'तिचं स्वगत'

एका विधवेचे मनोगत


तिचं स्वगत

अनुजा आयुष्याच्या अशा वळणावर उभी होती की तिच्या हातात गोंधळाशिवाय काहीच नव्हतं.वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी मागं वळून बघतांना तिच्या मनात विचार आला,एवढ्या आयुष्यात जगण्याचे सकस दाणे आपल्या ओंजळीत फारसे पडलेच नाहीत.जे पडलेत ते अगदी दोन-चार आहेत.या एवढ्याश्या दाण्यांची स्निग्धता आपल्याला आयुष्यभर कशी पुरेल? हा भूंगा तिचं डोकं पोखरत होता.


"आपलं लग्नाचं वय झालं तसं रीतीनुसार बघण्याचा कार्यक्रम झाला ,आपण पसंत पडलो, आणि लग्न झालं सुद्धा......लग्नाची आठवण अंगावर रोमांच उठवेल अशा पद्धतीन झालच नाही.आई-वडील पोरगी कधी सासरी जाते याचीच वाट बघत होते.आलेलं स्थळ चांगलं, मुलगा चांगल्या कंपनीत मोठ्ठ्या पगारावर नोकरीला ....मग काय आई-वडील खुश झाले.त्यांना वाटलं मुलगी कुबेराघरी पडली."


लग्नाळू मुलीला आपल्या लग्नात जे-जे करावंस वाटतं ते-ते तिलाही करावसं वाटत होतं.पण...आई-वडीलांनी त्याला महत्वच दिलं नाही.पैसा नाही या सबबीवर हातावर मेंदी नाही, मेंदीमध्ये मधोमध त्याचं नाव नाही,चेह-याला मेकअपचा स्पर्श नाही.


"बरी आहे न चेह-यानं मुलगी ! कशाला हवा मेकअप? उगाच खर्च …" आई-बाबांचं स्पष्टीकरण.


लग्न झालं .....नंतरचे दिवसही खूप आठवणीचे मोती बनून अंगभर घरंगळावेत असे नव्हतेच. ती स्वत:शीच हसली.

"सगळा कसा बेशिस्त कारभार होता. जगण्याचा, वागण्याचा. कसा केला आपण संसार? तो एकुलता एक म्हणून सासू-सास-यांच्या डोळ्यातील निरांजन. या निरांजनाची केवढी काळजी घेतली जायची. काळजी कसली ती!....सगळा वेडेपणा. त्या काळजीनच त्यांचं आरोग्य बिघडलं. या बिघडलेल्या शरीराबरोबर आपण तब्बल बारा वर्षे संसार केला?"



"संसार कसला? लोक नोक-या कशा पाट्या टाकल्यासारख्या करतात तसाच आपण संसार केला. म्हणेल तेव्हा..म्हणेल तशी आपण त्यांच्या सेवेत हजार असायचो.मी बायको थोडीच होते? गुलाम होते.परीटघडीचं वस्त्रं नेसलेली गुलाम. हं…" ती पुन्हा स्वत:शीच हसली.

"एवढ करूनही माझी बाळाशी ओळख झालीच नाही. तशीच राहिले आणि एक दिवस विधवा झाले. सगळंच संपलं.आधी रंगीबिरंगी वस्त्र होती आता पांढरी आली.बस....एवढाच फरक झाला."


"निरांजन विझलं म्हणून सासू-सास-यांना खूप दु:ख झालं. सहाजिकच आहे ते कारण शेवटी ते त्याचे आई-वडील होते. मी दुखावले का?" हा विचार मनात येताच क्षणी ती दचकली…

"आपण दुखावलो की नाही हा खरच संशोधनाचा विषय ठरेल. इतरांना माझ्याकडे बघून काय वाटलं माहित नाही पण मी मात्र दु:खाच्या काठावरच होते. दु:खाच्या घागरीत बुडणा-या मनाचा टाहो ऐकण्याइतकी मी अस्वस्थ झाले नाही. का झालं असेल असं? माहित नाही."

"हे असेपर्यंत पैसे कमावण या गोष्टीशी कधी संबंधच आला नाही. माझी इच्छा होती घेतलेल्या थोड्याफार शिक्षणाचा काहीतरी उपयोग करावा.पण.... घरच्यांनी हे फार मनावर घेतलं नाही.कारण,मी जर नोकरी म्हणून घराबाहेर राहिले तर त्यांच्या निरांजनाची खातिरदारी कोण करणार?" \"निरांजन\"...या शब्दावर पुन्हा तिला हसू आलं.

छोटीशी का होईना पण नोकरी करच. असा तिच्या मैत्रिणीनं तिला जिव्हाळ्याचा सल्ला दिला आणि तो तिला पटला. सासू-सासरे यावर काहीच बोलले नाहीत. तिच्या निर्णयाला ना समर्थन ना विरोध. तिने कणखरपणे नोकरी घेतली थोड्याश्याच पगाराची पण… तिची ओळख जपणारी.

त्याही गोष्टीला आता पाच-सहा वर्षं उलटली.

"मी पुन्हा लग्न करावं अस आता सगळ्यांना वाटू लागलयं.पण...मलाच आता पुन्हा त्या बेडीत अडकायचं नाही. जे मला असं सुचवतात त्यांच्या डोळ्यात मला माझी इस्टेट दिसते. त्यावरचं प्रेम दिसतं. ती एक गोष्ट नशीबानं मला छान दिली. माझा नवरा ...नवरा म्हणून चांगला होता म्हणूनच बराच पैसा माझ्या नावावर मागे ठेवून गेला."

"नव-याबरोबर तो आपला मित्रही असावा असं वाटत होतं. म्हणणारे म्हणतील...कोणता नवरा बायकोचा मित्र असतो? पण मला तसं वाटायचं. आता मला दुस-या नव-याच्या वेग-वेगळ्या नख-यांना बळी पडायचं नाही. वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी नव्या भिडूबरोबर गुलामगिरी पत्करून संसार करायचा नाही."


"एका संसाराचा झालेला विचका पुरे आहे. माहेरून माझ्या दुस-या लग्नासाठी झाला प्रयत्न. भावांनी आणलेलं स्थळ म्हणजे त्याचा वाया गेलेला जिगरी मित्र \"अतुल\".मला याचं आश्चर्य वाटलं की मला अतुल कसा आहे हे माहिती असूनही माझ्या भावाने सभ्यतेचा बुरखा पांघरून हे स्थळ माझ्यासमोर आणलं. पैशांसाठी माणूस किती खालची पातळी गाठू शकतो हे दिसलं.अतुलबद्दल मला माहिती होतं म्हणून बरं… नाही तर सुपातून जात्यात पडल्यासारखं झालं असतं."


"आमच्या मामासाहेबांनीपण केला होता प्रयत्न माझ्या लग्नाचा.पण हेही स्थळ असंच विना नोकरीचा मुलगा. त्रेचाळीस वर्षांची बाई म्हणजे काहीही चालवून घेईल असं बहुदा माझ्या भावाला,मामाला वाटलं असावं. प्रौढ विधवा किंवा घटस्फोटीत स्त्री म्हणजे सार्वजनिक मालमत्ता वाटते लोकांना. विचीत्र लोकांच्या विचीत्र समजुतीला आपण काय करणार?"

"कालच सगळ्यांना स्पष्ट बजाऊन सांगीतलं की माझ्या लग्नाचा प्रयत्न करू नका. माझ्यावर माझे म्हातारे सासू सासरे अवलंबून आहेत. त्यांना वगळून आता माझ्या आयुष्याची कल्पना मी करू शकत नाही. कितीही मतभिन्नता असली तरी आता त्यांचा मुलगा नाही म्हणजे मलाच त्यांचा मुलगा व्हावं लागणार." काल स्पष्टपणे बोलल्यामुळे आज माझं मन बरंच शांत आहे."

कालच तिच्या मैत्रिणीनं दिलेला सल्ला तिला आठवला.मैत्रीण म्हणाली होती, "गरीब मुलींना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घे, दुबळ्या अगतिक जीवांची लेक हो आणि उरलेलं आयुष्य सोनेरी करण्याचा प्रयत्न कर." हे आठवताच ती मनोमन सुखावली आणि उत्साहानं आपल्या स्वप्नाला कृतीत आणण्यासाठी तिनं सकारात्मक पाऊल उचललं.
---------------------------------------------------------------
समाप्त
लेखिका... मीनाक्षी वैद्य