ्यासाठी? आई न होताही माझ्या लेकराची खरी यशोदा माई त्या झाल्या. आई असून मी जेवढं केलं नाही कृष्णासाठी तेवढं त्यांनी केलं. थोडं जरी लेकरू रडायला लागलं तरी रात्री अपरात्री माझा खंबीर आधार बनून मला साथ दिली त्यांनी. माहेरची की तुझी साधी आठवण सुद्धा कधी होऊ दिली नाही मला.
ज्या गोष्टीसाठी मी घर सोडले, ती गोष्ट मला कधी मिळालीच नाही. ना मी एक आई म्हणून स्वतःला सिद्ध करु शकले, ना बायको, ना सून म्हणून. माझ्या या चुकीच्या वागण्याची शिक्षा मात्र माझ्या लेकराला भोगायला लागत आहे आज. मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आई आणि तुलाही."

"बघितलं का सौभाग्यवती. तरी म्हणालो होतो ना मी तुम्हाला, नका लेकीच्या संसारात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालू. पण नाही, आम्ही नेहमी चुकीचेच असतो. आम्हाला काहीच कळत नाही." स्मिताचे बाबा तावातावाने तिच्या आईला बोलत होते.

"बाबा तुम्ही शांत व्हा बरं. जे झालं ते झालं आता आणि स्मिता तू देखील काहीही बोलू नकोस, बस झालं आता. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी." आता मधेच आई बाबांच्यात वाद सुरू नको व्हायला म्हणून सतिशने परीस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

"चांगल्यासाठी होतं म्हणजे?" स्मिताने आश्चर्यकारकरित्या प्रश्न केला.

"म्हणजे...तू जर घर सोडण्याचा निर्णय घेतला नसता तर तुला सीमा वहिनीची किंमत कधी समजलीच नसती? अगं आपल्या कृष्णामुळे तिला तिचं नवं जग गवसलं होतं. तूही तिच्या त्या छोट्याशा जगाचा एक भाग होतीस. मातृत्वाचे सुख तुझ्यामुळेच तर ती भरभरुन जगत होती. बरं, फक्त कृष्णाच नाही तर तूही तिच्यासाठी तितकीच महत्त्वाची होतीस. मग ती तुझ्या बाळाला तुझ्याचपासून कसे काय तोडेल?
उलट ती नाही तर तू स्वार्थी झालीस स्मिता, गरज होती तेव्हा ताई ताई करत राहिलीस आणि गरज संपताच तू अशी पळवाट शोधलीस. जशी तू तुझ्या बाळासाठी स्वार्थी झालीस तशाच आईदेखील तुझ्यासाठी स्वार्थी झाल्या. शेवटी आई ही आईच असते ग. पण जे झालं ते बरंच झालं एका अर्थी."

"चुकलं हो माझं, पण मग काय करू मी आता?"

"काय करू म्हणजे?" अगं घरी जाऊन वहिनीची माफी माग आता."

"पण त्या करतील मला माफ?"

"तिने तर केव्हाच तुला माफ केलंय स्मिता. खूप मोठ्या मनाची आहे माझी वहिनी. अगं एवढं सगळं होऊनसुद्धा वरचेवर लेकराची, तुझी खुशाली विचारण्यासाठी मला फोन करते ती नेहमी. तुझे खूप हाल होत असतील, म्हणून खूप वाईट वाटते तिला. कृष्णा आजारी असल्याचे जर तिला समजले असते तर धावतपळत आली असती ती इथे. पण पुन्हा तुझा गैरसमज नको व्हायला म्हणून मग तिला मुद्दाम नाही सांगितले मी काहीच."

"अहो आत्ताच्या आत्ता मला ताईंकडे घेवून चला. पाय धरुन माफी मागायची आहे मला त्यांची."

"हो हो, अशी घाई करू नकोस. हे दोन तीन दिवस जाऊ दे मग जाऊ आपण. कृष्णालाही बरे वाटेल तोपर्यंत.

नुसत्या घरी ज्यायच्या विचारानेच स्मिताची कळी खुलली. तिने आईला घट्ट मिठी मारली.

"आई, रागाच्या भरात थोडे जास्तच बोलले मी तुला, त्यासाठी सॉरी."

"नाही ग बाळा. सॉरी म्हणून लाजवू नकोस आता मला."

दोन दिवसानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मिता आणि सतिश कृष्णाला घेऊन घरी पोहोचले.

त्यांना पाहून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आजीने कृष्णाला उचलून घेतले. पटापट त्याची पापी घेतली. सीमालाही आता कृष्णाला समोर पाहून स्वतःला रोखणे मुश्किल झाले होते. पण भावनांना आवर घालत ती दुरुनच त्याला नजरेच्या कप्प्यात सामावून घेत होती.

स्मिताला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले होते, सीमाला सामोरे जाताना. पण झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त करणेही तितकेच गरजेचे होते.

"आई दोन मिनिट, कृष्णाला देता का जरा?" म्हणत तिने कमल ताईंकडून कृष्णाला घेतले आणि ती सीमाजवळ गेली.

"ताई...तुमचा कृष्णा. पुन्हा एकदा तुमच्याकडे आलाय. घेणार नाही त्याला?"

क्षणभर सीमा स्तब्धच झाली. पुन्हा एकदा तिला तिचे जग खुणावत होते जणू. डोळ्यांतील आसवांनी क्षणात त्यांची सीमा ओलांडली.

"पुन्हा एकदा द्याल का तुमच्या छोट्याशा जगात आम्हाला छोटीशी जागा?" स्मिताने नजर खाली झुकवतच प्रश्न केला.

क्षणात सारे विसरून दोन्ही हात पसरवून सीमाने तिचे जग तिच्या कवेत सामावून घेतले. अश्रूंचा महापूर आता ओसंडून वाहत होता. प्रेमाचे हे जग पुन्हा एकदा एकरूप झालेले पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले. शेवटी चुकीतूनच माणूस शिकत असतो जगण्याची खरी कला.

"विश्वास" ही अशी एक गोष्ट आहे की जी नात्यांना पुनःपुन्हा सांधण्याची संधी उपलब्ध करून देत असते. शेवटी चुका या माणसाकडूनच होतात. पण चूकीतूनच जो शिकतो तोच मनुष्य जीवनात सुखी आणि समाधानी राहतो.

पुन्हा एकदा सीमाचे प्रेमाचे जग आनंदाने बहरले. कृष्णाच्या बाळलीलांत घराचे मात्र गोकुळ होवून गेले. यशोदा बनून सीमा त्याचे बालपण आवडीने जपत होती. यशोदा होती म्हणून तर देवकीही आता पुन्हा एकदा निर्धास्त झाली होती.

कृष्णा मात्र खूपच नशिबवान होता, एकाच वेळी दोन दोन मातांच्या सहवासात आणि संस्कारांत तो वाढत होता.

खरंच, आता पुन्हा एकदा दृष्ट लागण्याजोगे सीमाचे जग नव्या जोमाने आणि आनंदाने बहरले होते.

बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट ही चुकीचीच असते असे नाही. पण भावनेच्या भरात काही चुकीचे निर्णय घेतले जातात. परंतु, अशावेळी नात्यातील विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कोणी सांगतंय म्हणून आपल्याला काही गोष्टी चुकीच्या वाटतात. पण आपणच आपल्या हक्काच्या नात्यावर अविश्वास दाखवून नात्याची आधीच सैल झालेली गाठ कोणा तिसऱ्याच्या हाती का द्यावी?
प्रत्येक वेळी समोरचा योग्यच सल्ला देईल असे नाही. आपल्या मनाला जे वाटते त्यावर समोरच्याने शिक्कामोर्तब केल्यावर नात्याची गाठ सुटलीच म्हणून समजा.

जसे की या कथेत, स्मिताच्या आईने तिला पाठिंबा दिल्यामुळे नात्यांची गाठ नकळतपणे सुटली होती. तसेही प्रत्येक आईने लेकीच्या संसारात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालणे योग्यच नाही. अर्थातच,कोणतीही आई चुकीची असते असे नाही; पण आपली लेकही कधीतरी चुकू शकते हा विचारदेखील त्यावेळी आईने करायला नको का? नाण्याच्या दोन्ही बाजू विचारात घेवून मगच सल्ला देणे लेकीच्याच फायद्याचे ठरेल आणि तेव्हाच तर ती तिच्या जगात आनंदाने, सुखाने नांदू शकेल.

समाप्त

सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असली तरी वास्तवाची जाणीव करून देणारी आहे.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all