Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग (कविता वायकर)-भाग ३

Read Later
तिचं जग (कविता वायकर)-भाग ३


स्मिताचा निर्णय ऐकून सुजयला आणि सतिशला मात्र एका गोष्टीची खात्री पटली, हे सर्व अचानक नाही घडले. स्मिताचे हे खूप दिवसापासूनचे प्लॅनिंग असावे. तो योग मात्र आज जुळून आला होता. कदाचित या सर्वात स्मिताच्या आईचा हात असावा, ही शंकाही नाकारता येणारी नव्हती.

उगीच आणखी वाद नको म्हणून मग सुजयच्या सांगण्यावरून सतिशदेखील स्मितासोबत जाण्यासाठी तयार झाला. कारण आता ह्या परिस्थितीत स्मिताला जपणे, तिचे मन सांभाळणे खूप गरजेचे होते. पण सीमाचे काय? हा विचार मात्र त्याक्षणी कोणीही केला नाही. ती बिचारी कृष्णा त्याच्या आई बाबांसोबत घराबाहेर पडेपर्यंत फक्त आणि फक्त मनधरणी करत होती सर्वांची.

सीमाची अवस्था पाहून सासूलाही वाईट वाटले. कारण सीमाचे कृष्णासाठीचे प्रेम, तिची दिवसभर त्याच्यासाठी सुरू असलेली धडपड, सर्व घर सांभाळून लेकराला सांभाळताना तिची होणारी धावपळ आणि एवढे करूनसुद्धा तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद; हे सारं कमलताई रोजच अगदी जवळून पाहत होत्या.

"मी सीमाच्या जागी असते तर कदाचित मीही माझ्या जावेच्या मुलासाठी हे सगळं नसते करू शकले. सीमा मात्र याला अपवाद आहे." हे मनातून कमलताईंनी मान्य केले होते.
सीमाचा यात कोणताही स्वार्थ नाही, हे त्यांनाही चांगलेच ठाऊक होते. तिची मातृत्वाची ओढ तिला हे सर्व करायला भाग पाडत आहे, हे त्यांनीही हेरले होते. म्हणूनच एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी स्मिताला समजावण्याचा प्रयत्न केला.

"हे बघ स्मिता.. एकदा विचार कर फक्त, नाही होणार यापुढे तुझ्या मनाविरुद्ध काहीच. पण लेकराला नको ग तोडूस आमच्यापासून असं. कसं करशील तू एकहाती सगळं? तुझ्याबरोबर त्याचेही हाल होतील अगं."

"नाही आई, पण मीही त्याची आई आहे आणि हेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे आता. देव न करो आणि उद्या जाऊन त्याने म्हणावं,\"तू माझी आई नाहीस, सीमाकाकू माझी आई आहे,\" तेव्हा मात्र "आई" या नावाला मी कलंक असेल. जे की मला नको आहे आणि तसेही आई आणि वहिनी आहेच की माझ्या मदतीला. तुम्ही काळजी करू नका."

स्मिताचे सर्व काही आधीच ठरले होते जणू. त्यामुळे आता कोणी कितीही समजावले तरी ती ऐकून घेणार नाही हे सतिशलाही चांगलेच ठावूक होते.

पुढे जास्त स्पष्टीकरण न देता, स्मिताने तिच्या आई बाबांसोबत घराचा उंबरा ओलांडला. पण स्मिता इतकी कशी क्रूर झाली होती कोणास ठावूक? बाजूलाच उभ्या असलेल्या सीमाकडे तिने साधे ढुंकूनही पाहिले नाही.

सीमाच्या निस्वार्थ प्रेमाची आज खऱ्या अर्थाने हार झाली होती. मनातून ती खूपच खचली. तिने स्वतःभोवती विणलेल्या तिच्या छोट्याशा जगातून अगदी सहज काही गोष्टी अलगद निसटून गेल्या होत्या.

स्मिताच्या पाठोपाठ सतिशदेखील जायला निघाला. सतिशची तर \"इकडे आड आणि तिकडे विहीर\" अशीच अवस्था झाली होती. त्यात लेकराची वेगळीच चिंता त्याच्या मनाला सतावत होती.
"वहिनीच्या जीवावर आम्ही दोघेही निर्धास्त होतो. पण आता कसे होणार माझ्या कृष्णाचे?" म्हणत काळजीतच तो दाराजवळ जावून थबकला.

"दादा...वहिनीची काळजी घे आणि जमलं तर मला माफ कर. एक ना एक दिवस स्मिताला तिच्या निर्णयाचा पश्चात्ताप होईल, खात्री आहे मला. सध्या होवू दे तिच्या मनासारखं. पण लवकरच आम्ही पुन्हा घरी परत येऊ, शब्द आहे माझा."

एवढे बोलून डोळ्यांतील अश्रूंनी पापणीच्या कडा ओलांडायच्या आत सतिशने घराचा उंबरा ओलांडला.

अखेर हो नाही म्हणता म्हणता स्मिता छोट्या कृष्णाला घेवून तिच्या नव्या जगात राहायला गेलीच. जिथे सीमाची अजिबात लुडबूड जाणवणार नव्हती तिला. नाईलाजास्तव सतिशला देखील तिच्यासोबत जाणे भागच होते सध्यातरी.

कृष्णाशिवाय आता घर एकदम रिकामे झाले होते. सीमाची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. तिचे जगच आता नाहीसे झाले होते जणू. क्षणात सारे काही बदलले. कृष्णाचा चेहरा तिच्या नजरेसमोरून हटायलाच तयार नव्हता.

"लेकरू रडत तर नसेल ना?" वारंवार तिच्या मनात हा एकच प्रश्न घोळत होता. 
पण क्षणात लगेच तिचे मन गिरकी घ्यायचे, "नको सीमा जास्त विचार करुस, तू थोडीच ना कृष्णाची आई आहे. असे फक्त जीव लावून नाही ग आई होता येत. त्यासाठी आई होतानाच्या त्या मरणयातना भोगाव्याच लागतात. ज्या की तू नाही भोगल्यास, म्हणूनच कदाचित तू आईपणाच्या या परीक्षेत सपशेल नापास झालीस. तू कृष्णाभोवती जे जग तयार केले होतेस, ते तुझे नव्हतेच कधी. खरंच हे म्हणतात तसं, मी उगीच मृगजळाच्या मागे धावत होते का?"

"भास आभासाचा जणू खेळ हा सारा,
हाती येण्याच्या आधीच क्षणात निसटून जाणारा."

कृष्णाच्या विचाराने सीमा मात्र हळवी झाली.

त्या रात्री स्मिता आणि सतिश, स्मिताच्या आई बाबांकडेच राहिले. इच्छा नसतानाही सतिश कधी नव्हे तो सासुरवाडीला राहिला होता. कृष्णाही गाढ झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी स्मिताने  नव्या घरात तिचा छोटासा संसार मांडला. त्यासाठी तिच्या आईनेच तिला पूर्ण मदत केली. गरजेच्या सर्व वस्तू, भांडी सारं काही पुरवलं.

सकाळी उठल्यावर कृष्णा मात्र सीमाला शोधत होता जणू. नव्या घरात तो थोडा बावरला होता. चिडचिड करत होता. स्मिता मात्र घर लावण्यात बिझी होती. दोन दिवसांची तिने सुट्टी टाकली होती. कृष्णाचे आजी आजोबा त्यांच्या परीने त्याला सांभाळत होते. पण लहान लेकरूच ते, जागा आणि माणसे बदलली की चिडचिड करणारच.

स्मिताच्या भावजयीला, रोहिणीला मात्र तिचा हा निर्णय अजिबात पटला नाही.

"इतक्या शुल्लक कारणावरून कोणी घर सोडतं का? ताईंना एवढेही समजत नाही का? सीमा ताईंसारखी जाऊ मिळायलादेखील नशीब लागतं. यांना कोण सांगणार म्हणा ते? पण आईंना तरी काही गोष्टी कळायला हव्यात ना. लेकीला तिची चूक दाखवून द्यायचं सोडलं आणि लेकीच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत या. हेच जर माझ्या आईने केले असतं तर आकांडतांडव करण्यात ह्या सर्वात पुढे असत्या."

सकाळच्या नाश्त्याची तयारी करता करता रोहिणी विचारांत गुंतली होती.

इवल्याशा लेकराला त्याच्या हक्काच्या माणसांपासून तोडले होते स्मिताच्या आईने. पण याला ती स्वतःही तितकीच जबाबदार होती, हेही तितकेच खरे. त्यातच "सीमा कृष्णावर इतका हक्क गाजवत असते की त्यामुळे पुढे जावून ती कृष्णाला कायमची तोडेल तुझ्यापासून. तू कामानिमित्त रोज घराबाहेर असतेस. लेकरू तुझ्याकडे कमी आणि तिच्याकडेच जास्त असते. त्यामुळे ते तुझं कमी आणि तिचंच बाळ जास्त वाटतंय. तू फक्त नावाला आई आहेस कृष्णाची. देव न करो आणि पुढे जावून त्याने तिलाच आई न म्हणो. म्हणूनच म्हणते वेळीच सावध हो. त्यात तिला मुलबाळ नाही म्हणून तर आणखीच काळजी घ्यायला हवी तुला कृष्णाची."
असे काहीबाही सांगून स्मिताच्या आईने तिच्या मनात सीमाविषयी आधीच विषपेरण केली होती. हे आता सतिशच्याही लक्षात आले होते. पण आता व्हायचे ते तर होवून गेले होते.

एकाच दिवसांत स्मिताने छान घर लावले. ती वरवर जरी आनंद दाखवत असली तरी मनातून मात्र काहीतरी चुकतंय, असं तिला मनापासून वाटत होतं. राहून राहून सीमाचा विचार तिच्या मनात घोळत होता. 

पुढे दोनच दिवसांत स्मिताला ऑफिस जॉईन करायचे होते. पण त्याआधी कृष्णाची सोय करावी लागणार होती. तशी आई होतीच मदतीला. पण सर्व कामे तिच्या एकटीने होणारी नव्हती.

कृष्णासाठी मग स्मिताने एक केअरटेकर शोधली. आईदेखील दिवसभर थांबणार होती कृष्णासोबत. तरीही स्मिताला मात्र मनातून भीती वाटत होती. सतिश तर स्मिताच्या कोणत्याच निर्णयाला पाठींबा दर्शवत नव्हता.
"तुला जे हवे ते तू कर. मी कोण आहे मध्ये बोलणारा?" असे म्हणून त्याने या सर्वातून अलगद अंग काढून घेतले.

आता खरी स्मिताची कसरत सुरू झाली होती. ऑफिसला तर ती जात होती पण तिचे संपूर्ण लक्ष मात्र कृष्णाकडेच असायचे. आता तर कृष्णाचे वरचेवर आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढले होते. त्यामुळे स्मिताच्या ऑफिसच्या दांड्यादेखील वाढल्या होत्या. एक वर्षात लेकरू जेवढे रडले नसेल तेवढे या एक महिन्यात रडले होते. तिचे संपूर्ण जगच जणू आता बदलून गेले होते.

दिवसभर ऑफिसमधून दमून भागून आल्यावर रात्रीचा स्वयंपाक करणेदेखील मुश्किल होवून जायचे तिला. आता कोणकोणत्या कामासाठी बाई लावणार ना? हाही प्रश्न होताच. त्यात कृष्णाची दुहेरी जबाबदारी. दोन महिन्यातच स्मिता मात्र पुरती हतबल झाली परीस्थितीसमोर. राहून राहून तिला तिच्या निर्णयाचा पश्र्चाताप होत होता.

तिकडे सीमादेखील कृष्णाच्या आणि स्मिताच्या आठवणीत दिवसरात्र झुरत होती.

"कशी करत असेल स्मिता कृष्णाला पाहून सगळं? परमेश्वरा तुझाच आता आधार. काळजी घे दोघांचीही." म्हणत सीमा देवाला रोजच प्रार्थना करत होती.

तिच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात भावनांची गर्दी रोजच उचंबळून यायची. एक एक आठवण मग तिच्या जगण्याचा आधार बनून जायची. तिचं जग अजूनही त्या आठवणींच्या महासागरात घिरट्या घालत जगण्याचा आधार शोधू पहायचं. पण क्षणात साऱ्या स्वप्नांची राखरांगोळी पुढ्यात दिसायची. कारण कितीही नाही म्हटले तरी मातृत्वाच्या परीक्षेत ती अपयशी झाली होती. आणि जणू काही, हाच तिचा खूप मोठा गुन्हा ठरला होता.
ह्या एकाच कारणामुळे तिचा इतर लहान मुलांवर प्रेम करण्याचा अधिकारच जणू तिच्याकडून हिरावून घेतला जात होता.

क्रमशः

आता स्मिता करेल का पुन्हा सीमाला तिचं जग बहाल? की अजूनही  तिचा हेकेखोर आणि अविचारी स्वभाव तिच्याच त्रासाचे कारण ठरेल? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//