Jan 26, 2022
नारीवादी

तिचे अस्तित्व

Read Later
तिचे अस्तित्व

हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल मळवट आणि गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसुत्र अशी छान सजून ती बसली होती. सगळ्या पाहुण्यांची गर्दी जमली होती. तिची दोन मुले आणि नवरा एका बाजूला उभे होते. सगळे तिचे आप्त, नातेवाईक जवळ असूनही ती बोलत नव्हती. अगदी ऐटीत ती नटूनथटून बसली होती. ना कुणाचा पाहुणचार, ना स्वयंपाकाचे टेन्शन अशी निवांत ती पहिल्यांदाच बसली होती. थोड्या वेळाने तिचा पार्थिव देह उचलला गेला. मोठ्या दिमाखात ती जात होती. कधीच परत न येण्यासाठी..

तिचा नवरा तिच्याकडे पाहतच उभा राहिला. ती जाताना तिला अडवू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच हुरहुर लागून राहिली होती. लेकरांना मिठीत घेऊन त्याने एकच मोठा टाहो फोडला.

ती लग्न करून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्यच बनून गेली. ती खूप काही करत होती. पहाटे पाच वाजता तिची सकाळ होत होती. उठून आवरून नाश्ता बनवण्याची तयारी चालू असायची, नाश्ता झाल्यावर मग तो निवांत उठायचा.. तो उठला की ही त्याच्या अवतीभवती फिरायची. त्याला काय हवे नको ते पाहत होती. मग तिची स्वयंपाकाची धांदल उडत असायची. त्याला वेळेत डबा द्यावा लागत होता.

तो ऑफिसला गेला की मग ओटा स्वच्छ करायचा, कपडे धुवायचे, घराची स्वच्छता सारं काही ती अगदी मनापासून करत होती. पण हे कधी दिसूनच येत नव्हते. ती हाऊसवाइफ होती. ही सगळी कामे बाहेरून करायची म्हटले तर पैसे द्यावे लागत होते. ती मात्र बिनपगारी सगळी कामे अगदी व्यवस्थित करायची.

आज मात्र सगळेच थांबलेले होते. ना डब्याची चिंता ना स्वयंपाकाचे टेन्शन.. ती स्वस्थपणे जात होती. तिचा जन्म जणू त्याचे आयुष्य सुखकर करण्यासाठीच झालेला असतो. तो मात्र साधं तिची विचारपूसही करत नाही. तिचे अस्तित्व ती असताना कधीच जाणवत नाही पण ती गेल्यावर तिची कमी प्रत्येक सेकंदाला जाणवते.

ती असते आदीमाया, घरची लक्ष्मी. पण वेळ प्रसंगी ती काली, दुर्गा सुध्दा बनते. सासरच्यांची मने जपताना माहेर सुध्दा ती उत्तमप्रकारे जपते. सगळी नाती योग्य प्रकारे सांभाळते. सासू सासरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करते. त्यांची योग्य ती काळजी घेते. मुले आजारी पडली की रात्रभर त्यांच्या उशाशी बसून राहते. पण ती आजारी असेल तर साधी विचारपूस करायला कुणाला वेळच नसतो. तिची काळजी घ्यायला कुणाकडे वेळच नसतो.

ती सकाळी उठल्यापासून घरासाठी घरातल्या माणसांसाठी खूप काही करत असते पण त्याची जाणीव कोणालाच नसते. सगळे फक्त तिला गृहीत धरून जात असतात. ती जेव्हा दूर निघून जाते तेव्हाच तिची उणीव भासते. सलील कुलकर्णी यांची कविता "नसतेस घरी तू जेव्हा.." ही तंतोतंत लागू पडते. ती जेव्हा नसते तेव्हाच तिची किंमत कळते.

तिने त्याच्याकडे पहिल्यांदा दिवाळीसाठी हट्टाने हिरव्या रंगाची साडी हवी म्हणून मागितली होती. पण दिवाळी च्या आधीच ती ती हे जग सोडून गेली होती. म्हणूनच तिच्या पार्थिव देहावर हिरव्या रंगाची साडी नेसवली होती. जी आज तिला खूपच खुलून दिसत होती आणि आज ती समाधानाने शांत झोपली होती. तिने कधी कसलाच हट्ट केला नाही की अपेक्षा केली नाही. अगदी मनापासून संसार करत होती. तिचं अस्तित्व ती गेल्यावरच कळतं.

©®प्रियांका अभिनंदन पाटील.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..